का लिहितोस असं कोणी विचारेल तर माझ्याकडे काहीही उत्तर नाही. मला लिहावं वाटतं, मनापासून वाटतं हे पुरेसं नाही का!
Wednesday, July 27, 2011
Monday, July 18, 2011
गुपित
सागरापरीस आहे काय
अथांग
काळ्या मुग्यांची नेहमी
का रांग
पाडतो अन पितो दोन्हीही
का भांग
चिडल्यावर का असते
नानाची टांग
इंद्रधनुच्या पोटात
कुठून आले रंग
काळ्या काळ्या मेघाचं
कसं भिजत नाही अंग
वादळाला नेहमी कसा
वाऱ्याचा संग
शांत पाण्यातही येतात
कुठून तरंग?
सूर्यामधे कुठून येते
एवढी आग
शांत सुरेल गाण्याचाही
असतो कसा राग
चंद्रावर सांगा पडले
कुठून डाग
पहाटे पहाटे पक्षांना
येते कुठून जाग?
आभाळातल्या नभांनी
मन का उदास
नको त्या विचारांची
मनात का रास
हवाहवासा वाटणाऱ्याचीच
का सुटते साथ
सत्यात सदैव त्यांचा
का आभास?
आईच्या डोळ्यात कुठून
साठतं एवढं पाणी
आजीच्या गळ्यात कशी
गोड गाणी
आजोबांच्या खिशात खुळखुळतात
कशी नाणी
बाबा पण नेहमीच वागतो
कसा फणसावानी
रात्रीला रंग लावला
कुणी काळा
स्वप्नही शोधत येतात
कसा डोळा
डोळ्यात पाणी पण भरुन
येतो कसा गळा
आकलनापलिकडचा प्रकार
हा सगळा
मेल्याशिवाय स्वर्ग
दिसत का नाही
मनासारखं सगळंच असत
का नाही
प्रश्नाला उत्तर मिळत
का नाही
आजकाल बुद्ध हसत का
नाही
प्रत्येकाच्या रक्ताचा
रंग कसा लाल
सगळीकडे पसरुन उरतं
कसं आभाळ
छेद पडली बासरी धरते
कसा ताल
तलवारीपेक्षा श्रेष्ट
असते का ढाल?
फुलांत सुगंध पेरतो
कोण
नारळात पाणी आणतो कोण
काळाच्या उदरातलं जाणतो
कोण
प्रश्नाला जन्मास घालतो
कोण?
मिळतं सगळं पण चुकते
का वेळ
दातांचा चण्याशी का
बसत नाही मेळ
आठवांच्या रंगात रंगते
कशी कातरवेळ
सत्य कि आभास कि हे
फक्त मनाचेच खेळ?
मातीच्या पोटातून उगवतं
कसं पिक
कशाला बसायचं आसवं
पित
पाळायची कशाला जगाची
रीत
जगावं स्वच्छंद.. शोधायचं
कशाला उगाचंच गुपित?
कुणाल प्रकाश रुद्राके
पेपर श्रेडर
आज काल तिला प्रश्न
पडायचा
सगळं संपवलं मग मेसेजेस,
मेल्स..
अन या सगळ्या आठवणी
का जपायच्या?
रोजंच ठरवायची ती सारे
मेसेजेस डिलीट करुन टाकायचे
पण ईनबॉक्स ओपन करताच
जुनेच एसेमेस वाचायचे सत्र तासन तास चालायचे
प्रत्येक एसेमेस मधे
काहिना काही आठवण दडलेली
आजही एकेक आठवण वाचून
ती ओक्साबोक्शी रडलेली
सारा ईनबॉक्सच तिच्या
डोळ्यातून झाला रीता
वाटलं डिलीट करण्यासाठी
काय उरलं आता?
तरीही...
त्याच्यासाठी सेट केलेली
रींगटोन, स्पीड डायल, त्याचे एसेमेस... डिलीट केलं तिनं सग्गळं सगळं
हातात राहीलं आता मोबाईल
नावाचं फक्त एक खेळणं
त्याची सारी लेटर्स,
ग्रिटिंग कार्ड्स अन मॅरेज रजिस्ट्रेशनचा फॉर्मही...
