Friday, May 16, 2008

परत "अनामिक भटकंती"

परत "अनामिक भटकंती"

अनोळखी नजरांच्या गर्दीत आज परत ती नजर दिसली.

पाऊलं माझ्याकडे वळवंत ती ओळखीनं हसली.

ती (प्रश्नार्थक नव्हे आश्वस्त) - हेय ओळखलंस का? किती दिवसांनी....
मी - दिवसांनी नव्हे, रादर आमच्याकडे याला म्हणतात किती वर्षांनी.

ती (हसत) - तू बदलला नाहीस... अजूनही तसाच आहेस... "वेडा".
मी - हं....वेडा, पण आता "वेडा" कुणी म्हणतंच नाही,
वेडा म्हणणारं असं कुणी राहिलंच नाही,
म्हणून मी वेडेपणाचा आवंच आणत नाही.

ती (आता थोडी सावध) - खरंच बदलला नाहीस, अजूनही बोलतोएस बघ कसा टोचून.
मी - ईतक्या वर्षात फुलं कोमेजली गं सारी....काटेच तेवढे राहिले मनांत खोलवर साचून.

ती - कोमेजलेली फुलंच तेवढी दिसतात तुला,
पण त्यांनी दोघातही पेरलेला सुगंध आठवत नाही.
मी - सुगंध अजूनही दरवळतो एकांतात, फरक फक्त ....
एवढाच की मी तो असा चेहऱ्यावर दाखवत नाही.

ती - का रे प्रत्येक शब्दात तुझ्या एवढा कडवटपणा भरलाय?
मी - काय सांगू तुला, काही क्षणांनी माझ्या जीवनातला सारा गोडवाच चोरलाय

ती - किती हळवा होतास तू,
कसा झालास असा कठोर?
मी - दोष तुझा नाही गं, पिसारा कुणीच बघत नाही,
सगळ्यांनाच दिसतो फक्त विद्रुप पायाचा मोर.

ती - मनमोकळ्या गप्पा तर नाहीच,
पण कोरड्या शब्दांची देवाण घेवाण करताना जाणवतोय तुझ्या माझ्यातला दुरावा.
मी - त्याच क्षणी संपलं सारं,
जेव्हा संपला या नात्यातला अन माझ्याच आसवांतला ओलावा.

ती - ईतक्या वर्षानंतरही काळाच्या खपली मागे काळजावरची जखम ठसठसंत आहे.
मी - आज पहिल्यांदाच पाहिली माझी वेदना तुझ्य़ा नजरेत मी,
या मुखवट्यामागे तिला लपवून मी सर्वांना आजही फसवत आहे.

मी (मनाशीच) - कसं सांगू मी, मला दुखवायचं नव्हतं तिला... पण

तिच्या नजरेत आसवं नाही ओठावर हसू पहायचंय
म्हणून तिच्या नजरेतलं माझंच चित्र पुसायचं होतं मला.

ती (ती हि मनाशीच)- कितीही कठोर वागलास तरी माहित्येय मला
त्या हॄदयात माझ्यासाठी अजूनही जागा आहे.
सारी नाती तुटली तरी हे तुटणार नाही
हा मैत्रीचा घट्ट धागा आहे....

परतताना, तिच्या भिरभिरत्या नजरेत झाली गर्दी माझ्याच आसवांची.
माझ्या मात्र काळजात थेट बरसली सर आज पुन्हा तिच्या आठवांची.
कुणाल.

