कमलेश भाऊंचं कमलकुंज प्रशस्त आणि मोठं देखणं होतं. भिंती, छत मस्तपैकी भगव्या रंगात रंगवलेलं होतं आणि खिडक्या दारं तेवढी हिरवी होती. दारं-खिडक्या म्हणे हिरव्या असाव्या, प्रवेश जरी त्यातून घेतला तर आत कसं सगळं भगवं असतं आणि त्याहून बाहेरुन हिरवा आभासही होतोच. अन पांढऱ्या रंगाला मात्र तिथे जागा नव्हती कारण पांढरा रंगं म्हणजे शांतता, तह... आणि तह बिह छ्यॅट कमलेश भाऊंना जमलाच नाही कधी. पण खरं सांगायचं तर गेल्या काही वर्षात या देखण्या वास्तूला अवकळा आली होती, का कुणास ठाऊक. कोणी काही करो अपयश ईथल्या लोकांच्या पाचवीला पुजलेलं असायचं. आणि खरंतर कमलकुंज मधले जवळपास सगळे सदस्य ढाराढूर झोपलेले असायचे, दिवसरात्र... अगदी कोमात गेल्यासारखे किंवा कुंभकरणासारखे म्हणू आपण हवं तर. आणि त्यामुळेच कमलेश भाऊंच्या विरोधकांचं फावत होतं. हा पण यांची झोप हि अगदी कुंभकर्णासारखीच असायची, भूक(?) लागली कि ठराविक सदस्य उठायचे टामटूमीत खायचे प्यायचे नि परत झोपायला तयार. तर अशा दीर्घ काळच्या झोपेनंतर अचानक देशभरात म्हणे परीवर्तनाची लाट आली आणि त्या लाटेत बाकी सगळे वाहून गेले तसे कमलकुंज मधले सदस्य जागे झाले...
या लाटेनंतर तीन महिन्यांनी सुद्धा कमलकुंज मधले सदस्य जाग आल्याचा आव आणू लागले. एक दिवस कुस बदलत असताना लोकांना वाटलं ते उठतायेत पण त्यांनी आळोखे पिळोखे देत पडून राहणं पसंत केलं. आता कोणत्याही क्षणी हे उठणार म्हणून लोकांनी त्यांच्या खाण्या पिण्याची तयारी करायला सुरुवात केली. कमलेश भाऊंचा एव्हाना "कमलेस भाई" झाला होता. तर काही सदस्य आळोखे पिळोखे देत जावेगर उठून बसले आणि डोळे चोळत चोळत कमलकुंजमधे नजर फिरवू लागले. त्यांच्या नजरेतलं आश्चर्य लपत नव्हतं, कमलकुंज मधे अगदी नव्यानंच मधोमध एक भिंतं घालण्यात आली होती. अगदी भिंतीला प्लॅस्टरही करणं बाकी होतं, बांधकाम ओलं होतं. ते बघून भानावर येत काही जणांनी विचारायला सुरुवात केली कि हा काय प्रकार आहे. लोक म्हणाले दाढीवाले काका आले होते त्यांच्याकडे काही जागृत सदस्यांनी तक्रार केली कमलकुंजमधल्या खुर्च्या अपुऱ्या पडत आहेत. आपल्या सगळ्या सदस्यांना बसायची सोय नाही, आपले मित्र म्हणत म्हणत काही लोक बाण घेऊन येतायेत आणि आपल्या हक्काच्या खुर्च्यांवर अतिक्रमण करतायेत. काका चिडले, एक हात गुळगुळीत डोक्यावर आणि एक हात वाढलेल्या दाढीवर फिरवत म्हणाले बास झालं शेअरींग आता दाखवा डेअरींग.. उंदराला वाघ केलं आता परत उंदीर करा, चला कामाला लागा, लाटेच्या शाही पाण्याची मस्ती काय असते दाखवा सगळ्यांना... घाला भिंत मधोमध. कुणीतरी आगाऊ म्हणाला आहो पण भिंत घातली तरी खुर्च्या अपुऱ्या पडणारंच ना? त्यावर काका हसून म्हणाले ते माझ्यावर सोपवा, मी ऑलरेडी ज्यादाच्या खुर्च्या घेऊन फिरतोय, मला आयडीया होतीच या सगळ्याची म्हणून बाणवाल्यांना मी सांगितलंय नो ऊल्लू बनाविंग.
