Tuesday, November 11, 2014

आता फडकतील झेंडे


आता फडकतील झेंडे
ऑफिसात.. पक्ष कार्यालयात… शाळात
ग्राऊंडवर… चौका-चौकात अन गल्ली बोळात.
पडत्या पावसात
फाटक्या कपड्यांनी
अन अनवाणी पायानी
विकतील लहान लेकरं नाक्या-नाक्यावर…
गाडीच्या काचा खाली घेऊन
चिकटेल तिरंगा डॅश बोर्डवर
दिवसभर वाजतील
लाऊडस्पीकरवर देशभक्तीपर गीतं
राष्ट्रपतींचं भाषण होईल “इंग्रजीमधे”
अन कधी न बोलणारे पंतप्रधानही मोडतील नियम “मौनाचा”
आम्ही झोपू सूर्य डोक्यावर येईपर्यंत
कोणी करेल झेंडावंदन नाईलाजानं तर कोणी मनापासून
अखंड एक दिवस देशप्रेमाची येईल लाट
लाँग वीकेंडसाठी सुट्ट्यांचे ठरतील प्लान
सीमेवर जवान करत राहतील जीवाचं रान
“भरत माता की जय” जागोजागी ऐकायला मिळेल
एक दिवस हा असाच बघता बघता ढळेल
अन मग परत
बरळतील नेते, शहिद होतील जवान
पुढारी सोडून च्यायला सगळेच असतील
कायद्यापुढे समान
आया बहिणींची ईज्जत कवडिमोल असेल
तान्हुलीपासून म्हातारीपर्यंत
प्रत्येकीमधे निर्भया असेल
कोळश्यानी तोंड झालं जरी काळं
ओरबडतील त्यांना जमेल तेवढं सगळं
तुम्ही आम्ही च्यायला मरतंच राहू
सिस्टीमच्या नावानं खडे फोडतंच राहू
बोंबलत राहू लावून मनगटाला चूना
काहितरी करायला हवं म्हणत राहू पुनः पुनः
निवडणूका होतील सरकारही बदलेल
भ्रष्टाचाराचा चारा दुसरं कोणी चघळेल
आपण च्यायला फक्त चरफडत राहू
बातम्या वाचून बघून तडफडत राहू
भडकत राहतील कोणा ना कोणाच्या
धार्मिक भावना
दंगे जाळपोळ रोजचेच, त्यांत
उरावर बसवून घेऊ शेजारच्या देशाचा पाहुणा
रस्त्याच्या कडेला चिखल-माती कचरा
त्यातंच काल फडकलेल्या झेंड्यांचा निचरा
परत येईल पंधरा ऑगस्ट
फेसबूकवर प्रोफाईल पिक बदलतील
निलाजरी लोकं तिरंग्यासाठी लाईक्सची भिकही मागतील
तिरंगा स्वातंत्र्यसैनिक अन जावानांच्या फोटोला
एक लाईक देऊन
जाऊ जमेल तेवढ्या पटकन आपण त्यांना विसरुन
झेंड्याचा बिल्ला शर्टावर लावून
उगं छाताड फुगवू
खादी बिदी घालून च्यायला
आपली देशभक्ती दाखवू
सगळ्यांसमोर देशभक्तीचे ऊमाळे
अन देशाला लाखोली खोलवर आत
परत फडकतील झेंडे
ऑफिसात.. पक्ष कार्यालयात… शाळात
ग्राऊंडवर… चौका-चौकात अन गल्ली बोळात
हवा मला १५ ऑगस्ट असा
जेव्हा फडकेल तिरंगा डौलानं काळजात…
हरेक काळजात

के पी आर

(देश “लोकं” नाय घडवत
च्यायला लोकं “देश” घडवतात..
आता ठरवा तुम्हीच घडवायचा कि "बि"घडवायचा...

तिरंगा फडकतोय... माझ्यातरी "काळजात" अन खात्री आहे... तुमच्याबद्दलही.. साला मग दाखवूनंच देऊ ना बदल "काळजातला")

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!!
Happy independence day

पूर्वी


पूर्वी ईथे बुजगावणी असायची
येणाऱ्या जाणाऱ्याकडे पाहून
तोंड भरुन हसायची
पाऊस.. पडायचा कौलावर
अन कधी कौलांना चुकवून
पसरायचा घरभर
शिवार दिमाखात डोलायचं
सोनेरी ऊनही किती प्रेमानं बोलायचं
पाटाचं पाणी
ऊघडायचं स्वर्गाचं दार
जनावराच्या डोळ्यात पाहून
वाटायचा साता जन्माचा आधार
आता ईथं...
टँकर फिरतो एकदा
पंधरा दिवसातून..
विकासासाठी उगवल्या
बिल्डिंगा शिवारातून
पाऊस... पडतो कधी
कधी अडतो...
अन बाजूच्या पाटाला आता
ऊपवासंच घडतो..
पडलाच पाऊस तर
माजतं रान आजूबाजूनी
चारा छावण्यातून पोसतात
जनावरांची मढी अजूनही
ऊनाला तर आता माहितीये
फक्त एकंच गोष्ट
"चटका"
अन तोडला जातो ईथं
जित्त्या बुजगावण्यांचा ही लचका

के पी आर

ये ना जरा ये ना जरा


ये ना जरा ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा
साचलेलं आत खोलं
सांगू काय काय बोलं
वाहू दे आता सारं
भिजवून टाक चिंब पार
पहाटेच्या स्वप्नाला त्या
अर्थ दे आता खरा
ये ना जरा ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा

ढगाळलेल्या काळजातून
अवघडल्या वादळातून
दुष्काळाच्या आरश्यातून
थोडं ईथून थोडं तिथून
ठसठसणाऱ्या जखमेला
पंख इंद्रधनुचे बांध जरा
ये ना जरा ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा

दूर पडक्या माळावरं
तड तडकल्या कौलावर
भेगाळलेल्या जमिनीतून
हातावरल्या रेषांवर
थकल्या एकट्या डोंगरामागे
पडून थकलेल्या ऊनाला
शांत कर आता जरा
ये ना जरा ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा

अंगाचीही लाही लाही
बघवेना उनालाही
थकली झाडं शोधाया सावली
सर कधी येईल पहिली
लखलखत्या वीजेसंगं
काप आगीच्या या अंतरा
डोळ्यातंच साठू नको
चौफेर तू उड पाखरा
ये ना जरा ये ना जरा
चाहूल हलके दे ना जरा

