हे गाणं मला जाम नाॅस्टॅल्जिक
करतं. कधीही कानावर पडलं तर मला ना कंगना डोळ्यांसमोर येते ना इम्रान, माझ्या आजूबाजूला
मस्तं बर्फाचे डोंगर असल्याचा फील येतो. एप्रिल २००६ मध्ये मी हे गाणं सगळ्यात पहिल्यांदा
ऐकलं. आम्ही शिमलाकुलुमनाली ट्रीपला गेलो होतो केसरीच्या पॅकेज टूरमधून. शिमल्याचा
मुक्काम संपवून आम्ही मनालीकडे निघालो होतो. एव्हाना टूरमधल्या बऱ्यापैकी सर्वांशीच
ओळख झाली होती. बराचवेळ बसमध्ये धुमाकुळ घालून सगळे दमले होते. मी बसल्या बसल्या मला
हस्तरेषा कळतात अशी पुडी सोडायचा अवकाश जोतो आपापला हात माझ्या पुढे करु लागला. मी
अगदीच ढोबळ काहीतरी सांगत होतो एकेकाला. बराचवेळ चालत्या गाडीत खाली बघितलं, मोबाईलमध्ये
वगैरे किंवा हार्डकाॅपीवालं काही वाचलं की मला गरगरायला लागतं त्यानंतरही थांबलो नाही
तर मळमळायला सुरुवात होते. तशी तेव्हाही झाली मग मी सगळी नाटकं बंद करुन डोळे मिटून
पडून राहीलो काहीवेळ. थोड्यावेळाने बसमध्ये एकेकाचा आश्चर्याने भरलेल्या आवाज ऐकू येऊ
लागला पण अजूनंही गरगरत असल्यामुळे मी डोळे झाकूनंच बसून राहीलो होतो. वाॅव, क्लास,
कसलं सुंदर आहे असे आवाज येत होते. मी डोळे उघडत नाही हे बघून माझी एक मैत्रिण म्हणाली
काय बोअरिंग लोक आहेत, एवढा सुंदर सीन बघायलाही डोळे उघडत नाहीत, भाऊंनीही आवाज दिला.
मी डोळे जरा किलकिले करत मान डावीकडे हलकीशी वळवून खिडकीतून बाहेर बघितलं आणि समोर
दिसणारं दृश्य बघून चक्करबिक्कर पार विसरुन गेलो. आम्ही ज्या रस्त्याने चाललो होतो
त्याच्या दुतर्फा बर्फाच्छादीत डोंगर होते... ॲब्सोल्युटली हेवन! आणि मी ते बघण्यात
गुंग असताना बसमध्ये गाणं लागलं “तू ही मेरी शब है सुबह है” या गाण्ं पहिल्यांदा ऐकल्याची
एवढी सुंदर आठवण आहे की मी कधीच विसरु शकत नाही. त्यानंतर या गाण्याची ट्रीपमध्ये पारायणं
झाली. मनालीतंच किती वेळा ऐकलं त्याला काही मोजमापंच नाही. एकतर आईभाऊंसोबत केलेली
शेवटची मोठी ट्रीप म्हणून ती विशेष खास आहे.
पुण्यात आल्यावर त्या वर्षीच्या
पावसात आमच्या झेनमधून फिरताना हे गाणं वेड्यासारखं लूपवर ऐकलं. तूही मेरी शब है म्हटलं
की मला मनालीचा बर्फ आणि पुण्याचा तेव्हाचा पाऊस आठवतो. मी आणि माझा मित्र अभ्या दोघेही
मोठमोठ्यानं गाणं म्हणत आमच्या झेनमधून, त्याच्या स्काॅर्पियोमधून आणि त्याच्या पल्सरवरुन
खूप खूप हिंडलोय २००६ च्या पावसात. नितांत सुंदर दिवस होते ते. कमवण्याची चिंता, करीयरची
काळजी वगैरे काहीही नव्हतं. वेगळ्याच विश्वात होतो. त्यावेळी काॅलर ट्युन ठेवण्याचं
जाम फॅड होतं. हे गाणं मी किमान दोन-तीन वर्ष काॅलरट्युनला ठेवलं होतं माझ्या.
आजंही हे माझ्या प्लेलिस्टमध्ये
फेवरेट्समधे आहे गाणं... कायम राहील.
This song makes me
nostalgic like anything
कुठेही कधीही ऐकलं तर १००%
त्या काळात नेतं... मनालीचा बर्फ आणि पुण्याचा पाऊस आणि तो पाऊस एंजाॅय करायला खूप
सारा मोकळा वेळ!
तू ही मेरी शब है इज लव्ह

No comments:
Post a Comment