आज दिवसाची सुरुवात मस्तं झाली होती. बऱ्याच दिवसांनी तिला उशिरापर्यंत झोपायला मिळालं होतं, आज ना सकाळचा अलार्म होता, ना घाईघाईत उठून आवरायचं होतं, ना धावत पळत ऑफिसची बस पकडायची होती, ना कुणाचे फोन, अन आलेच तर तिला कळणार नव्हतंच कारण आदल्या दिवशी झोपतानाच तिनं फोन सायलेंट करुन ठेवला होता. तिला जाग आली तेव्हा डोक्यावर पंखा गरागरा फिरत होता आणि जमिनीवर गरमंच हवा फेकत होता. त्याचाही नाईलाजंच होता म्हणा, टेंपरेचरंच एवढं वाढलं होतं की सकाळी सकाळी घामाच्या धारा लागत होत्या. पण तिनं गरम हवा, वाढलेलं टेंपरेचर आणि अकार्यक्षम पंखा असल्या फुटकळ गोष्टींकडे आज दुर्लक्षंच केलं होतं, कसल्याही क्षुल्लक कारणावरुन चिडचिड करुन तिला सुट्टी वाया घालवायची नव्हती. तिनं उठून पहिल्यांदा पडदे बाजूला करुन खिडकी उघडली आणि दिर्घ श्वास घेतला. कुणीतरी नुकतंच कुंड्यांना पाणी घातलं होतं. ओल्या मातीचा वास उरात भरुन घेत ती मनापासून खुश झाली, तिला हवी तशीच दिवसाला अगदी परफेक्ट सुरुवात झाली होती.
ती तिच्याच नादात "पुरा~~ लंडन ठुमकदा" गाणं म्हणत हॉलमधे आली. तिच्या गाण्याची चाल ओरीजनल गाण्याच्या किंचितही जवळपास सुद्धा जात नव्हती पण ती असं गाणं म्हणतेय म्हणजे ती चांगल्याच मूडमधे असणार हे त्याला पक्क ठाऊक होतं. ती हॉलमधे आली तेव्हा तो किचेनमधे तिच्यासाठी ओट्स बनवत होता, तिची चाहूल लागताच मागे वळून न बघता मोठ्यानं अन मोठ्या प्रेमानं गूड मॉर्निंग म्हणाला. ती अजूनंही हॉलच्या खिडक्या उघडत तिच्याच नादात "हंगामा हो गया" म्हणत होती.
तो: (आता मागे बघत) ओय क्वीन, गूड मॉर्निंग.
ती: (हातानंच काय म्हणून खुणवत) गूड मॉर्निंग. काय अजून घरी तू?
तो: (तोंड वाकडं करत) हो ना मला जेलस फिल होतंय, तू घरी आराम करणार आणि मी.. असो
ती: (चिडवल्यासारखं हसत) जा जा.. दर सॅटर्डेला तुला सुट्टी असते आणि मी ऑफिसला जाते तेव्हा?
तो: ...
ती: (लाडात) ए.. ऐक ना, तुला आज सुट्टी नाही काढता येणार? जायलाच पाहिजे का?
तो: (वाकुल्या दाखवत) आता का? हा??
ती: ए सोड ना चेष्टा.. चल कुठेतरी जाऊया मस्त, एखादा पिक्चर बघू.. टू स्टेट्स आलाय.
तो: ...
ती: ओय, चल की काय भाव खातोस, मी दाखवते मूव्ही..
तो: ना~~ही.. शक्य नाही आज
ती: बर चल लंच पण.. तोही मीच देते.. अब बोलो..
तो विचार केल्यासारखा चेहरा करुन काही बोलणार एवढ्यात
ती: अब आया ऊट पहाड के नीचे.. चल मी आवरु पटकन.
तो: (ओट्सची डिश तिच्यासमोर ठेवत) सॉरी.. नॉट पॉसिबल. एम.डी सोबत अपॉइंटमेंट आहे माझी.
ती: (हवेत हात उडवत) जा जा..
तो: बाय..
ती: ...
तो: बा~~~~य..
ती: (नाराजीनंच) बाय.
तो जातो न जातो तेवढ्यात तिचा फोन वाजला, मेसेज त्याचाच होता.
तो: सॉरी, आज खरंच पॉसिबल नव्हतं. उद्या एकदम लवकर येतो.
ती: :( एनीवेज ड्राईव्ह सेफली..