के पी आर

पहिल्या पावसाच्या शुभेच्छा


घामाच्या धारा
कामाचा पसारा..
अशातंच गेलेली लाईट
जनरेटरचा आवाज
वेधशाळेचा पावसाचा अंदाज
जेवणाची सुट्टी
घरी विसरलेला डबा
पत्र्याच्या शेडखाली
भट्टी झालेला ऑफिस समोरचा ढाबा
आर्ध्या तासाची डेडलाईन... पंचिंगसाठी
जेवणाची घाई..
पावसानं गाठण्याआधी, ऑफिसात पोहचण्यासाठी
ए आवरा रे म्हणत
तो स्वतः सावरुन बसला
आजूबाजूच्या ओळखीच्यांकडे पाहून
उगाचंच हसला
वीजेचा कडकडाट
बरसणारे थेंब अन
त्याची चलबिचल वाढलेली
सकाळी केलेली ईस्त्री अन..
२३७० रुपये.. च्यायला नको तेव्हाच
त्याला शर्टाची किंमत आठवली..
शेडमधून तिरपा
आत येणारा पाऊस
लेदरच्या शूजवर उडणारे शिंतोडे
हॉटेलच्या तोंडाशी दाटीवाटीनं
थांबलेले लोक..
जागोजागी साचलेलं पाणी उडवत
समोरुन जाणारा लहान पोरांचा घोळका
कपड्यांवर चिखल अन चेहऱ्यावर.... हसू
पहिला पाऊस..
च्यायला अन आपण एवढे निरस...
पंचिंगची डेडलाईन अन
शर्ट, शूजच्या किंमतीत अडकलेले
कोणाला काहीही कळायच्या आत
तो शेडमधून बाहेर आला
बरसणाऱ्या आभाळाकडे बघून
मनापासून हसला..
पाठीमागून मित्रांच्या हाका
ह्यॅ... त्याला फक्त पाऊस "ऐकू" येत होता
ईस्त्री बिस्त्री.. किंमती बिमती
सगळं विसरुन.. चालत राहिला तो
चिंब ओला जाऊन बसला
त्याच्या डेस्कवर..
कोणीतरी विचारलं विचित्र हावभाव करुन
विचित्रच आवाजात, "काय रे"?
तो फक्त म्हणाला हसून...
पहिल्या पावसाच्या शुभेच्छा

के पी आर

देवाने केलेली एक फार मोठी गेम असते


Old poem found in mails :P

प्रेम म्हणजे....

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते....
देवाने केलेली एक फार मोठी गेम असते.
तो तिला चंद्रमुखी म्हणतो, का तर म्हणे,
तिचा चेहरा त्याला चंद्रापरी नितळ अन सुंदर दिसतो.
तुमचा चौकोनी चंद्र पाहून समोरचा मात्रं पोट धरुन हसतो.
भोपळ्याच्या साईझची ती त्याला चवळीच्या शेंगेपरी भासते.
टुणटुणला लाजवेल अशी ती त्याला मात्र शिल्पा शेट्टीच दिसते.
तिच्या चिनी डोळ्यांनाही तो टपोऱ्या बदामाची उपमा देतो.
का बरं वाळवंटातल्या खजूराच्या झाडाला केरळच्या हिरव्यागांर किनारपट्टीवर नेतो.
तिचे पुढे आलेले वाकडे तिकडे दातही त्याला मोत्यासारखे वाटतात.
वास्तवात मात्रं पुढचे सगळे दात एकावेळेस झाकताना तिचे ओठ फाटतात.
जाडे-भरडे ओठ तिचे त्याला नाजूक गुलाबाच्या पाकळीपरी दिसतांत.
पण खरंतर कुठल्याच गुलाबाच्या पाकळ्या कोबीच्या सालीएवढ्या मोठ्या नसतात.
उंदराने केस कुरतडल्यासारखा हेअर कट तिचा त्याला मात्रं "कूल" वाटतो.
आणि असं मनापासून प्रेम करणारा मराठी तरुण इंग्रजीत सर्वांना "फूल" वाटतो.
तिची मात्रं तऱ्हा निराळीच असते, त्याची हर-एक गोष्ट  तिला खटकत असते.
त्याची प्रत्येक गोष्ट ती, अंगावर पडलेल्या झुरळापरी झटकत असते.
तुम्ही कोणतेही कपडे घाला तिला ते आऊटडेटेडंच दिसतात.
अन तिने सुचवलेले कपडे घातल्यावर मात्रं सगळे विदूषकाला पाहिल्यासारखे हसतांत.
तुम्हाला शाहरुख तर तिला आमिर खानची ऍक्टिंग आवडते.
तुम्हाला आवडणारा सिनेमा बघताना ती हमखास नाक मुरडते.
तुम्हाला गोड तर तिला तिखट खायला आवडते.
लहान मुलासारखा नेहमी गोडंच खातो, म्हणत ती सर्वांदेखत तुमची टर उडवते.
गाडी सावकाश चालवली तर तुम्हाला ती डल अन आळशी म्हणते.
वेगात चालवल्यावर मात्रं रॅश ड्राईव्हिंगवर धडे देत, तुमच्या ड्राईव्हिंगला घाबरल्याचा आव आणते.
केस बारीक कापा किंवा लांब वाढवा, तिच्यासाठी तुमचा हेअर कट विचित्रंच असतो.
केस प्लेन ठेवले तर म्हातारा आणि रंगवले तर तिला तो मवाली दिसतो.
तुम्हाला कोल्हापुरी चप्पल तर तिला नाईकीचे शूज आवडतांत.
तुमची असते दयनीय अवस्था, कारण तुमच्या खिशाला मात्रं फारतर बाटाचेचं परवडतात.
तुम्हाला साऊथ इंडियन, तिला फास्ट फूड आवडते.
कुठल्या हॉटेलमधे जायचंं ते सोडा पण खाण्याचा मेनूपण तिचं ठरवते.
हि सगळी कसरत करताना तुम्ही सार्थक झाल्यासारखं हसता.
पण अशावेळीही तुम्ही तिला बावळटंच दिसता.
त्याच्या रागावर मात्र तिच्या प्रेमाचा उतारा असतो.
तिच्या रुसण्याला त्याच्या प्रेमाचा सहारा असतो.
तुम्हाला सुधारण्यासाठी असंच तुमच्या सर्व गोष्टी बदलण्याचा हट्ट ती धरते.
पण मनातून मात्रं, तुम्ही बिलकुल बदलू नये (बावळटंच रहावा) अशी मनापासून प्रार्थना करते.
एवढे मतभेद असूनही दोन लोक एकत्रं राहतात.
आणि याच जन्मी नव्हे तर  पुढच्या सात जन्मातही साथ देण्याची स्वप्नं पाहतात....
म्हणूनंच प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असते....
देवाने केलेली एक फार मोठी गेम असते.


के पी आर

चाळीशी


चाळीशीत...
चष्मा लागतो
दमही लागतो..
वजन वाढतं
उगाच धडधडतं..
बी.पी. सुद्धा कधी कमी कधी जास्तं
तब्येत कधी ऊत्तम तर कधी नादुरुस्तं
झोप ऊडते..
चिंता पिडते
केसंही थोडे ऊडतातंच
नाही म्हटलं तरी..
आरश्यातल्या प्रतिबिंबाशी नजरा भिडतातंच
तेल तिखट मिठाचे ठरतात नवे नियम
मनाविरुद्ध का होईना पाळावे लागतात कायम
हि चाळीशी मात्र जरा वेगळी आहे..
अजून बराच पल्ला गाठायची जिद्द उरात सगळी आहे
चष्म्यासोबत दूरदृष्टी मिळालीये
दम सोडा हो पण आस्ते चालण्याची मजाही कळालीये
या चाळीस वर्षात वजन अन धडधड वाढली
पण वाढली प्रेमापोटी
नाडीच्या प्रत्येक ठोक्यासोबत
नाव एकमेकांचंच ओठी
सावलीत एकमेकांच्या
निश्चिंत असतो
आरसा हवा कशाला
डोळ्यातंच एकमेकांच्या सुंदर दिसतो..
खाण्या पिण्याच्या निर्बंधांना मी म्हणतो जुलमी नियम
अन ती मात्र शिकवत राहते "ठेवा थोडासा संयम"

तर लग्नाची हि चाळीशी गाठली
घेऊन हातात हात...
जन्मोजन्मीची साथ आहे लेकांनो
हि तर आहे फक्त सुरुवात...


