Monday, July 18, 2011

गुपित




सागरापरीस आहे काय अथांग
काळ्या मुग्यांची नेहमी का रांग
पाडतो अन पितो दोन्हीही का भांग
चिडल्यावर का असते नानाची टांग

इंद्रधनुच्या पोटात कुठून आले रंग
काळ्या काळ्या मेघाचं कसं भिजत नाही अंग
वादळाला नेहमी कसा वाऱ्याचा संग
शांत पाण्यातही येतात कुठून तरंग?

सूर्यामधे कुठून येते एवढी आग
शांत सुरेल गाण्याचाही असतो कसा राग
चंद्रावर सांगा पडले कुठून डाग
पहाटे पहाटे पक्षांना येते कुठून जाग?

आभाळातल्या नभांनी मन का उदास
नको त्या विचारांची मनात का रास
हवाहवासा वाटणाऱ्याचीच का सुटते साथ
सत्यात सदैव त्यांचा का आभास?

आईच्या डोळ्यात कुठून साठतं एवढं पाणी
आजीच्या गळ्यात कशी गोड गाणी
आजोबांच्या खिशात खुळखुळतात कशी नाणी
बाबा पण नेहमीच वागतो कसा फणसावानी

रात्रीला रंग लावला कुणी काळा
स्वप्नही शोधत येतात कसा डोळा
डोळ्यात पाणी पण भरुन येतो कसा गळा
आकलनापलिकडचा प्रकार हा सगळा

मेल्याशिवाय स्वर्ग दिसत का नाही
मनासारखं सगळंच असत का नाही
प्रश्नाला उत्तर मिळत का नाही
आजकाल बुद्ध हसत का नाही

प्रत्येकाच्या रक्ताचा रंग कसा लाल
सगळीकडे पसरुन उरतं कसं आभाळ
छेद पडली बासरी धरते कसा ताल
तलवारीपेक्षा श्रेष्ट असते का ढाल?

फुलांत सुगंध पेरतो कोण
नारळात पाणी आणतो कोण
काळाच्या उदरातलं जाणतो कोण
प्रश्नाला जन्मास घालतो कोण?

मिळतं सगळं पण चुकते का वेळ
दातांचा चण्याशी का बसत नाही मेळ
आठवांच्या रंगात रंगते कशी कातरवेळ
सत्य कि आभास कि हे फक्त मनाचेच खेळ?

मातीच्या पोटातून उगवतं कसं पिक
कशाला बसायचं आसवं पित
पाळायची कशाला जगाची रीत
जगावं स्वच्छंद.. शोधायचं कशाला उगाचंच गुपित?

कुणाल प्रकाश रुद्राके

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...