Friday, September 18, 2020

तू ही मेरी शब है

 


हे गाणं मला जाम नाॅस्टॅल्जिक करतं. कधीही कानावर पडलं तर मला ना कंगना डोळ्यांसमोर येते ना इम्रान, माझ्या आजूबाजूला मस्तं बर्फाचे डोंगर असल्याचा फील येतो. एप्रिल २००६ मध्ये मी हे गाणं सगळ्यात पहिल्यांदा ऐकलं. आम्ही शिमलाकुलुमनाली ट्रीपला गेलो होतो केसरीच्या पॅकेज टूरमधून. शिमल्याचा मुक्काम संपवून आम्ही मनालीकडे निघालो होतो. एव्हाना टूरमधल्या बऱ्यापैकी सर्वांशीच ओळख झाली होती. बराचवेळ बसमध्ये धुमाकुळ घालून सगळे दमले होते. मी बसल्या बसल्या मला हस्तरेषा कळतात अशी पुडी सोडायचा अवकाश जोतो आपापला हात माझ्या पुढे करु लागला. मी अगदीच ढोबळ काहीतरी सांगत होतो एकेकाला. बराचवेळ चालत्या गाडीत खाली बघितलं, मोबाईलमध्ये वगैरे किंवा हार्डकाॅपीवालं काही वाचलं की मला गरगरायला लागतं त्यानंतरही थांबलो नाही तर मळमळायला सुरुवात होते. तशी तेव्हाही झाली मग मी सगळी नाटकं बंद करुन डोळे मिटून पडून राहीलो काहीवेळ. थोड्यावेळाने बसमध्ये एकेकाचा आश्चर्याने भरलेल्या आवाज ऐकू येऊ लागला पण अजूनंही गरगरत असल्यामुळे मी डोळे झाकूनंच बसून राहीलो होतो. वाॅव, क्लास, कसलं सुंदर आहे असे आवाज येत होते. मी डोळे उघडत नाही हे बघून माझी एक मैत्रिण म्हणाली काय बोअरिंग लोक आहेत, एवढा सुंदर सीन बघायलाही डोळे उघडत नाहीत, भाऊंनीही आवाज दिला. मी डोळे जरा किलकिले करत मान डावीकडे हलकीशी वळवून खिडकीतून बाहेर बघितलं आणि समोर दिसणारं दृश्य बघून चक्करबिक्कर पार विसरुन गेलो. आम्ही ज्या रस्त्याने चाललो होतो त्याच्या दुतर्फा बर्फाच्छादीत डोंगर होते... ॲब्सोल्युटली हेवन! आणि मी ते बघण्यात गुंग असताना बसमध्ये गाणं लागलं “तू ही मेरी शब है सुबह है” या गाण्ं पहिल्यांदा ऐकल्याची एवढी सुंदर आठवण आहे की मी कधीच विसरु शकत नाही. त्यानंतर या गाण्याची ट्रीपमध्ये पारायणं झाली. मनालीतंच किती वेळा ऐकलं त्याला काही मोजमापंच नाही. एकतर आईभाऊंसोबत केलेली शेवटची मोठी ट्रीप म्हणून ती विशेष खास आहे.

पुण्यात आल्यावर त्या वर्षीच्या पावसात आमच्या झेनमधून फिरताना हे गाणं वेड्यासारखं लूपवर ऐकलं. तूही मेरी शब है म्हटलं की मला मनालीचा बर्फ आणि पुण्याचा तेव्हाचा पाऊस आठवतो. मी आणि माझा मित्र अभ्या दोघेही मोठमोठ्यानं गाणं म्हणत आमच्या झेनमधून, त्याच्या स्काॅर्पियोमधून आणि त्याच्या पल्सरवरुन खूप खूप हिंडलोय २००६ च्या पावसात. नितांत सुंदर दिवस होते ते. कमवण्याची चिंता, करीयरची काळजी वगैरे काहीही नव्हतं. वेगळ्याच विश्वात होतो. त्यावेळी काॅलर ट्युन ठेवण्याचं जाम फॅड होतं. हे गाणं मी किमान दोन-तीन वर्ष काॅलरट्युनला ठेवलं होतं माझ्या.

आजंही हे माझ्या प्लेलिस्टमध्ये फेवरेट्समधे आहे गाणं... कायम राहील.

This song makes me nostalgic like anything

कुठेही कधीही ऐकलं तर १००% त्या काळात नेतं... मनालीचा बर्फ आणि पुण्याचा पाऊस आणि तो पाऊस एंजाॅय करायला खूप सारा मोकळा वेळ!

तू ही मेरी शब है इज लव्ह

#LateNightPlaylist

 


मराऽऽठीऽऽ....

 

माझ्या भाच्याचा जन्म २००२ साली झाला. तोपर्यंत आमच्याकडे कोणीही इंग्रजी माध्यमात शिकलं नव्हतं. इंग्रजी माध्यमात न शिकल्याने माणूस भयंकर मागास होतो किंवा माणसाची फार मोठी पिछेहाट होते, प्रगति करायची असेल तर इंग्रजी माध्यमाशिवय पर्याय नाही, इंग्रजी माध्यमात शिकण्याशिवाय गत्यंतर नाहीच नाही अशी त्यावेळी माझी ठाम समजूत झालेली होती. मी माझ्या ताईला उठताबसता सांगायचो की तुझ्या लेकाला आपण इंग्लिश मिडियममध्येच टाकायचं. फाडफाड इंग्रजी बोलता येणं किंवा फर्डा इंग्रजी वक्ता असणं म्हणजे विद्वत्तेचे लक्षण असं काहीसं चुकीचं समीकरण डोक्यात फिट्ट बसलेलं होतं. अर्थात या समीकरणाला छेद जायला फार काळ जावा लागला नाही. इंग्रजी माध्यमाचा बागुलबुवा आपणंच उभा केलाय हे त्यांनंतर झपाट्याने कळत गेलं.

मूळात इंग्रजी मध्यमाबद्दल अकर्षण वाटणं आणि वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मराठी माध्यमाचा सातत्याने घसरत चाललेला दर्जा आणि मराठी शाळा वाचवण्याबद्दल आजवरच्या सगळ्या सरकारांनी दाखवलेली अनास्था. मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत माझ्या लेकाला पाठवायचा विचार मी आज चुकुनही करू शकत नाही. शिक्षणाचा दर्जा, संगत, सर्वसाधारण विकास या कोणत्याच पातळीवर माझी शाळा आजच्या काळात एक चांगला पर्याय होऊच शकत नाही. जगात काय चाललंय, पुढे जाऊन निवडण्यासाठी सायन्स आर्ट्स कॉमर्स याव्यतिरिक्त कोणते पर्याय असतात, आपल्याला नेमकं काय आवडतं हे सगळं सहज सोप्या पद्धतीने दाखवणारी, शिकवणारी शाळा हवी की काळाच्या मागे राहून फक्त हजेरीपटावर पोरांची नावं चिकटवून दरवर्षी पोरांचं निकृष्ट का असेना उत्पादन करणारी शाळा हवी? या तुलनेत इंग्रजी शाळा बर्‍यापैकी कालसुसंगत म्हणाव्या अशा वाढत राहिल्या, त्यामागे अर्थकारण हाही एक मुद्दा असू शकतो पण त्याच्याशी सर्वसामान्य पालकाला काही घेणंदेणं नाही किंवा त्यावर विचार करायला वेळही नाही. आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे असं एक पुस्तकी वाक्य आपण सतत वापरत असतो, ऐकत असतो आजकाल आणि ती स्पर्धा निकोप नक्कीच नाहिये. तर या अशा गळेकापू स्पर्धेत आपल्या पाल्याला किती खोलवर उतरवायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे पण एकूणतंच या जीवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी आम्ही तुमच्या पाल्याला तयार करू शकतो ही प्रतिमा आपल्याच सहाय्याने तयार करायला इंग्रजी माध्यमाच्या शाळा पूर्णपणे यशस्वी झालेल्या आहेत.