लग्नाच्या चाळीसाव्या वाढदिवसाबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा

कुणाल, ज्यो, ताई, माई

"येथे थुंकू नये" च्या बोर्डावरंच
थुंकण्यात काय असते मजा?
ईन की पिंक से बचाने के लिये
भगवान की तस्वीर को भी सिंडीयोके कोने मे चिपकाने की सजा

हटकून उधळता चौका चौकात तुम्ही
पाहून लाल दिवा
साला और कितने दिन करेगी माँ
तुम्हारे लंबी ऊम्र की दुआँ?

चार दोन रुपड्यांचा धूर
ऊडवता हवेत रुबाबात
देखी न आप जैसी हस्तीया
जो करती है अपनी ही चिता जलाने की शुरुवात

नाक्या नाक्यावर छेडता तुम्ही
कोणाची बहिण, बायको, मुलगी कोणाची सून
आते जाते आँखे मुंदने वाले हम
सिर्फ ब्रेकींग न्यूज देख के खोलता है हमारा खून

धरणात मुतण्याची भाषा करणाऱ्या
राजकारण्यांकडे भरभरुन सगळं पण
"वरचा" मजला "खाली" आहे
साला ईस देश मे आजकल
राजनीती सबसे बडी गाली है

जगले वाचले किती
या दुष्काळाच्या दातातून
बिसलेरी कम पडे तो
पियेंगे बचे हुवो का भी खून

सडलेल्या सिस्टीमला शिव्या घालत
बसता बोंबलत घरी
ऐसे निकम्मो की वजह से तो होते है
खून से लतपत हाथो से नेता बाईज्जत बरी

तुझं नाव घेऊन भिडतो एकमेकांना
भगवा हिरवा अन रक्ताचा लाल रंग ताजा
मंदिर मस्जिद मजहब और कौम मे
बाँटने की मौला तुझको भी मिली है सजा

के पी आर

सरबजीत सोबत भारताचा स्वाभिमानही मेला??


मरेस्तोवर दुर्लक्षित असलेला सरबजीत
मेल्यावर... मेला म्हणू नका
शहीद म्हणा... देशाचा वीर...
एक कोटीची मदत... पंचवीस लाखाची मदत
२२ वर्षाच्या यातना सव्वा कोटीत विकत घेण्याचा
जीवघेणा अन निर्लज्ज प्रकार...
सरकारकडून पाकिस्तानचा निषेध...
हल्लेखोरांना कडक शासन होईल याची आशा
(अरे डोळे झाकून दूध पिणाऱ्यांनो अजून कळत का नाही हे जेलमधल्या कैद्यांचं कृत्य नाही ही पाकिस्तानची नापाक नीती आहे)
आज ताणले गेलेले संबध सुरळीत करण्यासाठी
दोन महिन्यांनी परत प्रयत्न..
मग भारत पाक क्रिकेट सिरीज
अमन की आशा
खिरापतिसारखे व्हिसा वाटप...
अन पुन्हा ये रे माझ्या मागल्या...
मॅच बघायला म्हणून आलेले
कित्येक ईथेच पांगतील
आधार कार्डासाठी रांग लाऊन त्यांचा हक्कही सांगतील
अन पाकिस्तानातल्या जेलमधे सरबजीतवर हल्ला केला तसाच
परत एकदा...
भारतातंच भारतीयांवरंच होईल हल्ला...
त्यातल्या एखाद्या अतिरेक्याला पकडून
ठेवली जाईल त्याची बडदास्त
परत एकदा टिकेचा मारा
निषेधाचे पुळचट शब्द...
लोकसभा तहकूब...
"आम्ही तुमच्याशी क्रिकेट खेळणार नाही जा" हा गर्भित ईशारा
अन चार दिवसांनी वाटचाल
नव्या हल्ल्याकडे...
हे सारं असंच चालणार का?
चालू द्यायचं का?
सरबजीत गेला...
हुतात्मा झाला...
कणाहीन राजकारण्यांसारखं
असंच म्हणत रहायचं???
की डोळे ऊघडून समजून घेयचं
सरबजीत सोबत भारताचा स्वाभिमानही मेला??

(जागं व्हायचं की आपणही पडून रहायचं सुस्त
थंड रक्तानं, दगडी अंतःकरणानं...
पुळचट राजकारण्यांचा वाण नाही पण गुण लागला म्हणत??)

के पी आर

तुला का गं जायचं असतं??


तुला का गं जायचं असतं??

आल्या आल्या त्याला माझ्याकडे येयचं नसतं
मला बघितल्यावर त्याचं उगाचंच बिनसतं
हाक मारली तरी बसतो कसा रुसुन
सवय होते हळू हळू, बघतो मग हसून
हाका मारतो येता जाता
"खेल माज्याशी" म्हणतो मांडीवर बसता बसता
सुरुवातीचे कित्येक दिवस आमचं जुळत नसतं
नेमकी आमची गट्टी जमल्यावरंच
तुला का गं जायचं असतं??

हाताला धरुन म्हणतो इते बश
गोग्गोड हसून करतो सगळ्यांना वश
बोबडं बोबडं बोलून वेड लावतो पार
गाल कपाळ ओठावर देतो मुके किमान चार
त्याच्या ईवल्याशा डोळ्यातंच
आता सुख आम्हाला दिसतं
तेव्हाच नजर चोरुन तुला का गं जायचं असतं??

ती ही एअरपोर्टवर, आल्या आल्या बिलगते..
आजी भाऊ कुठयेत विचारत त्यांनाही हुडकते
रोज संध्याकाळी माझी वाट बघत बसते
ऊशीर झाला म्हणून रुसली तर अजूनंच गोड दिसते
रोजच्या रहाटगाडग्यात तिला फिरायला नेणं राहतं
कोपऱ्यावरचं गार्डन रोज वाट तिची पाहतं
कामाला दांडी मारुन आता गार्डन ठरलेलं असतं..
तिच्यासाठी वेळ काढल्यावरंच नेमकं
तुला का गं जायचं असतं??

थोडसं तिला चिडवल्यावर बसते ती फुगुन
हसू दाबत राहतो आम्ही, तिला असं बघून
त्याचा तर आवाज गगनाला भिडतो
छोट्याशा गोष्टीतही असा जाम चिडतो
आपल्या सगळ्या घरात जीव भरतात दोघं
क्षणभर नजरेआड झाले तरी वारं सुटतं ऊभं
त्यांच्या सवयीनं काळीज वेडंपिसं झालेलं असतं
नेमकं हे वेड जपल्यावरंच
तुला का गं जायचं असतं??

