Friday, November 15, 2013

आपला सचिन रीटायर होतोय


""दोनशेव्या कसोटीनंतर सचिन निवृत्त होणार" बातमी वाचली अन सांगता न येण्याजोगी चलबिचल होऊ लागली मनात. फेसबूकवरचं सचिन तेंडूलकर ऑफिशिअल पेज, बीसीसीआयचं पेज, मुंबई इंडियन्सचं पेज, क्रिकईन्फो अन वेगवेगळ्या वेबसाईट्‌सवर वाचूनही खात्री होईना, मनाला पटेना कि सचिन खरंच थांबतोय, उगाच एक वेडी आशा की एखाद्यातरी वेबसाईटवर कळेल आपल्याला की नेहमीप्रमाणे हि अफवाच आहे, पण नाही.. मागल्यावर्षी वन डे मधून निवृत्ती घेतल्यावर वाटलं टेस्ट्‌सची कारकिर्द अजून वाढावी म्हणून हे पाऊल आहे पण त्या गोष्टीला एक वर्षही पूर्ण होण्याआधीच तुझी टेस्टमधूनही निवृत्तीची बातमी. २४ वर्षांच्या झंझावाताला पूर्णविराम, माहिती होतं रे की तू आयुष्यभर खेळणार नाहीस पण तरीही तू एक दिवस रीटायर होणार अन तू आत्ताच रीटायर होणार यात खूप फरक आहे. आपल्या घरी एखादा जीवाभावाचा मित्र येतो, तो येतो तेव्हाच माहिती असतं आपल्याला की तो २ दिवसांनी जाणारे, अगदीच राहिला तर ४ दिवसाच्या वर नाहीच राहू शकत तरीही तो जाताना गळा दाटून येतो, त्याला निरोप देता देता सगळ्यांपासून नजर चुकवत आपण प्रसंगी अश्रू टिपून घेतो हलकेच. आज अगदी तसंच झालंय सचिन, तू चाललाएस तर गळा भरुन आलाय. माहितीये आज ना उद्या जाणारंच तरीही...
क्रिकेटमधे तू अभिमन्यूपेक्षा काही कमी नाहीस, खरंतर काकणभर सरसंच आहेस. सुरुवातीपासून आजवर वॉर्न, मॅकग्रा, फ्लेमिंग, गिलेस्पी, पोलॉक, डोनाल्ड, स्टेन, अक्रम, वकार, सक्लेन, वास, मुरलीधरन, अ‍ॅम्ब्रोज, वॉल्श अन जगातल्या सगळ्याच दिग्गज गोलंदाजांचं चक्रव्यूह भेदत तू निधड्या छातीनं मैदानावर जायचास अन काही क्षणातंच रे सगळ्या फिल्डर्सचं चक्रव्यूह भेदत तुझे फटके चौफेर धावांची बरसात करायचे. तुला चक्रव्यूहात जाणंही चांगलं माहिती होतं अन तेच भेदून बाहेर पडणंही. तुझा प्रत्येक फटका, प्रत्येक खेळी मग ते ० असो, १०-१५-२० असो की शतक असो मला मंत्रमुग्ध करायची, ईतकी की त्यापुढे मला माझी स्वतःची दुःख, माझे प्रॉब्लेम्स माझा वाईट काळही विसरायला होयचं. गेले २४ वर्ष तू आम्हाला फक्त आणि फक्त आनंदंच दिलास, आमच्या अपेक्षा वाढत राहिल्या पण तू कधी तक्रार केली नाहीस, वैतागला नाहीस अन एवढं करुन आमच्यातल्या काही जणांनी तुझ्या निवृत्तीची वेळोवेळी मागणी केली पण तरीसुद्धा तू उत्तर फक्त तुझ्या बॅटनंच दिलंस.तुझ्याशिवाय क्रिकेटचा विचारंच केला नाही रे कधी. मला माहितीये तू क्रिकेटपेक्षा मोठा आहेस असं म्हणणं तुला बिलकुल आवडत नाही पण काय करु सचिन तुझा खेळ बघूनंच आम्ही क्रिकेट काय असतं ते शिकलो, तुला बघतंच मोठे झालो. खरतरं आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच कारण तुझा सुवर्णकाळ आम्हाला याची देही याची डोळा अनुभवता आला.
तुझी बॅटिंग बघण्यासाठी केलेला आटापिटा, शाळा बुडवण्यासाठी केलेले हट्ट, कॉलेजला मारलेल्या दांड्या, तू खेळायला येणार म्हटल्यावर मनात सुरु होणाऱ्या अंधश्रद्धा, ईथेच बसायचं, उठायचंच नाही, हात पाय हलवायचे नाहीत, बोलायचं नाही, पाणीही प्यायचं नाही, तू स्ट्राईकवर असताना स्वतःलाच ऐकू येणारा स्वतःच्या काळजाचा ठोका, सचिनला कोणी काही बोललं तर होणारा संताप, तावातावानं तुझी बाजू मांडत केलेली सगळी भांडणं, कोणालातरी फक्त सचिन आवडतो म्हणून त्याच्याशी जुळणं, तू खेळायला आल्यावर तुझी एकाग्रता, शारजा, वर्ल्ड कप अन सगळ्याच खेळींमधे तू सीमारेषेबाहेर भिरकावलेले चेंडू, चोरटी धाव घेताना चित्त्याच्या चपळाईनं धावणारा सचिन, अंपायरचं बोट वर होण्याची वाट न बघणारा खिलाडू सचिन, खोटा आऊट दिल्यावरंही शांतपणे परतणारा