आपण पाल्याला सगळं देतोय आता त्याने स्पर्धेत उडी मारुन कुठेही कमी पडूच नये असं माझ्याही कित्येक मित्रांना वाटतं. महागड्या इंग्रजी शाळेत घालणं, ट्युशंस लावणं याव्यतिरीक्त पोरं काहीही झालं तरी ऑलराउंडरंच व्हायला हवी या अट्टहासापायी अजून वेगवेगळ्या क्लासेस, ग्राऊंडला पोरांना चिकटवणे, खेळायला आयपॅड देणे हे म्हणजे अत्युत्तम पालक होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग वाटतो अनेकांना. खूप भारी म्हणून नावाजलेल्या (ती खिशाला परवडली नाही तरी चालतंय) शाळेत पोरांना घातलं एकदाचं की दहा वर्षात वर्ल्ड क्लास प्राॅडक्ट तयार होणारंच याची शाश्वती वाटते, एकदा “अशा” शाळेत येनकेनप्रकारेण प्रवेश मिळाला की आपली जबाबदारी संपली म्हणत सुटकेचा नि:श्वास टाकला जातो. आजकाल काॅम्पिटिशन टाळताच येत नाही, माझ्या मुलांना हे प्रेशर घेयची सवय करावीच लागेल असं सर्रास बोलतात माझ्या वयाचे पालक आजकाल. आपल्या ईच्छा, आपली अवाजवी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि आपली आपल्या मित्रमंडळींसोबत व समाजासोबत असलेली काॅम्पिटीशन जिंकण्यासाठी पोरांना मैदानात उतरवायचं. पालकांना कळायला हवंय शाळा, मार्क, स्पर्धा यापलिकडे त्या लेकरांना आयुष्य आहे, त्यांचं बालपण त्यांची निरागसता जपायला हवी, त्यांना मनमोकळं जगू द्यायला हवंय, त्यांना त्यांची स्वप्न निवडू द्यायला हवीयेत. फायनांशियल मार्केटमधल्या कमोडीटीसारखं त्यांना वागवयचं मग ते अलिप्त राहतात म्हणून बोंब मारायची याला काय अर्थय? मुलांशी भावनिक जवळीक हवी ना, नुसतंच आम्ही सगळं पुरवतो त्यांना असं म्हटल्याने काय साध्य होणारे? मुलांना भावी आयुष्यात सामोऱ्या जावं लागणार्‍या प्रत्येक आव्हानाला शाळा ही एकमेव "one stop solution" आहे असं वाटतं आजकालच्या अनेक पालकांना. मूल घडण्यात शाळा आणि पालकांचा समसमान वाटा असायला हवा, या प्रक्रियेत आपला सहभागंही तितकाच महत्वाचा आहे हे कळत का नाहिये पालकांना याचं राहून राहून आश्चर्य वाटतं मला.

माझ्या मुलाने छान शिकावं, शाळेचा, शिक्षणाचा मनापासून आनंद घ्यावा, आपलं शालेयजीवन एन्जॉय करावं, लहानपण मनसोक्त जगावं, स्पर्धा असली तरी ती निकोप असावी, एकमेकांना सहकार्य करायला शिकावं , आपण समाजाचं देणं लागतो हे मनावर ठसावं, आपल्या मुलाला काय विचार करायचा याचं स्पून फीडिंग न करता विचार कसा करावा, विचारांती निर्णय कसे घ्यावे, आपल्या निर्णयाची जबाबदारी आपण स्वतः घ्यावी या गोष्टी शिकवण्याचा कोणीही विचार करताना दिसत नाही. काही अपवाद असतीलंही पण बहुसंख्य पालक याबद्दल बिल्कुल विचार करत नाहीत. आजकाल प्रत्येकाला पोरांना परीक्षेसाठी तयार करायचंय, परीक्षा नीट देता आली पाहिजे, पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे, गुणवत्ता यादीत नाव झळकलं पाहिजे. अमुकच्या तुलनेत माझं लेकरू पुढे पाहिजे, कायम टॉपला पाहिजे, अपयश वगैरे त्याला स्वप्नातंही दिसलं नाही पाहिजे. कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन हे सतत कानीकपाळी ओरडून पोरांना त्या स्पर्धेच्या आवाजवी ओझ्याखाली इतकं दाबलं जातंय की त्यांच्यात आणि घाण्याला जुंपलेल्या बैलात काही फरक राहिलेला नाहिये.

यश ही खूप फसवी संकल्पना आहे किंवा प्रत्येक व्यक्तिनुसार ती संकल्पना बदलत राहते. कोणाशीतरी तुलना करून त्यांच्यापेक्षा सरस होऊनंच यशस्वी होता येतं असं मला आजिबात वाटत नाही. माझ्या मुलाने हसतखेळत शिकावं, त्याचं बालपण भरभरून जगावं, एकूणात शाळा या प्रकाराचा कसलाही दबाव घेऊ नये, शाळा बुडवण्यासाठी नानाविध कारणं सांगण्याऐवजी शाळेबद्दल आणि पर्यायाने जे शिकतोय त्याबद्दल त्याच्या मनात आवड निर्माण व्हावी असं मला मनापासून वाटतं. याऊपर माझ्या लेकराला शाळेनं लहान मुलासारखं वागवावं, गळेकापू स्पर्धेत जीवच्या आकांतानं धावून पहिला नंबर मिळवण्याची धडपड करणार्‍या रोबोटच्या भाऊगर्दीतला अजून एक रोबोट बनवू नये असं मनापासून वाटतं.

याव्यतिरिक्त एकदा शाळेत प्रवेश घेतला की मी मोकळा असा विचार करण्यापेक्षा शाळेसोबत पालकांनीही पाल्याच्या जडणघडणीत सहभागी असायला हवं असं मी मानतो. इंग्रजी महत्वाची तर आहेच पण इंग्रजीच फक्त महत्वाची आहे असं वाटत नाही. त्यामुळे एक भाषा म्हणून इंग्रजीचा अभ्यास माझ्या लेकाने १००% करायलाच हवा, इंग्रजी साहित्याची ओळख हवी, ही भाषा किती समृद्ध आहे हे शिकावं नुसताच फाडफाड इंग्रजी बोलणारा होऊ नये तर त्याचं इंग्रजी उत्तम असावं असं वाटतं. राहिला प्रश्न माध्यमाचा तर आपल्या परिसर भाषेमध्ये मुलांना आकलन चांगल्या पद्धतीनं होतं, परिसर भाषा ही मूळातच अवगत असल्याने भाषा शिकून मग त्या भाषेत बाकीचे विषय शिकणे या दोन पातळ्यांवर मुलांना झगडावं लागत नाही शिवाय शाळा व अभ्यासाव्यतिरीक्तंही आयुष्य भरभरुन जगता येऊ शकतं. परिसर भाषेतून शिकल्यानं मुलांचा पाया पक्का होतो आणि आजकालच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी शिक्षणाच्या नावाखाली लहान मुलांचा आणि सोबत पालकांचा चालवलेला छळ हे सर्व बघता माझ्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेतच प्रवेश घेयचा ही मी मला मूल होयच्या आधीपासून ठरवलं होतं. मुलांना परीक्षार्थी बनवून गुणवत्ता यादी, टक्केवारीच्या दुष्टचक्रात अडकवून त्यांच्या मनात स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण करायचे प्रकार करण्यापेक्षा ते ज्ञानार्थी व्हावे, एकमेकांशी अवाजवी स्पर्धा करण्यापेक्षा एकत्रित शिकावं, निरनिराळी कौशल्य शिकावी आणि सगळ्यात माहत्वाचं म्हणजे ही सगळी प्रक्रिया मनापासून एंजॉय करावी असं माझं ठाम मत आहे म्हणून मी माझ्या लेकाला अक्षरनंदन मराठी शाळेत प्रवेश घेतलाय.

मराठी माध्यमाची निवड करणं वाटतं तितकं सोपं निश्चितंच नव्हतं, मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांचा दबाव होता. . माझ्या मुलाला मराठी शाळेत प्रवेश घेयचं ठरवतोय हे कळल्यापासून माझ्या आजूबाजुचे सगळे जणू मी दोनचार खून केल्यासारखे माझ्याकडे बघत असायचे. मराऽऽठीऽऽ.... वेडाएस का म्हणून मराठी हा शब्द म्हणताना शब्दशः किंचाळत होते. हा सगळा दबाव, इंग्रजी माध्यमाची चमकधमक सगळं दुर्लक्षून तथाकथिक स्पर्धेचं युग आणि आपणंच उभा केलेला माध्यमाचा बागुलबुवा वगैरे गोष्टींचा अवास्तव दबाव झुगारून हा निर्णय घेऊ शकलो कारण सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमात झालेल्या माझ्या बायकोने हा विचार उचलून धरला, माझ्या आईबापाने बहिणींनी मला प्रोत्साहन दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्षरनंदनसारखी शाळा मिळाली.


माही

 


माणसाला एक खोड असते बाकीच्यांना आलेल्या अनुभवावरून (मग ते आपल्याला सर्वबाजूने माहीत नसले तरी), बाकीच्यांच्या कोणाबद्दल तरी मतावरुन प्रभावित होऊन आपण उगाचंच आपली न बदलणारी मतं बनवत राहतो, उगाचंच रीजिड होतो आणि मग ते मत बरोबर आहे हे सिद्ध करण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधून, वेगवेगळे दाखले देत राहतो, वस्तुस्थिती भलेही वेगळी असली तरीही. कित्येकदा तर हे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना टाईपचा राग किंवा मत असतं आणि मग घेणं न देणं कंदील लाऊन येणं असं वागत राहतो आपण.