त्यांना पंखाखाली घेऊन अशीच जातेस तू ऊडून
डोळ्यात काळजात घरात सगळ्या..
आठवणी त्यांच्या बसतात अशा दडून
आवंढा गिळत गिळत आम्ही..
एकमेकांच्या नजरा ऊगाच चुकवतो
मोकळ्या घराकडं बघत
आठवणींना हाताला धरुन ऊठवतो
फोटोंवरुन हात फिरवत..
दूधाची तहान ताकावर भागवत का गं रहावं लागत?
राहून राहून एकंच प्रश्न...
फिरुन फिरुन मन, ऊत्तर एकंच मागतं
तुला का गं जावं लागतं
तुला का गं जायचं असतं??

के पी आर

Thursday, October 9, 2014

कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा


कमलेश  भाऊंचं कमलकुंज प्रशस्त आणि मोठं देखणं होतं. भिंती, छत मस्तपैकी भगव्या रंगात रंगवलेलं होतं आणि खिडक्या दारं तेवढी हिरवी होती. दारं-खिडक्या म्हणे हिरव्या असाव्या, प्रवेश जरी त्यातून घेतला तर आत कसं सगळं भगवं असतं आणि त्याहून बाहेरुन हिरवा आभासही होतोच. अन पांढऱ्या रंगाला मात्र तिथे जागा नव्हती कारण पांढरा रंगं म्हणजे शांतता, तह... आणि तह बिह छ्यॅट कमलेश भाऊंना जमलाच नाही कधी. पण खरं सांगायचं तर गेल्या काही वर्षात या देखण्या वास्तूला अवकळा आली होती, का कुणास ठाऊक. कोणी काही करो अपयश ईथल्या लोकांच्या पाचवीला पुजलेलं असायचं. आणि खरंतर कमलकुंज मधले जवळपास सगळे सदस्य ढाराढूर झोपलेले असायचे, दिवसरात्र... अगदी कोमात गेल्यासारखे किंवा कुंभकरणासारखे म्हणू आपण हवं तर. आणि त्यामुळेच कमलेश भाऊंच्या विरोधकांचं फावत होतं. हा  पण यांची झोप हि अगदी कुंभकर्णासारखीच असायची, भूक(?) लागली कि ठराविक सदस्य उठायचे टामटूमीत खायचे प्यायचे नि परत झोपायला तयार. तर अशा दीर्घ काळच्या झोपेनंतर अचानक देशभरात म्हणे परीवर्तनाची लाट आली आणि त्या लाटेत बाकी सगळे वाहून गेले तसे कमलकुंज मधले सदस्य जागे झाले...


या लाटेनंतर तीन महिन्यांनी सुद्धा कमलकुंज मधले सदस्य जाग आल्याचा आव आणू लागले. एक दिवस कुस बदलत असताना लोकांना वाटलं ते उठतायेत पण त्यांनी आळोखे पिळोखे देत पडून राहणं पसंत केलं. आता कोणत्याही क्षणी हे उठणार म्हणून लोकांनी त्यांच्या खाण्या पिण्याची तयारी करायला सुरुवात केली. कमलेश भाऊंचा एव्हाना "कमलेस भाई" झाला होता. तर काही सदस्य आळोखे पिळोखे देत जावेगर उठून बसले आणि डोळे चोळत चोळत कमलकुंजमधे नजर फिरवू लागले. त्यांच्या नजरेतलं आश्चर्य लपत नव्हतं, कमलकुंज मधे अगदी नव्यानंच मधोमध एक भिंतं घालण्यात आली होती. अगदी भिंतीला प्लॅस्टरही करणं बाकी होतं, बांधकाम ओलं होतं. ते बघून भानावर येत काही जणांनी विचारायला सुरुवात केली कि हा काय प्रकार आहे. लोक म्हणाले दाढीवाले काका आले होते त्यांच्याकडे काही जागृत सदस्यांनी तक्रार केली कमलकुंजमधल्या खुर्च्या अपुऱ्या पडत आहेत. आपल्या सगळ्या सदस्यांना बसायची सोय नाही, आपले मित्र म्हणत म्हणत काही लोक बाण घेऊन येतायेत आणि आपल्या हक्काच्या खुर्च्यांवर अतिक्रमण करतायेत. काका चिडले, एक हात गुळगुळीत डोक्यावर आणि एक हात वाढलेल्या दाढीवर फिरवत म्हणाले बास झालं शेअरींग आता दाखवा डेअरींग.. उंदराला वाघ केलं आता परत उंदीर करा, चला कामाला लागा, लाटेच्या शाही पाण्याची मस्ती काय असते दाखवा सगळ्यांना... घाला भिंत मधोमध. कुणीतरी आगाऊ म्हणाला आहो पण भिंत घातली तरी खुर्च्या अपुऱ्या पडणारंच ना? त्यावर काका हसून म्हणाले ते माझ्यावर सोपवा, मी ऑलरेडी ज्यादाच्या खुर्च्या घेऊन फिरतोय, मला आयडीया होतीच या सगळ्याची म्हणून बाणवाल्यांना मी सांगितलंय नो ऊल्लू बनाविंग.

मग काय सगळे जोमाने कामाला लागले, भिंतं उभारली.. भिंतीच्या पलिकडची सगळी कमळं खुडून कमलकुंज मधे आणली. वाढीव खुर्च्या भिंतीच्या अलिकडे मांडण्यात आल्या, ईतके वर्ष संगीत खुर्चीच्या खेळामधे खुर्ची पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे सदस्य खुश झाले. त्यांना वाटलं आता आपण फक्त खुर्च्या आणि सतरंज्या टाकायचं आणि काढायचं काम नाही करणार, आपली जागा निश्चित म्हणून ते निश्चिंत झाले. परत एकदा म्युजिक चालू झालं आता खुर्च्या पकडून आपापली जागा निश्चित करण्यासाठी ईनमीन एकंच दिवस शिल्लक राहिला होता. कमलकुंज महाराष्ट्रात असूनंही संगीत खुर्चीसाठी गरब्याच्या टिपऱ्यांचं म्युजिक वाजू लागलं. पूर्वापार खुर्ची न मिळणारे सदस्य ज्यादाच्या खुर्च्या आल्यामुळे गाफील राहीले, त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत दगा फटका झाला. एक नाही दोन नाही तब्बल पासष्टं लोक कमलकुंजमधे घुसले आणि वाढीव खुर्च्यांवर अतिक्रमण करुन बसले. काही जुन्या सदस्यांना संताप अनावर झाला, म्हणाले महाराष्ट्रात हे नेहमीचं झालंय परप्रांतीय येतात काय अन कळायच्या आत अतिक्रमण करतात काय. नाही सहन होत आता आणि का करायचं सहन वाटणी झाल्यावर, खुर्च्या नव्यानं वाढल्यावर? रागाच्या भरात, तिरमिरीत ते दाढीवाल्या काकांकडे तक्रार करायला निघाले, दाढीवाल्या काकांना दाराशी उभं राहीलेलं पाहूम थोडं थबकले आणि मनोमन निराशही झाले. कारण गरब्याचं म्युजिक संपण्याआधी अचानक कमलकुंजच्या बाहेरुन येऊन वाढीव खुर्च्या पकडणारे काही लोक प्रवेशद्वारातून राजरोसपणे आत येत होते. दाढीवाले काका या लोकांना आत घेताना भगवा पंचा त्यांच्या गळ्यात घालत होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे परीवर्तनाच्या लाटेतलं शाही पाणी ज्या कळशीत भरुन ठेवलं होतं त्यातून या आगंतुकांवर शिंपडून त्यांनाही पवित्र करुन आत घेत होते, स्वागत करत होते. कुणीतरी हिंमत करुन म्हणालंच की आहो काका पण हे कालपरवा पर्यंत आपल्या विरोधात होते, आरोप आहेत यांच्यावर. काका फक्त हसले आणि तांब्याचा गडवा स्वतःच्या डोक्यावरुन ओतून घेतानाच्या फोटोकडे बोट दाखवून म्हणाले परीवर्तनाच्या लाटेतल्या शाही पाण्यानं सगळी पापं धुवून निघतात, चला कामाला लागा. काहीजण निमूटपणे मागे फिरले तर काहीजण अंगावरचं लाटेतलं पाणी पुसत भिंतीच्या पलिकडे गेले धनुष्य खांद्यावर पेलायला.


