Wednesday, April 23, 2014

दोघं... चौघं - भाग ४


तो आज मोबाईल फोनमधला अलार्म वाजण्याआधीच उठला. तसं तर अंथरुणातून उठला म्हणून ऊठला म्हणायचं नाहीतर तो झोपलाच कुठे होता रात्रभर. आज त्याच्या हालचालीत रोजसारखा उत्साह नव्हता अन सहजताही नव्हती. रोजच्यापेक्षा पाच दहा मिनिट लवकर उठूनंही आवरायला जरा वेळंच लागला. आज टेबलावर नाश्ता आणि टिफिन दोन्हीही नव्हतं आणि असतं तरी त्याच्या या स्लगिश हालचालीमुळे त्याल नाश्ता करायला वेळ राहीलाच नव्हता. मनाविरुद्ध धावतपळतंच त्यानं बस पकडली. एरव्ही तो बसमधे सगळ्यात मागचं सीट गाठून कानात हेडफोन सारायचा. गुलजार, लता, आशा, किशोर, केके बसचा दिड तासाचा प्रवास सुखाचा करायचे त्याचा. आज मात्र त्यानं बॅगेतून हेडफोन बाहेरंही नाही काढले. कुणास ठाऊक कोणता विचार करत होता, खरंतर त्यालाही माहित नव्हतं कोणता विचार करतोय ते. रोज तोंडदेखलं का असेना बसमधल्या एकेकाला गूड मॉर्निंग ग्रीट करायचा आज कोणाकडे ढुंकूनही नाही पाहिलं त्यानं.
तो घरातून बाहेर पडला तेव्हा सगळे झोपले होते, सहाजिकंच आहे म्हणा एवढ्या सकाळी त्याला सुद्धा पर्याय असता तर त्यानंही झोपणंच पसंत केलं असतं, पण..नाईलाज. बसमधे बसल्या बसल्या आज त्याला झोपही येईना, रात्रभर जागरण झाल्यावरही बसमधे टक्क जागं राहण्याची त्याची हि पहिलीच वेळ असावी कदाचित. खूप उदास वाटत होतं त्याला, वाटत होतं कोणालातरी फोन करावा मनसोक्त बोलावं पण एकतर सकाळचे फक्त ७ वाजले होते, त्याला कोणाची झोपमोड तर करायची नव्हतीच पण फोन केला तरी मनसोक्त काय बोलणार हा प्रश्नही होताच. त्याचा आवाज अन बोलण्यातला अडखळलेपणा बघून समोरच्यानं चार प्रश्न विचारले असते तर त्याचं उत्तर त्याच्याकडे निश्चितंच नव्हतं. मग तो डोळे झाकून बसून राहिला, बस तिच्या वेगानं चालत राहीली. एकेकजण आपापल्या स्टॉपवर बसमधे चढले तशी बसमधली बडबड वाढू लागली. कोणी त्याला हाक मारुन ऊठवायचा प्रयत्न केला पण त्यानं डोळे मिटून झोपेचं सोंग घेणंच प्रिफर केलं. बसमधला आवाज हळूहळू कमी झाला, आणि तो त्याच्या विचारांशी एकरुप झाला. हंम्म.. विचार.. कोणते, कोणाचे.. काही माहीत नाही.
तो पहिल्यापासून असाच होता; विचित्र. त्याला कोणी टिफिन दिला नाही, नाश्ता दिला नाही किंवा तो जाताना कोणी साधं उठलंही नाही याचं त्याला किंचितही वाईट वाटत नव्हतं. गेले चार दिवस त्याच्याशी चकार शब्दही स्वतःहून कोणीच बोलत नव्हतं घरात याचा त्याला त्रास होत होता. आपल्या माणसांनी आपल्याला समजून घ्यावं, प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण द्यायची वेळ येऊ नये हि त्याची साधी पण फार वाईट्ट अपेक्षा असायची नेहमी. तसंच कोणाला काही खटकलं असेल तर त्यानं स्पष्ट सांगावं हे लॉजिक. त्याला खरंच कळत नव्हतं नेमकं काय झालंय पण काहीतरी झालं होतं एवढं नक्की. विचार केला तर आठवेना सुद्धा.. दोन दिवसापूर्वी त्यानं क्रिकेटवरुन बाबांशी वाद घातला होता, शेजारच्यांच्या मुलांना काम सांगत जाऊ नकोस म्हणून आईलाही ओरडला होता. बायकोला सारखेच रस्त्यावरचे पदार्थ खाऊ नकोस म्हणून झापलं होतं. याच्याव्यतिरीक्त जेवताना टिव्ही सिरीयल किंवा अजून कशावरुन घरातल्यांची चेष्टा मस्करी केली होती. पण असल्या फुटकळ गोष्टींमुळे कोणी अफेक्ट होईल असं त्याला बिलकुल वाटत नव्हतं. नेमकं काय झालंय याचा विचार करेपर्यंत बस ऑफिसपाशी येऊन थांबली, त्याच्या बॉसनं त्याला हलवून जागं केलं.. हो बसमधल्या लोकांसाठी तरी तो गाढ झोपला होता.
ऑफिसला आल्यापासून त्यानं एकही काम हातावेगळं केलं नाही, त्याचा मूडंच नव्हता आज काम करायचा. ९ वाजल्यापासून लंच टाईमपर्यंतचा वेळ कसा गेला त्याचं त्याला कळेना. आज लंच टाईमला सुद्धा तिचा मेसेज नाही आला.न रहावून त्यानंच मेसेज केला.
तो: जेवलीस का? मी जेवलो जस्ट, आमच्या कँटीनचं जेवणंही चांगलं असतं गं आणि ताकंही होतंच. मस्त जेवण झालंय.
ती: ...
तो: आज खूप बिझी आहेस वाटतं? मला तर काम करायची ईच्छाच नाहीए.
ती: ...
तो: किती वाजता निघणारेस? लवकर जायचं का आज?
ती: काम आहे, नेहमीच्या वेळेत निघेन.
तो: आज जाम उकडतंय, मस्तानी खाऊ जाताना. व्हॉट से?
ती: ...
तो: ओय.. मस्तानी नको तर पाणी पुरी तरी?
ती: ...
खुर्चीत बसल्या बसल्या त्यानं बराचवेळ मोबाईलशी चाळा केला अन मोबाईल खिशात ठेऊन दिला. अजून मेसेज करण्यात काही अर्थ नव्हता. त्यानंतर लॅपटॉपच्या स्क्रीनकडे एकटक बघत बसला, काम तर होतंच नव्हत. बराचवेळ झाला असावं असं वाटून हातातल्या घड्याळाकडे पाहिलं तर आर्धा तास झाला होता फक्त. जागेवरुन उठत त्यानं खिशातला मोबाईल काढला आणि बाबांचा नंबर डायल केला, एक दोन तीन बंद पडेपर्यंत रिंग होत राहीली पलिकडून रीस्पॉन्स नाही आला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं, शांतपणे मोबाईल खिशात ठेऊन तो बेसिनपाशी गेला. तोंड धुवून जागेवर येत त्यानं लॅपटॉप बंद केला, बॅग आवरुन कोणालाही न सांगता बस स्टॉपवर येऊन बसला. त्याच्या घराकडे जाणाऱ्या ५-६ बसेस येऊन गेल्या पण तो बसून राहीला तसाच शून्यात बघत. ना बायकोचा फोन आला ना आई बाबांचा. माझं काय चुकलं हाच विचार करत बसला तो तिथेच संध्याकाळपर्यंत. हा विचार करणं म्हणजे जत्रेतल्या चक्रात बसल्यासारखं होतं, फिरुन फिरुन त्याच जागी येत होता परत तो, पुढे जाता येत नव्हतं. विचार डोक्यातून जाण शक्य नव्हतं, तिथे बसूनंही बराच वेळ झाला होता. ऑफिसचं टायमिंग संपलं होतं पण त्यानं त्या दिवशी ऑफिसच्या बसनं न जाता पी.एम.टी नं जाणं पसंत केलं. कोणताही ओळखीचा माणूस नको होता त्याला आजूबाजूला.
रात्रीचं जेवण आज एकत्र झालंच नाही, टिव्ही सुद्धा बंदच होता आणि सगळ्यांची तोंडही. बेडरुममधे येण्याआधी त्यानं आई बाबांशी बोलायचा प्रयत्न केला. क्रिकेट, मालिका, राजकारण, ऑफीस बरेच विषय काढले पण हो नाही, हंम्म्म शिवाय प्रतिसादंच मिळेना. शेवटी वैतागून त्यानं विचारलं आई बाबांना प्लिज काय झालंय ते सांगा. माझ्याशी असं का वागताय? बाबांनी हात धुतला अन पोर्चमधे जाऊन बसले, आई निर्विकारपणे म्हणाली काही नाही बाबा.. उगाच त्रागा करुन घेऊ नकोस. आमचं काहीच म्हणणं नाही, अन कोणाबद्दलंच नाही.
तो बेडरुममधे गेला पाठोपाठ ती ही आली. अंथरुणावर दोघेही अनोळखी असल्यागत पडून राहिले शेजारी शेजारी.  त्याच्या कानात आईचे शब्द घुमत राहिले आमचं काहीच म्हणणं नाही, अन कोणाबद्दलंच नाही. त्यानं बायकोचा हात धरुन तिला विचारलं काय गं काय झालंय तुम्ही असे का वागताय माझ्याशी? तीही काही बोलेना, परत परत विचारल्यावर भरल्या डोळ्यानं म्हणाली, तू ऊपकार करत जाऊ नकोस रे माझ्यावर. तो लाईट बंद करुन अंधारलेल्या छताकडे बघत राहिला तसाच, अगदी काळोख डोळ्यातून वाहून जाईपर्यंत. दोघांनी एकमेकांकडे पाठ फिरवली आपापल्याच हाताची ऊशी केली अन डोळे मिटले, झोप लागणं न लागणं इम्मटेरीअल होतं त्या रात्री.