किमान मला ही खोड फार होती पूर्वी (फार पूर्वी नाही), एखाद्या जवळच्या, आवडत्या किंवा प्रिय व्यक्तींला आलेल्या अनुभवावरून किंवा सांगण्यावरून आपलं मत बनवणं. स्वतः फर्स्ट हॅंड अनुभव न घेताच एखादी गोष्ट मनात निश्चित करुन टाकणे आणि पर्यायाने नको ती कटुता आणि ओझी स्वतःच्या मनावर वागवत राहणे. यातलं प्रसिद्ध व्यक्तींच्या बाबतीतले उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यात बेस्ट उदाहरण आहे महेंद्रसिंग धोनी. धोनीचा भारतीय संघातली एंट्री आणि ज्यांचा खेळ बघत आम्ही मोठे झालो त्या लाडक्या खेळाडूंना एकेक करत लागलेली गळती ठळक दिसत होती शिवाय मिडीयामध्ये धडकणाऱ्या बातम्या ज्यात तिखटमीठ लावून धोनीने कसा वरीष्ठ खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवलाय, कसे ते त्याच्या डोळ्यात खुपतात, कसा तो वरीष्ठांना हुसकवायला आणि त्याच्या मर्जीतल्या खेळाडूंना संघात घ्यायला टपून बसलाय याच्या सुरस कथा येत रहायच्या. म्हणजे काय तर ठराविक खेळाडूंना आलेला खराखोटा अनुभव आणि मिडीयातल्या खऱ्याखोट्या (खऱ्या म्हणणं धाडसाचंच ठरेल) बातम्या यावरुन माझं मत बनवून मी धोनीचा तिरस्कार करत राहीलो, तो कितीही चांगला खेळला किंवा जिंकत राहीला तरी मी त्याचं कौतुक केलं नाही. धोनीचा खेळातलं वैगुण्य शोधणं किंवा त्याचा अमुक एक निर्णय कसा चुकला हे सांगणं हेच त्याचा खेळ बघताना उद्दिष्ट असायचं. पुलंनी सांगितल्याप्रमाणे आपण उंदीर मारायच्या विभागात काम करणारे असूनंही “धोनी”बद्दल मत ठोकून द्यायचो. तो कसा टेक्निकली खराब खेळतो, गावठी आहे वगैरे म्हणून मी स्वतःचं समाधान करुन घ्यायचो आणि तो जवळपास प्रत्येकवेळी काही ना काही ऑनफिल्ड कमाल करुन दाखवायचा. धोनीबद्दलचा तिरस्कार विनाकारणंच एवढा वाढवून ठेवला होता की “धोनी द अनटोल्ड स्टोरी” हा पिक्चरंही कसा बकवास आहे हे लोकांना सांगता यावा म्हणून मी बघितला होता आणि सरप्राईजिंगली तो पिक्चर बघितल्यानंतर धोनी मला हळूहळू आवडू लागला होता. I owe this to Sushant

माझ्या वडिलांना मात्र माही जाम आवडायचा, माझ्या बहीणींनाही तो खूप आवडतो. त्यांच्याशी मी धोनी विषयावरुन विनाकारण हुज्जत घातलेली चांगली आठवते. तर बाकी काही नाही पण माझ्या वडिलांच्या शेवटच्या काळात म्हणजे २०१६ पासून त्यांना बरं वाटावं म्हणून धोनीबद्दल चांगलं बोलायला सुरुवात केली होती मी आणि पुढे जाऊन महेंद्रसिंग धोनी या माणसाबद्दल मला आतोनात आदर वाटू लागला.

२०१७ मध्ये मला मुलगी झाली तेव्हा खूप नावं शाॅर्टलिस्ट केली होती तिच्यासाठी आम्ही, नाव निवडताना अट एकंच होती जोडाक्षर नको आणि नाव छोटंसं असावं. पर्ण, रमा, वीरा, सारा, ईरा ही नावं विचारात होती. सचिन तेंडूलकरच्या मुलीचे नाव सारा असल्याने तिकडे माझा कल जास्तं होता पण मग सगळ्यांना ईरा आवडल्याने ईरा फायनल झालं आणि भाऊंना माही आवडतो म्हणून मी माही+ईरा = माहीरा केलं.

२०१६ आधी मला कोणी चेष्टेत जरी म्हणालं असतं की तू तुझ्या मुलाचं/मुलीचं नाव धोनीच्या नावावरुन ठेवशील तर तुंबळ भांडलो असतो मी त्याच्याशी.

 

Huge Respect for Dhoni for what he’s achieved, for the way he’s achieved it, for whatever he is

Happy Birthday Mahi!


एक उनाड दिवस

 


मस्तं डोंगराच्या कुशीत वसलेलं टुमदार गाव, त्यात लुटेरा सिनेमातल्या सोनाक्षीच्या घरासारखं एक घर, आजूबाजूला जिथे नजर जाईल तिथे हिरवळ. गाड्या यंत्रं अगदी नगण्यच. येणार्‍या जाणार्‍या लोकांची उगाचच कसलीही लगबग नाही. रस्त्यावर खेळणारी लहान मुलं, एकमेकांशी निवांत गप्पा मारणारे गावकरी, थोड्या वेळापूर्वी झालेल्या पावसानं स्वच्छ झालेले रस्ते, पावसाचे थेंब हिर्‍यासारखे अंगावर मिरवणारी झाडांची पानं फुलं आणि वीजेच्या तारा, आपली जागा सोडून जमिनीवर इतक्या खाली उतरलेले ढग की कळूच नये कोणाला जमिन कुठे संपतेय आणि ढग कुठे सुरू होताएत.

नुकत्याच झालेल्या पावसाने थंड झालेली हवा दीर्घ श्‍वास घेऊन छातीत भरून घेत मी सगळी बैठी घरांची रांग पार करत करत त्या लुटेरामधल्या घरासारख्या घरापाशी येऊन थांबलो. आत जाऊन हॉलमधे शेकोटीसाठी राखून ठेवलेल्या एका कोपर्‍यात मस्तं शेकोटी पेटवून आराम खुर्चीत जाऊन बसलो. खुर्चीच्या पलिकडची एक मोठी खिडकी, खिडकीच्या गजावरंही ओघळणारे पावसाचे थेंब आणि बाहेर परत चालू झालेला पाऊस तल्लीन होऊन बघत बसलो. पावसाच्या लयीशी आणि संगीताशी एवढा एकरूप झालो की किती वेळ गेला काही कळलं नाही, हातात घड्याळ घातलंच नव्हतं आणि हॉलमधल्या घड्याळाकडे बघण्याची इच्छाही झाली नाही. तसाच उठून बाजूच्या टेबलापाशी गेलो त्यावर लेदरच्या फोल्डरमध्ये नीट कोरे कागद ठेवलेले होते, वर एक छानसं फाउंटेन पेन डकवलं होतं ते काढून बाजूच्या टेबल लॅम्पचं बटन चालू करून लिहायला बसलो. भरपूर भरून आल्यावर कसलेही प्रयत्न न करता आपसूकंच पावसाला सुरुवात व्हावी आणि संततधार पाऊस पडत रहावा तसंच कसलेही प्रयत्न न करता सुचत गेलं, तसाच लिहीत राहिलो मानपाठ एक होईपर्यंत. थोड्या वेळापूर्वी पेटवलेल्या शेकोटीमुळे पूर्ण हॉल ऊबदार वाटत होता.

पेनाचं टोपण लावून फोल्डरवर परत डकवून जरासा मागे सरकत मी हात आणि पाठ स्ट्रेच करत मनसोक्त आळोखेपिळोखे देत आळस दिला. दोनएक मिनिट तसाच खुर्चीत रेलून बसलो आणि मग हॉलमधल्या वूडन फ्लोरिंगवरून चालत चालत स्वैपाकखोलीत गेलो. तिथे कुकरमध्ये ठेवलेलं गरमागरम चिकन सूप बाउलमध्ये ओतून घेतलं बाकी जेवण वाढून घेऊन परत हॉलमध्ये येऊन बसलो. जेवून पाणी प्यायल्यावर शेकोटीने ऊबदार झालेल्या घरातंही गाऽऽऽर वाटू लागलं होतं. जुन्या वर्तमानपत्राने शेकोटीला फुलवून थोडे हातपाय शेकून मी आरामख़ुर्चीत अरुणा ढेरेंच कृष्णकिनारा घेऊन बसलो, हे पुस्तक वाचण्याची माझी ही कितवी वेळ हे माझं मलाही आता आठवत नाही. वाचता वाचता कधी झोपी गेलो ते कळलंच नाही.