मग काय सगळे जोमाने कामाला लागले, भिंतं उभारली.. भिंतीच्या पलिकडची सगळी कमळं खुडून कमलकुंज मधे आणली. वाढीव खुर्च्या भिंतीच्या अलिकडे मांडण्यात आल्या, ईतके वर्ष संगीत खुर्चीच्या खेळामधे खुर्ची पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे सदस्य खुश झाले. त्यांना वाटलं आता आपण फक्त खुर्च्या आणि सतरंज्या टाकायचं आणि काढायचं काम नाही करणार, आपली जागा निश्चित म्हणून ते निश्चिंत झाले. परत एकदा म्युजिक चालू झालं आता खुर्च्या पकडून आपापली जागा निश्चित करण्यासाठी ईनमीन एकंच दिवस शिल्लक राहिला होता. कमलकुंज महाराष्ट्रात असूनंही संगीत खुर्चीसाठी गरब्याच्या टिपऱ्यांचं म्युजिक वाजू लागलं. पूर्वापार खुर्ची न मिळणारे सदस्य ज्यादाच्या खुर्च्या आल्यामुळे गाफील राहीले, त्यांच्या विश्वासाचा गैरफायदा घेत दगा फटका झाला. एक नाही दोन नाही तब्बल पासष्टं लोक कमलकुंजमधे घुसले आणि वाढीव खुर्च्यांवर अतिक्रमण करुन बसले. काही जुन्या सदस्यांना संताप अनावर झाला, म्हणाले महाराष्ट्रात हे नेहमीचं झालंय परप्रांतीय येतात काय अन कळायच्या आत अतिक्रमण करतात काय. नाही सहन होत आता आणि का करायचं सहन वाटणी झाल्यावर, खुर्च्या नव्यानं वाढल्यावर? रागाच्या भरात, तिरमिरीत ते दाढीवाल्या काकांकडे तक्रार करायला निघाले, दाढीवाल्या काकांना दाराशी उभं राहीलेलं पाहूम थोडं थबकले आणि मनोमन निराशही झाले. कारण गरब्याचं म्युजिक संपण्याआधी अचानक कमलकुंजच्या बाहेरुन येऊन वाढीव खुर्च्या पकडणारे काही लोक प्रवेशद्वारातून राजरोसपणे आत येत होते. दाढीवाले काका या लोकांना आत घेताना भगवा पंचा त्यांच्या गळ्यात घालत होते आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे परीवर्तनाच्या लाटेतलं शाही पाणी ज्या कळशीत भरुन ठेवलं होतं त्यातून या आगंतुकांवर शिंपडून त्यांनाही पवित्र करुन आत घेत होते, स्वागत करत होते. कुणीतरी हिंमत करुन म्हणालंच की आहो काका पण हे कालपरवा पर्यंत आपल्या विरोधात होते, आरोप आहेत यांच्यावर. काका फक्त हसले आणि तांब्याचा गडवा स्वतःच्या डोक्यावरुन ओतून घेतानाच्या फोटोकडे बोट दाखवून म्हणाले परीवर्तनाच्या लाटेतल्या शाही पाण्यानं सगळी पापं धुवून निघतात, चला कामाला लागा. काहीजण निमूटपणे मागे फिरले तर काहीजण अंगावरचं लाटेतलं पाणी पुसत भिंतीच्या पलिकडे गेले धनुष्य खांद्यावर पेलायला.