सगळ्याच वस्तू तिने
ऑफिसच्या पेपर श्रेडरमधे टाकल्या
तिच्या डोळ्यासमोर
"त्यांच्या" आठवणींच्या चिंध्या चिंध्या होत राहिल्या..
श्रेडरची घरघर चालूच
होती... तिकडे एक कटाक्ष टाकून स्वतःशीच म्हणाली ती....
"ईमोशन्सही श्रेडरमधे
घालता आल्या असत्या तर किती बरं झालं असतं..."
कुणाल प्रकाश रुद्राके
Saturday, July 16, 2011
मुंबई - ७/१२ ते ७/१३
मिटल्या डोळ्यात आठवणी
अजूनही दाटतात
चिरणाऱ्या काळजाला
कालपरवाच घडल्यासारख्या ताज्या वाटतात
तसं पाहिलं तर...
काल सहा वर्ष झाली
तू मला सोडून गेलास त्याला
सकाळी कामावर गेलेला
तू, रात्री मात्र तू गेल्याचाच फोन आला
पायाखालची जमिन सरकली
डोळ्यातली आसवं डोळ्यातंच
आटली
पदरात दोन लहान मुलं
अन वयस्कर सासू सासरे
वाटायचं हा संसाराचा
गाडा एकट्यानं रेटायचा कसा रे?
"बाबा कुठे गेला?"
चिनूच्या निरागस प्रश्नानं डोळे टचकन भरुन यायचे
पण नेहमी त्याच्याकडे
पाठ फिरवून खोटंच हसून त्याला खोटंच उत्तर द्यायचे.
वरवर सावरलेली, निश्चयानं
उभी राहिलेली मी आतून मात्र हादरले होते
तुझ्या पंखाखाली जगताना
स्वतंत्र उडायलाच विसरले होते
उभी राहले कारण...
कारण चालणारंच नव्हतं
हात पाय गाळून
काय मिळणार होतं सत्यापासून
दूर पळून?
वाटायचं आपली गरज आहे
घराला
म्हणूनंच भीती वाटली
तरी मुंबईच्या गर्दीत झोकून दिलं स्वतःला
लोकलची भीती वाटायची
म्हणून ठरवलेलं बसनंच प्रवास करायचा
लोकलमधे पाऊल ठेवल्या
ठेवल्या डोळ्यासमोर तुझा छिन्नविछिन्न देह यायचा.
आजकाल चिनूला मात्र
कॉलेजला जायला लोकलंच सोयीस्कर वाटते
त्याला परतायला १०
मिनिट उशीर झाला तरी मनी नसत्या विचारांचं काहूर दाटते.
लोकांची सहानूभूती,
नेत्यांची आश्वासनं
विरोधकांचा निषेध,
मेडियाच्या ब्रेकिंग न्यूज...
सगळं सगळं चारदोन दिवसातंच
विरु लागलं
अन रुटीन आपसूकंच त्याच्या
त्याच्या वेगानं फिरु लागलं
लोकांनी मात्र
"रुटिनला" उगाचंच मुंबईच्या स्पिरीटचं नाव दिलं.