जाग आली तेव्हा खिडकीच्या काचेवर धुकं जमलं होतं, आजूबाजूला अंधार झाला होता. मी तळहाताने धुकं पुसत काचेपल्याड पाहिलं पाऊस थांबला होता, गावात सर्वदूर दिवे लागले होते. पलीकडच्या डोंगरावर तुरळक येजा करणार्‍या गाड्यांचे lights चमकत होते. मी अजूनही घड्याळ बघितलं नाही. उठून मोठा मग भरून कॉफी करून घेऊन मी घराच्या मागच्या बाजूच्या झोपाळ्यावर जाऊन बसलो. छप्परावरून पाण्याचे एकेक करून थेंब खाली साठलेल्या पाण्यात पडत होते, त्यांचा पडण्याचा वेग हळूहळू कमी होत होता. मी संपलेल्या कॉफ़ीचा मग तसाच हातात ठेऊन कितीतरी वेळ तो खेळ तसाच बघत राहिलो. घड्याळाच्या काट़यांशी ब्रेकअप झाल्यासारखा मी सकाळपासून एकदाही वेळेची पर्वा केली नव्हती. तिथे बसल्या बसल्या डुलकी लागणार एवढ्यात माझ्या मोबाईलमधला गजर वाजला, मी डोळे किलकिले करून बघितलं सकाळचे साडेपाच झाले होते. मनाविरुद्ध का असेना या गोड स्वप्नातून बाहेर येत आवरण्याशिवाय पर्याय नव्हता. स्वप्नाच्या दुनियेसारखं सत्यात घड्याळाशी ब्रेकअप झालं नव्हतं. पार्किंगमधून गाडी काढताना पावसाला सुरुवात झाली होती आणि मनात स्वप्नातल्या एक उनाड दिवसाची उजळणी करत मी ऑफिसला जाण्यासाठी गाडी पिटाळत होतो.


कोव्हिड



 

गेले काही महीने माझा ऑफिसचा वर्कलोड भरपूर वाढल्यामुळे माझं वर्कआऊट करणं बंद झालं होतं. लाॅकडाऊनच्या सुरुवातीपासून मी नियमित व्यायाम करत होतो पण मिड जूनपासून हळूहळू अनियमित होत होत व्यायाम बंद झाला. ऑगस्टमध्ये मात्र मी मनातून ठरवलं कितीही वर्कलोड असला तरी व्यायामासाठी रोज थोडातंरी वेळ काढायचाच आणि मी महिन्याच्या मध्यापासून परत व्यायामाला हळूहळू सुरुवात केली.

होम वर्कआऊटची सवय असूनंही परत सुरुवात करणं तसं आव्हानात्मक गेलं. हळूहळू नियमित होत होत मी थोडा थोडा व्यायाम वाढवत होतो. २३ तारखेला रात्री फारसा हेवी वर्कआऊट न करुनंही मला दमल्यासारखं वाटत होतं. त्या रात्री घरातल्या आरतीच्यावेळी मला थोडीशी धाप लागल्यासारखी वाटली, पण वाटलं वर्कआऊट करुन लगेच पोटभर खाल्ल्यामुळे असं झालं असेल. पुढच्या पाचेक मिनिटांत धाप थांबली आणि मी ते विसरुनंही गेलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवार २४ ऑगस्टला दुपारी काम करताना जरा थकल्यासारखं वाटत होतं. अंगात आळस भरल्यासारखं वाटत होतं, वाटत होतं सगळं सोडून फक्त लोळत रहावं, कोणीतरी अंग चेपून द्यावं. ऑफिसचं काम असल्यामुळे मी त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करत तसंच काम रेटत राहीलो. त्यादिवशीचं काम संपवलं आणि रात्री जेवण करायला बसण्याआधी पूर्ण गळून गेल्यासारखं वाटू लागलं, लोअरबाॅडी अचानक खूप दुखू लागली. भूक तर लागली होती, तसंच जेवण केलं आणि पॅरासीटॅमाॅल घेऊन झोपलो. रात्रभर शांत म्हणावी अशी झोप लागली नाही. लोअरबाॅडी दुखतंच होती. अगदी पाठीवर झोपलो तर शाॅर्टची लेसंही कमरेत रुतुन कंबर दुखत्येय असं वाटू लागलं. सकाळी उठलो तेव्हा अंगदुखी कमी झाली होती. त्यादिवशी जरा उशिरा आंघोळ केली, अंगदुखी नव्हती पण अंगात भयंकर आळस भरला होता, काहीही करायची ईच्छा होतंच नव्हती. दिवस असाच गेला, रात्री सहज म्हणून ताप चेक केला तर ९८.७ च्या आसपास होता. ताप नाही पण अंग परत दुखू लागलं होतं. परत औषध घेऊन झोपलो, सकाळी जसा उठलो तसा अंथरुण पांघरुण घेऊन तळमजल्यावर स्वतःला आयसोलेट केलं. ताप नसला तरी अंगदुखी होती आणि आता खूप अशक्तपणा जाणवू लागला होता. थोड्यावेळाने डाॅक्टरला फोन केला तर त्यांनी सांगितलं फोनवर बोलण्यासाठी संध्याकाळची वेळ राखून ठेवलीये, संध्याकाळी पाचनंतर फोन कर. दिवसभर तसंच ऑफिसचं काम केलं. संध्याकाळी १००.६ ताप आला होता. त्यादिवशी डाॅक्टरांना परत परत फोन करुनंही संपर्क होऊ शकला नाही. दुसऱ्या दिवशी ताप अंगदुखी वाढली, सकाळी डाॅक्टरांकडे गेलो तेव्हा १०१ च्या आसपास ताप होता. तीन दिवसासाठी ॲंटीबायोटीक्स आणि बाकी काही औषधं देऊन डाॅक्टरांनी घरी पाठवलं, म्हणाले ताप उतरला नाही तर टेस्ट करुया. तोपर्यंत मलाही वायरलंच असावं असं वाटंत होतं.

एक दिवसभर औषधं घेतल्यानंतर ॲंटीबायोटीक्समुळे जुलाबंही चालू झाले. जेवायची ईच्छा होईनाशी झाली, अंग तर दुखतंच होतं. औषधं घेतल्यावरंही ताप उतरायला दोन-सव्वा दोन तास लागत होते आणि त्यानंतर लगेचंच तीनेक तासात परत सणकून ताप येत होता. तीन दिवस गेले पण ताप कणभर कमी नाही झाला. मग मात्र आम्ही सबर्बन लॅबला फोन करुन ३१ ऑगस्टला टेस्ट करुन घेतली.

त्या दिवसापर्यंत मी सगळं व्यवस्थित पाळत होतो, एकतंर कुठेच जातयेत नव्हतो आणि बाहेर गेलोच तर सोशल डिस्टंसिंग, परत आल्यावर कुठेही स्पर्श न करता साबणाने हात स्वच्छ धुणे, मास्क धुवायला टाकणे सगळं तंतोतंत पाळत होतो. एकटा तर एकदाही कुठेच गेलो नव्हतो. बायकोला कसलेही सिंप्टंम्स नसणं हा त्यामुळेच आशेचा किरण होता. टेस्ट केल्यावर पूर्ण दिवसभर आपण कुठे चुकलो कोणाच्या संपर्कात आलो? याचा विचार करण्यात गेला. काहीही केल्या आठवत नव्हतं की कुठे चूक झाली असावी ते. एकूण लक्षणं बघता टेस्ट पाॅजिटीव्हंच येण्याची शक्यता जास्तं वाटत होती. दरम्यान ताप कमी होत नसल्याने डाॅक्टरने ॲंटीबायोटीक्स बदलून दिले होते पण ताप जराही कमी झाला नव्हता, वास येत नाहीये असं वाटत होतं पण ते वाटत होतं की वास येणं खरंच बंद झालं होतं हे कळेना. दुसऱ्या दिवशी १ सप्टेंबरला माझा कोव्हिड रीपोर्ट पाॅजिटीव्ह आला आणि मला कोव्हिड असल्याचं शिक्कामोर्तब झालं. घरातून कुठेच न जाता, जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा १००% सोशल डिस्टंसिंग पाळूनंही मला कोव्हिड झाला. खूप खूप विचार करुनंही नेमकं कुठे काय चुकलं ते आठवेना.