दुसऱ्या दिवशीही तो अलार्म वाजण्याआधीच उठला, तेव्हा मात्र झटकन आवरलं. मधे एक रात्र येऊन गेली म्हणून, नाही तर आज दिवस उगवलाच नाही नव्यानं.. कालचाच एक्स्टेंड झाला. निघण्याआधी तिघांसाठीही ब्रेकफास्ट करुन टेबलवर ठेवला त्यानं. बसमधे बसल्या बसल्या बाबांना मेसेज केला, "काय झालंय नाही विचारणार, पण चुकलं असेल तर समजून घ्या ना प्लिज. तुम्ही नाही तर कोण समजून घेणार मला? आणि हो आज रात्री जेवायला जायचंय आपल्याला सगळ्यांना"
बाबांचा रीप्लाय आला: येस :) काही काळजी करु नकोस.
स्वतःशी हसत हसत आज त्यानं तिला मेसेज केला.
तो: निघालीस? ब्रेकफास्ट केलास? टेबलवर ठेवला होता..
ती: आय लव्ह यू... :)

काय झालं होतं याचं कोडं सोडवणं गरजेचं नव्हतं आता त्याला..
त्यानं मेसेज टाईप केला, तिला आणि बाबांना पाठवला: :)
कानात हेडफोन सारले, गुलजार धीरगंभीर आवाजात म्हणत होता, "येह खेल आखिर किस लिए, मन नही उबता"
तो हसला मनापासून..
एक्स्टेंशन नव्हतं.. दिवस चालू झाला होता नव्यानं परत.

के.पी. आर

Monday, April 21, 2014

दोघं - भाग ३


तो रविवार जरा वेगळाच होता. खूप दिवसानंतर ते दोघे सकाळपासूनंच बाहेर होते. सकाळ म्हटलं तरी घरच्यांचा नाश्ता, थोडीफार आवराआवर, कपड्यांना ईस्त्री करुन बाहेर पडायला साडे अकरा वाजलेच. त्यानं गाडीला चावी लावण्याआधी वैतागून हातातल्या घड्याळाकडे पाहिलं, ती त्याच्याकडे पाहून कसंनुसं हसली. नेहमीचंच आहे असं पुटपुटत त्यानं गाडीला किक मारली. पुढचे किमान दोन किलोमीटर तो जरासा घुश्यातंच, तिनं कितीतरी विषय काढून पाहिले बोलण्यासाठी पण हो नाही व्यतिरक्त त्याचा रीस्पाँस शून्य.
ती: आपण बर्फी पाहूया?
तो: हंम्म
ती: छान असेल नाही.
तो: ...
ती: आज ऊन नाहीये तर बरं वाटतंय ना?
तो: ...
ती: काय प्लान मग आपला आज? कुठे जेवायचं?
तो: तू सांग.
ती: ए सॉरी ना. एवढा वेळ तर जाणारंच रे. काय घड्याळाच्या काट्यात अडकून पडतोस. आता वेळ मिळालाय तर बोल ना जरा, नको ना रागाऊ
तो: मी नाही रागावलो.
ती: मग रुसु नकोस.
तो: हंम्म.
त्यालाही आतून कळत होतं, आपण उगाचंच रुसतोय, उगाचंच ताणतोय पण म्हणतात ना कळतय पण वळत नाही तसंच काहीसं झालं होतं. कसा कुणास ठाऊक पण थोड्या वेळात तो नॉर्मल झाला. भरुन आलेलं आभाळ पहिल्या पावसाची चाहूल, शहराबाहेरचं हॉटेल, सारवलेली जमीन, भरगच्च झाडी त्याखाली टाकलेल्या बाजा, पाखरांची किलबील अन ते दोघेच... गप्पाटप्पा मारत त्यांनी मस्त लंच केला, बेसन भाकरी कांदा, ताक. आहा.. खरंच काय दिवस होता. तो बिल देऊन येईपर्यंत तिनं एका पारावर जागा धरुन ठेवली. दोघंही बसून राहिले बराच वेळ काहीही न बोलता. मग तो म्हणाला तिला, परवा खूप उशिर झाला म्हणून विषय टाळलास तू, सोड ना जॉब.. खरंच खूप ओढाताण होते तुझी. ती फक्त हसली अन मान हलवून खुणेनंच नको म्हणाली.
तो: का नको?
ती: अं.. नको.
तो: अगं पण का?
ती: अरे आपले अजून किती प्लान्स पेंडींग आहेत.
तो: कसले प्लान्स?
ती: घराला पडदे करायचेत, रंग देयला आलाय. झालंच तर ते डायनिंग टेबलंही बदलावं म्हणतेय मी. आणि आपली रुम पाहिलीस? त्यात तर किती काय काय करता येईल. पोर्चमधे मस्त वॉलपेपर करायचाय मला आणि फॉल्स सिलींग.
तो: अगं हो हो.. पण हे सगळं एकदमंच करायला हवं का. एकेक करुन करुया ना.
ती: (स्वप्नात रमल्यागत) विचार कर ना. या सगळ्या गोष्टी केल्यावर काय मस्त वाटेल नाही आपलं घर.
तो:...
ती: नाही.. म्हणजे आपलं घर आत्ताही मस्तच आहे पण तरी..
तो: हो अगं पण आपण हे एकेक करुन करुया.. काय म्हणतेस?
ती: (हसून) चल तर मग, आता जाता जाता पडदे बघू.
तो: ..
ती: (दोन्ही हात हवेत उडवत) काय??? नको?
तो: चल.. आणि बजेटमधे असेल तर घेऊनंच टाकू..
.
.
.
ती: ते कसं वाटतं रे, ते ते.. डावीकडून चौथं? हा.. ते थोडसं ऑरेंजी शेडमधलं.
तो: (चेहेरा वेडा वाकडा करत) शी.. ऑरेंज काय अगं
ती: मग तो, प्रिंटेड.. थोडी ब्लूईश शेड आहे तो..
तो: (तोंडदाखलं) ठिके..
सेल्समन: आतल्या बाजूला ब्रासो पाहिजे.... नाही का?
सेल्समनचा ऊत्साह पाहून तो आणि ती एकमेकांकडे बघत हळूच: आधी बजेट कितीपर्यंत जाईल बघूया ना?
.
.
.
गाडीवरुन परतीच्या वाटेवर, त्याच्या कानाशी ती: काय ना मोठे मोठे प्लान आपले..
तो: मोठ्यानं हसत.. स्वप्नं मोठीच बघत जा. पूर्ण करायची जवाबदारी माझी.
ती: तसंही पुढच्या महिन्यात पॉसिबल आहे नाही का रे?
तो: पुढच्या महिन्यात पडदे आणि रंग... त्याच्या पुढच्या महिन्यात डायनिंग टेबल.. आणि दिवाळी पर्यंत फॉल्स सिलींग बिलिंग बघूया... डन?
ती: (हे सगळं केल्यावर आपलं घर कसं दिसेल हा विचार करत ऊत्साहात) येस्स्स.. डन.

दुसऱ्या दिवशी बसमधे परत त्याला मेसेज
ती: डबा घेतलास? टेबलवर फ्रुट्स ठेवले होते. ब्रेकफास्ट केलास की घाईत निघालास तसाच?
तो: सगळं केलंय डोंट वरी..
ती: :)
ती: आणि डील लक्षात ठेव..
तो: डील ईज डील..
ऑफिसमधे दोघेही बिझी.. नेहमीसारखेच.. आठवड्याचा पहिला दिवस.. लंचपर्यंत उसंत नाही.
लंच टाईमला तिचा मेसेज.. नेहमीप्रमाणेच..
ती: कोशिंबीर नक्की खा.. तुला आवडेल आणि ऊन बाधणार नाही.
तो: ...
बराचवेळ त्याचा रीप्लाय नाही.
ती: आवडली नाही का?
तो: ...
दोन एक तासांनी... बॉसच्या केबिन बाहेर येत, त्याचा तिला मेसेज.
तो: दुसरी नोकरी मिळण्याआधी मी हा जॉब सोडला तर?
ती: एनिथिंग राँग?
तो: ...
ती: सोड, आज येतानाच रीजाईन केलंस तरी चालेल.
ती: बोलशील काहीतरी? की घरी आल्यावर बोलूया
तो: मॅनपॉवर रीडक्शन ईन कंपनी. दे आर आस्कींग मी टू लिव्ह ईन अ मंथ ऑर टू.
.
.
.
रात्री बेडरुममधे रोजच्या संवादापेक्षा शांतताच ज्यास्तं
ती: काही काळजी करु नको रे.. मी आहे ना
तो: ...
ती: हे बघ कार लोन, एलायसी वगैरे वगैरे सगळं कटींग होऊनही आपल्याला मॅनेज करता येऊ शकतं.
तो: ...
ती: आणि नोकरी काय दुसरी मिळेलंच की, तू असाच थोडी घरी बसून रहाणार आहेस?
तो: मान हलवत.. नाही तसं नाही.
ती: मग..?
तो: (भरल्या डोळ्यानं) तू एवढी हौशी आणि.. आणि.. कधीच ठरवल्यासारखं होत नाही.. आपण कालंच..
पुढे त्याला बोलवेना. आज त्यानं तिच्या हाताची उशी केली, काही न बोलता डोळे मिटून पडून राहीला.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला बसमधे मेसेज आला (नेहमीसारखाच)
ती: चिअर उप.. मी हौशी आहे पण माझी हौस तर तूच पूर्ण करणार.. फक्त नवा जॉब लागल्यावर. आणि हो तू तर खुश व्हायला पाहीजे, नेक्स्ट मंथपासून तुला नवा जॉब मिळणारे.. आणि तोही आत्तापेक्षा चांगला.
तो: समाधानानं हसत.. येस्स.. हौस तर मीच पूर्ण करणार.
ती: आणि हो डबा घेतलास ना? ब्रेकफास्ट?

आजही तो फक्त हसला स्वतःच्या नशिबावर खुश होऊन.

आणखी एक दिवस सुरु झाला होता... नव्यानं… आजही.