गरीबांच्या असहाय्यतेला
आणि नाईलाजाला "सलाम मुंबई" म्हणत गौरवलं
घराकडे बघून मला जमवावंच
लागलं सगळं
निसर्गाचाच नियम तो,
मुंबईनं असं काही केलं नाही वेगळं
आज पाच वर्षांनी पुन्हा
कानठाळ्या बसवणारा आवाज आलाय
चिनू व्यवस्थित आहे
आत्ताच त्यानं फोन केलाय
तरीही काळजाचा ठोका
मात्र चुकलाय
आता पुन्हा आरोप प्रत्यारोप,
लोकांच्या वांझोट्या चर्चा, सरकारचं निर्लज्ज स्पष्टिकरण
विरोधकांचं स्वार्थी
राजकारण... सगळ्याला ऊत येईल
मिडियाही अमानुषपणे,
"पहिल्यांदा अमुक तमुक चॅनेलवर" म्हणत आठवडाभर हिच ब्रेकिंग न्यूज
देईल
आज पुन्हा कित्येकांच्या
डोक्यावरचं छत्र हरवलं असेल
पण लोकांना संकटग्रस्तांनी
खांद्दावर आभाळंच पेललेलं दिसेल
त्यांच्याही घरी येईल
फोन.. शेवटचा
सुरु होईल फाटक्या,
विखुरल्या संसाराला गोळा करण्याचा प्रवास तिचा एकटा
खोटी उत्तरं... निरागस
प्रश्न
खरं माहिती असूनंही
पोरांचं घरासाठी खोटं हसणं
हालाखीमधे असंच पोरं
शिकतील
घरटं वाचवण्यासाठी
"त्याही" घरट्याबाहेर पडतील
तुम्ही रक्त सांडलं
पण त्या डोळ्यात टिपूसही येऊ देणार नाहीत
अवसान गळलं पायातलं
तरीही कुणाला खचू देणार नाहीत
थोडं असं थोडं तसं..
आयुष्य चालूच राहील
कसंनुसं
थोड्याच वेळात सगळं
मनात साठवून.. नाईलाजानंच.. मुंबई जगण्याच्या शर्यतीत पुन्हा धावू लागेल
कुणी आमच्यासारखांच
असहाय्यपणे, कुणी कौतुकानं तरं कुणी चक्क स्वार्थासाठी मुंबईच्या स्पिरीटला परत
"सलाम" ठोकू
लागेल..
हं... चालायचंच...
कुणाल प्रकाश रुद्राके
Saturday, July 9, 2011
वापर
कोपऱ्यातल्या एका बाकावर
एकटा बसलेला तो...
वर्गात गर्दी, बडबड,
घोळके, गोंधळ अन त्या गर्दितही
एकटाच... गोंधळलेला
तो..
सुरुवातीला वाटायचं
चुकलंच आपलं साला
शाळा असो की कॉलेज
मैत्री करायला जमलंच नाही आपल्याला.
शांत, अबोल.. घुमाच
तो खरंतर
चारचौघात बसूनही बोलायचा
नाही कणभर.
पण कुणास ठाऊक कसे
अचानक बदल होत गेले...
दिवस बदलले पण ऋतूसारखे
नेमानं मित्र त्याच्या आयुष्यात येत गेले.
मैत्रीची व्याख्या
बिख्या कधी आवडलीच नाही त्याला
रुचलंच नाही आभाळासारख्या
अथांग नात्याला "व्याख्येमधे" अडकवायला
मित्रांसाठी कधीच काही
नसायचं ठरवून
कुठल्याच मित्रासाठी
ठेवलं नाही कधी हातचं राखून..
सगळं कसं बेधुंद, बेछूट,
उत्कट
ना कसला व्यवहार, ना
औपचारीकता च्यायला माहित नव्हती कसली चौकट
त्याचं बोलणं, त्याचं
हसणं, त्याचं वागणं...
सारंच कसं हवंहवसं
वाटणारं
सुख-दुःखाच्या क्षणी
त्याचं आपलं असणं अगदी मनाला भिडणारं
त्याच्या गप्पा त्याच्या
चेष्टा अन त्याचे जोक्स
त्याची भांडणं त्याचे
रुसवे अन आयुष्याच्या कॅन्व्हासवरचे त्याचे बेछूट स्ट्रोक्स..
त्याचं सुखं त्याचं
दुःखं त्याच्यासोबतचा एकेक क्षण
त्याच्या साथीनं साजरा
केलेला "मैत्रीचा सण"
पैसा अडका मोजदाद जमा-खर्च
आयला या शब्दांना त्याच्या
परीघात नव्हता अर्थ..
मजा मस्ती अन सगळे
राडे
परीक्षा अभ्यास कॉप्या
एकेका प्रॉब्लेममधून सुटण्यासाठी अन सोडवण्यासाठी केलेले किडे.
त्याचं यश त्याचं अपयश
त्याचा आनंद..
