मस्तं डोंगराच्या कुशीत वसलेलं
टुमदार गाव, त्यात लुटेरा सिनेमातल्या सोनाक्षीच्या घरासारखं एक घर, आजूबाजूला जिथे
नजर जाईल तिथे हिरवळ. गाड्या यंत्रं अगदी नगण्यच. येणार्या जाणार्या लोकांची उगाचच
कसलीही लगबग नाही. रस्त्यावर खेळणारी लहान मुलं, एकमेकांशी निवांत गप्पा मारणारे गावकरी,
थोड्या वेळापूर्वी झालेल्या पावसानं स्वच्छ झालेले रस्ते, पावसाचे थेंब हिर्यासारखे
अंगावर मिरवणारी झाडांची पानं फुलं आणि वीजेच्या तारा, आपली जागा सोडून जमिनीवर इतक्या
खाली उतरलेले ढग की कळूच नये कोणाला जमिन कुठे संपतेय आणि ढग कुठे सुरू होताएत.
नुकत्याच झालेल्या पावसाने
थंड झालेली हवा दीर्घ श्वास घेऊन छातीत भरून घेत मी सगळी बैठी घरांची रांग पार करत
करत त्या लुटेरामधल्या घरासारख्या घरापाशी येऊन थांबलो. आत जाऊन हॉलमधे शेकोटीसाठी
राखून ठेवलेल्या एका कोपर्यात मस्तं शेकोटी पेटवून आराम खुर्चीत जाऊन बसलो. खुर्चीच्या
पलिकडची एक मोठी खिडकी, खिडकीच्या गजावरंही ओघळणारे पावसाचे थेंब आणि बाहेर परत चालू
झालेला पाऊस तल्लीन होऊन बघत बसलो. पावसाच्या लयीशी आणि संगीताशी एवढा एकरूप झालो की
किती वेळ गेला काही कळलं नाही, हातात घड्याळ घातलंच नव्हतं आणि हॉलमधल्या घड्याळाकडे
बघण्याची इच्छाही झाली नाही. तसाच उठून बाजूच्या टेबलापाशी गेलो त्यावर लेदरच्या फोल्डरमध्ये
नीट कोरे कागद ठेवलेले होते, वर एक छानसं फाउंटेन पेन डकवलं होतं ते काढून बाजूच्या
टेबल लॅम्पचं बटन चालू करून लिहायला बसलो. भरपूर भरून आल्यावर कसलेही प्रयत्न न करता
आपसूकंच पावसाला सुरुवात व्हावी आणि संततधार पाऊस पडत रहावा तसंच कसलेही प्रयत्न न
करता सुचत गेलं, तसाच लिहीत राहिलो मानपाठ एक होईपर्यंत. थोड्या वेळापूर्वी पेटवलेल्या
शेकोटीमुळे पूर्ण हॉल ऊबदार वाटत होता.
पेनाचं टोपण लावून फोल्डरवर
परत डकवून जरासा मागे सरकत मी हात आणि पाठ स्ट्रेच करत मनसोक्त आळोखेपिळोखे देत आळस
दिला. दोनएक मिनिट तसाच खुर्चीत रेलून बसलो आणि मग हॉलमधल्या वूडन फ्लोरिंगवरून चालत
चालत स्वैपाकखोलीत गेलो. तिथे कुकरमध्ये ठेवलेलं गरमागरम चिकन सूप बाउलमध्ये ओतून घेतलं
बाकी जेवण वाढून घेऊन परत हॉलमध्ये येऊन बसलो. जेवून पाणी प्यायल्यावर शेकोटीने ऊबदार
झालेल्या घरातंही गाऽऽऽर वाटू लागलं होतं. जुन्या वर्तमानपत्राने शेकोटीला फुलवून थोडे
हातपाय शेकून मी आरामख़ुर्चीत अरुणा ढेरेंच कृष्णकिनारा घेऊन बसलो, हे पुस्तक वाचण्याची
माझी ही कितवी वेळ हे माझं मलाही आता आठवत नाही. वाचता वाचता कधी झोपी गेलो ते कळलंच
नाही.
जाग आली तेव्हा खिडकीच्या
काचेवर धुकं जमलं होतं, आजूबाजूला अंधार झाला होता. मी तळहाताने धुकं पुसत काचेपल्याड
पाहिलं पाऊस थांबला होता, गावात सर्वदूर दिवे लागले होते. पलीकडच्या डोंगरावर तुरळक
येजा करणार्या गाड्यांचे lights चमकत होते. मी अजूनही घड्याळ बघितलं नाही. उठून मोठा
मग भरून कॉफी करून घेऊन मी घराच्या मागच्या बाजूच्या झोपाळ्यावर जाऊन बसलो. छप्परावरून
पाण्याचे एकेक करून थेंब खाली साठलेल्या पाण्यात पडत होते, त्यांचा पडण्याचा वेग हळूहळू
कमी होत होता. मी संपलेल्या कॉफ़ीचा मग तसाच हातात ठेऊन कितीतरी वेळ तो खेळ तसाच बघत
राहिलो. घड्याळाच्या काट़यांशी ब्रेकअप झाल्यासारखा मी सकाळपासून एकदाही वेळेची पर्वा
केली नव्हती. तिथे बसल्या बसल्या डुलकी लागणार एवढ्यात माझ्या मोबाईलमधला गजर वाजला,
मी डोळे किलकिले करून बघितलं सकाळचे साडेपाच झाले होते. मनाविरुद्ध का असेना या गोड
स्वप्नातून बाहेर येत आवरण्याशिवाय पर्याय नव्हता. स्वप्नाच्या दुनियेसारखं सत्यात
घड्याळाशी ब्रेकअप झालं नव्हतं. पार्किंगमधून गाडी काढताना पावसाला सुरुवात झाली होती
आणि मनात स्वप्नातल्या एक उनाड दिवसाची उजळणी करत मी ऑफिसला जाण्यासाठी गाडी पिटाळत
होतो.

No comments:
Post a Comment