के.पी. आर

दोघं - भाग २


एकिकडे खिडकीत बसून कॉफी पिणारे हे दोघे अन दुसरीकडे घड्याळाच्या काट्यावर दिवस सुरु केलेले ते दोघे.
अलार्म वाजला.. तिनं डोळे किलकिले करुन पाहिले, साडे पाच. स्नूझ करुन परत ती पांघरुणात शिरली. दहा मिनिटात परत एकदा अलार्म वाजला, च्च्चक करुन ती अंथरुणात उठून बसली, तो कुस बदलून पोट पायात घेऊन झोपला. रोजंच सकाळी त्याची पाठ दुखायची मग तो पाय पोटात मुडपून घ्यायचा, बरं वाटायचं थोडा वेळ. पांघरुण बाजूला सारत ती बेडरुम मधून बाहेर गेली, तोंडावर पाण्याचा हबकारा मारुन स्वयंपाकघरात गेली. भाजी मंद गॅसवर परतून, फळं चिरुन ती आवरायला गेली. आंघोळ वगैरे उरकल्यावर तिनं त्याला आवाज दिला, "प्लिज माझ्या डब्यात थोडी द्राक्ष आणि एक दोन अंजीर देतोस" म्हणत रिक्वेस्ट करत ती बाकीचं आवरायला गेली. त्यानं डोळे किलकिले करुन पाहिलं ६:२५ झाले होते, काही ऐकलं नसल्यासारखा तो परत रजई डोक्यावर ओढून पडून राहीला. पाचेक मिनिटांनी त्याला परत जाग आली, त्यानं तिच्या डब्यात फळं घालून दिली तोवर तिची निघायची घाई चालू झाली होती. एका खांद्याला पर्स, त्याच हातात डब्याची पिशवी, एका हातात कचऱ्याची कॅरी बॅग, उजव्या हाताच्या अंगठ्यामधे अडकवलेली गाडीची चावी, हि सगळी कसरत संभाळत तिनं पायात मॅचिंग चप्पल सरकवली अन निघाली. "सावकाश जा, घाई गडबड करुन गाडी चालवू नकोस, अजून ७ मिनिटं आहेत" तिला पाठमोरं पाहत त्यानं सूचना दिल्या. पुढे तसंच चालता चालता तिनं हो म्हणत हात वर करुन बाय केलं.
ती गेल्याबरोबर त्यानं आळस झटकत आवरलं, रजई, अंथरुण सगळं जागेवर ठेवलं आणि स्वयंपाक खोलीत आला. डायनिंग टेबलवर तिनं दूध-पोहे, केळी अन खजूर मिक्स करुन नेमकं पदार्थाचा नाव सांगता येणार नाही असं काहीतरी करुन ठेवलं होतं, ते उभ्यानंच खात, डबा घेऊन त्यानं "आई मी निघालो" म्हणत सातच्या काट्याला घर सोडलं. बसमधे बसतो न बसतो तोवर त्याला मेसेज आला, "निघालास तू? आणि टेबलवर ठेवलेलं खाल्लस?"
तो: हो खाल्लं, बस निघाली १५ मि. झाले. तू कुठपर्यंत पोचलीस?
ती: माझी झोपंच पूर्ण होत नाही रे. कशीबशी बस मिळाली आज, उद्यापासून १० मि. लवकर उठणार. मी पोचले पिंपरीपर्यंत
तो: आळशी होत चाल्लीएस तू. वुई विल सी किती लवकर उठतेस.
ती: :(
तो: ....
पुढल्या एक तासात दोघेही कामाला लागले. ना फोन, ना मेसेज ना व्हॉट्‌स अ‍ॅप. ११ च्या सुमारास तिच्या फोनमधे रिमांडर वाजली. सेफ्टीच्या मिटिंगमधे सगळ्यांना एक्स्युजमी म्हणत तिनं मोबाईलमधे डोकं खुपसलं. "डॉक्टर्स अपॉइंटमेंट अ‍ॅट ७:३०". तिच्या सासऱ्यांची डॉक्टरची अपॉइंटमेंट मागच्या दोन वेळा चुकली होती म्हणून यावेळेस तिनं रिमांडर सेट करुन ठेवली होती. तिनं पुढच्या मिनिटाला घरचा लँडलाईन डायल केला, "आई, आज आबांची डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे साडे सातची" आठवण करुन देत तिनं फोन ठेवला अन परत कामात बुडाली.
दुपारच्या जेवणाआधी तिचा त्याला फोन आला.
ती: जेवलास तू?
तो: नाही, जस्ट कँटीनला आलोय.
ती: ऐक ना, तू एकटा आधी भाजी खाऊन बघ, मला वाटतंय बेचव झालीए अगदीच. बरी वाटली तरंच दे बाकीच्यांना.
तो: एवढा नाही गं विचार करायचा.
ती: बघ मला मीठ कमी वाटतंय.
तो: असू दे.
ती: (थोडी अपराधीपणानं) आणि तिखटसुद्धा थोडसं.
तो: (विषय टाळत, घाईघाईनं) मी म्हणालो ना असू दे.
ती: (जरा नाराजीनं) आणि तीनंच पोळ्या दिल्यात. छोट्या डब्यात लसणाची चटणी आहे ती खा, भाजी नाही आवडली तर. आणि हो, एक अंजीर आणि ऑरेंजही दिलंय संध्याकाळी खायला.
तो: .....
ती: सॉरी मी ठेवते चल, मला माहितीए तुला बोअर झालंय, पण फ्रुट्‌स तसेच परत आणू नकोस, नक्की खा. चल बाय (फोन कट)
पंधरा मिनिटांनी तिला मेसेज...
तो: भाजी ईज डॅम गूड, एव्हरीवन लाईक्‌ड ईट. अँड या मी टू..
ती: :)
लंचटाईम, जेवण, डब्ब्याच्या गप्पा, टाईमपास, थोड्याच वेळात दोघेही परत कामात बिझी. संध्याकाळी परतीची बस अन बसमधे मेसेज
ती: निघालास? मला खूप वाईट वाटतंय रे. फिलींग लो :(
तो: (बसमधे झोपेतून जागा होत) ???????
ती: बघ ना आपल्याला जायला ८ वाजतात ऑल्मोस्ट. आई सगळं काम करतात, मला काहीच करायला जमत नाही. खूप गिल्टी फिल होतं.
तो: मलाही कळतंय गं पण वळत नाही :(
बसचा प्रवास, अर्धवट झोप, खड्डे खुड्डे, धूर धुळ, डिझेलचा वास अन त्यानंतर गाठलेलं घर. हात पाय धुवून, फ्रेश होऊन जेवण मग आईला जरातरी आराम मिळावा म्हणून दोघांनी मिळून केलेली आवरा आवर. आई आबांशी १५-२० मिनिट गप्पा आणि दमून बेडरुममधे दाखल  होणं. अंथरुण टाकून पाठ टेकते ना टेकते तोवर दोघांचा संवाद.
ती: आईंची खूप धावपळ होते रे, या वयात त्यांना सगळं करावं लागतं. मला खूप खूsssssप वाईट वाटतं रे.
तो: हम्म्मं मलाही. काय करुया?
ती: आपल्याला दोघांना तर १५-२० मिनिटही एकत्र स्पेंड नाही करता येत. गप्पा मारणं तर दूरंच पण भेटसुद्धा होत नाही आपली नीट.
तो: ....
ती: मी जॉब सोडू का? घरी सुद्धा लक्ष देता येईल. आणि या प्रवासाचा मलाही खूप कंटाळा येतो रे. सकाळी दिड तास संध्याकाळी दोन तास.
तो: ....
ती: तू कधीच काही बोलत नाहीस. झोपलास का?
तो: आज अकरा तारीख, गाडीचा ईएमआय गेला १३ हजार. ईसीएस आहे ना, ११ म्हणजे ११ ला जातोच, त्याचं १० ही होत नाही आणि ११ ही.
ती: हंम्म्म..
तो: एलायसी, रिकरिंग, पर्सनल लोन, क्रेडीट कार्ड सगळं वजा करुन ३,७०० रुपये उरलेत अकाउंटमधे, अजून १९ दिवस जायचेत.
एका मोठ्या पॉझ नंतर.
तो: (जरासा हसत) तरी बरं फोन आणि लाईट बिल तुझ्याकडे असतं.
ती: ....
.
.
.
तो: सोड तू जॉब, डेअरींग केल्याशिवाय काही होत नाही. आपल्या दोघांचं मिळून कमवण्याची जवाबदारी माझी.
ती: शूssss... झोप आता शांत. ऊशीर झालाय खूप.
तिनं कुस बदलत त्याच्या हाताची उशी केली. दोघांनीही डोळे मिटले, झोप कधी लागली कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी बसमधे त्याला मेसेज आला
ती: निघालास तू? खाल्लस टेबलवरचं? डब्बा घेतला?
तो फक्त हसला.

