Tuesday, November 11, 2014

तुला का गं जायचं असतं??


तुला का गं जायचं असतं??

आल्या आल्या त्याला माझ्याकडे येयचं नसतं
मला बघितल्यावर त्याचं उगाचंच बिनसतं
हाक मारली तरी बसतो कसा रुसुन
सवय होते हळू हळू, बघतो मग हसून
हाका मारतो येता जाता
"खेल माज्याशी" म्हणतो मांडीवर बसता बसता
सुरुवातीचे कित्येक दिवस आमचं जुळत नसतं
नेमकी आमची गट्टी जमल्यावरंच
तुला का गं जायचं असतं??

हाताला धरुन म्हणतो इते बश
गोग्गोड हसून करतो सगळ्यांना वश
बोबडं बोबडं बोलून वेड लावतो पार
गाल कपाळ ओठावर देतो मुके किमान चार
त्याच्या ईवल्याशा डोळ्यातंच
आता सुख आम्हाला दिसतं
तेव्हाच नजर चोरुन तुला का गं जायचं असतं??

ती ही एअरपोर्टवर, आल्या आल्या बिलगते..
आजी भाऊ कुठयेत विचारत त्यांनाही हुडकते
रोज संध्याकाळी माझी वाट बघत बसते
ऊशीर झाला म्हणून रुसली तर अजूनंच गोड दिसते
रोजच्या रहाटगाडग्यात तिला फिरायला नेणं राहतं
कोपऱ्यावरचं गार्डन रोज वाट तिची पाहतं
कामाला दांडी मारुन आता गार्डन ठरलेलं असतं..
तिच्यासाठी वेळ काढल्यावरंच नेमकं
तुला का गं जायचं असतं??

थोडसं तिला चिडवल्यावर बसते ती फुगुन
हसू दाबत राहतो आम्ही, तिला असं बघून
त्याचा तर आवाज गगनाला भिडतो
छोट्याशा गोष्टीतही असा जाम चिडतो
आपल्या सगळ्या घरात जीव भरतात दोघं
क्षणभर नजरेआड झाले तरी वारं सुटतं ऊभं
त्यांच्या सवयीनं काळीज वेडंपिसं झालेलं असतं
नेमकं हे वेड जपल्यावरंच
तुला का गं जायचं असतं??

त्यांना पंखाखाली घेऊन अशीच जातेस तू ऊडून
डोळ्यात काळजात घरात सगळ्या..
आठवणी त्यांच्या बसतात अशा दडून
आवंढा गिळत गिळत आम्ही..
एकमेकांच्या नजरा ऊगाच चुकवतो
मोकळ्या घराकडं बघत
आठवणींना हाताला धरुन ऊठवतो
फोटोंवरुन हात फिरवत..
दूधाची तहान ताकावर भागवत का गं रहावं लागत?
राहून राहून एकंच प्रश्न...
फिरुन फिरुन मन, ऊत्तर एकंच मागतं
तुला का गं जावं लागतं
तुला का गं जायचं असतं??

के पी आर

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...