अहं... हे सगळं फक्त
त्याचं नाही
त्याच्यात अन मित्रांत
"तुझं माझं" असं कधीच काही नाही
त्याचं ते मित्रांचं
अन मित्रांचं ते त्याचं
ना कसले बंध ना मर्यादा...
समाधान खरंतर फक्त याचंच
त्याच्यापासून मित्र
अन मित्रांपासून तो कधीच नव्हता वेगळा
डोळे मिटून मित्रांवर
विश्वास टाकलेला सगळा.
एक नातं असं मनापासून
जपलेलं
काळजाच्या कोपऱ्यात
उगवताना "लार्जर दॅन लाईफ" बनून रुजलेलं
"स्व" कधी
शिकलोच नव्हतो
मित्रांच्या बाबतीत
कधी चुकलोच नव्हतो
पण तरीही समज गैरसमजाचं
नाट्य घडलं
एके दिवशी असंच अचानक
त्या परीघातल्या एकानं बोलणंही सोडलं
फोन, मेसेजेस, भेटी
गाठी..
प्रयत्न केले भें**
फक्त मैत्रीसाठी
असंच एकदा संबंध तोडून
पाठीवर सांगितलं "यानं" एकाला
गरज होती तेव्हा साला
वापरलं "त्यानं" मला
हं.. "वापर"
च्यायला शब्दंच पाठीतून काळजात येऊन रुतला...
या शब्दानंच तो एक
गोष्ट कळून चुकला...
च्यायला ख्रंरंच
मैत्री करायला जमलंच नाही आपल्याला...
आता ना वर्ग, ना बाक,
ना घोळके, ना गोंधळ तरीही "मी" एकटाच... तसाचं परत गोंधळलेला..
कुणाल प्रकाश रुद्राके.
Thursday, June 30, 2011
॥ माऊली ॥
मुखी नामं त्याचं
हाती टाळ मृदंग
भारावलेलं जीणं माझं
त्याच्यातंच दंग
उरी लागली ओढ, ओढ लागली
तयाची
डोळ्यामधे अवतरली मूर्ति
सावळ्या हरीची
पाऊलास दिसे आता वाट
फक्त पंढरीची
काळजात वाजे धुन, धुन
वाजे हरीनामाची
काळ्या मेघात वसली
आज सावळी माऊली
माझ्या वाटेवर असे,
असे त्याचीच सावली
थेंबा थेंबातून नभीच्या
विठूरायाचं बरसतो
त्याच्या थेंबातून
मला अर्थ अमृताचा गवसतो
आभाळानं पण ल्याला
आज भगवाचं रंग
किरणा किरणातून वाहे
माऊलीचा तरंग
तिन्ही लोकी वसून माझ्या
डोळ्यात दिसतो
लेकराच्या ओठी त्याच्या
आनंदानं तो हसतो
आसमंतात घुमतो हरीनामाचा
गजर
लेकरास तुझ्या आता
तुझाचं आधार
दिंड्या पताकात माझा
हरी दिसे मला
चंद्रभागेच्या तीरी
अन माझ्या उरी विठु गवसला
त्याच्या दर्शनानं
आज सारं भरुन पावलं
त्याच्या चरणातंच मी
सर्वस्व वाहिलं
सावळ्यानं असं वेड
लावलं जीवा
तुझ्या चरणात आता जागा
देगा मला देवा
त्याची आस.. त्याचा
ध्यास..
जगतो त्याचं नामस्मरुनी..
जन्म लागलासे सत्कारणी
बनून विट विठूरायाचे
चरणी..
कुणाल प्रकाश रुद्राके
Saturday, June 25, 2011
पाहीलय मी त्याला...
पहायचे मी रोज त्याला
दिसभर आभाळ उजळताना
त्याच्यासाठी असंच
रोज रोज पोळताना
आभाळाच्या भाळी तिलक
बनून सजताना
आभाळभर पसरुन अंगोपांगी
रुजताना
कातरवेळी रंगाची उधळण
करताना
थकून भागून परतीची
वाट धरताना
आज.. आज पाहिलं मी
त्याला
जाता जाता माझ्या पुढ्यात
भिजताना
शांत निवांत क्षणी
त्या सागराच्या कुशीत निजताना..