तर या अशा सगळ्या धामधुमीत वर्षानुवर्षाच्या कुंभकरणीय झोपेतून उठून, पक्वान्नांचा सुवास नाकात भरुन घेत, डोळे चोळत कमलकुंजमधले सदस्य त्यांचा महाराष्ट्राशी काहीही संबंध नसताना महाराष्ट्र शोधायला निघाले, गेल्या कित्येक वर्षात ते झोपेत असताना बदलेला, घडलेला, बिघडलेला महाराष्ट्र त्यांना ओळखू येईना तसे सैरभैर होत त्यांनी कंठाळी ओरडायला सुरुवात केली, "अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा". जसजसा वेळ जाऊ लागला तसतसं येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला गाठून विचारणा सुरु झाली.. टिव्ही, रेडीओ, वर्तमानपत्रातून सगळीकडे बातमी पसरली की महाराष्ट्र सापडेना. कुठे नेऊन ठेवलाय,कुठे नेऊन ठेवलाय,कुठे नेऊन ठेवलाय... शोधा नाहीतर खुर्चीवर कसं बसणार म्हणाले दाढीवाले काका. नेमही भिंतीवरंच बसणारे एक सद्गृहस्त दाढीवाल्या काकांच्या पलिकडे पण भिंतीच्या अलीकडे एकटेच आपली दाढी कुरवाळत, चित्रविचित्र ज्यॅकेट घालून कविता करत बसले होते. म्हणे "जिसको नही हय परीवर्तन के लाट के बारे मै अक्कल... जिसकोsss नही हय परीवर्तन के लाट के बारे मे अक्कल, निकाल के नंतर तो बरोबर सबकुछ शिक्कल". आपण कुंभकरणीय झोपेत असताना हरवलेल्या महाराष्ट्राचा काही थांगपत्ता लागत नाही हे लक्षात येताच घायकुतीला येत कमलकुंजमधल्या कालपरवा जागे झालेल्या सदस्यांनी अजून मोठमोठ्यांनी विचारणा करायला सुरुवात केली, "कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा" कुठे नेऊन ठेवलाय,कुठे नेऊन ठेवलाय... तेवढ्यात भिंतीपलीकडून नाकावर मास्क चढवत जनतेतल्या काहीजणांनी डोकावून पहायला सुरुवात केली आणि म्हणाले, "ईतके वर्ष चिरनिद्रेत असलेल्या, खाऊन पिऊन सुस्तावलेल्या आणि महाराष्ट्राला विसरलेल्या लोकांनो, महाराष्ट्राचं राहू द्या पण एक सांगा कुठे नेऊन ठेवलाय शहाणपणा तुमचा, कुठे होता बाणेदारपणा तुमचा, आणि कुठे नेऊन ठेवला होता आमच्या बद्दलचा पुळका तुमचा?"
ताक:
१) असं विचारलेल्यांच्या तोंडात स्वतःचे दात आता औषधालाही शिल्लक नाहीत
२) आमच्यामुळेच महाराष्ट्र पहिला, भविष्य अमुकतमुकच्या हाती वगैरे म्हणणाऱ्यांची दखल कोणीच घेईना मग आम्ही तरी चार दोन वाक्य त्यांच्यावर का वाया घालवावी असा एक प्रश्न मनात घोळतोय
३) आणि दाढीवाल्यांचं पिक वाढलंय तर दोन भावांनी एकत्र येऊन एकेकाची हजामत का करु नये असा एक विचारंही सारखा मनात डोकावतोय...
असो... माझा महाराष्ट्र कुठे आहे याचा शोध लागेपर्यंत माझ्या महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करायला निघतील कदाचित... कदाचित मुंबई मधून ऊद्योगांना पाय फुटून केम छो करत पलिकडे उडी मारतील... कदाचित देशाचे पंतप्रधान महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या प्रचाराच्या तयारीला लागतील.. कदाचित पाकिस्तान गोळ्या झाडत राहील आणि कदाचित लाटेपूर्वी ५६ इंच असणारी छाती ३६ वर येऊन पोहचेल.. कदाचित शाही लाट नाकातोंडात जाईल.. कदाचित आज एकमेकांची डोकी फोडणारे गळ्यात गळे घालतील... कदाचित निष्ठावान कार्यकर्ते पुढच्यावेळीही खुर्ची मिळण्याची अपेक्षा न ठेवता सतरंज्या टाकत आणि काढत राहतील... कदाचित जनता मत देईल, काळ्या शाईचे फोटो फेसबूकावर आणि व्हॉट्सअॅपवर टाकेल, निकालावर चर्चा करेल.. आणि कदाचित विरोधी पक्षासोबत पुढच्या निवडणूकीपर्यंत मी मत देऊन माझी जवाबदारी पूर्ण केलीये म्हणत कुंभकरणासारखी ढाराढूर झोपी जाईल.. कदाचित काही वेगळं घडेल... कदाचित विकास होईल... कदाचित परत महाराष्ट्र शोधायची वेळ येणार नाही... कदाचित... कदाचित... कदाचित
के पी आर

No comments:
Post a Comment