Tuesday, November 11, 2014

खपली


तू ज्याला ठेचकाळलास
त्याच दगडावर बसतं ना अजून कोणीतरी
"हात रे" म्हणत फसवायचे लाहानपणी
कुठे बदललंय काही आतातरी?

वाच्यता नको त्यागाची
सोड, सोडलंस ना काहीतरी त्यांच्यासाठी
नको ठेऊस अपेक्षा मनी
अन नकोच बघ ओठी

लाथाडलं तुला ज्यानी
नतमस्तक होतील त्याच्याचपाशी
मस्तक त्यांचं निर्णय त्यांचा
उगी भांडू नको भावनांशी

दगडाला तो जीव का लावा
मग कसली माया आपुलकी
संपला अध्याय केव्हाच मित्रा
घे धडा, आता जरा बदल की

काढून टाकलं ना आयुष्यातून
तांदळातल्या खड्यापरी
नकोच ठेऊ मनातही, नकोत शक्यता
जरी तरी...

के पी आर

(किती जरी जपली
असली जरी आपली
काढायची नाहीच
भूतकाळावरची खपली)

माणूस होऊ शकलो नाही


होश आम्हाला नव्हता कधीच
दोष स्वतःचा दिसला नाही
बोट दाखवलं चंद्राकडेही
डाग काळजाचा पुसला नाही

तोकडे दिसले कपडे तिचे
मन मोठ केल नाही
चाळवल्या भावना नेहमीच
अंतरातल्या जनावराला अंतरातंच मारलं नाही

दिसेल ते ओरबाडलं आम्ही
संमती कुणाची मागितली नाही
डोळ्यांनीच नागवलं तिला
"आई बहिण लेक" वय कुणाचं बघितलं नाही

पुरुषार्थ गाजवला जबरदस्तीनं
लाज कशाचीच वाटली नाही
चिंध्या चिंध्या केल्या तिच्या
वासना उरातली मिटली नाही

भोगायची वस्तू भोगली फक्त
आवर स्वतःला घातला नाही
पिळल्या मिशा फुगवली छाती
बाईपुढं नमणं जमलंच नाही

आदर मान खातात कशाशी
आजवर कधी शिकलोच नाही
जनावरं बरी आमच्यापरीस
आयुष्यात माणूस होऊ शकलो नाही.


के पी आर
(तू "पुरुष" आहेस असं ऐकून स्वतःची लाज वाटावी अशी वेळ आणू नका रे)

ती फुलतेय फुलासारखी
शिका थोडं जपायलाही
सात जन्म कमी पडतील
"स्त्री" खरी समजायलाही...