तोही असाच दिसभर पोळतो
माझ घर लख्ख करण्यासाठी
माझं कुंकू बनून नटतो
रोज मला सजवण्यासाठी
क्षणोक्षणी असाच झटतो
घरात संस्कार रुजवण्यासाठी
आमच्याच रंगात तो रंगतो
आनंदाची उधळण करण्यासाठी
थकून भागून परतीची
वाट धरतो जेव्हा
आमच्या प्रेमात भिजून
त्याच्या मायेत भिजवतो तेव्हा
समाधानानं पाठ टेकतो
सारं घर सुखानं निजताना
पाहिलय मी त्याला...
माझ्या घराची चौकट
उजळताना
हो, पाहिलंय त्याला...
घरासाठी असाच अथक पोळताना..
भगवंताकडे एकंच मागणं...
असाचं सदैव सजत रहा
बनून माझ्या सौभाग्याचं लेणं
कुणाल प्रकाश रुद्राके.
Monday, June 20, 2011
मुर्दाड मड्याचं जीणं
हिरोसारखं राहणीमान,
आहे व्हाईट कॉलर
स्वप्नही आहे फक्त
कमवायचं डॉलर.
स्लिम ट्रीम बॉडी याची
कसून केलेली जिम
मित्रही म्हणतात लाडानं
याला छोटा भीम
पोरी तर याच्यावर असतात
नेहमी फिदा
त्याच्यासाठीच असतात
दिलखेचक अदा
कॉलेजमधे नेमही छाती
काढून चालतो
बाहेर मात्र चार दोन
टग्यांसमोर शेपूट हा घालतो.
गर्दीत एकदा तिला कोणीतरी
धक्का दिला
यानं त्याकडे सोयीनं
कानाडोळा केला
वर म्हणतो कसा... वर
म्हणतो कसा
देना आता सोडून
काय मिळणार आपल्याला
या रगेलांशी नडून
रागारागात तेव्हा झटकला
हात तिनं
तेव्हापासून चालू आहे
हे मुर्दाड मड्याचं जीणं
काल परवा त्याला कुणीतरी
मागून येऊन धडकला
तब्येत त्याची पाहून
याचा आवाज घश्यातंच अडकला
च्यायला म्हणता म्हणता
म्हणाला काय राव
राग गिळून समजावणीचाच
होता आविर्भाव
चले ए निघ जेव्हा तो
म्हणाला
मनातल्या मनातंच शिव्या
हासडत तो जाऊ दे म्हणून निघाला
भीतीवर राग काढत गाडी
काढली त्यानं
असंच चालू आहे मुर्दाड
मड्याचं जीणं
बातम्यात बघत होता
आण्णा बाबांचं उपोषण
राजकारण्यांना देत
बसला होता दूषण
वैतागून म्हटला भ्रष्टाचाराला
च्यायला घातला पाहिजे आळा
दंड वाचवण्यासाठी ट्रॅफिक
पोलिसाला ५० - १०० देऊन बेशिस्त ट्रॅफिकबद्दल काढत होता गळा
पोराच्या अॅडमिशनसाठी
पैसा जमवत होता
डोनेशन भरताना त्याला
भ्रष्टाचार आठवत नव्हता
स्वतःची पापं झाकत
मोर्च्यात, आंदोलनात मेणबत्त्या पेटवल्या त्यानं
च्यायला चालूये असंच
मुर्दाड मड्याचं जीणं
आज सकाळी लोकलमधे बॉम्बस्फोट
झाला
तेव्हा अचानक याला
देशाचा पुळका आला
पहिल्यांदा चार दोन
शिव्या आल्या ओठी
नकळतंच त्याच्या वळल्या
मग मुठी
डोळ्यामधे उतरली होती
आग
देहबोलीमधे भीती, असहाय्यता
आणि राग
रक्ता मासाचा चिखल
बघताना माथा त्याचा भडकला
सगळीकडच्या बातम्या
बघताना शिव्यांचा यथेच्छ कार्यक्रम त्यानं उरकला
जेवता जेवता बातम्यात
एकेक कुटुंब उध्वस्त होताना त्यानं पाहिलं
लोकलच्या रुळावर सांडलेलं
रक्त त्याच्या धमण्यातून थंड पाण्यासारखं वाहत राहिलं
पोलिसांची भीती
गुंडाची अरेरावी
राजकारण्यांची कूटनीती
अन भ्रष्टाचारानं पोखरलेल्या
दिशा दाही
बदल कसा करणार याच्यात
सर्वसामान्य?