सचिन, शतकानंतर आभाळाकडे समाधानानं पाहणारा सचिन सगळं सगळं कसं अजूनंही अगदी ताजं आहे अन काळजावर कोरलंय कायमचं. तुझा प्रत्येक यशानंतर अक्षरशः मी स्वतः जिंकल्याचा आनंद व्हायचा मला, तुझा अपयशानंतर, तुझ्यावर झालेल्या टिकेनी आतोनात वाईट वाटायचं, मुंबई इंडियन्स हरल्यावर, २००७ च्या वर्ल्ड कपमधे तू श्रीलंकेविरुद्ध फर्नांडोच्या बॉलिंगवर आऊट झाल्यावर, चेन्नईच्या टेस्टमधे तू जीवाचं रान करुनंही पाकिस्तान विरुद्ध सामना गमावल्यावर अन तू कित्येकदा नव्वदित आऊट झाल्यावर मी अक्षरशः रडलोय, फोन स्विच ऑफ करुन एकांतवास ठरलेला असायचा अशा वेळेस, कुणाचं समजावणं नको की चिडवणं नको. पुढच्या मॅचला परत जोमानं फक्त तुला बघायला बसायचो काळीज धडधडायचं परत त्याच इंटेन्सिटीनं अन काल तुझ्या शेवटच्या कसोटीमधे तू खेळायला आलास तेव्हाही ती धडधड तशीच होती, ऐकू आला एवढ्या गोंगाटातही मला माझा ठोका. असं कोणासाठीच वाटत नाही रादर असं कशासाठीच वाटत नाही. २००८-०९ मधे तब्बल ६ वेळेस शतकानी हुलकावणी दिली तुला, नर्व्हस नाईन्टीज... एकदा थिअटरमधे पिक्चर बघत असताना मित्रांचे मेसेज सच्या भन्नाट खेळतोय, सेंच्युरी मारणार, तू ७५ वर असताना मी पिक्चर अर्ध्यात सोडून घराकडे पळालो, तू ९९वर होतास परत एकदा धडधड अन पुढच्याच बॉलवर तू आऊट झालास. त्यावेळेस खात्री झाली होती आमची कि मी मॅच बघितली की तू आऊट होतोस म्हणून त्यानंतर कित्येक दिवस मी तुझी बॅटिंग पाहणं टाळलं फक्त तुझा परफॉर्मन्स चांगला व्हावा म्हणून. त्यानंतर बऱ्याचदा माझ्या आईचा मला फोन येयचा सचिन छान खेळतोय तू घरी येऊ नकोस. त्याच काळात म्हणजे फेब्रुवारी २००९ मधे तू वन डे मधे द्विशतक ठोकलंस, मी ऑफिसमधे होतो, ती मॅच बघणं मला सहज शक्य होतं पण क्रिक‌ईन्फोवर स्कोअर जरी पाहिला तर तू आऊट होशील या भीतीनं मी ऑफिसच्या टेरेसवर जाऊन ऊभा राहिलो होतो, सगळीकडून लोकांचे आवाज ऐकू येत होते, फोनवर मित्र अपडेट्स देत होते अन तुझी डबल सेंच्युरी झाली. वर्षानुवर्ष डोळ्यात जीव ओतून तुझी बॅटिंग बघणारा मी पण तुझी द्विशतकी खेळी लाईव्ह न पहाता रीपीट टेलिकास्ट अन हायलाईट्स मधे पाहिली या दुःखापेक्षा तुझ्या यशाचा आनंद कितीतरी पटिने जास्त होता. वर्ल्ड कप जिंकल्यावर तुला सर्वांनी खांद्यावर उचलून घेतलेला क्षण पाहून भरुन पावलो, तुझ्या स्वप्नातंच आमची स्वप्न बघितली आम्ही. असे कितीतरी क्षण आहेत, प्रत्येकाबद्दल लिहिणं अन बोलणं शक्य नाही.एवढं अन असं प्रेम फक्त तुझ्यावरंच, सांग आता कोणासाठी क्रिकेट बघणार. नाही, नवे प्लेयर्स चांगले आहेतंच पण आमची नाळ तुझ्याबरोबर जोडली गेलीये ईतकी वर्ष आता ती इंटेन्सिटी तो वेडेपणा दुसऱ्या कोणासाठी शक्य नाही.
एवढ्या सगळ्या ऊत्तुंग यशानं हुरळून जाऊन हवेत न जाता, कायमंच जमिनीवर पाय ठेवलेस, टिकेलासुद्धा तेवढ्याच संयमानं सामोरा गेलास. तुझं तुलाच माहीत कसं जमवलंस ते अन म्हणूनंच तू एकमेवाद्वितीय सचिन आहेस. तुझं यश, तुझं अपयश, तुझ्या इंज्युरीज, तुझ्या वेदना या फक्त तुझ्या नाहीत आम्ही ते स्वतःच्या असल्यासारख्या अनुभवल्या.

कदाचित तू रीटायर होशील, नाही होतोच आहेस पण आमच्या मनातून आठवणींतून तू कधीच रीटायर होणार नाहीस, तुझ्यासाठीचा वेडेपणा, दिवानगी, प्रेम, पॅशन कधीच रीटायर होणार नाही हे सगळं तसंच राहील सदैव. सsssचिन सचिनsss... स्टेडियमच्या गर्दितून ऐकू येणाऱ्या आरोळ्या घुमत राहतील कानात वर्षानुवर्ष... अन क्रिकेट राहील आता फक्त आठवणीत.


सलाम सचिन. लव्ह यू. तुझ्या वैयक्तिक जीवनासाठी शुभेच्छा

 कुणाल प्रकाश रुद्राके

(के.पी. आर)

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...