मुंबई खंबा आणि…




सकाळची ८:०५..
त्यासाठी साडे सहाचा गजर..
स्नूझ करत करत
७ ला उठायचं गडबडून.. नेहमीच
आवरुन, धावत पळतंच गाठायचं स्टेशन
हुलकावणी देणाऱ्या  लोकलचा
डोअर गाठला की दिवसाचं सार्थक..
अन निसटला तर
"आयच्या गावात" असला विचारही नको वाटतो
घड्याळ्याच्या काट्यावरची पावलं
ऑफिसला येऊन थांबतात
अन मग चालू होत
घड्याळ्याच्याच काट्यावर कामं
अन मिनिटागणिक वाढणारा घाम..
डोकं थकतं.. मी थांबतो
पण मुंबई थांबत नाही
पाऊलंही उचलली जातात... आपोआपंच..
परत एकदा धावत पळतच
गाठली जाते ७:१६..
कानात हेडफोन सारुन..
गर्दिला डिसकनेक्ट करंतच..
मिसळून जायचं गर्दीत
कानात कधी लता आशा
कधी गुलजार गुलाम अली..
काळोख चिरत पोचते लोकल
माझ्या स्टेशनवर
लोकलमधले विक्रेते..
स्टेशनवरचे भिकारी..
नाक्यावरची भांडणं..
चौका चौकातल्या टाळ्या..
अन घराकडे पावलं वळवताना
कट्ट्यावरच्या मित्रानं
हात करत दिलेली आरोळी...
सगळंच अंदाजानं ऐकत...
कधी स्वतःशीच चरफडत
कधी उसनंच हसत
गाठायचं घर...
हे सगळं दिवसा उजेडी बघतंच नाही मी... कधीच...
पोटात चार घास ढकलता ढकलता
खुणावतो परत एकदा गजर
परत एकदा साडे सहाचाच सेट करुन
पडायचं अंथरुणावर...
दुसऱ्या दिवशी
आदल्याच दिवशीचा रिकॅप...
-----------------------------------------
शनिवारी संध्याकाळी मात्र...
गर्दी धावते अन मी रेंगाळतो...
सिनेमाच्या अडकलेल्या कॅसेटसारखा..
बघता बघता गर्दीचा आवाजही
म्युट होतो... कानात हेडफोन न सारता
पावलं स्टेशन ऐवजी वळतात मग
"अप्सरा"कडे..
वाटेत भेटतो तो..
ऐकू काहीच येत नसतं
तो काहीच बोलत नाही... अन मी ही
पोटात नाइंटी गेल्यावर
ऐकू येतो तो डायरेक्ट..
गुलाम अलीचा आवाज... "चोरी तो नही की है"
त्यानंतर सुरु होते बाराखडी "भ"ची
भेंचोद बॉसपासून ^$%#@#^%
अजूनंही तो फक्त ऐकूनंच घेत असतो..
त्यानं हाताला धरुन उठवेपर्यंत
मी चालूच असतो...
परत एकदा मग
पावलं वळतात स्टेशनाकडं
तुलनेनं तुरळक गर्दीतून..
च्यायला गर्दी अजूनंही म्युटंच असते..
शांतता अंगावर येते पार..
ती शांतता झेलत दबक्या पावलानंच मी
घराचा जिना चढतो..
तो माझा हात सोडत नाही..
मला अंथरुणावर झोपवून
तो डोक्यावरुन हात फिरवतो..
अर्धवट झोपेत मी बरळतो..
"मुंबईत प्रत्येकजण तसा एकटाच"
तो माझ्याकडे बघून हसतो.. गालातल्या गालात
"तुला सांगतो भेंsssचोद... मुंबईकर दारु का पितो"
माझं वाक्य पूर्ण होण्याआधीच..
तो "श्शsss" करुन ओठावर बोट ठेवतो...
सकाळी उठेपर्यंत तो गेलेला असतो..
आजूबाजूला...
गजर न वाजवणारा मोबाईल
जमिनीवर पडलेली ऑफिसची बॅग
वॉल्युमचं बटन वाढवून
कलकलाट करणारी मुंबई...
रीकामा खंबा अन...
मधोमध असतो "मी"
“एकटा...”

के पी आर

आता फडकतील झेंडे


आता फडकतील झेंडे
ऑफिसात.. पक्ष कार्यालयात… शाळात
ग्राऊंडवर… चौका-चौकात अन गल्ली बोळात.
पडत्या पावसात
फाटक्या कपड्यांनी
अन अनवाणी पायानी
विकतील लहान लेकरं नाक्या-नाक्यावर…
गाडीच्या काचा खाली घेऊन
चिकटेल तिरंगा डॅश बोर्डवर
दिवसभर वाजतील
लाऊडस्पीकरवर देशभक्तीपर गीतं
राष्ट्रपतींचं भाषण होईल “इंग्रजीमधे”
अन कधी न बोलणारे पंतप्रधानही मोडतील नियम “मौनाचा”
आम्ही झोपू सूर्य डोक्यावर येईपर्यंत
कोणी करेल झेंडावंदन नाईलाजानं तर कोणी मनापासून
अखंड एक दिवस देशप्रेमाची येईल लाट
लाँग वीकेंडसाठी सुट्ट्यांचे ठरतील प्लान
सीमेवर जवान करत राहतील जीवाचं रान
“भरत माता की जय” जागोजागी ऐकायला मिळेल
एक दिवस हा असाच बघता बघता ढळेल
अन मग परत
बरळतील नेते, शहिद होतील जवान
पुढारी सोडून च्यायला सगळेच असतील
कायद्यापुढे समान
आया बहिणींची ईज्जत कवडिमोल असेल
तान्हुलीपासून म्हातारीपर्यंत
प्रत्येकीमधे निर्भया असेल
कोळश्यानी तोंड झालं जरी काळं
ओरबडतील त्यांना जमेल तेवढं सगळं
तुम्ही आम्ही च्यायला मरतंच राहू
सिस्टीमच्या नावानं खडे फोडतंच राहू
बोंबलत राहू लावून मनगटाला चूना
काहितरी करायला हवं म्हणत राहू पुनः पुनः
निवडणूका होतील सरकारही बदलेल
भ्रष्टाचाराचा चारा दुसरं कोणी चघळेल
आपण च्यायला फक्त चरफडत राहू
बातम्या वाचून बघून तडफडत राहू
भडकत राहतील कोणा ना कोणाच्या
धार्मिक भावना
दंगे जाळपोळ रोजचेच, त्यांत
उरावर बसवून घेऊ शेजारच्या देशाचा पाहुणा
रस्त्याच्या कडेला चिखल-माती कचरा
त्यातंच काल फडकलेल्या झेंड्यांचा निचरा
परत येईल पंधरा ऑगस्ट
फेसबूकवर प्रोफाईल पिक बदलतील
निलाजरी लोकं तिरंग्यासाठी लाईक्सची भिकही मागतील
तिरंगा स्वातंत्र्यसैनिक अन जावानांच्या फोटोला
एक लाईक देऊन
जाऊ जमेल तेवढ्या पटकन आपण त्यांना विसरुन
झेंड्याचा बिल्ला शर्टावर लावून
उगं छाताड फुगवू
खादी बिदी घालून च्यायला
आपली देशभक्ती दाखवू
सगळ्यांसमोर देशभक्तीचे ऊमाळे
अन देशाला लाखोली खोलवर आत
परत फडकतील झेंडे
ऑफिसात.. पक्ष कार्यालयात… शाळात
ग्राऊंडवर… चौका-चौकात अन गल्ली बोळात
हवा मला १५ ऑगस्ट असा
जेव्हा फडकेल तिरंगा डौलानं काळजात…
हरेक काळजात