षंढाचं ते जीणं केलं
त्यानं मान्य
चर्चा, बातम्या, आरोप
प्रत्यारोपांना येतो थोडावेळ ऊत
चार दोन तास मानगुटीवर
बसतं बंडाचं भूत
नंतर हेच भूत त्याला
जीवाची भीती दाखवतं
खांदे पाडून, मान खाली
घालून चारचौघात जगायला शिकवतं
आरश्याच्या दुनियेत
त्याला दिसतो फक्त तोच
विमनस्कपणे भावी पिढीतही
असहाय्यतेचं तो रुजवत राहतो रोप
मनातला राग आयुष्यभर
तो मनात गिळत राहीलाए
त्याच्यातला पुरुषार्थ
त्यानं असाच मरताना पाहिलाए
राग मानापमानापेक्षा
च्यायला असतो जीव मोठा
डोळेझाक करुन ओढून
घ्यायचा सामंजस्याचा मुखवटा खोटा
सगळं सगळं विसरुन चार
दोन तासात चालू होतं रुटीन नेमानं
असंच चालत आलय अन चालू
राहणार हे मुर्दाड मड्याचं जीणं, हे मुर्दाड मड्याचं जीणं
कुणाल प्रकाश रुद्राके.
पाऊस पहिला कि??
यावर्षी उन्हाळा जरा जास्तच होता...
अंगाची लाही लाही
त्याचीच वाट पाहत होत्या
दिशा दाही
क्षणा क्षणाला वाढणारी
काहिली
अन घालमेलही वाढलेली
घामेजलेल्या अंगानं
काम करायचा तिला वैताग येयचा
तिनं ठरवलं,
"बास झालं सेव्हिंग, पुढच्या वर्षी आपणही ए.सी. घ्यायचा"
अन पावसाळ्यात नॅनो
कार घेऊ
स्वप्नातल्या पावसाला
सगळ्यांसोबत आपल्याच गाडीतून पाहू..
ती विचारात बुडली तेव्हा
आभाळ भरुन येत होतं
कपाळावरचा घाम पुसत
भानावर आली ती अन खिडक्या ऊघडल्या
नभी जमलेल्या घोळक्यात
तेव्हाच वीजा कडाडल्या
त्या आवाजानं धस्स
झालं उरात
सैरभैर नजर उगाचंच
फिरत राहीली घरात
का कुणास ठाऊक नभीच्या
काळ्या रंगानं तिला आज निराश.. हताश वाटत होतं
मनात अनामिक भीती कि
हुरहुर..
पावसाचं पहिलं पाऊल
कसल्या अघटीताची देत होतं चाहूल
कुठले प्रश्न.. कसली
उत्तरं.. विचारंही मनात कसले?? तिचं तिलाच कळत नव्हतं
वादळी वारा सुटला
ढग फुटल्यासारखा तो
पहिल्या दिवशीच बरसला.
ती असहाय्यपणे खिडकीतून
घरात येणारा पाऊस पाहत राहीली
त्याचवेळेस तो तिचे
रीपोर्ट्स घेऊन डॉक्टरांपुढे बसला होता
डॉक्टरांनी सांगितलं...
सहा महिने फक्त..
तसा त्याच्या काळजाचा
ठोका चुकला
ईकडे खिडकीतून घरात
घुसणारा पाऊस थांबला होता
पण तो आज काळ्या रंगातंच
रंगला होता...
तिला मात्र कळलंच नाही
यावर्षी... आधी वीज
कोसळलीए घरावर
अन मग पाऊस आला भेटीला
डोळ्यातून गालावर..
कुणाल
Monday, June 13, 2011
तपूर... तिपूर.. तिपूर..तपूर..