तो गेल्यानंतरचे दोन तास आळसात, आवरण्यात, कपाट लावण्यात गेले तिचे. आज सासू सासरे सुद्धा एका लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. दुपारचं जेवण एकट्यानं करायला नको वाटायला लागलं तिला, रोजं ऑफीसमधे काय घरचे सोबत नसायचे पण तरीही घरी कसं सगळे असल्याशिवाय बरं वाटायचं नाही तिला. आणि तो ही नेहमीच म्हणायचा, "असली मजा सब के साथ". तसंही सकाळी त्यानं केलेले ओट्स खाल्ले होते तिनं आणि जेवणंही कमीच होतं तिचं, मग काय टिव्ही बघत काहीतरी सटरफटर खाल्ल तिनं. टिव्हीवरंही फारसं काही बघण्यासारखं नव्हतं. तिनं वैतागून घड्याळाकडे पाहिलं, दुपारचे साडे तीन वाजत आले होते. आळोखेपिळोखे देत तिनं झोपायची तयारी केली, टिव्हीचा टायमर लाऊन मस्त ताणून दिली. झोपेतून उठल्यावर, सगळ्या घरातल्या लाईट्स लावत देवापुढे दिवा लावला तिनं, रामरक्षा म्हटली. आपसूकंच प्रसन्न वाटू लागलं तिला. तसं फार मोठं घर नव्हतं त्यांचं; टेरेस, पार्कींग वगैरे पकडून २५०० वगैरे स्क्वेअर फिट असावं. दिवसा फारसं काही नाही वाटायचं पण रात्री खूप एकटं एकटं वाटायचं, एकट्याला तसं नकोच वाटायचं पण आज ईलाजंच नव्हता. बाहेर जाऊन भाजी, फळं आणावी असं वाटत होतं तिला पण दिवे लागणीला दार बंद करुन जायची ईच्छा होईना मग हॉलची मोठी खिडकी ऊघडून ती बाहेर बघत बसली. बाहेरचा सगळा गोंगाट आत आला, गाड्या, हॉर्न्स, लाईट्स, लोकांचे आवाज आणि गा~~र वारा. ती तिच्याच नादात बाहेर बघत बसली. बराच वेळ तिथे बसल्यानंतर तिला त्याचं बोलणं आठवलं, "खिडकी बंद ठेवत जा रे तुम्ही लोकं, त्या आवाजानं डोकं उठतं माझं", खिडक्यांशी त्याचं काय वाकडं होतं कुणास ठाऊक, हॉल, बेडरुम कुठेही तो आला की पहिल्यांदा खिडकी बंद करायचा आणि ती आली कि पहिल्यांदा खिडकी उघडायची. चालू बंद चा हा खेळ रोजचा होता. आज मात्र खिडकी बंद करायला तो घरी नव्हता, तिनं स्वतःशीच हसत खिडकी बंद केली आणि त्याचा फोन आला.
तो: काय करतीएस?
ती: काय करणार, खिडकीमधे बसले हॉलच्या.
तो: डोकं नाही दुखत का गं तुमचं त्या गोंगाटानं? झोपायच्या आधी खिडकी बंद कर बर का.
ती फक्त हसली.
तो: हसू नकोस, काळजी वाटते म्हणून बोललो
ती: (त्याला चिडवत) ओहो, काळजी आहे तर मग जायचंच नाहीस ना, एकटीला सोडून.
तो: नसतो गेलो गं पण काय करणार कंपनी माझ्या पप्पाची नाही ना.
ती: आणि हो सासऱ्याचीही नाही, बिच्चारा तू.
तो: (कुत्सितपणे हसत) ते सोड, काय केलंस आज?
ती: काहीही नाही. आज माझा एक ऊनाड दिवस होता.
तो: जेवलीस की नाही?
ती: खाल्लं सटरफटर..
तो: ...
ती: नाही झाली माझी ईच्छा एकट्यानं खायची.
तो: ...
ती: असं काय करतोस.
तो: ...
ती: मग मला न्यायचं होतंस.
तो: तुला माहीतीये ते शक्य नव्हतं.
ती: मग सोड तर.
तो: आता नीट जेवणारेस तू.
ती: ...
तो: मी काय बोलतोय.
ती: बघू..
तो: बघू नाही.. नक्की.. समजत नाही का तुला?
ती: तुलाच समजत नाहीए..
तो: अगं असं काय
ती: एवढं मोठं घर आपलं, मी एकटी, रात्र.. नाही ईच्छा होत.
तो: (हसत) तुला भीती वाटतीये.. सोडून बोल.. मला नको सांगूस.
ती: हंम्म्म.. भीती नाही.. एकटं वाटतंय.
तो: ...
ती: कसा रे तू, कशाला गेलास मला एकटीला सोडून? आता मला झोप नाही येणार.
तो: पण तू एकटी कुठे आहेस.
ती: (फणकाऱ्यानं) आता फालतू फिल्मी डायलॉग्ज मारु नकोस. माझ्या आठवणी आहेत ना वगैरे..
तो: ना~~ही...
ती: मग
तो: ज्युनिअर मी आहे ना तुझ्यासोबत
ती: पोटावर हळूवार हात ठेवत हसली स्वतःशी.
तो: एकटा तर मी आहे.
ती: ...
तो: बेडटाईम स्टोरी सांग बेबीला.
ती: चल फोन ठेव. आम्हाला डिस्टर्ब होतंय.
तो: टेक केअर. मुआह टू पिल्लू.
ती: गूड नाईट.
फोन कट करत तिनं त्याला मेसेज पाठवला
ती: आय लव्ह यू.
बेडवर येऊन पडली, पोटावर हात ठेवून बोलू लागली
ती: एक होती चिऊ, एक होता काऊ... चिऊचं घर होतं मेणाचं...
के.पी. आर





.jpg)

.jpg)