आणखी एक दिवस सुरु झाला होता... नव्यानं

के.पी. आर

दोघं - भाग १


पहिल्या मजल्यावरचा मोठा, अगदी प्रशस्त हॉल. ४० बाय २० फूटाचा असावा. भिंतीला लटकवलेला एल्सीडी टिव्ही, मोठा फिश टँक, सोफा सगळंच पॉश. एका टोकाला पूर्ण काचेच्या खिडक्या, खिडकी बाहेर दिसणारी आंबा आणि रबराची झाडं, डांबरी रस्ता आणि समोरच्या चाळी, काही बिल्डींग्‌जचे वरचे मजले अन पर्वतीचं शिखर.
भिंतीवरच्या घड्याळात पावणे आठ वाजत आलेले. तिनं हॉलमधे येता येता रांगोळी अन हळदी कुंकवाचे डबे त्यांच्या कप्प्यात ठेवले. हॉल क्रॉस करत स्वयंपाकघरात पोहोचली. रांगोळी काढायला जाण्याआधी गॅसवर ठेवलेली कॉफी उकळली होती, गॅस बंद करुन ती एका छोट्या ट्रेमधे दोन कप घेऊन हॉलमधे आली. तो चष्मा नाकावर चढवून पेपर वाचत होता. खिडकीशेजारी ट्रे ठेऊन ती परत स्वयंपाकघरात गेली, बिस्किटाचा प्लॅस्टीकचा डबा आणला. तिनं काही बोलण्याआधी त्यानं पेपरची व्यवस्थित घडी केली, नाकावरचा चष्मा काढून चपट्या केसमधे ठेवला आणि फिरुन तिच्याकडे चेहरा करुन बसला, दोघांच्या मधोमध कॉफीचे कप, बिस्किटाचा ट्रे. कॉफी पित एखाद दुसरं बिस्कीट खात दोघेही खिडकीतून बाहेर बघू लागले. वर्दळ वाढू लागली होती, तिनं स्लायडींग विंडो सरकवली आणि गाड्यांचे, हॉर्न्सचे, बाहेरचे सगळेच आवाज हॉलमधे भरले. पुढचा घोट घेता घेता त्यानं परत खिडकी सरकवत बंद केली.
पुढे बराच वेळ शांतता..
तो: जगातल्या कुठल्याच कॉफीला चहाची सर नाही येऊ शकत.
ती: आता काय, गोड मानून घ्यायचं. पथ्यपाणी कोणाला चुकलंय.
तो: ....
खिडकित रोजचा कावळा येऊन बसला, तिनं सवयीनं एका बिस्किटाचे दोन तुकडे करत त्याच्या पुढ्यात ठेवले अन परत काच लावली. त्यानंही सवयीनं दोन्ही तुकडे उचलून आंब्याच्या झाडावर बसकण मारली.
ती: (कावळ्याकडे बोट दाखवत) मागच्या जन्मी हा माझा सासरा असणार नक्कीच, रोज येऊन हट्टानी काही ना काही घेतोच माझ्याकडून.
तो: गगनभेदी हसत, हो हो असेल नक्कीच.
काहीतरी आठवल्यासारखा कप खाली ठेवत तो घाईघाईनं उठला. टिव्ही खालचा ड्रॉवर ऊघडून फिश फूडची डबी काढली अन माशांना खायला घालून जागेवर येऊन बसला. टँकमधे एकंच जोडी, दोघेही एकत्र आले खायला..
तो: पोरं गेली का?
ती: सात वाजताच.. तास होत आला आता.
तो: आजकाल बोलणं होतंच नाही... नाही का
ती: ...
ती: काय वातावरण आहे बाई, तुळस मेली सगळी माझी. आता नवीन लावते, तुळशीला तसा तोटा नाही, टेरेसवर बरीच आहे.
तो: (खिडकीतून बाहेर बघत) उमेशचा मुलगा एक वर्षाचा झाला का गं?
ती: हंम्म्म.. म्हातारा म्हातारी दिवसभर मागे असतात. दिवस कसा जातो कळतंही नसेल.
तो: ....
ती: आपल्या आंब्याला यावेळी मोहोर नाही आला
तो: हे तिसरं वर्ष आहे.
ती: तिसरं वर्ष? काहीतरीच काय बोलताय? आवंढा गिळत..
तिनं वळून घड्याळाकडे पाहिलं आठ वाजले होते.. समोर अजून आख्खा दिवस होता..टँकमधले मासे खाणं संपवून दोन टोकाला दोन गेले...
ती: ट्रे अन कप उचलत... आपल्या झाडालाही येईल ना ओ परत मोहोर?
त्यानं परत पेपर उचलला, चश्मा डोळ्यावर चढवला.
ती परत स्वयंपाकघरात गेली...
कप, ट्रे खाली ठेवत पदर डोळ्याशी गेला...

के.पी. आर

Thursday, April 10, 2014

अतिपरीचयात अवज्ञा



पूर्वी म्हणजे लहानपणी माझी आई, मोठ्या बहिणी मला पत्र कसं लिहितात हे शिकवायच्या. आम्ही आमच्या आजीला पत्र लिहायचो. आमच्या आजीला वाचायला येत नव्हतं. ती तिच्या घरासमोर रहाणाऱ्या एका जणाकडून त्याला जसा वेळ होईल तसं पत्र वाचून घ्यायची, त्याला वेळ मिळेपर्यंत ते पत्र तिच्या कमरेला लावलेल्या चंचीमधे (बटव्यात) जपून ठेवायची अन त्याला वेळ मिळेल तेव्हाच त्याच्याकडून पत्र लिहून घेऊन आम्हाला पाठवायची. आमचं पत्र तिच्याकडे पोहोचायला ३-४ दिवस जायचे, पत्र वाचून घ्यायला अजून एखाद दुसरा दिवस जायचाच आणि मग ऊत्तर लिहून घेण्यासाठी एखादा दिवस आणि मग ते पत्र आमच्याकडे पोहोचेपर्यंत अजून चारेक दिवस जायचे. म्हणजे आम्ही पाठवलेल्या पत्रावर ऊत्तर येण्यासाठी जवळपास पंधरा एक दिवस लागायचे. तेव्हा त्या पत्राची वाट बघायची, शाळेतून घरी आल्यानंतर जेवायला बसल्यावरंच नेमका पोस्टमन येयचा आणि मग जेवण सोडून धावत जाऊन आलेली पत्र चाळायची त्यात आजीचं पत्र आहे का हे बघायचं. अगदी तसंच आमच्या शेजारचे काका गुजरातला असताना व्हायचं. एकतर महाराष्ट्रातून गुजरातला आणि तिकडून ईकडे असं पत्रव्यवहार होयला वेळ लागायचा. पण ती वाट बघण्यात आणि ते पत्र जपून ठेऊन परत परत वाचण्यात खूपंच मजा होती. पत्रातून व्यक्त होणं, छोट्याश्या त्या पोस्टकार्डावर पाठपोट मजकूर लिहिणं, काही राहिलंच तर ता.क. म्हणून एका ओळीत लिहिणं अन पत्राची वाट बघतानाची ती रोजची हुरहुर शब्दात व्यक्त करणं तसं कठीणंच.

मग कालांतरानं आमच्या शेजारच्या नानींकडे फोन आला. काय अप्रूप वाटायचं त्या लँडलाईनंच तेव्हा, आपल्या ओळखीच्या कोणाकडे फोन आहे हे आठवून आठवून छोट्या डायरीमधे लिहून ठेवायचं, त्याशिवाय नंबर तोंडपाठ तर असायचेच माझे. आपल्याकडे फोन का नाही असं मनातून वाटत रहायचं पण घरात असं बोलायची हिम्मत व्हायचीच नाही. माझा शालेय मित्र सुजीत शिळमकरकडे तेव्हा फोन होता, दुपारच्या वेळेस कधीतरी नानींकडे जाऊन लाडीगोडी लाऊन मी सुजीतला फोन करायचो. फोनवर बोलायला विषय नसायचे तेव्हा. फार झालं तर एखादा मिनिट बोलायचो, त्यातही पहिल्यांदा त्याची बहिण फोन उचलायची मग त्याच्याकडे फोन जायचा. खूप महत्वाचं काही काम असलं कि नानींकडे नातेवाईक फोन करायचे, कंपाऊंड वॉलवरुन डोकावून नानी मोठ्यानं आवाज द्यायच्या अन मग आम्ही धावायचो फोन उचलायला. कधी मधे आईनं कोणाला फोन करुन निरोप द्यायला सांगितला कि मी लाजत लाजतंच नानींकडून फोन करायचो, खिशातून अडीच रुपये काढून, फोनच्या टेबलावर ठेवत त्यांना सांगायचो नानी पैसे ठेवलेत. मग नानी ओरडायच्या माझ्या अंगावार, आलास मोठा पैसेवाला, घेऊन जा चल ते पैसे. हो एखादा फोन करायचा म्हणजे सुद्धा खूप मोठी गोष्ट होती त्याकाळात आणि एका कॉलचा रेट अडीच रुपये द्यावा लागायचा. ताईला तिच्या मैत्रिणीला जरी फोन करायचा झाला तर तिच्यासोबत मी एस्टीडीमधे जायचो, नंबर डायल करुन समोरच्यानं फोन उचलेपर्यंत आपल्या कानाला लावायचा. तिकडून हॅलो ऐकू आलं कि घाईगडबडीत ताईकडे द्यायचा. बोलताना लक्ष समोरच्या डिस्प्लेवर असायचं, एक मिनिट संपण्यापूर्वी निरोप देऊन फोन ठेवायचाय हे पक्क असायचं मनात. एखाद्यावेळेस एक मिनिट क्रॉस झालाच तर मग दुसरा मिनिट होईपर्यंत काही ना काही विषय काढून बोलत रहायचं. तेव्हा पर मिनिट बिलींग असायचं, पर सेकंदचं फॅड अगदी रिसेंट. काय आकर्षण होतं त्या फोनचं, फक्त नंबर डायल करायला मिळणं हेसुद्धा सुख देऊ शकतं असं आता सांगितलं तर वेड्यात काढतील लोक. फोनचा वापर (काही अपवाद वगळता) तेव्हातरी फक्त महत्वाचे निरोप देण्यासाठीच केला जायचा.

हो नाही हो नाही करत आमच्याकडेही फोन आला.. कॉर्डलेस आला.. मग मोबाईलची एंट्री झाली. हळूहळू पत्र मागे पडू लागलं. नंबर कागदाच्या डायरीमधून, डिजीटल डायरीमधे अन मग मोबाईलमधे सेव्ह होऊ लागले. पूर्वी तोंडपाठ असणारे नंबर आता मोबाईलमधे बघितल्याशिवाय आठवेनासे झाले. पत्रात मनमोकळं लिहिणं संपलं, काही भावना पत्रातंच उतरु शकतात हेच खरं. कॉल रेट्‌स न भूतो न भविष्यती ईतके कमी झाले, तास्‌न तास बोलूनही पत्राचा अवाका फोनला जमू शकलाच नाही कधी. इंटरनेटचं जाळं सगळीकडे पसरलं संपर्क साधणं खूप म्हणजे खूपंच सोपं झालं, अन मुख्य म्हणजे एका क्लिकवर पत्र (मेल) पाठवता येऊ लागले. आता खऱ्या अर्थानं कागदी पत्रांना तिलांजलीच मिळाली.

