माझ्या भाच्याचा जन्म
२००२ साली झाला. तोपर्यंत आमच्याकडे कोणीही इंग्रजी माध्यमात शिकलं नव्हतं.
इंग्रजी माध्यमात न शिकल्याने माणूस भयंकर मागास होतो किंवा माणसाची फार मोठी
पिछेहाट होते, प्रगति करायची असेल तर इंग्रजी माध्यमाशिवय पर्याय नाही, इंग्रजी
माध्यमात शिकण्याशिवाय गत्यंतर नाहीच नाही अशी त्यावेळी माझी ठाम समजूत झालेली
होती. मी माझ्या ताईला उठताबसता सांगायचो की तुझ्या लेकाला आपण इंग्लिश
मिडियममध्येच टाकायचं. फाडफाड इंग्रजी बोलता येणं किंवा फर्डा इंग्रजी वक्ता असणं
म्हणजे विद्वत्तेचे लक्षण असं काहीसं चुकीचं समीकरण डोक्यात फिट्ट बसलेलं होतं.
अर्थात या समीकरणाला छेद जायला फार काळ जावा लागला नाही. इंग्रजी माध्यमाचा
बागुलबुवा आपणंच उभा केलाय हे त्यांनंतर झपाट्याने कळत गेलं.
मूळात इंग्रजी मध्यमाबद्दल
अकर्षण वाटणं आणि वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे मराठी माध्यमाचा सातत्याने घसरत
चाललेला दर्जा आणि मराठी शाळा वाचवण्याबद्दल आजवरच्या सगळ्या सरकारांनी दाखवलेली अनास्था.
मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत माझ्या लेकाला पाठवायचा विचार मी आज चुकुनही करू शकत
नाही. शिक्षणाचा दर्जा, संगत, सर्वसाधारण विकास या कोणत्याच पातळीवर माझी शाळा आजच्या
काळात एक चांगला पर्याय होऊच शकत नाही. जगात काय चाललंय, पुढे जाऊन निवडण्यासाठी सायन्स
आर्ट्स कॉमर्स याव्यतिरिक्त कोणते पर्याय असतात, आपल्याला नेमकं काय आवडतं हे सगळं
सहज सोप्या पद्धतीने दाखवणारी, शिकवणारी शाळा हवी की काळाच्या मागे राहून फक्त हजेरीपटावर
पोरांची नावं चिकटवून दरवर्षी पोरांचं निकृष्ट का असेना उत्पादन करणारी शाळा हवी? या
तुलनेत इंग्रजी शाळा बर्यापैकी कालसुसंगत म्हणाव्या अशा वाढत राहिल्या, त्यामागे अर्थकारण
हाही एक मुद्दा असू शकतो पण त्याच्याशी सर्वसामान्य पालकाला काही घेणंदेणं नाही किंवा
त्यावर विचार करायला वेळही नाही. आजचं युग हे स्पर्धेचं युग आहे असं एक पुस्तकी वाक्य
आपण सतत वापरत असतो, ऐकत असतो आजकाल आणि ती स्पर्धा निकोप नक्कीच नाहिये. तर या अशा
गळेकापू स्पर्धेत आपल्या पाल्याला किती खोलवर उतरवायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न
आहे पण एकूणतंच या जीवघेण्या स्पर्धेत टिकण्यासाठी आम्ही तुमच्या पाल्याला तयार करू
शकतो ही प्रतिमा आपल्याच सहाय्याने तयार करायला इंग्रजी माध्यमाच्या शाळा पूर्णपणे
यशस्वी झालेल्या आहेत.
आपण पाल्याला सगळं देतोय आता
त्याने स्पर्धेत उडी मारुन कुठेही कमी पडूच नये असं माझ्याही कित्येक मित्रांना वाटतं.
महागड्या इंग्रजी शाळेत घालणं, ट्युशंस लावणं याव्यतिरीक्त पोरं काहीही झालं तरी ऑलराउंडरंच
व्हायला हवी या अट्टहासापायी अजून वेगवेगळ्या क्लासेस, ग्राऊंडला पोरांना चिकटवणे,
खेळायला आयपॅड देणे हे म्हणजे अत्युत्तम पालक होण्याचा सगळ्यात सोपा मार्ग वाटतो अनेकांना.