तर या अशा सगळ्या धामधुमीत वर्षानुवर्षाच्या कुंभकरणीय झोपेतून उठून, पक्वान्नांचा सुवास नाकात भरुन घेत, डोळे चोळत कमलकुंजमधले सदस्य त्यांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नसताना महाराष्ट्र शोधायला निघाले, गेल्या कित्येक वर्षात ते झोपेत असताना बदलेला, घडलेला, बिघडलेला महाराष्ट्र त्यांना ओळखू येईना तसे सैरभैर होत त्यांनी कंठाळी ओरडायला सुरुवात केली, "अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा". जसजसा वेळ जाऊ लागला तसतसं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला गाठून विचारणा सुरु झाली.. टिव्ही, रेडीओ, वर्तमानपत्रातून सगळीकडे बातमी पसरली की महाराष्ट्र सापडेना. कुठे नेऊन ठेवलाय,कुठे नेऊन ठेवलाय,कुठे नेऊन ठेवलाय... शोधा नाहीतर खुर्चीवर कसं बसणार म्हणाले दाढीवाले काका. नेमही भिंतीवरंच बसणारे एक सद्‌गृहस्त दाढीवाल्या काकांच्या पलिकडे पण भिंतीच्या अलीकडे एकटेच आपली दाढी कुरवाळत, चित्रविचित्र ज्यॅकेट घालून कविता करत बसले होते. म्हणे "जिसको नही हय परीवर्तन के लाट के बारे मै अक्कल... जिसकोsss नही हय परीवर्तन के लाट के बारे मे अक्कल, निकाल के नंतर तो बरोबर सबकुछ शिक्कल". आपण कुंभकरणीय झोपेत असताना हरवलेल्या महाराष्ट्राचा काही थांगपत्ता लागत नाही हे लक्षात येताच घायकुतीला येत कमलकुंजमधल्या कालपरवा जागे झालेल्या सदस्यांनी अजून मोठमोठ्यांनी विचारणा करायला सुरुवात केली, "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" कुठे नेऊन ठेवलाय,कुठे नेऊन ठेवलाय... तेवढ्यात भिंतीपलीकडून नाकावर मास्क चढवत जनतेतल्या काहीजणांनी डोकावून पहायला सुरुवात केली आणि म्हणाले, "ईतके वर्ष चिरनिद्रेत असलेल्या, खाऊन पिऊन सुस्तावलेल्या आणि महाराष्ट्राला विसरलेल्या लोकांनो, महाराष्ट्राचं राहू द्या पण एक सांगा  कुठे नेऊन ठेवलाय शहाणपणा तुमचा, कुठे होता बाणेदारपणा तुमचा, आणि कुठे नेऊन ठेवला होता आमच्या बद्दलचा पुळका तुमचा?"

ताक:
१) असं विचारलेल्यांच्या तोंडात स्वतःचे दात आता औषधालाही शिल्लक नाहीत
२) आमच्यामुळेच महाराष्ट्र पहिला, भविष्य अमुकतमुकच्या हाती वगैरे म्हणणाऱ्यांची दखल कोणीच घेईना मग आम्ही तरी चार दोन वाक्य त्यांच्यावर का वाया घालवावी असा एक प्रश्न मनात घोळतोय
३) आणि दाढीवाल्यांचं पिक वाढलंय तर दोन भावांनी एकत्र येऊन एकेकाची हजामत का करु नये असा एक विचारंही सारखा मनात डोकावतोय...

असो... माझा महाराष्ट्र कुठे आहे याचा शोध लागेपर्यंत माझ्या महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करायला निघतील कदाचित... कदाचित मुंबई मधून ऊद्योगांना पाय फुटून केम छो करत पलिकडे उडी मारतील... कदाचित देशाचे पंतप्रधान महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचाराच्या तयारीला लागतील.. कदाचित पाकिस्तान गोळ्या झाडत राहील आणि कदाचित लाटेपूर्वी ५६ इंच असणारी छाती ३६ वर येऊन पोहचेल.. कदाचित शाही लाट नाकातोंडात जाईल.. कदाचित आज एकमेकांची डोकी फोडणारे गळ्यात गळे घालतील... कदाचित निष्ठावान कार्यकर्ते पुढच्यावेळीही खुर्ची मिळण्याची अपेक्षा न ठेवता सतरंज्या टाकत आणि काढत राहतील... कदाचित जनता मत देईल, काळ्या शाईचे फोटो फेसबूकावर आणि व्हॉट्‌सअ‍ॅपवर टाकेल, निकालावर चर्चा करेल.. आणि कदाचित विरोधी पक्षासोबत पुढच्या निवडणूकीपर्यंत मी मत देऊन माझी जवाबदारी पूर्ण केलीये म्हणत कुंभकरणासारखी ढाराढूर झोपी जाईल.. कदाचित काही वेगळं घडेल... कदाचित विकास होईल... कदाचित परत महाराष्ट्र शोधायची वेळ येणार नाही... कदाचित... कदाचित... कदाचित

के पी आर

Tuesday, September 23, 2014

आपल्या वॉट्‌स अ‍ॅप ग्रुपचं विश्लेषण SCOE


मित्रांनो हे सगळं मजा मस्करीमधे लिहिलं आहे तरी कोणी कृपया वाचून मनात राग धरु नये आणि गैरसमज करुन घेऊ नये ही मनःपूर्वक विनंती. यामधे कोणालाही दुखवण्याचा किंवा त्रास देण्याचा हेतू नाही.. यारी दोस्तीत लिहिलंय गड्यांनो... तर भाऊड्याहो विश्लेषण जरा मोठंच आहे पण शेवटपर्यंत वाचा आणि नक्की सांगा कसं आहे ते.