आतातर काय, फेसबूक आलं आणि त्याच्यावर कडी म्हणून की काय स्मार्ट फोन्‌सचा अन पर्यायानं व्हॉट्‌स अ‍ॅपचा जन्म झाला. इंटरनेट, मेल, फेसबूक यांचा जन्म आणि आजवरची ग्रोथ होयला तसा बऱ्यापैकी कालावधी लागला पण व्हॉट्‌स अ‍ॅप नामक अपत्य काँग्रेसचं गवत कुठेही फोफावतं तसं अनिर्बंध वाढू लागलं. स्मार्टफोननं फेसबूक अन व्हॉट्‌स अ‍ॅप सगळ्यांच्या हातात चोवीस तास दिलं. माकडाच्या हाती कोलीत हि म्हण खरी करुन दाखवायचा चंगच एकेकानं बांधला. खऱ्याखुऱ्या आयुष्यात मग कोणाशी अन किती संपर्क आहे यापेक्षा ऑनलाईनच्या व्हर्च्युअल जगात आपलं अस्तित्व दाखवण्याची धडपड सुरु झाली. पूर्वी वेळ मिळेल, म्हणजे खरोखरंच मोकळा वेळ मिळेल तेव्हा ऑनलाईन येणारी मंडळी आता ऊठसूट स्टेटस अपडेट करु लागली. जगानं आपली दखल घ्यावी या नादात काही बाही बरळू लागली, वादग्रस्त आणि संवेदनशील विषयांवर अभ्यास अथवा काहीही संदर्भ नसताना हिरीरीनं मतं मांडू लागली. व्हॉट्‌स अ‍ॅपवर ग्रुप्स आले, सुरुवातीच्या काळात खूप वर्षानी संपर्कात आल्यामुळे बऱ्याचजणांना मस्त, फ्रेश वाटू लागलं. मग न पटणाऱ्या गोष्टी लोक फॉरवर्ड करु लागले. महिलांवरचे अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार, धार्मिकता वगैरे वगैरे गोष्टींवर विवेकशून्य पद्धतीनं बोलू लागली. किळसवाणे मेसेजेस, बलात्काराचे, दंगलीचे व्हिडिओज संवेदनाशून्य मनानं पाठवू लागली. जग नको तेवढं जवळ आलं, बोटाच्या एका स्पर्शानं कोणाच्याही आयुष्यात डोकावता येऊ लागलं अन मग कळेना आपली नेमकी वाटचाल कुठे चालूए. प्रत्येक माणसाची मतं वेगळी, प्रत्येकजण काही १००% चांगला किंवा वाईट नसतो. जे चांगलं ते घ्यावं, वाईट ते सोडून द्यावं हि आजवरची शिकवण काही केल्या अंगिकारता येईना. कारण जोवर लिमिटेड संपर्क होता तोवर हे शक्य होतं. एकेकाची थेरं क्षणाक्षणाला समोर येत नव्हती, झाकली मूठ सव्वा लाखाची होती. अन ती मूठ सगळ्यांसमोर ऊघडली गेल्यावर कवडीमोल ठरु लागली, मतभेद चव्हाट्यावर येऊ लागले. हेल्दी डिस्कशनचं रुपांतर हमरीतुमरीमधे होऊ लागलं. मीच कसा बरोबर, माझीच भूमिका कशी बेस्ट हे लोक एकेकावर थोपवू लागले. सामाजिक भान न बाळगता सनसनाटी बोलू वागू लागले. समोरच्याचं पटतंय म्हणूनंच नाही तर प्रसिद्ध व्यक्तींचं लांगूलचालन करण्यासाठी, पर्यायानं प्रसिद्धीत राहण्यासाठी आणि असुरक्षिततेची भावना वाढल्यामुळे की काय पण लोक कोणाच्याही चुकिच्या अन फुटकळ गोष्टींनाही दुजोरा देऊ लागले, डोक्यावर घेऊ लागले आणि खऱ्या आयुष्यात एकाकी वाटत असल्यामुळे ऑनलाईन कंपू बनवून राहू लागले, म्युच्युअल अ‍ॅडमायरेशन क्लब्ज वाढिला लागले. म्हणजे चार हात लांब असलेलंच चांगलं होतं असं वाटू लागलं. प्रत्येक माणसाचा हरेक पैलू दिसू लागला, नको ती बाजूही समोर येऊ लागली. सार्वजनिक जीवनात काय बोलावं अन काय नको याचा साधा विधिनिषेध लोक पाळेनासी झाली. प्रत्येकाची सगळीच मतं चांगली असतात किंवा १००% पटू शकतातंच असं नाही पण त्या सगळ्याच मतांचा मिनिटा मिनिटाला भडीमार होऊ लागला, समोरच्यावर बिंबवायचा केविलवाणा प्रयत्न होऊ लागला अन आपोआपंच तिरस्कार, तेढ वाढू लागली. खरंच काय करतोय आपण असा प्रश्न मलाही पडतोय, म्हणूनंच कि काय गेल्या महिना दिड महिना मी व्हॉट्‌स अ‍ॅप वापरलंच नाहीये. नाही.. ते माध्यम वाईट निश्चितंच नाही, त्याचा वापर चुकिच्या पद्धतीनं होतोय अन माझा तोल, संयम ढळू लागलाय म्हणून मी ब्रेक घेतलाय ईतकंच. हा अल्पविराम आहे पूर्णविराम नक्कीच नाही. आत्मपरिक्षण करतोय, काय, किती, कसं वापरायचं आणि कशाच्या किती आहारी जायचं हे ठरवतोय मनात. हे करतानाची चलबिचल, उद्विग्नता, राग यामुळे बाकिचे अफेक्ट होऊ नयेत म्हणून हा अल्पविरामाचा पर्याय.
बऱ्याचजणांनी मला विचारलं अरे ते सब्यॅटीकल स्टेटस का? तर ते अशाच साठी.. माझा मला शोध घेण्यासाठी, अन कोणत्या वाटेवर चाललोय हे जोखण्यासाठी.

पत्र कालबाह्य झालं, त्याच्यासोबत हुरहुर, आपुलकीची भावना, संयम सगळंच कालबाह्य होण्याच्या उंबरठ्यावर आहे. आता अतिपरीचयात अवज्ञा करुन घ्यायची कि या साधनांचा जाणीवपूर्वक, संवेदनशीलपणे चांगला वापर करायचा हे ज्याचं त्याला ठरवायचं आहे.

के.पी. आर

Tuesday, January 28, 2014

आपण अतिरेकी झालो आहोत


आपल्याला स्वातंत्र्य मिळालं; नव्हे, मिळवलं. जीवाचं रानं करुन, प्राणांची आहुती देऊन, घर दार संसार सोडून, जात-पात, धर्म, ऊच्च नीच सगळे भेदभाव सोडून, एकत्र लढून मिळवलं. असंच नाही मिळालं, खरंच मिळवलं. स्वातंत्र्य कोण्या एका गटाची, जातीची, धर्माची किंवा वर्गाची मक्तेदारी नाही ते प्रत्येक भारतीयाचं आहे, प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे. स्वातंत्र्यानं आपल्याला काय दिलं? एक सशक्त राज्यघटना दिली, त्याच राज्यघटनेनं व्यक्तिस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. पण स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षात हे स्वातंत्र्य खरंच आहे प्रत्येकाला?
अरे दोन वर्षाच्या चिमुकलीपासून ते ७० वर्षाच्या जख्ख म्हातारीपर्यंत, प्रत्येकीकडे आपण फक्त आणि फक्त आपली वासना शमवण्याची साधनं म्हणून बघू लागलोय. तिला डोळ्यानंच नागवू लागलोय. गर्दीत चोरटा स्पर्श करताना, तिच्याकडे पाहून आचकट विचकट हावभाव करताना, विनयभंग आणि प्रसंगी बलात्कारही करताना तिनं घातलेले कपडे हे एक कारण पुढे करतोय आपण? हे स्वातंत्र्य आहे??? तसेच कपडे आपल्या आई, बहिण, मुलीनी आत्या मावशीनी घातले तर? त्यांच्याही कपड्यांच्या आरपार बघणार का आपण?
"मला असं वाटतं कि मुलींनी किमान अमुक तमुक प्रकारचे कपडे घालावे, फलाणा ढिमका ठिकाणी जाऊ नये, ईतके तितके वाजण्याआधी घरी यावं, ह्यॅव अन त्यॅव करावं" असं सर्रास ऐकायला मिळतं. अरे पण त्यांनी कसे कपडे घालावे, त्यांनी काय करावं, कुठे जावं हे ठरवणारे आपण कोण. त्यांनी काहीही केलं, कसलेही कपडे घातले तरीही मी माणसासारखंच वागणार, जनावर होणार नाही ईतकी साधी गोष्ट नाही ठरवू शकत आपण?
माझ्यापुढे सिग्नलला थांबलेल्या माणसाला हॉर्न वाजवून वाजवून हैराण करणार, का? तर लाल दिवा असताना माझी थांबायची तयारी नाही, वाह. म्हणून पुढच्यानंही नियम मोडायचा. तो अतिशहाणा तसाच थांबून राहिला तर एखाद दुसरी शिवी हासडणार मी, दमदाटी करणार, झालंच तर बाचाबाचीही करणार अन त्याहूनंही नाही ऐकलं तर हातही चालवणार. हे सगळं कशासाठी? तर त्या अतिशहाण्यानं त्याच्या वागण्यातून मला शहाणपणा शिकवायचा प्रयत्न केला म्हणून?
तुझा भा... ला पाठिंबा आहे तर तू कट्टरपंथी, बाकीच्या धर्माचा आदर करणारा. तुझा काँग्रेसला पाठिंबा आहे तर तू आंधळा, भ्रष्टाचाराला चालना देणारा. तुझा आप ला पाठिंबा आहे तर तू बिनडोक, तुला काहीच कळत नाही. अमुक एका पत्रकारानं तमुकचं कौतुक केलं अजून कोणी एकानं कोण्या एकावर टिका केली तर विकलं गेलंय मेडिया. तू गे आहेस तर तू गुन्हेगार आहेस, तू चळवळीतून आलास तर तू अराजकतावादी आहेस. तू अमुक आहेस तर असा, तमुक आहेस तर तसा. मीच ठरवणार तू कसा अन मी कसा.
माझी जात ऊच्च, माझा धर्म श्रेष्ठ, माझं म्हणणं बरोबर, तुझं वागणं चूक. अमुक एका गोष्टीनं माझ्या डोक्यात सणक जाते, माथा तर आमचा कायमंच भडकलेला असतो. मग तोल जातो माझा, अर्वाच्च भाषेत टिका, हातात लाठ्याकाठ्या, दगड, तोडफोड, जाळपोळ, विटंबना, नुकसान पण सगळं दुसऱ्याच्या मालमत्तेचं. माथा भडकल्यावर कोणी स्वतःच्या घरी जाऊन तोडफोड, जाळपोळ बरी करत नाही, घरच्यांची डोकी बरी फोडत नाही? असं करु नये एवढं कळण्याईतपत डोकं ठिकाणावर असतं. माथा भडकतो तो फक्त ऊरलेल्या भारतीयांवर.
मला तू आवडत नाहीस तर मी तुझ्यावर टिका करणार, जाहीर टिका करणार, अर्वाच्च अश्लाघ्य भाषेत करणार. सोशल मेडियावर मजकूर टाकणार. कधी संघिष्ठ, खाकी चड्डी, काळी टोपी अन हातातल्या काठीवरुन बोलणार. कधी बामण, कधी महार कधी मुसलमान आहेस म्हणून तर कधी रंगावरुन दिसण्यावरुन हिनवणार. तू चिड, चरफड, दमून हरुन जा, आत्महत्या कर, मर तिकडे पण मी नाही थांबणार.
माझ्या मनाविरुद्ध असेल तर तुझं वागणं चूक, बोलणं चूक, भावना चूक, कपडे घालणं चूक, नियम पाळणं चूक, प्रेम करणं चूक, मतप्रदर्शन चूक, आवड चूक, निवड चूक, तुझं असणं चूक, तुझं दिसणं चूक, तुझं जगणंही चूक. माझ्या मनासारखं असेल ते सगळं बरोबर आणि मनाविरुद्ध असेल ते सगळं सगळं चूक.
स्वातंत्र्य फक्त मलाच, माझ्याच विचारांना, माझ्याच कृतीला, माझ्याच स्वैराचाराला. मी, मी आणि फक्त मी...