के पी आर

(देश “लोकं” नाय घडवत
च्यायला लोकं “देश” घडवतात..
आता ठरवा तुम्हीच घडवायचा कि "बि"घडवायचा...

तिरंगा फडकतोय... माझ्यातरी "काळजात" अन खात्री आहे... तुमच्याबद्दलही.. साला मग दाखवूनंच देऊ ना बदल "काळजातला")

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
Happy independence day

पूर्वी


पूर्वी ईथे बुजगावणी असायची
येणाऱ्या जाणाऱ्याकडे पाहून
तोंड भरुन हसायची
पाऊस.. पडायचा कौलावर
अन कधी कौलांना चुकवून
पसरायचा घरभर
शिवार दिमाखात डोलायचं
सोनेरी ऊनही किती प्रेमानं बोलायचं
पाटाचं पाणी
ऊघडायचं स्वर्गाचं दार
जनावराच्या डोळ्यात पाहून
वाटायचा साता जन्माचा आधार
आता ईथं...
टँकर फिरतो एकदा
पंधरा दिवसातून..
विकासासाठी उगवल्या
बिल्डिंगा शिवारातून
पाऊस... पडतो कधी
कधी अडतो...
अन बाजूच्या पाटाला आता
ऊपवासंच घडतो..
पडलाच पाऊस तर
माजतं रान आजूबाजूनी
चारा छावण्यातून पोसतात
जनावरांची मढी अजूनही
ऊनाला तर आता माहितीये
फक्त एकंच गोष्ट
"चटका"
अन तोडला जातो ईथं
जित्त्या बुजगावण्यांचा ही लचका

के पी आर

ये ना जरा ये ना जरा


ये ना जरा ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा
साचलेलं आत खोलं
सांगू काय काय बोलं
वाहू दे आता सारं
भिजवून टाक चिंब पार
पहाटेच्या स्वप्नाला त्या
अर्थ दे आता खरा
ये ना जरा ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा

ढगाळलेल्या काळजातून
अवघडल्या वादळातून
दुष्काळाच्या आरश्यातून
थोडं ईथून थोडं तिथून
ठसठसणाऱ्या जखमेला
पंख इंद्रधनुचे बांध जरा
ये ना जरा ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा

दूर पडक्या माळावरं
तड तडकल्या कौलावर
भेगाळलेल्या जमिनीतून
हातावरल्या रेषांवर
थकल्या एकट्या डोंगरामागे
पडून थकलेल्या ऊनाला
शांत कर आता जरा
ये ना जरा ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा

अंगाचीही लाही लाही
बघवेना उनालाही
थकली झाडं शोधाया सावली
सर कधी येईल पहिली
लखलखत्या वीजेसंगं
काप आगीच्या या अंतरा
डोळ्यातंच साठू नको
चौफेर तू उड पाखरा
ये ना जरा ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा

के पी आर

पहिल्या पावसाच्या शुभेच्छा


घामाच्या धारा
कामाचा पसारा..
अशातंच गेलेली लाईट
जनरेटरचा आवाज
वेधशाळेचा पावसाचा अंदाज
जेवणाची सुट्टी
घरी विसरलेला डबा
पत्र्याच्या शेडखाली
भट्टी झालेला ऑफिस समोरचा ढाबा
आर्ध्या तासाची डेडलाईन... पंचिंगसाठी
जेवणाची घाई..
पावसानं गाठण्याआधी, ऑफिसात पोहचण्यासाठी
ए आवरा रे म्हणत
तो स्वतः सावरुन बसला
आजूबाजूच्या ओळखीच्यांकडे पाहून
उगाचंच हसला
वीजेचा कडकडाट
बरसणारे थेंब अन
त्याची चलबिचल वाढलेली
सकाळी केलेली ईस्त्री अन..
२३७० रुपये.. च्यायला नको तेव्हाच
त्याला शर्टाची किंमत आठवली..
शेडमधून तिरपा
आत येणारा पाऊस
लेदरच्या शूजवर उडणारे शिंतोडे
हॉटेलच्या तोंडाशी दाटीवाटीनं
थांबलेले लोक..
जागोजागी साचलेलं पाणी उडवत
समोरुन जाणारा लहान पोरांचा घोळका
कपड्यांवर चिखल अन चेहऱ्यावर.... हसू
पहिला पाऊस..
च्यायला अन आपण एवढे निरस...
पंचिंगची डेडलाईन अन
शर्ट, शूजच्या किंमतीत अडकलेले
कोणाला काहीही कळायच्या आत
तो शेडमधून बाहेर आला
बरसणाऱ्या आभाळाकडे बघून
मनापासून हसला..
पाठीमागून मित्रांच्या हाका
ह्यॅ... त्याला फक्त पाऊस "ऐकू" येत होता
ईस्त्री बिस्त्री.. किंमती बिमती
सगळं विसरुन.. चालत राहिला तो
चिंब ओला जाऊन बसला
त्याच्या डेस्कवर..
कोणीतरी विचारलं विचित्र हावभाव करुन
विचित्रच आवाजात, "काय रे"?
तो फक्त म्हणाला हसून...
पहिल्या पावसाच्या शुभेच्छा

के पी आर

देवाने केलेली एक फार मोठी गेम असते


Old poem found in mails :P

प्रेम म्हणजे....