आपल्या वॉट्‌स अ‍ॅप ग्रुपचं विश्लेषण (SCOE)

दिवाळीच्या सकाळी आपली एक रुढी म्हणून काहीजणं फटाके ऊडवतात. फटाके ऊडावणं फारसं आवडत नसलं तरी आपला प्रघात पडलाय म्हणून उडवतात. दोन-चार फटाके लावतात, वात पेटवल्यावर घाईघाईत लांब जाऊन ऊभे राहतात आणि दोन्ही हातांनी कान घट्ट दाबून धरतात. पाच दहा मिनिटामधे हा कार्यक्रम गुंडाळून निघून जातात. आपला प्रसाद उगले त्या प्रघात म्हणून फटाके ऊडवणाऱ्या माणसा सारखा आहे.  रोज सकाळी ग्रुपवर येतो, दोन-चार मेसेजेस टाकतो आणि पसार होतो.

मित्रांनो जातीवाचक बोलण्याचा उद्देश नाहीये, कृपया कोणीही गैरसमज करुन घेऊ नका हि विनंती) मराठा मंडळींच्या लग्नपत्रिकेत नेहमी नावांची मोठी यादी असते. प्रेषक, कार्यवाहक, निमंत्रक, आमचे आदरस्थान वगैरे वगैरे. त्यात त्यांच्याशी काहीच संबंध नसलेल्या लोकांचीही भली मोठी यादी असते, म्हणजे निमंत्रक श्री. अमुक तमुक, भाजयुमो जिल्हाध्यक्ष, श्री. फलाना ढिमका विद्यमान आमदार, श्री हे ते माननीय नगरसेवक आणि कोण कोण. या लोकांना आयडीयाच नसते कि यांची नावं लग्नपत्रिकेत आहेत. छापणारे मात्र माननीयांना अजून मान द्यायचा म्हणून नावं छापत राहतात. तसेच आपले आनंद बखारे, सचिन सिनगारे, राहुल संघवी, शैलेश गाडवे, किरण चौधरी, विवेक दानेज, अमोल शिंदे, निलेश गोयल, रोहित जोशी, भुज्या.. हे आपले मित्र कळत नकळत आपल्या ग्रुपची शान वाढवतायेत पण यांची नावं आपल्या ग्रुपमधे छापलेली आहेत हि आयडिया तरी आहे का आपल्या मित्रांना?

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, कसा का खेळेना तो या पदावर कायम आहे. पाच पंचवीस मॅचेसमधे तो एखादी मॅच ब्यॅट आडवी तिडवी करत जोरजोरात रन्स करतो मग पुढच्या पाच पंचवीस मॅचेससाठी तो निवांत. टिममधे तर असतो, ग्राऊंडवरसुद्धा दिसतो पण टीममधे नसल्यागत खेळत(?) राहतो. तसाच आपला संघनायक अतुल कुलकर्णी अधून मधून ग्रुपमधे डोकावतो चार दोन मेसेज चिकटवतो आणि परत निवांत.

एका मुलाला लव्ह मॅरेज करायचं असतं, मुलीच्या घरचे काहीच बोलत नसतात. हा पोरगा उठसूट त्यांच्याकडे फेऱ्या मारत असतो, काही ना काही विषय काढत असतो, भरभरुन बोलतो. मनोरंजन करतो, अगदी पुढे पुढे करुन होतं मुलीच्या घरच्यांपुढे पण तिचे आई वडील चकार शब्द काढत नाहीत. त्याल वाटतं आता काही बोलतील, नंतर बोलतील पण ते गप्पच. ते काय बोलतायेत हे ऐकण्यासाठी कानांत जीव ओतून वाट बघत असतो तो आणि ते कधीतरी हळूच एखादं वाक्य बोलतात. याच्या आशा वाढतात, वाटतं अजून बोलतील, हुरुप वाढतो याचा अजून भरभरुन बोलू लागतो पण मग मुलीचे आई वडील परत गप्प बसतात ते गप्पच.. हा प्रार्थना करतो मनोमन की परत लवकर बोलावे, पण कुणास ठाऊक कधी बोलतील परत? तसे आपले इंद्रजीत आणि चिन्मय पंडित, यांच्या एखाद्या वाक्यासाठी आख्खा ग्रुप जीव काढतो आणि हे एखाद दुसरं वाक्य बोलून गायब. आख्खा ग्रुप त्या लग्नाळलेल्या मुलासारखं यांच्या एकाद्या वाक्यासाठी तरसतात आणि एका वाक्यानं खुश होतात तर हे लगेच गायब.

आपल्या कॉलेजला स्वारगेटवरुन ५४ नंबरची बस येयची. येण्याजाण्याचे टायमिंग्ज ठरलेले असायचे. आपल्या आखून दिलेल्या रुटवर ती बस शेड्यूलप्रमाणे अविरत चालायची, बसमधे पोरं येऊ न येऊ तिला फरक नाही पडायचा. ती आपली ठरलेल्या वेळेत येणारंच, आपलं काम चोख.. तसेच आपले ऋषिकेश गुळुंजकर आणि धिंग्या, हे दोघं रोज ईमानेईतबारे ग्रुपवर येणार म्हणजे येणार, मॉर्निंग गुड करणारे मेसेज टाकणारंच आणि न चुकता हि दिनचर्या पाळणारंच. एकवेळ आपली बस पुढे मागे झाली असेल पण हे दोघं एकदम रेग्युलर.

एखादी सिरीयल, पिक्चर, मॅच किंवा बातम्या चालू असतात. मधेच जाहीरात लागते, सिरीयल, पिक्चर किंवा बातम्यांचा विषय काय याच्याशी जाहीरातीचा काहीच संबंध नसतो. सिरियलमधे एखादीचा नवरा तिला सोडून गेलेला असतो आणि ब्रेक होतो जाहीरात लागते टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची.. हनीमून स्पेशल ऑफर.. पिक्चरमधे एखाद्या जोडप्याला मूल होत नसतं आणि तेवढ्यात ब्रेक होतो काँडोमची जाहीरात लागते आणि सांगतात अनचाहे गर्भसे बचिये... मॅच चालू असते, भारतीय टिमचे गडी धडाधडा आऊट होत असतात ब्रेक होतो आणि बच्चन नाचत गात म्हणतो कुछ मिठा हो जाए. त्या जाहीरातींना काही देणंघेणं नसतं मुख्य कार्यक्रमात काय चाल्लय.. पण अशावेळेस कधी कधी या जाहीराती खरंच मच नीडेड ब्रेक देतात.. हसवतात.. तसा आपला हा प्रतिक पत्की. तुम्ही चुत्त्यासारखी काहीही चर्चा करा हा अधून मधून येतो आणि सुपरमॅनच्या जोक्ससारखे झकास जोक्स टाकतो आणि जातो..