Saturday, March 29, 2008

स्वयपाकघरात थोडी लुडबूड


स्वयपाकघरात थोडी लुडबूड
हल्लीच्या मुलींना स्वयपाकही येत नाही....
कविता वगैरे ठिक आहे, पण सांगा त्यांना कवितेनं पोट मात्र भरत नाही.
स्वयपाकच काय.... सगळ्याच गोष्टीत बायकोला मदत आम्ही करु.
स्वयपाक तिने केला तर भाजी आणायची जवाबदारी हाती आमच्या धरु.
पण स्वयपाकही आम्हीच केला तर ती काय फ़क्त कविता करेल?
बिचाऱ्या नवऱ्यासोबत त्या शब्दांनाही तव्यावर धरेल....
यमक जुळवता जुळवता भाजी खुडायची राहते
दूध ऊतू जाऊन गॅसवरुन मग किचेन ओट्यावर वाहते....
भातात किती पाणी घालू? अजून आईला विचारता....
अरे वरणभातही शिजवता येईना, पण मुलांना कवितेतही धारेवर का धरता?
प्रत्येक सणाला सासुरवाडिवरुन आईला येतो फोन....
सगळ्या सणांना पुरणपोळीचा नैवेद्य का गं.... त्रासिक असतो टोन.
आर्धा किलो गुळ, दिड किलो डाळ, दोन-चार वेलदोडे अन टाकू का जायफळं दोन????
(दोन जायफळं????) अगं जेवतानाच झोपतील जावाईबापू, आईनं सांगताच आदळते तिकडून फोन.
ईडलीचं पिठ किती दिवस भिजवायचं?
आईनं भिजवून दिलं तर किती वेळ शिजवायचं?
पोळ्या म्हणजे तर एकेका राज्याचा नकाशा असतो....
जेवण म्हणजे भूगोलाचा तास.... अन ऑफिसात डबा ऊघडल्या ऊघडल्या हशा पिकतो.
कधीतरीच घरी ईडली किंवा जरा वेगळा बेत असतो....
आर्ध कच्चं आर्ध पक्क शिजलं की पुरता बेत फसतो....
हा फसलेला बेत अन तिचा त्रागा पाहून नवरा बचावात्मक पवित्रा घेतो.
अन स्वयपाकघरातला राडा तसाचं ठेवून मग तिला घेऊन हॉटेलात जेवायला जातो.
जेवता जेवाता विचारतो मग, ए एवढ्यात कवित केली नाहीस का कुठली नवी....?
विसर जरा ते स्वयपाकघर अन घरकाम (ते तर रोजचंच आहे)... एक खरं सांगू, तुझ्यासारखी रसिक बायको मिळायला खरंच नशिबाची साथ हवी....
कुणाल

एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला

एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला

एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला
आहो एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला
कुणाचीतरी गर्लफ्रेंड बनून बघायचंय स्वतःला....
येता जाता आता तो माझे नखरे सहन करेल.
मी सॊडायचा म्हटलं तरी माझा हात हाती त्याच्या धरेल.
आठवण त्याची येईल तेव्हा त्याला मिस कॉल देईन
मिसकॉल देण्यासाठीही त्याच्याच सिमवर ऍडऑन सिमकार्ड घेईन.
छोट्या मोठ्या गोष्टींवर आता मीही बसेन रुसुन.
पिक्चरची दोन तिकिटं त्याच्या हातात बघून, देईन प्रतिसाद हळूच गालात हसून.
पिझ्झा काय बर्गर काय पंजाबी काय नि चायनिज काय.... भरपूर हॉटेलिंग करेन.
सूपपासून फिंगरबाऊल पर्यंत मला हवं तसं, फक्त बिल मात्र त्याच्या हवाली करेन.
वीकेण्ड्सला तर काय शॉपिंगची चंगळ..... शॉप टिल ड्रॉप.
क्रेडिट कार्ड आहे कशासाठी त्याचं, जिथे जाईन तिथे स्वॅप करेन नॉन स्टॉप.
फार नाही पण महिन्यात दोनचारदा लॉंगड्राईव्हचं प्लानिंग असेल.
क्रेडिट लिमिट संपलं तरी त्याच्याकडे कॅश अन पेट्रोकार्डही असेल.
हि सगळी बिलं चुकती करता करता त्याच्या डोक्यावरचे केस जातील
माझ्या घरी मात्र माझ्यासाठी रोज नवी-नवी अन त्याच्यापेक्षा सुंदर सुंदर स्थळं येतील.
मला मागणी घालायच्या गडबडीत हेअर विव्हिंगच्या भरमसाठ खर्चाचं ओझही तो डोक्यावर घेईल.
अन या सगळ्या धांदलीत माझं लग्न मात्र कुण्या एका सुंदर "एन. आर. आय" शी पक्क होईल.
एवढं सगळं भयाण स्वप्न पाहून मी आता जागा होईन.
गणपती बाप्पाच्या पायावर डोकं ठेवून, गर्लफ्रेण्ड वगैरे नाही बनायचं मला अशी शप्पथ घेईन....
गंमत नाही नि स्वप्नातही नाही, कशासाठीच बदलून बघणार नाही स्वतःला.
माझी गर्लफ्रेण्ड नाहीये खर्चिक, लग्न करेन तिच्याशीच, सरतेशेवटी आम्ही दोघेच आहोत ना एकामेकाला......