स्वातंत्र्य मिळालं आपल्याला ६६ वर्षांपूर्वी पण त्या स्वातंत्र्याचा वेगळाच अर्थ घेतला आपण. स्वातंत्र्य फक्त माझ्यापुरतं, बाकीच्यांचं काय? बाकी माझेच गुलाम?
दुसऱ्याची जात, धर्म, रंग, मतं, विचार... दुसऱ्याचा आदर करायला शिकू तेव्हाच खरं स्वतंत्र्य होऊ.
आता मात्र या मी माझाच्या जयघोषात कळलंच नाही आपल्याला आपण कधी अतिरेकी झालो ते..
खरंच आपण अतिरेकी झालोय.

के.पी. आर

Friday, November 15, 2013

आपला सचिन रीटायर होतोय


""दोनशेव्या कसोटीनंतर सचिन निवृत्त होणार" बातमी वाचली अन सांगता न येण्याजोगी चलबिचल होऊ लागली मनात. फेसबूकवरचं सचिन तेंडूलकर ऑफिशिअल पेज, बीसीसीआयचं पेज, मुंबई इंडियन्सचं पेज, क्रिकईन्फो अन वेगवेगळ्या वेबसाईट्‌सवर वाचूनही खात्री होईना, मनाला पटेना कि सचिन खरंच थांबतोय, उगाच एक वेडी आशा की एखाद्यातरी वेबसाईटवर कळेल आपल्याला की नेहमीप्रमाणे हि अफवाच आहे, पण नाही.. मागल्यावर्षी वन डे मधून निवृत्ती घेतल्यावर वाटलं टेस्ट्‌सची कारकिर्द अजून वाढावी म्हणून हे पाऊल आहे पण त्या गोष्टीला एक वर्षही पूर्ण होण्याआधीच तुझी टेस्टमधूनही निवृत्तीची बातमी. २४ वर्षांच्या झंझावाताला पूर्णविराम, माहिती होतं रे की तू आयुष्यभर खेळणार नाहीस पण तरीही तू एक दिवस रीटायर होणार अन तू आत्ताच रीटायर होणार यात खूप फरक आहे. आपल्या घरी एखादा जीवाभावाचा मित्र येतो, तो येतो तेव्हाच माहिती असतं आपल्याला की तो २ दिवसांनी जाणारे, अगदीच राहिला तर ४ दिवसाच्या वर नाहीच राहू शकत तरीही तो जाताना गळा दाटून येतो, त्याला निरोप देता देता सगळ्यांपासून नजर चुकवत आपण प्रसंगी अश्रू टिपून घेतो हलकेच. आज अगदी तसंच झालंय सचिन, तू चाललाएस तर गळा भरुन आलाय. माहितीये आज ना उद्या जाणारंच तरीही...
क्रिकेटमधे तू अभिमन्यूपेक्षा काही कमी नाहीस, खरंतर काकणभर सरसंच आहेस. सुरुवातीपासून आजवर वॉर्न, मॅकग्रा, फ्लेमिंग, गिलेस्पी, पोलॉक, डोनाल्ड, स्टेन, अक्रम, वकार, सक्लेन, वास, मुरलीधरन, अ‍ॅम्ब्रोज, वॉल्श अन जगातल्या सगळ्याच दिग्गज गोलंदाजांचं चक्रव्यूह भेदत तू निधड्या छातीनं मैदानावर जायचास अन काही क्षणातंच रे सगळ्या फिल्डर्सचं चक्रव्यूह भेदत तुझे फटके चौफेर धावांची बरसात करायचे. तुला चक्रव्यूहात जाणंही चांगलं माहिती होतं अन तेच भेदून बाहेर पडणंही. तुझा प्रत्येक फटका, प्रत्येक खेळी मग ते ० असो, १०-१५-२० असो की शतक असो मला मंत्रमुग्ध करायची, ईतकी की त्यापुढे मला माझी स्वतःची दुःख, माझे प्रॉब्लेम्स माझा वाईट काळही विसरायला होयचं. गेले २४ वर्ष तू आम्हाला फक्त आणि फक्त आनंदंच दिलास, आमच्या अपेक्षा वाढत राहिल्या पण तू कधी तक्रार केली नाहीस, वैतागला नाहीस अन एवढं करुन आमच्यातल्या काही जणांनी तुझ्या निवृत्तीची वेळोवेळी मागणी केली पण तरीसुद्धा तू उत्तर फक्त तुझ्या बॅटनंच दिलंस.तुझ्याशिवाय क्रिकेटचा विचारंच केला नाही रे कधी. मला माहितीये तू क्रिकेटपेक्षा मोठा आहेस असं म्हणणं तुला बिलकुल आवडत नाही पण काय करु सचिन तुझा खेळ बघूनंच आम्ही क्रिकेट काय असतं ते शिकलो, तुला बघतंच मोठे झालो. खरतरं आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच कारण तुझा सुवर्णकाळ आम्हाला याची देही याची डोळा अनुभवता आला.
तुझी बॅटिंग बघण्यासाठी केलेला आटापिटा, शाळा बुडवण्यासाठी केलेले हट्ट, कॉलेजला मारलेल्या दांड्या, तू खेळायला येणार म्हटल्यावर मनात सुरु होणाऱ्या अंधश्रद्धा, ईथेच बसायचं, उठायचंच नाही, हात पाय हलवायचे नाहीत, बोलायचं नाही, पाणीही प्यायचं नाही, तू स्ट्राईकवर असताना स्वतःलाच ऐकू येणारा स्वतःच्या काळजाचा ठोका, सचिनला कोणी काही बोललं तर होणारा संताप, तावातावानं तुझी बाजू मांडत केलेली सगळी भांडणं, कोणालातरी फक्त सचिन आवडतो म्हणून त्याच्याशी जुळणं, तू खेळायला आल्यावर तुझी एकाग्रता, शारजा, वर्ल्ड कप अन सगळ्याच खेळींमधे तू सीमारेषेबाहेर भिरकावलेले चेंडू, चोरटी धाव घेताना चित्त्याच्या चपळाईनं धावणारा सचिन, अंपायरचं बोट वर होण्याची वाट न बघणारा खिलाडू सचिन, खोटा आऊट दिल्यावरंही शांतपणे परतणारा सचिन, शतकानंतर आभाळाकडे समाधानानं पाहणारा सचिन सगळं सगळं कसं अजूनंही अगदी ताजं आहे अन काळजावर कोरलंय कायमचं. तुझा प्रत्येक यशानंतर अक्षरशः मी स्वतः जिंकल्याचा आनंद व्हायचा मला, तुझा अपयशानंतर, तुझ्यावर झालेल्या टिकेनी आतोनात वाईट वाटायचं, मुंबई इंडियन्स हरल्यावर, २००७ च्या वर्ल्ड कपमधे तू श्रीलंकेविरुद्ध फर्नांडोच्या बॉलिंगवर आऊट झाल्यावर, चेन्नईच्या टेस्टमधे तू जीवाचं रान करुनंही पाकिस्तान विरुद्ध सामना गमावल्यावर अन तू कित्येकदा नव्वदित आऊट झाल्यावर मी अक्षरशः रडलोय, फोन स्विच ऑफ करुन एकांतवास ठरलेला असायचा अशा वेळेस, कुणाचं समजावणं नको की चिडवणं नको. पुढच्या मॅचला परत जोमानं फक्त तुला बघायला बसायचो काळीज धडधडायचं परत त्याच इंटेन्सिटीनं अन काल तुझ्या शेवटच्या कसोटीमधे तू खेळायला आलास तेव्हाही ती धडधड तशीच होती, ऐकू आला एवढ्या गोंगाटातही मला माझा ठोका. असं कोणासाठीच वाटत नाही रादर असं कशासाठीच वाटत नाही. २००८-०९ मधे तब्बल ६ वेळेस शतकानी हुलकावणी दिली तुला, नर्व्हस नाईन्टीज... एकदा थिअटरमधे पिक्चर बघत असताना मित्रांचे मेसेज सच्या भन्नाट खेळतोय, सेंच्युरी मारणार, तू ७५ वर असताना मी पिक्चर अर्ध्यात सोडून घराकडे पळालो, तू ९९वर होतास परत एकदा धडधड अन पुढच्याच बॉलवर तू आऊट झालास. त्यावेळेस खात्री झाली होती आमची कि मी मॅच बघितली की तू आऊट होतोस म्हणून त्यानंतर कित्येक दिवस मी तुझी बॅटिंग पाहणं टाळलं फक्त तुझा परफॉर्मन्स चांगला व्हावा म्हणून. त्यानंतर बऱ्याचदा माझ्या आईचा मला फोन येयचा सचिन छान खेळतोय तू घरी येऊ नकोस. त्याच काळात म्हणजे फेब्रुवारी २००९ मधे तू वन डे मधे द्विशतक ठोकलंस, मी ऑफिसमधे होतो, ती मॅच बघणं मला सहज शक्य होतं पण क्रिक‌ईन्फोवर स्कोअर जरी पाहिला तर तू आऊट होशील या भीतीनं मी ऑफिसच्या टेरेसवर जाऊन ऊभा राहिलो होतो, सगळीकडून लोकांचे आवाज ऐकू येत होते, फोनवर मित्र अपडेट्स देत होते अन तुझी डबल सेंच्युरी झाली. वर्षानुवर्ष डोळ्यात जीव ओतून तुझी बॅटिंग बघणारा मी पण तुझी द्विशतकी खेळी लाईव्ह न पहाता रीपीट टेलिकास्ट अन हायलाईट्स मधे पाहिली या दुःखापेक्षा तुझ्या यशाचा आनंद कितीतरी पटिने जास्त होता. वर्ल्ड कप जिंकल्यावर तुला सर्वांनी खांद्यावर उचलून घेतलेला क्षण पाहून भरुन पावलो, तुझ्या स्वप्नातंच आमची स्वप्न बघितली आम्ही. असे कितीतरी क्षण आहेत, प्रत्येकाबद्दल लिहिणं अन बोलणं शक्य नाही.एवढं अन असं प्रेम फक्त तुझ्यावरंच, सांग आता कोणासाठी क्रिकेट बघणार. नाही, नवे प्लेयर्स चांगले आहेतंच पण आमची नाळ तुझ्याबरोबर जोडली गेलीये ईतकी वर्ष आता ती इंटेन्सिटी तो वेडेपणा दुसऱ्या कोणासाठी शक्य नाही.
एवढ्या सगळ्या ऊत्तुंग यशानं हुरळून जाऊन हवेत न जाता, कायमंच जमिनीवर पाय ठेवलेस, टिकेलासुद्धा तेवढ्याच संयमानं सामोरा गेलास. तुझं तुलाच माहीत कसं जमवलंस ते अन म्हणूनंच तू एकमेवाद्वितीय सचिन आहेस. तुझं यश, तुझं अपयश, तुझ्या इंज्युरीज, तुझ्या वेदना या फक्त तुझ्या नाहीत आम्ही ते स्वतःच्या असल्यासारख्या अनुभवल्या.