आता घरच्या सगळ्यांची टेस्ट करायचं ठरलं. त्यांचे स्वाॅब सॅंपल्स दिल्यानंतर पूर्ण दिवसभर किमान त्या सगळ्यांचे रीपोर्टस निगेटीव्ह यावे असं वाटत राहीलं. आता मला औषधं चालू करुन सहा दिवस झाले होते, दोन वेगवेगळे ॲंटीबायोटीक्स घेऊनंही ताप कमी झाला नव्हता. त्या रात्री परत एकदा डाॅक्टरने ॲंटीबायोटीक्स बदलले. दुसऱ्या दिवशी २ सप्टेंबरला घरच्या सगळ्यांचे रीपोर्टस आले. माझी ६७ वर्षांची आई, बायको आणि ३ वर्षांची मुलगी तिघींचे रीपोर्टस पाॅजिटीव्ह आले होते. ६ वर्षांचा मुलगा आणि मुलांना संभाळणाऱ्या मावशी दोघांचे रीपोर्टस निगेटीव्ह आले. मावशी त्यांच्या घरी गेल्या आणि लेकाची रवानगी लगेचंच माझ्या काकाच्या घरी केली. आता घरात सगळेच कोव्हिड पाॅजिटीव्ह असल्यामुळे मी तळमजल्यावरुन परत घरात आलो. मी सोडून बाकी सगळे जवळपास असिंप्टमॅटीक असल्यामुळे सगळेच होम क्वारंटाईन झालो. घरात लहान मुलं आहेत आई वयस्कर आहे म्हणत ईतके महीने जे होऊ नये म्हणून जपलं ते आमच्या नकळत जवळपास पूर्ण कुटुंबाला झालं होतं. कोव्हिडचा सामना हा दोन आघाड्यांवर करावा लागतो म्हणतात त्याचा प्रत्यय आला. शारिरीक त्रास तर होताच पण मानसिक पातळीवर कोव्हिडला सामोरं जाण्यासाठी कणखर असणं तेवढंच गरजेचं असतं हे कळू लागलं. मानसिकरीत्या स्ट्राॅंग राहणं काय अवघड नाही असं नेहमी वाटायचं पण कोव्हिड जेव्हा घरात आला तेव्हा कळलं की ते वाटतं ईतकं सोपं निश्चितंच नव्हतं. सर्वप्रथम आमच्या पिडीयाट्रीशियन ज्या आमच्या नातेवाईकंही आहेत त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं की लहान मुलांना काहीही औषधोपचाराची गरज नसते. ताप आला तर पॅरासिटॅमाॅल देणे, याव्यतिरीक्त शक्यतो बाकी काही देण्याची गरज पडत नाही. त्यानंतर दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा पिडीयाट्रीक सेक्शनचा एक विडीयो पाहीला त्यात त्यांनी लहान मुलांना सतत काही ना काही वॅक्सिनेशंस चालू असल्याने त्यांची प्रतिकारशक्ति खूप चांगली असते आणि त्यांना कोव्हिडचा शक्यतो काही त्रास होत नाही हे सांगितल्यामुळे शिवाय मुलीला त्रास होत नसल्याने आणि ती फुलाॅन एनर्जेटीक असल्यामुळे काळजी बऱ्याच अंशी कमी झाली.

आई ६५+ असल्याने आता काळजी फक्त आईची वाटत होती, वाटत होतं एखाद्या चांगल्या हाॅस्पिटलमध्ये जाऊन पूर्ण चेकअप करुन घ्यावं, त्यांनी घरी उपचार करायला फिट आहे सांगितलं तर ठीक नाहीतर हाॅस्पिटलाईज करुन उपचार करावे. पण आईने पूर्णपणे या गोष्टीला विरोध केला, तिला एकट्याने हाॅस्पिटलमध्ये राहण्याची भयंकर भीती वाटत होती. हो-नाही हो-नाही करत आम्ही काॅर्पोरेशनने सांगितल्याप्रमाणे सगळेजण होम क्वारंटाईन झालो.

खूपजणांनी सतत एकंच गोष्ट बजावून सांगितली होती की काहीही झालं तरी ऑक्सीजन लेवल सतत तपासत रहा. तसं मी दरतासाला तपासून नोंद ठेवत होतो. ईतके दिवस ९०+ असायला हवी हे कळलं होतं पण होमक्वारंटाईन झालो आणि काही डाॅक्टरांनी आणि मित्रांनी सांगायला सुरुवात केली की ९४च्या खाली ऑक्सीजन येणं चांगलं लक्षण नाही. काहीही झालं तरी ९४ च्या खाली येता कामा नये. हे सतत ऐकून मला असं वाटू लागलं होतं की आपली ऑक्सीजन लेवल नक्कीच ९४च्या खाली येणारंच. मग ऑक्सीजन लेवल चांगली राहण्यासाठी डीप ब्रीदींग एक्झरसाइजेस, पालथं झोपणे, प्राणायाम आणि दिनानाथ हाॅस्पिटलने रीलीज केलेले काही हलके व्यायाम करायला सुरुवात केली. ४ सप्टेंबरला दिनानाथच्या होम आयसोलेशन वाॅर्डला जाऊन पूर्ण चेकअप करुन आपण होम आयसोलेशनसाठी फिट असल्याची खात्री करुन घेतली. तीन मिनिट चालून ऑक्सीजन लेवल ९७ आल्यावर थोडं रीलीव्ड फिल होऊ लागलं. ४ तारखेला ताप आला ९९ पासून सुरु झाला ते १०१.५ वर स्थिरावला. एक तासाभराने औषध न घेता कमी झाला आणि दोन-अडीच तासांनी कसलंही औषध न घेता पहिल्यांदाच ताप पूर्णपणे उतरला आणि तेव्हापासून ताप येणं थांबलं.

थोडं थोडं करत तब्येतीत प्रगती होऊ लागली आणि घरातले बाकी सगळे जवळपास असिंप्टमॅटीक असल्यामुळे त्यांना जुजबी औषधं दिली होती. एकूण लागोपाठ दहा दिवस ताप आला, जवळपास ते दहाही दिवस जुलाब होत होते, सुरुवातीचे सहा एक दिवस जाम अंगदुखी होती, मग अंगदुखी कमी होत गेली, पहिल्या दोन दिवसानंतर पहाटे घसा दुखायला सुरुवात झाली, अजून दोन दिवसांनी घसा दुखणं कमी झालं पण थोडाही दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न केला तर घशात एका बाजूला दुखायचं आणि दीर्घ श्वास घेणं शक्य होत नव्हतं, हळूहळू तेही कमी झालं पण एका मर्यादेनंतर दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न केला तर खोकला यायचा, तरीही मी दीर्घ श्वास घ्यायचा प्रयत्न करतंच राहीलो, लक्षणं दिसायची सुरुवात झाल्यापासून बाराएक दिवसांनी प्रयत्नपूर्वक दीर्घ श्वास घेणं शक्य होऊ लागलं दीर्घ श्वास घेतल्यावर खोकला येणं बंद झालं. २४-२५ ऑगस्टला एकेक करत दिसू लागलेली लक्षणं आता जवळपास बरी झालीयेत, थोडा कोरडा खोकला आहे आणि त्यासाठी डाॅक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली औषधं आणि आजीबाईच्या बटव्यातले घरगुती उपचार घेणं चालू आहे.

शारिरीक आणि मानसिक पातळ्यांवर परीक्षा बघणारे गेले दोन आठवडे होते. लक्षणांवर ईलाज केला असला तरी अशक्तपणा अजूनंही खूऽऽप आहे, पाच-दहा पायऱ्या चढउतार केल्या तरी दमछाक होतेय, घरात अगदी छोटंसं काम करुनंही अगदी गळून गेल्यासारखं वाटतंय. ज्यांना कोव्हिड होऊन त्यातून ते बरे झालेत आणि मेडिकल प्रॅक्टीशनर्स सगळयांचे म्हणणं आहे की अशक्तपणा जायला वीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. ऑफिसकडून कामावर परत कधी रुजु होणार याबद्दल विचारणा सुरु झालीये. गेल्या दहा दिवसात ऑफिसने कामाबद्दल कसलीही गोष्ट न विचारणं हीसुद्धा एक सुखद बाब आहे. वर्कफ्राॅमहोम असलो तरीही काम सुरु करुन १२-१४ तास काम करण्याबाबत आत्ता तरी मनात साशंकता आहे. कंटीन्यू २-३ तासाच्यावर बैठक आणि काम इतक्यात तरी जमेल असं वाटत नाहीये. डाॅक्टरांच्या सल्ल्याने काम रीझ्युम करण्याबद्दल ठरवेन.