कुणाल

Monday, March 24, 2008

"निर्माल्यं"

"निर्माल्यं"

एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला....
आहो एकदा मला बदलून बघायचंय स्वतःला
पूजेचं फूल बनून त्या ईश्वराच्या चरणी अर्पण करायचंय स्वतःला.
येता जाता प्रत्येकजण आता हात जोडेल.
देव्हाऱ्यात मला वाहताना,माझ्याच रुपाने "भक्ती" त्यांची घडेल
माझं अस्तित्व तिथे एक दिवसंच असेल(२)
ऊद्या तुम्हाला तिथे नवं फूल दिसेल
एका दिवसांतच आता होईल माझं निर्माल्य.(२)
पण सुकलेल्या फूलाकडे पाहतानाही आठवेल तुम्हाला ते सारं मांगल्य
सुकलेल्या फूलाचीही पाकळी न पाकळी तुम्ही ठेवाल जपून(२)
असंच एके दिवशी मग द्याल मला गंगेमधे झोकून.
पण तिथेही माझ्या नशिबी गंगेचं निर्मळ पाणी असेल(२)
ऊद्या तुम्हाला माझ्या जागी एक नवं फूल दिसेल.
माझं निर्माल्य खऱ्या अर्थानं तेव्हा निर्मळ झालं असेल.(२)
गंगेत न्हायल्यावर कोमेजलेल्या फूलाची पाकळी न पाकळी हसेल
एकंच दिवस का असेना पण तो मी सन्मानाने जगेन.(२)
गंगेमधे मिसळताना तोच मंगलमय दिवस निरंतर मी स्मरेन....
निरंतर मी स्मरेन.......

कुणाल.

माझी कविता हरवलीए.........

माझी कविता हरवलीए.........

माझी कविता हरवलीए.........
नऊ ते पाच पाट्या टाकण्याच्या वेळापत्रकांत.
फक्त पैसांच कमविण्यासाठी जगणाऱ्या या मतलबी जगांत.
शब्दकोशांत ठासून भरलेल्या अवजंड शब्दांच्या गर्दीत.
व्यवसाय, नोकरी-धंद्याच्या गणवेश आणि वर्दित.
दररोज आकडेमोड करुन मांडयला लागणाऱ्या अनिवार्य अशा जमा-ख्रर्चात.
जागोजागी खेटे घालून चपला झिजेपर्यंत कराव्या लागणाऱ्या नोकरीच्या अर्जात.
खरं झाकून ठेवून, खोटंच दाखवणाऱ्या सुंदर मुखवट्यांत.
माझ्यावर रुसून मलांच दुरावलेल्या माझ्या शब्दांच्या दुखवट्यांत.
दिखाव्याखांतर साथ देणाऱ्या शेकडो माणसांच्या कळपांत.
सजीवांची सृष्टि असलेल्या पृथ्वी नावाच्या तथाकथित निर्जीव स्वर्गात.
माझी कविता हरवलीए..... खरंतर माझ्यांत.
कुणी देईल का शोधून, शब्द दुरावल्यापासून माझाच आवाज पोहचंत नाही माझ्यांच अंतकरणात.