कदाचित तू रीटायर होशील, नाही होतोच आहेस पण आमच्या मनातून आठवणींतून तू कधीच रीटायर होणार नाहीस, तुझ्यासाठीचा वेडेपणा, दिवानगी, प्रेम, पॅशन कधीच रीटायर होणार नाही हे सगळं तसंच राहील सदैव. सsssचिन सचिनsss... स्टेडियमच्या गर्दितून ऐकू येणाऱ्या आरोळ्या घुमत राहतील कानात वर्षानुवर्ष... अन क्रिकेट राहील आता फक्त आठवणीत.


सलाम सचिन. लव्ह यू. तुझ्या वैयक्तिक जीवनासाठी शुभेच्छा

 कुणाल प्रकाश रुद्राके

(के.पी. आर)

Saturday, September 21, 2013

आत्महत्या होती का खून


गेल्या काही दिवसात शनिवार वाड्याच्या दारात गर्दी वाढू लागली होती. एरव्ही गर्दी नसते असं नाही पण गेल्या काही दिवसांपासून एका ठराविक ठिकाणीच गर्दी जमू लागली होती. आषाढातल्या मुसळधार आणि अनिर्बंध कोसळण्यानंतर पाऊस निसर्गनियमाला जागला होता, श्रावण यावर्षी खरोखरंच श्रावण वाटत होता. अन श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यात तर दिवसभर कडक ऊन असायचं. पण अशा ऊनातंही लोकांची गर्दी कमी होईना म्हणून एक दिवस जाऊन पाहूच या उद्देशानं काल मुद्दामंच तिकडे गेलो. गर्दीला दोन्ही हातांनी बाजूला सारत स्वतःसाठी जागा करत करत पुढे गेलो. ए धक्का देऊ नको, च्यायला आम्ही काय मुक्कामाला ईथे आलोय काय? फुकट मिळालं की सगळ्यात पुढे. असे काही ना काही पुणेरी टोमणे ऐकत पुढच्या रांगेत पोहोचलो. वर्तुळाकार गर्दी केलेल्या लोकांच्या मधोमध एक मध्यमवयीन ईसम मान खाली घालून बसला होता. डोक्यावरचे केस काढून शेंडी ठेवलेली, कानात भिकबाळी, अंगावर धोतर सदरा अन उपरणं. मुंबई पुण्यातून ईतिहासजमा झालेला पेहराव बघून ऊत्सुकता थोडी वाढली पण क्षणातंच डोक्यात विचार आला की च्यायला काय वेडेपणा आहे, कोणीतरी एक अपरिचित व्यक्ती ऐतिहासिक पेहेराव अन वेशभूषा करुन शनिवारवाड्यापाशी येऊन बसतो आणि आपण बघायला गर्दी करतो. आपल्यासारखे सुशिक्षित लोकही असा वेडगळपणा करतातंच. आता या अपिरिचिताचा बुवा होयला वेळ लागणार नाही आता हा चार शब्द बोलेल, विवंचना दूर करण्यासाठी सल्ले देईल, हातचलाखी करुन एखादी जादू दाखवेल आणि लोक याच्या पायावर डोकं ठेवतील जयजयकार करतील असा विचार करत असतानाच गर्दितले कौतुकाचे शब्द ऐकून भानावर आलो. साला क्या जादू आहे, पलक झपकते काम करता है. बघितलंस का? कमाल...आईच्चा एकंच नंबर.. आपसूकंच मान परत त्याच्याकडे वळाली, पहातो तर काय पठ्ठ्याने बघता बघता शेजारी पडलेल्या मातीच्या गोळ्यातून गणपतीची मूर्ती बनवली होती. सराईतपणे मूर्तीला फिनिशींग टच देत त्याने खांद्यावरच्या उपरण्याने कपाळावरचा घाम पुसला. त्याची कलाकारी पाहून अवाक झालेल्या एकाने त्याच्यासमोर टाकण्यासाठी खिशातून चिल्लर काढली तसा त्याचा हात दाबत त्याचा मित्र त्याला म्हणाला थांब, येडा आहे हा... आवडत नाय त्याला असं पैसे फेकलेलं. मागच्या आठवड्यापासून बघतोय पैसे टाकले कोणी कि बिथरतो तो, हा पण बाकी कुणाशी काय बोलत नाय़ हा. गर्दीतून माहिती कानावर पडताच मी ही खिशात घातलेला हात बाहेर काढला अन माझ्यासारखंच गर्दीत नव्यान दाखल झालेल्या बाकिच्या बघ्यांनीही. गर्दी पांगू लागली, पुण्यात गुणी कलाकारांची कमी होती अशातला भाग नाही पण साला याची जादूच वेगळी होती. कसल्याच प्रकारचा साचा न वापरता एकदा मान खाली घातली कि मूर्ती पूर्ण झाल्यावरंच वर बघायचा तो, तसंच आत्ताही पाहीलं. मूर्ती बनवल्याचं समाधान त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. लोक आपल्या कामाला निघून गेले पण मी तिथेच थांबलो. थोड्यावेळापूर्वीच या गर्दीला वेडा म्हणनारा मी आता मात्र भान हरपून त्या मूर्तीकडे बघत राहीलो. त्या कलंदर माणसाशी बोलावं असं वाटत होतं मनापासून पण कलाकार माणसं थोडी विचित्रंच असतात त्याला नाही आवडलं तर काय हा विचार मनात असतानाच त्यानं हातानं खूण करुन मला बोलावलं. ईस्त्रीचे कपडे ऑफिसची वेळ कशा कशाचाही विचार न करता मी जाऊन त्याच्या शेजारी बसलो. कसला विचार करतोस बाळा, लोक गेले सगळे तू ही जा, काम नाही तुला? कुठे विकता तुम्ही या मूर्ती? त्याच्या प्रश्नाचं ऊत्तर न देता मी त्याला प्रतिप्रश्न केला. मूर्ती? त्यानं प्रश्नार्थकंच विचारलं. म्हणजे, तुम्हाला जागा नसेल तर मी आमच्या मंडळाच्या मैदानावर जागा द्यायला लावतो आपण तिकडे तुमचा स्टॉल लाऊया, आजकाल साच्याशिवाय बनवलेल्या सुबक मूर्तींना खूप मागणी आहे. मी पटकन बोलून मोकळा झालो. मला आवडतं म्हणून मी मूर्ती बनवतो, विकायला नाही. हां... एखाद्याला आवडली तर तो घेऊन जातो जरा नाराजीनंच उत्तर दिलं त्यांनी. कमाल आहे आजच्या जमान्यात फक्त आवड म्हणून? आणि आवडली तर तशीच देऊन टाकता की? मी त्याच्याकडे बघत बोलायचा थांबलो. हं.. जमाना बदललाय हे खरं बघ, पण काय करु आम्हाला तेव्हापासूनंच आवड, वेड.. काहीही म्हण असं काहीबाही करायची, लोकं जमवायची… पण आता.. सोड जाऊ दे तुला ऊशिर होईल जायला जा तू म्हणत त्यानं माझ्याकडे पाठ केली. मला काही कळेना, तेव्हापासून म्हणजे नक्की केव्हापासून? लोकं जमवायची? एकदा म्हणतोय मूर्त्या करायला आवडतात एकदा म्हणतोय लोकं जमवायला आवडतं. आता याच्याशी बोलल्याशिवाय जायचं नाही, ऑफिसला दांडी मारायला लागली तरी चालेल असं ठरवून मी परत त्याच्यासमोर जाऊन बसलो. काय बोलत होता काका तुम्ही सांगा ना थोडासा हटवादीपणानं म्हणालो. तो दोन मिनिट स्तब्ध बसून राहिला मग कसंनुसं हसत म्हणाला राजा तू सांग कशी चालूये तयारी गणपतीची, मंडळ कुठय तुमचं आणि काय काय करता गणेशोत्सवात? तयारी जोरात चाललीये काका, मंडळ कुठय सांगण्यापेक्षा मी तुम्हाला घेऊनंच जाईन तिकडे आणि काय काय करतो म्हणाल तर आपला मांडव तगडा असतो एकदम, च्यायला सगळ्यात मोठा, आपली मूर्तीसुद्धा ऊंच आहे ना. यावर्षीचा देखावा करायला तर बॉलिवूडचा शिल्पकार बोलावलाय. सकाळ संध्याकाळ आरती होते, आपला गणपती लै फेमस आहे कमीत कमी ३-४ सेलिब्रेटी येतातंच आरतीला. एक दिवस स्थायी समिती अध्यक्षांच्या हस्ते पण आरती असते. अजून? त्याने मधेच प्रश्न विचारला. अजून, मिरवणूक तर बघायलाच पाहिजे तुम्ही आई शप्पथ आपल्या चौकातंच ३-४ तास लागतात, सहा सात पथकं असतात ढोल, ताशा, डि.जे. काय बोलाल ते असतं मी ऊत्साहाने बोलत होतो. अरे वाह, अजून काय करता? तो प्रश्न विचारायचा काही थांबेना. अजून, अं... अजून म्हणत मी विचार करु लागलो तसा तो हसला, म्हणाला बास एवढंच? मी वैतागून विचारलं एवढंच म्हणजे अजून काय पाहिजे तुम्हाला? तेच तर सांगतोय बाळा तुमची ऐकायची तयारी नाही म्हणूनंच मी अर्धवट बोलून थांबलो मगाशी.