खूप भारी म्हणून नावाजलेल्या (ती खिशाला परवडली नाही तरी चालतंय) शाळेत पोरांना घातलं
एकदाचं की दहा वर्षात वर्ल्ड क्लास प्राॅडक्ट तयार होणारंच याची शाश्वती वाटते, एकदा
“अशा” शाळेत येनकेनप्रकारेण प्रवेश मिळाला की आपली जबाबदारी संपली म्हणत सुटकेचा नि:श्वास
टाकला जातो. आजकाल काॅम्पिटिशन टाळताच येत नाही, माझ्या मुलांना हे प्रेशर घेयची सवय
करावीच लागेल असं सर्रास बोलतात माझ्या वयाचे पालक आजकाल. आपल्या ईच्छा, आपली अवाजवी
स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आणि आपली आपल्या मित्रमंडळींसोबत व समाजासोबत असलेली काॅम्पिटीशन
जिंकण्यासाठी पोरांना मैदानात उतरवायचं. पालकांना कळायला हवंय शाळा, मार्क, स्पर्धा
यापलिकडे त्या लेकरांना आयुष्य आहे, त्यांचं बालपण त्यांची निरागसता जपायला हवी, त्यांना
मनमोकळं जगू द्यायला हवंय, त्यांना त्यांची स्वप्न निवडू द्यायला हवीयेत. फायनांशियल
मार्केटमधल्या कमोडीटीसारखं त्यांना वागवयचं मग ते अलिप्त राहतात म्हणून बोंब मारायची
याला काय अर्थय? मुलांशी भावनिक जवळीक हवी ना, नुसतंच आम्ही सगळं पुरवतो त्यांना असं
म्हटल्याने काय साध्य होणारे? मुलांना भावी आयुष्यात सामोऱ्या जावं लागणार्या प्रत्येक
आव्हानाला शाळा ही एकमेव "one stop solution" आहे असं वाटतं आजकालच्या अनेक
पालकांना. मूल घडण्यात शाळा आणि पालकांचा समसमान वाटा असायला हवा, या प्रक्रियेत आपला
सहभागंही तितकाच महत्वाचा आहे हे कळत का नाहिये पालकांना याचं राहून राहून आश्चर्य
वाटतं मला.
माझ्या मुलाने छान शिकावं,
शाळेचा, शिक्षणाचा मनापासून आनंद घ्यावा, आपलं शालेयजीवन एन्जॉय करावं, लहानपण मनसोक्त
जगावं, स्पर्धा असली तरी ती निकोप असावी, एकमेकांना सहकार्य करायला शिकावं , आपण समाजाचं
देणं लागतो हे मनावर ठसावं, आपल्या मुलाला काय विचार करायचा याचं स्पून फीडिंग न करता
विचार कसा करावा, विचारांती निर्णय कसे घ्यावे, आपल्या निर्णयाची जबाबदारी आपण स्वतः
घ्यावी या गोष्टी शिकवण्याचा कोणीही विचार करताना दिसत नाही. काही अपवाद असतीलंही पण
बहुसंख्य पालक याबद्दल बिल्कुल विचार करत नाहीत. आजकाल प्रत्येकाला पोरांना परीक्षेसाठी
तयार करायचंय, परीक्षा नीट देता आली पाहिजे, पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे, गुणवत्ता
यादीत नाव झळकलं पाहिजे. अमुकच्या तुलनेत माझं लेकरू पुढे पाहिजे, कायम टॉपला पाहिजे,
अपयश वगैरे त्याला स्वप्नातंही दिसलं नाही पाहिजे. कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन कॉम्पिटिशन
हे सतत कानीकपाळी ओरडून पोरांना त्या स्पर्धेच्या आवाजवी ओझ्याखाली इतकं दाबलं जातंय
की त्यांच्यात आणि घाण्याला जुंपलेल्या बैलात काही फरक राहिलेला नाहिये.
यश ही खूप फसवी संकल्पना आहे
किंवा प्रत्येक व्यक्तिनुसार ती संकल्पना बदलत राहते. कोणाशीतरी तुलना करून त्यांच्यापेक्षा
सरस होऊनंच यशस्वी होता येतं असं मला आजिबात वाटत नाही. माझ्या मुलाने हसतखेळत शिकावं,
त्याचं बालपण भरभरून जगावं, एकूणात शाळा या प्रकाराचा कसलाही दबाव घेऊ नये, शाळा बुडवण्यासाठी
नानाविध कारणं सांगण्याऐवजी शाळेबद्दल आणि पर्यायाने जे शिकतोय त्याबद्दल त्याच्या
मनात आवड निर्माण व्हावी असं मला मनापासून वाटतं. याऊपर माझ्या लेकराला शाळेनं लहान
मुलासारखं वागवावं, गळेकापू स्पर्धेत जीवच्या आकांतानं धावून पहिला नंबर मिळवण्याची
धडपड करणार्या रोबोटच्या भाऊगर्दीतला अजून एक रोबोट बनवू नये असं मनापासून वाटतं.