कुणाल.

Sunday, March 23, 2008

"भेट"

"भेट"
भेटशील ना तू मला कधीतरी अशीच????
हसशील ना नजरेस नजर मिळवताना कशीनुशी उगीच.
मी समोर असूनही तुझी नजर तो पूर्वीचा मी शोधत असेल.
पण तोच मी, मला मात्र तुझ्याच डोळ्यात दिसेल.
काहीतरी बोलायचं म्हणून विचारेन मी, कशी आहेस तू?
माझं जाऊ दे, तू कसा आहेस? उत्तरादाखल एक प्रश्नच विचारशील तू.
उत्तर माहित असूनही दोघे शांत ऊभे राहू.
आयुष्याच्या एका वळणावर अचानक एकत्र येतानाही, दोघांच्या वेगळ्या होणाऱ्या दिशा पाहू.
मग मी म्हणेन, कसला विचार करतेस एवढा?.... काहीतरी बोल.
तू म्हणशील, तू तरी कुठे बोलतोएस,...... तूही त्याच विचारात बुडलाएस ना खोल?
बोलावसं वाटलं तरी शब्द अपुरे पडतील.
अबोल राहूनही नजरेची भाषा समजून घेण्याची नाट्य मग घडतील.
गतकाळच्या आठवणींमुळे कंठ दाटून आला असेल.
डोळ्याच्या कडांमधे आसवं लपवत चेहरा मात्र खोटं-खोटंच हसेल.
क्षण गोठून जावासा वाटला तरी तेव्हा वेळेचं बंधन असेल.
"निघावंच लागेल आता" या स्वरुपाची असहाय्यता दोघांच्याही चेहऱ्यावर दिसेल.
चटकन निघून जाताना सवयीनं तू, येते मी म्हणशील.
ईतकावेळ डोळ्यात तरळणाऱ्या आसवाला मग टचकन गालावर माझ्या आणशील.
आता मात्र आसवं न रोखता मी तुला खूणेनंच निरोप देईन.
पाठमोऱ्या तुझ्या आकृतीकडे ठिपका होईपर्यंत भरल्या डोळ्यानं पाहत राहीन.
आजसारखं तेव्हाही तू मागे वळून पाहणार नाहीस.
आणि तेव्हाही माझं मन तू एकदातरी वळून पाहण्याची आशा सोडणार नाही.
पाय उचलता घेईन मी तिथून, असंच कधीतरी परत भेटायची वेडी आशा ऊरी घेऊन.
पण तेव्हाच कायमचा मावळला असेल आपल्या नात्याचा सूर्य, विरहाच्या पडद्याआड जाऊन. !!!!

कुणाल.

अनुभवलेलं जग - सुंदर तरुणी.


अनुभवलेलं जग - सुंदर तरुणी.

काल रस्त्यामधे एक सुंदर तरुणी दिसली.
फार पूर्वीची ओळख असल्यासारखी ती गालात गोड हसली.
तिनं माझ्याकडे, मी तिच्याकडॆ हळूच नजर चोरुन पाहिलं.
आता फक्त पुढे जाऊन तिच्याशी बोलायचंच राहिलं.
माझ्याशी बोलायलाही तीच पटकन पुढे सरसावली.
हे स्वप्नं की सत्य हा विचार करुन आता चक्करच यायची राहिली.
मन म्हणालं, "याआधीच तू मला का नाही गं दिसली.
"जरा.... हा पत्ता सांगता का?" असं लडिवाळपणे तिनं विचारलं.
कोमल आवाज ऐकून तिचा, मन कसं आनंदाच्या झऱ्यात न्हायलं.
पत्त्याचा कागद हातून तिच्या घेताना आपसूकच शहारलं.
"थॅंक यू भैय्या" म्हणून सांगितलेल्या पत्त्यावर तडक ती निघाली.
भैय्या ऐकून हिरमूसून, चेहरा पाडून मी ही घरची वाट मग धरली.
आता मात्र पक्क ठरवलंय मी, पत्ता कुणालाही सांगायचा नाही.
विचारलंच कुणी हटकून तर सांगेन, "मी ही ईथे नवीनच आहे, मला काहीच माहित नाही ताई"

कुणाल.