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते....
देवाने केलेली एक फार मोठी गेम असते.
तो तिला चंद्रमुखी म्हणतो, का तर म्हणे,
तिचा चेहरा त्याला चंद्रापरी नितळ अन सुंदर दिसतो.
तुमचा चौकोनी चंद्र पाहून समोरचा मात्रं पोट धरुन हसतो.
भोपळ्याच्या साईझची ती त्याला चवळीच्या शेंगेपरी भासते.
टुणटुणला लाजवेल अशी ती त्याला मात्र शिल्पा शेट्टीच दिसते.
तिच्या चिनी डोळ्यांनाही तो टपोऱ्या बदामाची उपमा देतो.
का बरं वाळवंटातल्या खजूराच्या झाडाला केरळच्या हिरव्यागांर किनारपट्टीवर नेतो.
तिचे पुढे आलेले वाकडे तिकडे दातही त्याला मोत्यासारखे वाटतात.
वास्तवात मात्रं पुढचे सगळे दात एकावेळेस झाकताना तिचे ओठ फाटतात.
जाडे-भरडे ओठ तिचे त्याला नाजूक गुलाबाच्या पाकळीपरी दिसतांत.
पण खरंतर कुठल्याच गुलाबाच्या पाकळ्या कोबीच्या सालीएवढ्या मोठ्या नसतात.
उंदराने केस कुरतडल्यासारखा हेअर कट तिचा त्याला मात्रं "कूल" वाटतो.
आणि असं मनापासून प्रेम करणारा मराठी तरुण इंग्रजीत सर्वांना "फूल" वाटतो.
तिची मात्रं तऱ्हा निराळीच असते, त्याची हर-एक गोष्ट  तिला खटकत असते.
त्याची प्रत्येक गोष्ट ती, अंगावर पडलेल्या झुरळापरी झटकत असते.
तुम्ही कोणतेही कपडे घाला तिला ते आऊटडेटेडंच दिसतात.
अन तिने सुचवलेले कपडे घातल्यावर मात्रं सगळे विदूषकाला पाहिल्यासारखे हसतांत.
तुम्हाला शाहरुख तर तिला आमिर खानची ऍक्टिंग आवडते.
तुम्हाला आवडणारा सिनेमा बघताना ती हमखास नाक मुरडते.
तुम्हाला गोड तर तिला तिखट खायला आवडते.
लहान मुलासारखा नेहमी गोडंच खातो, म्हणत ती सर्वांदेखत तुमची टर उडवते.
गाडी सावकाश चालवली तर तुम्हाला ती डल अन आळशी म्हणते.
वेगात चालवल्यावर मात्रं रॅश ड्राईव्हिंगवर धडे देत, तुमच्या ड्राईव्हिंगला घाबरल्याचा आव आणते.
केस बारीक कापा किंवा लांब वाढवा, तिच्यासाठी तुमचा हेअर कट विचित्रंच असतो.
केस प्लेन ठेवले तर म्हातारा आणि रंगवले तर तिला तो मवाली दिसतो.
तुम्हाला कोल्हापुरी चप्पल तर तिला नाईकीचे शूज आवडतांत.
तुमची असते दयनीय अवस्था, कारण तुमच्या खिशाला मात्रं फारतर बाटाचेचं परवडतात.
तुम्हाला साऊथ इंडियन, तिला फास्ट फूड आवडते.
कुठल्या हॉटेलमधे जायचंं ते सोडा पण खाण्याचा मेनूपण तिचं ठरवते.
हि सगळी कसरत करताना तुम्ही सार्थक झाल्यासारखं हसता.
पण अशावेळीही तुम्ही तिला बावळटंच दिसता.
त्याच्या रागावर मात्र तिच्या प्रेमाचा उतारा असतो.
तिच्या रुसण्याला त्याच्या प्रेमाचा सहारा असतो.
तुम्हाला सुधारण्यासाठी असंच तुमच्या सर्व गोष्टी बदलण्याचा हट्ट ती धरते.
पण मनातून मात्रं, तुम्ही बिलकुल बदलू नये (बावळटंच रहावा) अशी मनापासून प्रार्थना करते.
एवढे मतभेद असूनही दोन लोक एकत्रं राहतात.
आणि याच जन्मी नव्हे तर  पुढच्या सात जन्मातही साथ देण्याची स्वप्नं पाहतात....
म्हणूनंच प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते....
देवाने केलेली एक फार मोठी गेम असते.


के पी आर

चाळीशी


चाळीशीत...
चष्मा लागतो
दमही लागतो..
वजन वाढतं
उगाच धडधडतं..
बी.पी. सुद्धा कधी कमी कधी जास्तं
तब्येत कधी ऊत्तम तर कधी नादुरुस्तं
झोप ऊडते..
चिंता पिडते
केसंही थोडे ऊडतातंच
नाही म्हटलं तरी..
आरश्यातल्या प्रतिबिंबाशी नजरा भिडतातंच
तेल तिखट मिठाचे ठरतात नवे नियम
मनाविरुद्ध का होईना पाळावे लागतात कायम
हि चाळीशी मात्र जरा वेगळी आहे..
अजून बराच पल्ला गाठायची जिद्द उरात सगळी आहे
चष्म्यासोबत दूरदृष्टी मिळालीये
दम सोडा हो पण आस्ते चालण्याची मजाही कळालीये
या चाळीस वर्षात वजन अन धडधड वाढली
पण वाढली प्रेमापोटी
नाडीच्या प्रत्येक ठोक्यासोबत
नाव एकमेकांचंच ओठी
सावलीत एकमेकांच्या
निश्चिंत असतो
आरसा हवा कशाला
डोळ्यातंच एकमेकांच्या सुंदर दिसतो..
खाण्या पिण्याच्या निर्बंधांना मी म्हणतो जुलमी नियम
अन ती मात्र शिकवत राहते "ठेवा थोडासा संयम"

तर लग्नाची हि चाळीशी गाठली
घेऊन हातात हात...
जन्मोजन्मीची साथ आहे लेकांनो
हि तर आहे फक्त सुरुवात...