गणपतीला हत्तीचेच धड का लावले, हत्तीला मारताना वाईट वाटलं नाही का, रीया चक्रवर्ती, कंगना वगैरे निरर्थक गोष्टींवर फेसबूकवर चर्चा झडत असताना माझ्या घरात जवळपास सगळे कोव्हिड पाॅजिटीव्ह झाले होते. निगेटीव्ह पोस्टस आणि बातम्यांचा होणारा भडीमार थांबवण्यासाठी मी फेसबूक डीॲक्टीवेट केलं, वाॅटसॅपवरचा एकंही फाॅरवर्डेड मेसेज वाचला नाही. कोव्हिडमध्ये होणारा शारिरिक त्रास आणि मानसिक थकवा बघता कोणत्याही मेसेजला रीप्लाय करण्याची एनर्जी आणि ईच्छा दोन्हीही नव्हती. फोन उचलून बोलण्याची ताकद वाटत नव्हती आणि ईच्छा त्याहूनंही नव्हतीच. मित्र नातेवाईक आपुलकीने चौकशी करण्यासाठी फोन करत होते पण फोन अटेंड करुन करुन एनर्जी डाऊन होत होती. मी पहिले काही दिवस फोनवर बोलणं पूर्ण टाळलं होतं, वाॅटसॅप बघत नव्हतो. त्याकाळात सर्वांनी समजून घेतलं, फोनला उत्तर देत नाही म्हणून कोणीही गैरसमज करुन घेतला नाही. मला लिटरली फोनकडे बघायचीही ईच्छा होत नव्हती. रीपोर्ट पाॅजिटीव्ह आल्या दिवसापासून मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून मिळणारी ट्रीटमेंट आणि मदत अक्षरशः ओव्हरव्हेल्मिंग होती. चौकशी करणारे आणि काळजी घ्या सांगणारे फोन मेसेजेस नाही आले फक्त तर मित्रमंडळी कोव्हिडचे सगळे प्रोटोकाॅल पाळून काय हवं काय नको बघत होते. वाफेचं भांडं आणून देणं असो की होमिओपॅथिक औषधं देणं असो. काॅर्पोरेशनच्या फाॅर्म्यालिटीज पूर्ण करणे या सगळ्या गोष्टी सचिन शिंदेने केल्या, त्याचा छोटा भाऊ सुधीर रोज लिटरली दारात येऊन तब्येतीची चौकशी करत होता, फोन करुन त्याच्या डाॅक्टरकडे जाऊया म्हणून आग्रह करत होता. सागर बिद्रीने फोनवरुन या काळात काय करावं आणि काय टाळावं याबद्दल खूप सपोर्ट केलं, त्याच्या माहितीने खूप आधार मिळाला. बाकी सगळे जुने मित्र रोज नियमित चौकशी करत होते, शेजारीपाजारी आणि मित्र काही लागतंय का चेक करत होते, माझं मोराल बूस्ट करण्यासाठी रोज काही ना काही करायचा प्रयत्न करत होते. काही मित्र माझ्या बायकोकडे नियमित चौकशी करत होते. माझ्या काकाने माझा रीपोर्ट पाॅजिटीव्ह आलेलं कळल्यावर अर्ध्या तासाच्या आत माझ्या लेकाला त्याच्या घरी नेलं. दिवसभरात आम्हाला क्वारंटाईनच्या काळात जे काही लागू शकतं ते आणून दिलं. अगदी आजंही माझी काकी रोज सकाळसंध्याकाळ आम्हाला गरम डबा पाठवतेय. या काळात सर्वांनी आमच्यासाठी केलेली हरेक गोष्ट बघून, अनुभवून फार फार नशीबवान असल्याचा फिल येतोय, खूप भावुक व्हायला झालंय. खरंच माणसं कमावणं काय असतं ते या काळात तंतोतंत कळलंय. याआधीही खूप साऱ्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये मदत करणारे हात आणि आधार देणारी आपली लोकं याचा प्रत्यय आलेला आहे. या सर्वांनी आणि कुटुंबाने मला मानसिक पातळीवर कणखर रहायला मदत केलीये. कोव्हिडने बरंच काही शिकवलंय, जमलंच तर परत लिहीन त्यावर.

तुम्ही मात्र कोव्हिड वगैरे काही नसतं, कोव्हिड हा मोठा फ्राॅड आहे, मोठी खेळी आहे वगैरे कोणी बोलत असेल तर त्याकडे सपशेल दुर्लक्ष करा. कोव्हिड काळात मेडिकल फिल्डमध्ये मोठ्या प्रमाणात पेशंटसना लुबाडण्याचे प्रकार झालेही असतील, नव्हे झालेतंच पण कोव्हिड खरा आहे, शारिरिक आणि मानसिक पातळीवर भरपूर त्रास देतो. कोव्हिडबद्दल ईतके दिवस वाचून वाचून आपण गरजेपेक्षा जास्तं माहीती डोक्यात लोड करुन ठेवलेली आहे. प्रत्येकाचा केस अन अनुभव वेगळा आहे. कोव्हिडने अमुकेकंच त्रास होतो किंवा काहीच त्रास होत नाही असं कोणीही ठामपणे सांगू शकत नाही.

तेव्हा सुरक्षित राहण्यात शहाणपणा आहे, स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करा, सगळं तंतोतंत पाळलंत आणि थेट रुग्णाच्या संपर्कात आला नाहीत तर कोव्हिड होण्याची शक्यता जवळपास शून्य आहे. सगळी दक्षता घेऊन अनफाॅर्च्युनेटली झालाच तर क्षणाचाही विलंब न लावता उपचार घ्या, लवकरात लवकर बरं होता येतं. काळजी घ्या, विशेषतः घरातल्या ज्येष्ठांची नीटंच काळजी घ्या. कसल्याही बातम्या बघू नका, बातम्या फक्त घाबरवण्याचं काम करतात त्यामुळे बातम्या पूर्णपणे टाळा.

संतुलित आहार घ्या, हलके व्यायाम करा, योग प्राणायाम करा, फिटनेसकडे दुर्लक्ष करु नका. जेवढी प्रतिकारशक्ती चांगली, जेवढे तुम्ही शारिरिक आणि मानसिकरीत्या सशक्त तेवढा कोव्हिडचा धोका कमी. दगदग/एक्झर्शन करु नका, एनर्जी राखून ठेवा त्यामुळे कोव्हिड झालाच तर चटकन बरे व्हाल, कमीत कमी त्रास होईल.

ज्यांना झाला नसेल ते सुरक्षित रहा, ज्यांना झाला असेल ते घाबरु नका मानसिकरीत्या स्ट्राँग रहा लवकर बरे व्हाल.

घाबरु नका पण दक्ष रहा, सुरक्षित रहा.

Tuesday, September 11, 2018

दोघं - भाग ११




मावळतीच्या सूर्याचे आणि पर्यायाने दिवसाचे आभाळातले उरलेसुरले अवशेष पुसत जसजशी रात्र दबक्या पावलानं येऊ लागते तसं घर स्वतःचा आकार सोडून वासलेल्या जबड्याचा आकार घेऊ लागतं. दिवसभर ज्या घरात मोठ्या प्रयत्नानं मन रमवलेलं असतं तेच घर आता तिला खायला उठतंती हाताला येतील ती सगळी बटनं दाबून सगळ्या घरातल्या लाईट्स लावते. मेनडोअर आतून घट्ट बंद करून घेत हॉलमधल्या खिडकीत येऊन बसते. बाहेर, येणार्या- जाणार्या माणसांनी, गाड्यांनी रस्ता फुलून गेलेला असतो. एकेक गाडी, माणूस, दारात खेळणारी लहान मुलं बघता बघता तिची नजर गेल्या चार महिन्यात जागच्या हललेल्या त्याच्या गाडीवर येऊन स्थिरावते. धुळीच्या जाडंच जाड थरामध्ये त्याची गाडी झाकून गेलेली असते. तिच्या काळजावरंही अशीच आठवणींची पुटं चढलेली असतात. रोज शेकडो वेळा त्यावर बोटं फिरवत तिने "I miss you" लिहून झालेलं असतं. पण तरीही आठवणींचा थर कणभरंही कमी होत नाही. आठवणींच्या थरावर फिरवलेल्या बोटापासून सुरुवात करत ती तास, दिवस, आठवडे, महिने करत करत किती वर्ष झाली ते मोजत राहते. नजर खिडकीच्या बाहेर रोखून ती बोटावर वेळेचं गणित मांडत राहते.

देवापुढे दिवा लावायची वेळ उलटून चाललेली असते. गेली कित्येक वर्षं नित्यनेमाने आणि भक्तिभावाने केलेलं काम आता तिला मनापासून करावसं वाटत नाही. ती तशीच जागेवर रेंगाळते. पलीकडच्या तक्क्याखाली पडलेला मोबाईल फोन उचलून ती contact list मध्ये जाते, एकेक alphabet शोधून ती त्याचं नाव टाइप करते, नावावर क्लिक करून त्याचा नंबर वाचून बॅक बटन दाबून contact list मधून बाहेर येते. परत त्याच्या नावावर क्लिक करते परत त्याचा नंबर वाचून बाहेर येते. हा खेळ बराचवेळ चालत राहतो. तिला मनापासून एकदाच का असेना पण त्याला कॉल करुन बघावसं वाटत राहतं, पलीकडून तो बोलणार नाही नक्कीच हे माहिती असूनही असंच वाटत राहतं. मग ती मोठ्या प्रयत्नाने फोन बाजूला ठेऊन देते. पलीकडेच बैठकीवर त्याच्या नेहमीच्या बसायच्या जागेवर तिची नजर जाते. ती लगबगीनं जागची उठून बैठकीपाशी जाते, बैठकीवर पडलेलं आणि घडीही उघडलेलं आजचं वर्तमानपत्र उचलून रद्दीच्या कप्प्यात टाकून देते. बैठकीवरचं बेडशीट एकसारखं करत झटकून त्यावरच्या छोट्या उशा एका रांगेत लावून ठेवते. त्याला जशी आवडते अगदी तशी बैठक ती चकाचक करते. पलिकडे ठेवलेला लँडलाईन फक्त इनकमिंग पुरता मर्यादित असतो, कधी वाजलाच तर... उचलायचा... मनाविरुद्ध. एरव्ही इंटरनेट बंद पडलंच कधी तर कंप्लेंट करण्यापुरता वापरला जायचा आधी आता तेही कोणी वापरत नाही जास्तं.. मग बंद पडल्यानं फरकंही पडत नाही. शेवटचा आउटगोइंग कॉल कदाचित त्यानंच केला असावा कित्येक महिन्यांपूर्वी असं वाटून ती विनाकारण रिसीव्हर उचलून रिडायलचं बटन दाबते, पलिकडून ऑटोमेटेड आवाज ऐकू आल्यावर रिसीव्हर परत जागेवर ठेऊन देते.