तपूर तिपूर... तपूर
तिपूर
तो मग्न होऊन संगीत
ऐकत होता..
इन्स्ट्रूमेंटल असूनही
ते त्याच्याशी संवाद साधत होतं
क्षणा क्षणाला नवी
धून
कधी थंड सावली तर जणू
कधी ऊन
आठवणींचा राग प्रेमाचा
सूर
गेल्या काळात परतण्यासाठी
भरल्या डोळ्यानं मन आतूर..
हरेक थेंब त्याला काही
सांगत होता..
काल अन आज मधली दरी
आपसूकंच सांधत होता
पावसाची सर तिचा स्पर्श
काळ्याभोर मेघात दोघांनाही
गवसलेला स्वर्ग
एकत्र भिजताना बॅगेत
पडून राहिलेली रेनकोटची घडी.
खडकवासल्याला जाताना
मित्राकडून उधार घेतलेली गाडी
वाऱ्यावर उडणारे केस
अन चेहऱ्यावरचे पावसाचे मोती
हिरव्याकंच निसर्गापेक्षाही
त्याला भूलवायची "ती"
वाफाळलेला कॉफीचा कप
अन तिच्या चष्म्यावर जमणारे वाफेचे ढग
तिच्या डोळ्यातंच सामावलेलं
त्याचं ईवलसं जग
हात फैलावून पावसाला
मारलेली मिठी
नव्या कोऱ्या प्रेमाच्या
चिंब चिंब भेटी गाठी
तिनं ओंजळीत झेललेले
थेंब अन
आत्ता काचेवर पडणारा
पाऊस दोन्हीचा आवाज अगदी होता सेम टू सेम...
टपूक.. टिपूक... तपूर..
तिपूर...
हॅ.. त्याला कळेना
सगळं काही असूनही आज नॉस्टॅल्जिक का वाटतय???
तेव्हढ्यात तिचा आवाज
आला स्वयपाकघरातून..
ए.. पावसावर कविता
नाही केलीस का यावेळेस
ऐकव ना.. आज जरा रोमॅन्टिक
व्हावसं वाटतंय..
कवितांची वही बाहेर
काढताना तो स्वतःशीच हसला..
बाहेर त्याच्या कवितेला
बॅकग्राऊंड म्युजिक चालूच होतं..
तपूर... तिपूर.. तिपूर..तपूर..
कुणाल
Sunday, May 29, 2011
माहीत नाही...
क्लायमेट चेंज झालं...
आभाळ भरुन आलं..
पण..
आकाश मोकळं व्हायला
किती दिवस लागले
अजून पाऊस पडतोय..
अजूनंही धरतीवर प्रेमाची
बरसात करतोय...
कधी थांबेल माहीत नाही..
आपल्या हातात काहीच
नाही..
पाऊस थोडासा भिजवून
जाईल
कि... पावसात सगळंच
वाहून जाईल
काय होणार काहीच माहीत
नाही...
एवढंच माहितीए..
तो बरसतोय त्याच्या
प्रेमापोटी
अन मी भरलेले असूनंही
रित्या डोळ्यानं बघतोय...
आश्चर्य वाटत असेल
तुला...
माझ्या रित्या डोळ्यांचं
माझ्या कोत्या मनाचं..
शांत कसा मी एवढ्या
वादळात?
अगं वीजा चमकतात माझ्याही
काळजात..
अजूनंही डोळे माझे
बरसतात..
अजूनंही...
काळजाच्या धरतीवर सारं
रितं करतात..
पण..खरंच माहीत नाही
पाऊस कधी थांबणार..?
काळ्जातली दरी कधी
सांधणार?
कधी कधी प्रश्नांची
उत्तरं प्रश्नातंच असतात नाही?
तरीही म्हणतोय आपण
काहीच माहीत नाही...
एक मात्र माहीतीए...
पावसाला, धरतीला, वादळाला, आसमानाला
अन माहीतीये सगळ्यांना...
"आय लव्ह यू"...
पण तुला माहितीये कि
नाही... माहीत नाही...
कुणाल
Subscribe to:
Posts (Atom)
दोघं - भाग १५
तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...