टिव्हीवर विविध विषयांवर चर्चासत्र, वादविवाद होतात. त्यामधे वेगवेगळ्या क्षेत्रातले आणि राजकिय पक्षातले प्रतिनिधी सहभागी होतात. या पाहुण्यांमधे कॉमन असतात ते म्हणजे राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसचे जनार्दन चांदुरकर, मग विषय कोणता का असेना. त्यांना कोणत्याच विषयाचं वावडं नाही आणि शिवाय त्यांना सगळ्याच विषयाचं ज्ञानंही आहे. असे लोक खरतर दुर्मिळंच पण आपलं परमभाग्य म्हणून आपल्या ग्रुपमधे जितेंद्र आणि जनार्दन नंतर आपल्याला एक असा धडाडीचा नेता आणि अभ्यासू मित्र (पुष्कराज पाटील) पुष्क्याच्या रुपानं लाभलाय.

आपल्या मंडळात एखादा असा असतो जो सकाळी सकाळी येतो आणि म्हणतो पत्ते खेळू, पब्लिक तयार होतं. पत्ते आणतात, तीनपत्ती चालू होते, एकेकजण पैसे लावतो, काऊंटर वाढत जातं आणि शो जसाजसा जवळ येतो तेव्हा हा म्हणतो, "ए पत्ते बंद करा रे, सकाळी सकाळी पत्ते खेळणं वाईट.. किंबहुना कधीच जुगार खेळणं वाईट, पैसे लावणं हा सेन्सीटिव्ह ईश्यू आहे.. बंद करा". कोणी काही बोलण्याआधी मग तो म्हणतो पत्ते पिसायला मीच सुरुवात केली म्हणून मी माफी मागतो. सगळेजण त्याचं ऐकून खेळ बदलतात, हाही त्यांच्यासोबत खेळतो आणि सगळे गुंगलेले बघून तिथून काढता पाय घेतो आणि संध्याकाळी सगळे जाण्याआधी परत एकदा डोकावून जातो, जणू काही मी ईथेच होतो रे. तसा आपला बेल्या, ग्रुपवर येतो विषय बदलायला लावतो, बोलल्यासारखं करतो आणि सगळे रमले की गायब होतो.

दोन बोक्यांची लोण्यावरुन भांडणं चालू असतात, वाटप काही केल्या होत नसतं. तिथे माकड येतं, बोके मोठ्या आशेनं माकडाकडे बघतात, त्याला म्हणतात दादा आम्हाला वाद सोडवायला मदत कर. माकड सगळं ऐकून घेतं, लोणी कोणी आणलं, कोणी मदत केली.. कसं आणलं कोणाचं काँट्रीब्युशन जास्त वगैरे वगैरे आणि सगळं ऐकून झाल्यावर म्हणतो भोसडीच्यांनो लोण्यासाठी कसलं भांडता, खरंतर सगळ्यांसाठी खीर चांगली. अरे पण आमचं काय चाल्लंय, च्यायला आमच्याकडे लोणी आहे, मोठे कष्ट करुन चोरुन आणलंय आणि आयचा घो तू खीरीबद्दल काय बोलतोयेस? अरे चुत्त्यांनो खीर आणि पुरी बेश्टंच एकदम. अरे आमच्याकडे लोणी आहे रे दादू.. लोणी.. मगाशी खीर म्हणालास आता पुरी अ‍ॅड केलीस.. लोणी रे लोणी सगळे वैतागून सांगतात.. हा हसतो म्हणतो खीर पुरी आणि झालंच तर फ्रुट सॅलड लय भारी. आयच्या गावात रे लोण्याबद्दल बोल ना.. खीर पुरी फ्रुट सॅलड आऊट ऑफ क्वच्चन आहे बे... मग हा म्हणतो.. मँगो ज्युस झिंदाबाद.. तसा आपला गणेश सुतार तुम्ही कोणाहीबद्दल बोला त्याला ज्याला सपोर्ट करावं वाटेल (ईर्रीस्पेक्टीव्ह ऑफ पब्लिक ओपिनियन) त्यालाच तो सपोर्ट करणार मग बाकी बोके जाऊदे भोकात.

आपलं कॉलेज, ऑफिस कोणतीही संस्था असो, त्याचे अध्यक्ष, चेअरमन, ट्रस्टीज वगैरे महत्वाची लोकं रोजंच संस्थेच्या लोकांसमोर येत नाहीत पण ते असतात. ते आहेत यामुळे सगळ्यांना हुरुप असतो, मोटीवेशन असतं. वेगवेगळ्या ओकेजन्सला, कार्यक्रमांना, वाढदिवसाला ते आवर्जून हजेरी लावतात सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देतात. लोक खुश होतात पुन्हा नव्या जोमानं पुढच्या कार्यक्रमापर्यंत सगळ्यात सहभागी होतात आणि चेअरमन वगैरे मोठ्या लोकांचं दर्शन परत नव्या कार्यक्रमातंच होतं. तसा आपला शंतनू मोघे, प्रत्येक वाढदिवसाला, सणासमारंभाला तो नक्की आवर्जून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि परत येतो नव्या ओकेजनला.

आख्ख्या शहरात मच्छर खूप होतात. मलेरीया, डेंग्यू बिंग्यू आजार पसरवतात. सगळीकडून बोंबाबोंब होते पार, मग लोकांवर ऊपकार केल्यासारखं म्युन्सिपालटी एका माणसाकडे धुराचं मशिन घेऊन पाठवते आणि प्रत्येक एरीयात धुर सोडत फिरवते. धुरवाल्याचं आगमन सगळे नोटीस करतात, लहान पोरं त्याच्या मागं है.. करत पळतात, तो त्याला अलॉट केलेल्या वेळेपर्यंत भकाभका धूर मारत राहतो आणि निघून जातो.. दर चार-दोन दिवसांनी धूरवाला येतो, लोकांना समाधान वाटतं, पोरं खुश होतात, हा भकाभका धूर ओकतो आणि निघून जातो तसा आपला कौट्या चार दोन दिवसांनी येतो भकाभका मेसेजेस ओकतो, धूरवाला जसा मागे पळणाऱ्या पोरांच्या अंगावर ओरडतो तसा हा एखाद्याला एखाद्या पोस्टवरुन ओरडतो आणि निघून जातो.

टिव्हीवर चर्चासत्र चालू असतं, रंगात आलेलं असतं. तेवढ्यात अँकर म्हणतो आपल्याकडे आज एक विशेष पाहुणे आहेत टेलिफोनवरुन आपण त्यांच्याशी संपर्क करुया. फोन लावला जातो पलिकडून उचलतो, अँकर म्हणे अमुक तमुक कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. प्रश्न विचारतो.. विशेष पाहुणा उत्तर देतो, परत प्रश्न परत उत्तर आणि पुढचा प्रश्न विचारल्यावर नेमका विशेष पाहुणा बोलायचा बंद होतो. मग अँकर आपल्याला सांगतो, "असं वाटतंय विशेष पाहुण्यांशी आपला संपर्क तुटलाय, आपण नंतर त्यांच्याकडे परत जाऊ" आणि परत जुन्या पार्टीसिपंट सोबत बोलणं सुरु होतं. तर असा विशेष म्हणून येणारा आणि अचानक संपर्क तुटणारा पाहुणा म्हणजे आपला (पराग कारखानीस) प्यॅगी.