लॅण्डलाइनच्याखाली ठेवलेला त्याचा लॅपटॉप काढून पदरानं पुसते. याआधी कधीच वापरलेला लॅपटॉप आज तिला उघडून बघावासा वाटतो. ती तो फ्लॅप उघडते, फ्लॅप उघडलेल्या बंद लॅपटॉपकडे बघता बघता जमिनीवर मांडी घालून बसते. लॅपटॉपच्या बंद स्क्रीनमध्ये तिला तो दिसतो.. चष्मा लावून लॅपटॉप मांडीवर घेऊन बसलेला. नाकावर चष्मा थोडासा खाली ओढून कानात इयरफोन लावून पिक्चर बघणारा तो आपल्याच नादात मोठ्यानं हसतो, पलिकडे तीही असते. काय लावलंय, रात्रीचे बारा वाजलेत बंद करा तुमचं ते डबडं म्हणून ती हातवारे करत असते. इयरफोनमुळे त्याला ऐकू येत नाहिये हे कळाल्यावर तीशुक शुक करून मोठ्यानं आवाज देते, तो तिला सांगतो तू झोप मी पिक्चर संपल्याशिवाय झोपणार नाहिये. ती त्याला करून आवाज देत उगाचंच चिडवत राहते. तो हनुवटी एका हाताच्या तळव्यावर टेकवून पुढचा पिक्चर बघत राहतो. ती कूस बदलते आणि लॅपटॉपच्या बंद स्क्रीनवर दिसणारे ते दोघे तिला दिसायचे बंद होतात. ज्या कीबोर्डवर कायम त्याची बोटं फिरली त्या कीबोर्डवर त्याच्या हाताचे ठसे उमटल्याचा भास होतो तिला. मग ती प्राणपणानं तिचा तळहात त्या कीबोर्डवर ठेऊन त्याच्या तळहाताच्या रेषांशी स्वतःच्या तळहाताच्या रेषा जुळवायचा प्रयत्न करते. तिला बघायचं असतं की अजून किती काळ हे असं त्याच्याशिवाय एकट्यानं जगायचंय. या प्रश्नाचं उत्तर तिला काही केल्या हवं असतंसैरभैर होत ती हात कीबोर्डवरून फिरवत राहते.

त्याच्या तळहाताच्या रेषा कीबोर्डवर तर दिसत नाहीत पण डोळ्यात साठवलेल्या असतात तिने. त्याचा हात आपल्या हातात घेऊन कित्येकदा बोललेली असायची ती, "सायबा, एवढा मऊ कसा काय तुमचा हात? आणि ती आयुष्यरेषा बघा लांबच लांब आहे. काळजी करू नका". हे वाक्य बोलल्यानंतर प्रत्येकवेळी हसणारी ती आता मात्र स्वतःचा तळहात भानातून गेल्यासारखं निरखून बघत राहते. तळहाताच्या रेषा ठळक होत होत वाऱ्यावर धूळ उडून डोळ्यात जावी अशा डोळ्यात खुपू लागतात. इतकावेळ स्पष्ट दिसणारा हात धूसर होत जातो. ती तिचा चेहरा दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये झाकते, तिचे अस्फुट हुंदके त्या तळव्यांवर विरून जातात. तिला मोठ्याने रडावंसं वाटत असतं, वाटतं आपला आवाज पोहोचेल त्याच्यापर्यंत पण ती तसं करत नाही, तळव्यावर विरलेल्या हुंदक्याला ती बाहेर पडू देत नाही

डोळ्यांच्या कडा टिपत ती सभोवार नजर फिरवते, संपूर्ण घर तिला एकाकीपणाच्या रंगात रंगल्यासारखं वाटतं. तळमजल्यावर खेळणार्या नातवाला ती आवाज देते, तो आपल्याच नादात बागडत राहतो. ती अगदीच एकटी नसते घरात, दिवसभर खेळून दमलेली नात निरागस चेहर्याने गाढ झोपलेली असते पण खरं सांगायचं तर तिचा एकाकीपणा हा घरातल्या माणसांच्या संख्येनेशी निगडीत नसतो. बरं माणसंही तिची स्वतःची असली तरीही त्याच्या जाण्यानं झालेली पोकळी ही भरून येणारी नसते. तिची भिरभिरणारी नजर फिश टँकवर स्थिरावते. त्यातले सगळेच मासे त्यानं आणि तिनं मिळून आणलेले असतात. मासे शांतपणे टँकच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहत असतात. दिवसभर त्यांचा तोच खेळ चालू असतो. दिवसरात्र पोहूनंही ते एकाच ठिकाणी असतात. तो गेल्यापासून तिला तिचं आयुष्य त्या माशांसारखं झालंय असं वाटतं असतं, कितीही काहीही झालं तरी ते पुढे जातंच नसतं, तो गेला त्या क्षणापाशी तिचं आयुष्य थांबून राहिल्यासारखं कॅलेंडरची पानं पलटून परत ती तिथेच जात राहते. ती संमोहित झाल्यासारखी नजरेनंच माशांच्या हालचाली टिपत टँकच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत डोळे फिरवत राहते.

तो खेळ थांबवून मग ती उठून देवघरात जाते. सकाळी तिने पूजा करून मांडलेले सगळे देव जसेच्या तसे त्याच जागेवर असतात. त्यांच्या पुढ्यातल्या छोट्या वाटीत नैवेद्यासाठी ठेवलेले साखर फुटाणे तेवढे नातवानं येताजाता लांबवलेले असतात. आता जे काय करायचं ते या लेकरांसाठीच असं काहीतरी पुटपुटत ती देव्हार्याखालची काडेपेटी, अगरबत्ती आणि तेलाची लोटी काढते. दिव्याची वात वर ओढत तेलानं दिवा भरून वात पेटवते. तेवता दिवा चेहर्याच्या जवळ अगदी जवळ आणते, चेहर्याच्या आरपार डोळ्यातल्या पाण्यापलिकडे त्या देवाला दिसेल अशी एक वेड़ी आशा असते मनात. दिवा, अगरबत्ती लावून यांत्रिकपणे ती जागेवर ठेवते तेव्हा देव्हार्यातल्या एकातरी देवाला हाताला धरून बाहेर काढून समोर उभं करावं नि दोन्ही खांद्यांना धरून गदागदा हलवत त्याला विचारावं की किती दिवस असा निर्जीव असल्याचा आव आणणारेस, किती दिवस मुक्यानंच बघत राहणारेस, किती दिवस तू निर्गुण निराकार आहेस म्हणून मी स्वतःचं खोटं समाधान करुन घ्यायचं, किती दिवस जळी स्थळी काष्टी पाषाणी, चराचरात तूच आहेस म्हणत राहायचं मी? अजून किती दिवस माझ्या देवाशिवाय जगायचं मी? मोजून किती लिहिलेस श्वास माझ्या नशिबात? असं ओरडून ओरडून विचारावंसं वाटतं. ती तशीच बसून राहते बराच वेळ.

माहितीये तुला भरल्या घरातलं रितेपण काय असतं, आपल्या माणसातलं एकटेपण काय असतं? कसं वाटतं मध्यातंच हात सुटल्यावर अन पुढे एकट्यानंच नेमका किती रस्ता चालायचाय हे माहितीही नसल्यावर. आयुष्यभर कष्ट उपसताना जगायला जमलेल्या माणसाचं चांगले दिवस आल्यावर मनसोक्त जगण्याआधी आयुष्यच संपून जातं तेव्हा मागे राहणार्या साथीदाराची हतबलता, असहायता काय असते कळेल तुला कधी? मेलंय तुझ्या जवळचं कधी कोणी, झालीये कधी संपणारी ताटातूट? कसं कळेल मग तुला? विचारू नकोस कोणाला चुकलंय हे? किमान तुला तरी जन्म मरणाचा फेरा नाही म्हणे ना? खोटं खोटं सांत्वन तर नकोच आता, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. देव्हार्यास्मोर बसून या सगळ्या उद्वेगाला मनातल्या मनात वाट करू देत असताना वार्याच्या झुळुकेवर फडफडणारा दिवा पाहून ती भानावर येते आणि सवयीनंच दोन्ही हाताची ओंजळ दिव्याभोवती धरते. लख्ख उजळलेल्या ओंजळीत तिला परत तो दिसतो. ती देव्हार्याकड़े बघते अजूनंही सगळे देव निर्विकार चेहर्याने जागच्याजागी बसलेले असतात. ती सवयीनं डोकं टेकवून जागची उठते. घड्याळाचे काटे खाऊन खाऊन पोट टच्च करून सुस्तावलेल्या अजगरासारखे हळूहळू पुढे सरकत असतात. तीही पायाला मणामणाचं ओझं बांधल्यागत देव्हार्यापासून दूर जाते