भाऊबीज - ओवाळणी


भाऊबीज - ओवाळणी

नाही गं ताई..... भाऊबीज कोरडी राहत नाही.
कारण कितीही दूर गेलं तरी काळजातला झरा वाहायचा थांबत नाही.
नीट बघ, निरंजन तिथेच नाही ज्योत ईथेही पेटली आहे.
मनाच्या आभाळातली सर आज भाऊबीजेला तुला न मला भेटली आहे.
उसासा दिर्घ असला तरी थंड नाही वाटत आज.
तुझ्याच प्रेमाची त्याला आहे गाज.
मन आठवांच्या हरेक क्षणात....
चिडलो भांडलो तंटलो तरी आजमन घुटमळे तुझ्याच अंगणात.
वेडे तुझं नि माझं अंगण वेगळं कधी नव्हतंच मुळी.
भावनेच्या भरांत आज काहीतरीच बोलतेय खुळी.
बघ हा गधडा आलाय तुझ्या अंगणात.
कर औक्षण माझं, चल ना भाऊबीज साजरी करुयात.
चल, सोबत बसून पुन्हा एकदा आठवांच्या क्षणांची करु ऊजळणी.
द्यायला बाकी काही नाही गं ताई, हे क्षणंच माझ्याकडून समज ओवाळणी.....

तुझाच (गधडा) भाऊ....
कुणाल.

नथुराम गोडसे का बोलतोय????


नथुराम गोडसे का बोलतोय????

नथुराम गोडसे देशासाठी मेला का?
गांधीजींना मारुन तो देशाचं भलं करुन गेला का?
त्याच्या तीन गोळ्य़ांनी एक शरीर मेलं.
त्याच तीन गोळ्य़ांनी गांधीजींच्या विचारांना अजरामर केलं.
अंग झाकायला एक पंचा अन हाती काठी घेऊन सत्याग्रह कोण करतो?
एका हाकेवर जनतेला एकत्र आणणारा, देशासाठीच मरतो.(दुसऱ्याला मारुन नव्हे)
विलायतेहून शिकून आलेला वकिल, गोऱ्यांच्या विरोधात अहिंसेचे शस्त्र घेऊन ऊभा राहतो.
घरची श्रीमंती लाथाडून, एका आश्रमातून देशाच्या स्वातंत्र्याला त्याचा प्रत्येक श्वास का वाहतो?
जहाल काय नि मवाळ काय, सर्वांचेच ध्येय होते समान.
फक्त बापूच नाही, टिळक, नेताजी अन भगतही होते महान.
शिवबांच्या तलवारीची आठवण नथुरामने करुन देऊ नये.
त्या शूर वीराचं पवित्र नाव एका कटकारस्थानि खुन्याने घेऊ नये.
सत्याग्रह अहिंसा सगळं साफ झूठ आहे, हे आता नथुराम आम्हाला शिकवणार का?
सत्याग्रह, म्हणजे सत्याचा आग्रह आम्ही नथुरामच्या सांगण्यावरुन सोडणार का?
एका निशःस्त्र माणसावर गोळ्या झाडून त्यानं काय अटकेपार झॆंडा लावला?
याउपर बापूंना महान म्हणून, त्यानं मनाचा किती मोठेपणा दावला....
कोणी म्हणावं असं की, देशासाठीच जन्मणार अन देशासाठीच मरणार????
मनातंच ज्याच्या राम नाही तो कुणाला मारुन रामराज्य काय आणणार?
नथुराम गोडसे बोलतोय म्हटलं की सगळे कान टवकारुन ऐकणार.
गांधीजींवर टिका करायची एकही संधी कशी काय सोडणार????
उचलली जीभ लावली टाळ्याला,
पण ....बोलणाऱ्याचं तोंड धरता येत नाही ही खरी भ्रांत आहे.
म्हणूनंच डोळे, कान, तोंड बंद.... आणि सगळे शांत आहे.
कुणाल.