दिवस-रात्र आय.बी.एन लोकमतवर येणारा, क्षणाक्षणाला काही ना काही सांगणारा निखिल वागळे, आपण टिव्ही बंद करायचा जरी म्हणत असलो तरी "अचूक बातमी ठाम मत, पहा फक्त आय.बी.एन लोकमत" म्हणून आय.बी.एन वर स्वतः चिकटून बसलेला आणि लोकांना चिकटायला लावणारा निखील वागळे गेले काही दिवस कुठे आहे काही पत्ता लागेना तो कालपरवा मी मराठी चॅनेलवर एका टॉक शो मधे दिसला. तर या अशा बेपत्ता वागळे सारखा आपला स्वानंद मोकाशी, एरव्ही दिवस रात्र एस्सीओई ग्रुपवर असणारा हा ईसम आजकाल सापडेनासा झालाय. देव न करो हा वागळे सारखा एखाद्या टिनपाट ग्रुपवर अ‍ॅक्टिव दिसायचा.

आपल्या प्रत्येकाच्या एरियामधे संघाची शाखा भरते. त्यात रेग्युलर मेंबर्ससोबतंच काही ईर्रेग्युलर कार्टी असतात, कधी येतात तर कधी टिवल्या बावल्या करत फिरत राहतात. शाखेत एखादे डेडीकेटेड शिक्षक असतात ज्यांना मुलं नियमीत यावी त्यांना शिस्त लागावी असं मनापासून वाटत असतं. मग ते अनियमीत मुलांकडे येताजाता चक्कर टाकतात संघाचं महत्व पटवण्यासाठी त्यांना संघाच्या कार्याची माहीती देतात, एक निःस्वार्थी स्वयंसेवक देशसेवेच्या भावनेने पंतप्रधानपदापर्यंत कसा पोहोचला याचं उदाहरण देतात. मुलांना पटलंय याची खातरजमा करुन घेतात. मुलं माना डोलवतात, काही मनापासून तर काही तोंडदेखले.. शिक्षक समाधानानं आपल्या कामाला निघून जातात, अधून मधून वेगळ्या विषयांना हात घालतात पण बरेचसे विषय देशप्रेम, भाषेची अस्मिता वगैरेशी निगडीत असतात. तर असे डेडीकेटेड शिक्षक म्हणजे आपल्या ग्रुपचे वरिष्ठ सदस्य श्रीयुत अनिरुद्ध देव.

आपला एखादा मामे, चुलत, मावस भाऊ असतो, मित्र असतो. जो कुठल्याही डिस्कशनचा शेवट उदास नोटवर करत असतो. आपण त्याच्याशी गप्पा मारल्या की तो भरभरुन बोलतो, हसतो खिदळतो पण जेव्हा आपण त्याला म्हणतो, काय मग काय चाल्लय? कसा आहेस? मग तो आपल्याला म्हणतो, "बस यार चाल्लय, भेंचोद कंपनी, टार्गेट वाट लागलीये" आपण म्हणतो अरे पण तू तर एम.बी.ए केलं होतंस ना? तसा तो पिसाळतो... म्हणतो, "आयचा घो त्या एम.बी.ए च्या, माती खाल्ली आणि आयच्या गावात एम.बी.ए. केलं यार, तुझ्या कंपनीत ओपनिंग असेल तर सांग" आणि पुढच्यावेळेस एम.बी.ए चा विषय निघेपर्यंत शांत निवांत.. परत एम.बी.ए चा विषय निघाल्यावर जीवाच्या आकांतानं शिव्यांची लाखोली वाहणारा असा मित्र म्हणजे आपला विज्या बाँड.

आणि सरतेशेवटी एकजण असा असतो जो चौकात उभा राहतो सकाळपासून. दुपारची जेवणाची वेळ झाली तरी हा तिथेच, कुणीतरी येतं आवाज देतं विचारतं काय करतोएस रे? हा म्हणतो काय नाय.. निवांते. या आपल्या मित्रापाशी गाडी थांबवून तो म्हणतो बस येऊ जाऊन जरा. कुठ? अरे चल रे टिळक रोडला जाऊन येऊ. मित्र म्हणतो अरे घरचे जेवायला थांबलेत मी फोन... त्याला मधेच तोडून हा म्हणतो चल रे नाहीतरी तुला लय महत्वाची कामं आहेत चल बस.. आपला मित्र बसतो निमूट, जातो.. सगळी कामं उरकून तो गाडीवाला याला संध्याकाळी चौकात आणून सोडतो, घरचं जेवण तसंच राहतं, हा खुशाल पान खाऊन येतो. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाचं ऑब्झर्वेशन करतो, कोण कोणासारखं आहे यावर जोक्स मारतो.. जमलं तर लिहितो.. काम काही नसतं सध्या त्याला.. मग घरी जातो रात्रीचं जेवण करतो, शतपावली करायला म्हणून परत चौकात येतो.. जो दिसेल त्याच्याशी गप्पा मारतो, चौकात कोण कसे नमुने दिसले हे रंगवून रंगवून सांगतो. मग एकेकजण चौकातून पाय काढता घेतो म्हणतो यार लै उशीर झालाय, सकाळी लवकर उठायचंय.. च्यायला ऑफिस परत.. तुझं बरंय.. हा हसतो, एकेकाला बाय करतो.. मंदगतीनं घरी येतो.. कडीचा आवाज न करता दार उघडतो. बेडवर पडल्या पडल्या विचार करतो च्यायला मी सगळे कसे आहेत, कोणासारखे आहेत हे ऑब्झर्वेशन केलं लिहूनही काढलं पण मी कोणासारखा आहे..? बराचवेळ विचार केल्यावर त्याला लक्षात येतं की आपण पाळीव पोपटासारखे आहोत जो येईल जे बोलेल ते टिपून आपण तेच परत सादर करतोय का? आणि नकारार्थी मान हलवतो. वेगवेगळ्या गोष्टी सुचतात पण एकही त्याच्याशी जुळत नाही.. मग त्याला जाणवतं आपण चहाच्या गाळासारखे झालो आहोत, आधी चहाच्या डब्यात, मग पातेल्यात पडून राहतो, मग गाळणीत आणि मग सिंकमधे.. जोवर कोणी आपल्याला येऊन हलवत नाही तोवर तिथेच... एखाद्याला चहाची तल्लफ येईपर्यंत आपण त्याचे मग सिंकपर्यंतचा प्रवास... असे काही बाही विचार करत झोपी जातो.. सकाळी उठून परत आवरुन चौकात हजर.. क्रिकेट, राजकारण, निवडणूक, अर्थव्यवस्था सगळ्यावर गप्पा होतात मग कोणीतरी म्हणतं काय करायचं ठरवलयेस पुढं आयुष्यात? हा चिडीचूप.. तर असा हा सध्या ऑल्वेज अ‍ॅव्हलेबल आणि या ना त्या विषयावर बोलणारा पण स्वतःला आयुष्यात काय करायचंय हे अजूनंही माहीती नसणारा तुमचा मित्र (तुम्हाला खरंतर कळलंच असेल पण तरीही फॉर्म्यालिटी म्हणून सांगतोच) म्हणजे कुणाल प्रकाश रुद्राके/कुण्या.

के पी आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...