तिथून निघताना त्याच्या वॉर्डरोबचा दरवाजा उघडून आत व्यवस्थित घड्या करून एकावर एक रचलेले कपडे बघते. त्यानं दवाखान्यात जाण्याआधी म्हणजे चालता फिरता असताना शेवटचा घातलेला शर्ट दिसतो तिला. हास्पिटलचे कपडे अंगावर चढवण्याआधी काढून लेकाच्या हातात देत धुवायला टाक घरी जाऊन सांगितलेलं असतं त्याने. च्यायला हे हॉस्पिटलचे कपडे घालायलाच पाहिजे का म्हणत वैतागलेला तो आठवतो तिला. कपाटातला तो शेवटी घातलेला शर्ट ती बाहेर काढते. जणू तो त्या शर्टमध्ये असल्यागत मायेनं त्यावरून हात फिरवते, शर्ट स्वतःच्या अंगावर टाकून घट्ट मिठी मारते. आता तिला हुंदका आवरत नाही. इतकावेळ प्राणपणाने दाबून ठेवलेलं बाहेर पडतं. ती मोठ्यानं हंबरडा फोडते. कामावरून नुकताच येत घरात पाऊल टाकलेला लेक, तिचा आवाज ऐकून आल्यापावली तिच्या शेजारी जाऊन बसतो. डोक्यावरून हात फिरवत तिला कवेत घेतो, मनसोक्त रडू देतो. लेकाच्या मिठीतून बाहेर येता म्हणते ती, "कडक इस्त्री केल्याशिवाय कपडे घालत नव्हते रे कधीच, रूमाल सुद्धा इस्त्री करून खिशात ठेवायचा माझा राजा. हॉस्पिटलच्या कपड्यावर जीव गेला, ना आंघोळ घातली ना कपड़े बदलले, हॉस्पिटलच्या चादरीत गुंडाळून नावाला पायावर दोन तांबे पाणी ओतून माती केली रे आपण"... पुढे एकंही शब्द बोलता लेकाच्या मिठीत स्फुंदत रहते ती. लेक बाजूला होत तिचे डोळे पुसतो परत एकदा डोक्यावरून हात फिरवतो. ती आसवांना बांध घालत डोळे कोरडे करते, पण ते ओसरणं नसतं, आतल्या आत परत साठत राहतं, कधीही बांध फोडून आवरण्या पलिकडे पूर येऊ शकेल अशा नदीसारखे तिचे डोळे दिसत राहतात. ती सोंबरलेल्या डोळ्याने आणि जडावलेल्या डोक्याने परत एकदा खिडकीत येऊन बसते.

थोड्यावेळाने जेवताना कोरड्याठाक घशातून एकेक घास खाली ढकलणं कठीण होत जातं. प्रत्येक घासाला तोटरा बसू लागतो मग ती पाण्याच्या घोटासोबत दोनचार घास पोटात ढकलते आणि निर्विकार चेहर्याने नजर शून्यात रोखून बसते. जसजशी रात्र चढत जाते तसतसा आजूबाजूच्या आंधारापेक्षा तिच्यात अंतर्बाह्य आंधार साठून राहतो. डोळे बाहेरच्या अंधाराला सरावतात पण आतल्या आंधारात तिचं मन चाचपडंत आठवणींशी झगडत राहतं. तिला तो आंधार बाकी कशाहीपेक्षा शाश्वत वाटत राहतो. वाटतं या काळोखाच्या डोहात देहाची नाव सोडून द्यावी आणि परतून येऊच नये, डोहाच्या माधोमध गेल्यावर नाव सोडून उडी मारावी आणि खोल खोल जात तळ गाठावा आयुष्याचा. वर आलाच तर फक्त देह यावा, आपण बुडून जावं कायमचं. आजंच व्हावं हे, अगदी आत्ताच... नको बघायला उद्याचा सूर्य, नको परत ते दुष्टचक्र. काळोखाच्या गर्भातून खोल खोल तळाशी पोहोचल्यावर कदाचित दिसेल आपल्याला वाट, जी त्याच्यापाशी घेऊन जाईल परत. तो परत दिसल्यावरंच उजळून जावं अस्तित्व. अंथरूणावर पडल्या पडल्या घरभर नजर फिरवते ती, तिला ते तिचं घर वाटतंच नाही. भिंतीवर टांगलेल्या घड्याळाची टिकटिक थांबलेली असते, तासनतास घड्याळ एकंच वेळ दाखवत राहत. जहाल विषासारखी रात्र क्षणोक्षण तिच्यात भिनत राहते. एकामागून एक आठवणींचे कढ येत राहतात, बांध फुटतो, ती आसवं थोपवत नाही, अश्वत्थ जखमेसारखी डोळ्यातून आसवं भळभळत राहतात. आठवणींचा शीणवटा तिला पेलण्यापालिकडे असतो. ती जडावलेल्या पापण्यांनी आणि शीणलेल्या मेंदूने स्वतःला झोपेच्या स्वाधीन करून टाकते तेव्हा रात्रीचा प्रवास वेगानं दिवसाच्या दिशेने चालू झालेला असतो. आठवणीत स्वतःला अशी गुरफटून झोपते ती की उगवणाऱ्या दिवसाचा उजेड तिच्यापर्यंत पोहोचतंच नाही.

नाईलाजाने डोळे उघडते तोवर उजाडलेलं असतं, तिच्या नव्या दिवसावर सूर्य एकाकीपणाची किरणं फेकत असतो. घरातला एकेकजण आवरायला सुरुवात करतो, प्रत्येकजण पुढे पुढे चालायचा प्रयत्न करत असतो अन तेव्हाच तिचं मन पायाला चाकं लावल्यासारखं वेगानं भूतकाळाकडे निघालेलं असतं. तिला पुढे जाण्यात स्वारस्य नसतं, मनाच्या कोपर्यात कुठेतरी तिचं आठवणींचं गाव असतं, त्या गावत मधोमध त्या दोघांचं घर असतं. मिटल्या डोळ्यांना ते दोघे त्याच घरात एकत्र दिसत असतात. ते एकत्र असतात तिथे लख्ख उजेड असतो. घराचा कानाकोपरा त्याच्या अस्तित्वानं उजळून गेलेला असतो. तेवढं एक ठिकाण सोडलं तर तिच्या उघड्या डोळ्यांना मात्र सर्वदूर भेदता येणारा काळोख पसरलेला दिसतो. ती रहावून डोळे मिटून घेते परत आणि खांद्यावर डोकं टेकवून निश्चिंत बसून राहते. सायबा मला एकटीला सोडून जाऊ नका हा म्हणते तेव्हा उत्तरादाखल तो फक्त हसतो. ती डोळे उघडते, श्वासांची माळ तुटत नाही जगण्याशी जुळलेली नाळ सुटत नाही, डोळे बंद करून बसावसं वाटतं... बंद डोळ्यांना आठवणींशिवाय काहीही दिसत नाही. उघड्या डोळ्यांनी कुठेही बघवत नाही... राहतं घर स्वतःच वाटत नाही कारण तो घरात नसतो. एकट्यानं उपसण्यासाठी कालसारखाच दिवस समोर वासून अस्तव्यस्त पडलेला असतो.

तिच्या पुढ्यात ठेवलेला चहाचा कप गार होत आलेला असतो. तो गेल्यापासून चहासोबत बिस्किट खाणारी ती रोज बिस्किटं सोबत घेऊन बसते. खिडकी उघडून एक बिस्किट हातात धरते धरते तोवर समोरच्या फांदीवर बसलेला कावळा खिडकीच्या गजावर येऊन बसत तिच्या हातातलं बिस्किट चोचीत घेऊन उडून जातो. रोज एकच बिस्किट घेतो परत येत नाही. ती एकट्यानं चहा पिण्याचा सोपस्कार पार पाडते आणि नाईलाजानं उठून दिवसातला एकेक क्षण वेचत राहते, तळहातावरची आयुषयरेषा कणकण तुटत राहते. थेंब थेंब करून तिच्यातला काळोख सभोवताली गळत राहतो, ती आठवणींची काजळी अविरत आयुष्यावर सारवत राहते. घर मोठया जबड्याचा आकार घेत राहतं, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र होत राहते. तिच्या आयुष्याच्या बळकट दोरीमध्येच मान अडकवून तिचा श्वास गुदमरत राहतो. असह्य एकटेपण वागवत काळजात आठवणींची माळ गुंफत पाय खुरडत का असेना पण एक ना एक वाट त्याच्याकडे घेऊन जाईल आपल्याला या एका आशेनं ती चालत राहते... ती एकाकी चालत राहते

केपी आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...