आता मी ईरेला पेटलो होतो, ऐकायचंच होतं मला काय सांगतोय तो ते. नाही आता सांगाच काय बोलत होता ते मी हट्टंच धरला त्याच्याकडे. उपरण्यानं परत एकदा कपाळावरचा घाम पुसत बोलू लागला तो. हं.. तर आम्हाला हे वेडंच पहिल्यापासून लोक गोळा करायचे म्हणजे संघटित करायचे. तेव्हाची लोकंही निराळीच अन काळही निराळाच बघ. सायबानी बंदी घातली होती, जमावबंदी. कोणाला असा घोळका करुन वावरता येयचं नाही, एकत्र आल्याशिवाय काही होणारसुद्धा नव्हतं. चारजण एकत्र आले तर विचारांना चालना मिळेल, विधायक कार्य होईल, समाजासाठी लढता येईल अन सायबाच्या गुलामगिरीतून बाहेर पडता येईल असं सतत वाटत रहायचं सगळ्यांनाच, हं.. पण एकत्र कसं येयचं, जमावबंदी मोडायची कशी हा मोठा प्रश्न होता सगळ्यांसमोर. एवढं बोलून काहीतरी विचार करत असल्यासारखं त्यानं शून्यात नजर रोखून धरली अन मग त्यानंच घडवलेल्या मूर्तीकडे बोट दाखवून बोलू लागला. या, या बाप्पानंच आम्हाला त्यावेळी मार्ग दाखवला. धार्मिक गोष्टींसाठी एकत्र येयला बंदी नव्हती, सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाला, त्यानिमित्तानं लोक एकत्र येऊ लागले. सायबाला ईथे जमावबंदी करता येईना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली त्याची. प्रबोधन झालं, समाज एकत्र आला, एकत्र आला एका समान उद्देशासाठी, एकाच ध्येयासाठी आणि ते ध्येय होतं स्वराज्य मिळवळ्याचं. फक्त गणेशोत्सवानं नाही साध्य झालं ते ध्येय पण, पण हातभार लागला बाळा, हातभार नक्कीच लागला, चार पावलं पुढेच झाली होती वाटचाल, परत पीछेहाट नाही झाली. एवढं बोलून तो थांबला, स्वातंत्रपूर्व काळातल्या आठवणींनं त्याच्या डोळ्यात पाणी आलं, गळा दाटून आल्यानं त्याला पुढे बोलता येईना. काका हा ईतिहास तर मला माहितीये काका, तुम्ही परत, म्हणजे.. मी चाचपडत बोलायला सुरुवात केली. हं.. परत का सांगताय असंच म्हणायचंय ना तुला? अरे माहिती सगळ्यांनाच आहे पण जरासा विसर पडलाय का असं वाटतंय. मोठा मांडव, रस्त्यावर खड्डे, ट्रॅफिकला अडथळा, अव्वाच्यासव्वा वर्गणी, बेशिस्त मिरवणूका, दारु, जुगार, महिलांची छेडछाड यासाठीच का रे चालू केला गणेशोत्सव? माहीतीये म्हणतोस. हो, हो मलाही माहितीये सगळेच असं करत नाहीत पण असं करणाऱ्यांची संख्या जास्तय बाळा. अजून काय करता म्हणालो तर विचारतोस अजून काय हवं तुम्हाला? आणि मंडळं तरी किती रे? हा नाका तो रस्ता, प्रत्येक गल्लीचा राजा. टोप्यांवर छापून जाहिरातबाजी करता नवसाचा गणपती? हं.. कमाल आहे.. माझं मंडळ मोठं, माझं पथक मोठं, माझा खर्च मोठा...आमचं आमचं आमचं, अरे मूळ उद्देशंच गुंडाळून ठेवलात लेकांनो, एकत्र येऊन काय करु शकत नाही तुम्ही? करण्यासारखं खूप आहे रे. आलेल्या वर्गणीतून चार गरीब पोरांना शिकवा, घ्या जवाबदारी. तुमच्या भागातल्या पोरीबाळींच्या संरक्षणासाठी करा काही, त्या उत्तराखंडात जलसमाधी मिळाली हजारो संसारांना, द्या ना फाटा एक वर्ष देखाव्याला, द्या मदत पूरग्रस्तांना, सीमेवर शहिद झालेल्या जवानांना. या एकत्र द्या लढा साठेबाजी विरुद्ध, पुढाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध, लाल फितीत अडकलेल्या प्रकल्पांना सोडवा, द्या ना आवाज याच्यासाठी, अरे तुम्हाला बास म्हणावं लागेल एवढे हात येतील मदतीला. एकत्र येयचं ते काय फक्त दहा दिवस गाणं बजावणं करायला? तेव्हाचे प्रश्न वेगळे, तेव्हाचा समाज वेगळा अरे पण वेगळे असले तरीही आजही प्रश्न आहेतंच ना मग करा ना प्रयत्न तुमच्यापरीनं उत्तरं शोधण्याचा. जा जाऊन सांग तुझ्या मंडळात यातलं काहीतरी करु आपणं नको आपल्याला भपका, बाप्पाची पूजा करु मनापासून अन सामाजिक बांधिलकीसुद्धा जपू आणि ती ही मनापासून. बोल, सांगशील? तर येतो मीसुद्धा, नेणार होतास ना मंडळ दाखवायला. तो पोटतिडकिनं बोलत होता. आता माझी नजर शून्यात होती त्यानं दोन्ही खांद्याला धरुन गदागदा हलवत विचारलं मला, आहे तयारी? मी भानावर येत नकारार्थी मान हलवली.
काही न बोलता त्यानं मागे ठेवलेली पुणेरी पगडी उचलून डोक्यावर घातली. निघताना माझ्या पाठीवर हात ठेऊन म्हणाला बाप्पा तुम्हाला सुबुद्धी देवो. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहीलो मी वेड्यासारखा, भानातून गेल्यासारखं कानात घुमत राहिले शब्द त्याचे. तो कॉर्पोरेशनच्या दिशेला चालू लागला अन मी भानावर आलो, पुणेरी पगडी, धोतर, सदरा, उपरणं, भिकबाळी, झुपकेदार मिशा... लोकमान्य?? मनातल्या मनात म्हणालो मी स्वतःशी. रस्त्यावरची गर्दी, वाहनं सगळं विसरुन मी धावत सुटलो त्यांच्यामागे. मी मागून आवाज दिला त्यांना, काका काका थांबा पण ते थांबले नाहीत. मी पहात होतो त्यांना, मुठेच्या पूलावर मध्यभागी जाऊन थांबले ते. मी जीवाच्या आकांतानं ओरडलो थांबा काका काय करताय. माझ्याकडे पाहून म्हणाले ते ईथेच येता ना तुम्ही गणपती विसर्जनाला? मी फक्त होकारार्थी मान हलवली. एकत्र येण्याचा उद्देश तर तुम्ही केव्हाच बुडवलात राजा आता मी तरी थांबून काय करु? म्हणत त्यांनी मान वळवली. काका म्हणून मी त्यांच्याकडे धावलो अन त्यांनी कठड्यावरुन उडी मारली... धप्प... पाण्यात पडल्याचा आवाज आला. उपरणं, पगडी तरंगत राहिले पूराच्या पाण्यात... मी आजही विचार करतोय ती आत्महत्या होती का खून....?

के.पी. आर.
(जनतेला एकत्र कसं आणता येईल हा विचार करत गिरगाव चौपाटीवर गणपती मूर्ती करत बसायचे लोकमान्य टिळक, तेव्हा लोक तिथे गोळा होयचे असं एकत्र येण्याला बंदी नव्हती ब्रिटीश राज्यकर्त्यांची आणि त्यातूनंच लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली)

गणपती बाप्पा मोरया, बाप्पा सुबुद्धी दे आम्हा सर्वांना

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...