Tuesday, March 18, 2008

"तू होतीस तेव्हा"....

"तू होतीस तेव्हा"....

तू होतीस तेव्हा.....
तो चंद्रही चांदण्याचं लेणं लेऊन रोज रात्री सजत होता.
खिडकितून तुझं सौंदर्य चोरुन पाहण्यासाठी रात्र रात्र जागत होता.
पाऊसही तुझ्याच भेटिसाठी धरणीवर बरसत होता.
तुझ्या गालावर रेंगाळण्यासाठीच तो थेंब थेंब बनून तरसत होता.
तू गेलीस नि बघ,
आपल्या नात्याच्या धरतीवर प्रेमाचा दुष्काळ पडलाय.
आता तर पाऊसही पडत नाही.
चंद्रही दडून बसला कुठे, चांदण्यांच दर्शनही मला आता घडत नाही.
तू गेल्यापासून आसवांनीही माझी साथ सोडली.
सुख दुःखात समान साथ देणाऱ्या अश्रूंनीही साथ सोडावी अशी सांग,
माझ्याकडून गं काय चूक घडली.
तुझ्या साथीत थंडी नेहमीच गुलाबी वाटायची,आता नुसताच बोचरा वारा असतो.
स्मृतीभ्रंश झाल्यापरी त्या गुलाबी आठवणींनाही आता या शुष्क मनांत थारा नसतो.
तुझ्यासवे माझा प्रत्येक दिवस नवा होता.
तुझ्या प्रेमाचा नि सहवासाचा प्रत्येक क्षण मला पुनःपुन्हा हवा होता.
आता मात्र दिवसही वाटतो मला काळरात्र.
रोजंच ऊगवतो सूर्य माझ्यासाठी घेऊन न संपणारं हे काळोखाचं सत्र.
आता मात्र एकंच सांगणं आहे तुला.....
परत तू येऊ नको...अर्ध्यावर सोडण्यासाठी माझा हात आता हाती तुझ्या घेऊ नको.
तुझ्याशिवाय आताशा जगायलाही मी शिकलोय.
हसू येत नाही ओठी पण, मनावरचा घाव दाबून धरुन सर्वांसमोर खोटं खोटं हसायला मी शिकलोय.
येऊ नको परत, माझं नातं नव्यानं त्या आसवांशी जोडण्यासाठि.
शुष्क डोळ्यांनीच जगू दे आता , दाखवू नकोस स्वप्नं, एकत्र जगण्या मरण्याची परत एकदा मोडण्यासाठी....
दाखवू नकोस स्वप्नं, एकत्र जगण्या मरण्याची परत एकदा मोडण्यासाठी....
कुणाल.

पाऊस

पाऊस
असं वाटतं....
सगळी दुःख वाहून जाईपर्यंत
या पावसांत एकट्यानंच चिंब भिजावं.
सोबत फ्क्त तुझ्या आठवणी असाव्या,
बाकी कुणीच नसावं.
बरसणाऱ्या या धारांमधे
आसवं सगळी मिसळून जावी.
आसवं माझी पुसायला
तूच परत माझ्याकडे यावी.
अधुरं हे स्वप्नं माझं
आज ना ऊद्या पूर्ण व्हावं
अधुरंच राहणार स्वप्नं हे जाणवतांच
आसवं गाळून जडावलेल्या पापण्यांनी कायमचंच निजावं......

वाट पाहतोय.....
कुणाल.

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...