लग्नाच्या चाळीसाव्या वाढदिवसाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा

कुणाल, ज्यो, ताई, माई

"येथे थुंकू नये" च्या बोर्डावरंच
थुंकण्यात काय असते मजा?
ईन की पिंक से बचाने के लिये
भगवान की तस्वीर को भी सिंडीयोके कोने मे चिपकाने की सजा

हटकून उधळता चौका चौकात तुम्ही
पाहून लाल दिवा
साला और कितने दिन करेगी माँ
तुम्हारे लंबी ऊम्र की दुआँ?

चार दोन रुपड्यांचा धूर
ऊडवता हवेत रुबाबात
देखी न आप जैसी हस्तीया
जो करती है अपनी ही चिता जलाने की शुरुवात

नाक्या नाक्यावर छेडता तुम्ही
कोणाची बहिण, बायको, मुलगी कोणाची सून
आते जाते आँखे मुंदने वाले हम
सिर्फ ब्रेकींग न्यूज देख के खोलता है हमारा खून

धरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या
राजकारण्यांकडे भरभरुन सगळं पण
"वरचा" मजला "खाली" आहे
साला ईस देश मे आजकल
राजनीती सबसे बडी गाली है

जगले वाचले किती
या दुष्काळाच्या दातातून
बिसलेरी कम पडे तो
पियेंगे बचे हुवो का भी खून

सडलेल्या सिस्टीमला शिव्या घालत
बसता बोंबलत घरी
ऐसे निकम्मो की वजह से तो होते है
खून से लतपत हाथो से नेता बाईज्जत बरी

तुझं नाव घेऊन भिडतो एकमेकांना
भगवा हिरवा अन रक्ताचा लाल रंग ताजा
मंदिर मस्जिद मजहब और कौम मे
बाँटने की मौला तुझको भी मिली है सजा

के पी आर

सरबजीत सोबत भारताचा स्वाभिमानही मेला??


मरेस्तोवर दुर्लक्षित असलेला सरबजीत
मेल्यावर... मेला म्हणू नका
शहीद म्हणा... देशाचा वीर...
एक कोटीची मदत... पंचवीस लाखाची मदत
२२ वर्षाच्या यातना सव्वा कोटीत विकत घेण्याचा
जीवघेणा अन निर्लज्ज प्रकार...
सरकारकडून पाकिस्तानचा निषेध...
हल्लेखोरांना कडक शासन होईल याची आशा
(अरे डोळे झाकून दूध पिणाऱ्यांनो अजून कळत का नाही हे जेलमधल्या कैद्यांचं कृत्य नाही ही पाकिस्तानची नापाक नीती आहे)
आज ताणले गेलेले संबध सुरळीत करण्यासाठी
दोन महिन्यांनी परत प्रयत्न..
मग भारत पाक क्रिकेट सिरीज
अमन की आशा
खिरापतिसारखे व्हिसा वाटप...
अन पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
मॅच बघायला म्हणून आलेले
कित्येक ईथेच पांगतील
आधार कार्डासाठी रांग लाऊन त्यांचा हक्कही सांगतील
अन पाकिस्तानातल्या जेलमधे सरबजीतवर हल्ला केला तसाच
परत एकदा...
भारतातंच भारतीयांवरंच होईल हल्ला...
त्यातल्या एखाद्या अतिरेक्याला पकडून
ठेवली जाईल त्याची बडदास्त
परत एकदा टिकेचा मारा
निषेधाचे पुळचट शब्द...
लोकसभा तहकूब...
"आम्ही तुमच्याशी क्रिकेट खेळणार नाही जा" हा गर्भित ईशारा
अन चार दिवसांनी वाटचाल
नव्या हल्ल्याकडे...
हे सारं असंच चालणार का?
चालू द्यायचं का?
सरबजीत गेला...
हुतात्मा झाला...
कणाहीन राजकारण्यांसारखं
असंच म्हणत रहायचं???
की डोळे ऊघडून समजून घेयचं
सरबजीत सोबत भारताचा स्वाभिमानही मेला??

(जागं व्हायचं की आपणही पडून रहायचं सुस्त
थंड रक्तानं, दगडी अंतःकरणानं...
पुळचट राजकारण्यांचा वाण नाही पण गुण लागला म्हणत??)

के पी आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...