याव्यतिरिक्त एकदा शाळेत प्रवेश
घेतला की मी मोकळा असा विचार करण्यापेक्षा शाळेसोबत पालकांनीही पाल्याच्या जडणघडणीत
सहभागी असायला हवं असं मी मानतो. इंग्रजी महत्वाची तर आहेच पण इंग्रजीच फक्त महत्वाची
आहे असं वाटत नाही. त्यामुळे एक भाषा म्हणून इंग्रजीचा अभ्यास माझ्या लेकाने १००% करायलाच
हवा, इंग्रजी साहित्याची ओळख हवी, ही भाषा किती समृद्ध आहे हे शिकावं नुसताच फाडफाड
इंग्रजी बोलणारा होऊ नये तर त्याचं इंग्रजी उत्तम असावं असं वाटतं. राहिला प्रश्न माध्यमाचा
तर आपल्या परिसर भाषेमध्ये मुलांना आकलन चांगल्या पद्धतीनं होतं, परिसर भाषा ही मूळातच
अवगत असल्याने भाषा शिकून मग त्या भाषेत बाकीचे विषय शिकणे या दोन पातळ्यांवर मुलांना
झगडावं लागत नाही शिवाय शाळा व अभ्यासाव्यतिरीक्तंही आयुष्य भरभरुन जगता येऊ शकतं.
परिसर भाषेतून शिकल्यानं मुलांचा पाया पक्का होतो आणि आजकालच्या इंग्रजी माध्यमाच्या
शाळांनी शिक्षणाच्या नावाखाली लहान मुलांचा आणि सोबत पालकांचा चालवलेला छळ हे सर्व
बघता माझ्या मुलाला मराठी माध्यमाच्या शाळेतच प्रवेश घेयचा ही मी मला मूल होयच्या आधीपासून
ठरवलं होतं. मुलांना परीक्षार्थी बनवून गुणवत्ता यादी, टक्केवारीच्या दुष्टचक्रात अडकवून
त्यांच्या मनात स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण करायचे प्रकार करण्यापेक्षा ते ज्ञानार्थी
व्हावे, एकमेकांशी अवाजवी स्पर्धा करण्यापेक्षा एकत्रित शिकावं, निरनिराळी कौशल्य शिकावी
आणि सगळ्यात माहत्वाचं म्हणजे ही सगळी प्रक्रिया मनापासून एंजॉय करावी असं माझं ठाम
मत आहे म्हणून मी माझ्या लेकाला अक्षरनंदन मराठी शाळेत प्रवेश घेतलाय.
मराठी माध्यमाची निवड करणं
वाटतं तितकं सोपं निश्चितंच नव्हतं, मित्रमंडळी, नातेवाईक सगळ्यांचा दबाव होता. . माझ्या
मुलाला मराठी शाळेत प्रवेश घेयचं ठरवतोय हे कळल्यापासून माझ्या आजूबाजुचे सगळे जणू
मी दोनचार खून केल्यासारखे माझ्याकडे बघत असायचे. मराऽऽठीऽऽ.... वेडाएस का म्हणून मराठी
हा शब्द म्हणताना शब्दशः किंचाळत होते. हा सगळा दबाव, इंग्रजी माध्यमाची चमकधमक सगळं
दुर्लक्षून तथाकथिक स्पर्धेचं युग आणि आपणंच उभा केलेला माध्यमाचा बागुलबुवा वगैरे
गोष्टींचा अवास्तव दबाव झुगारून हा निर्णय घेऊ शकलो कारण सगळं शिक्षण इंग्रजी माध्यमात
झालेल्या माझ्या बायकोने हा विचार उचलून धरला, माझ्या आईबापाने बहिणींनी मला प्रोत्साहन
दिलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अक्षरनंदनसारखी शाळा मिळाली.
No comments:
Post a Comment