Saturday, September 21, 2013

आत्महत्या होती का खून


गेल्या काही दिवसात शनिवार वाड्याच्या दारात गर्दी वाढू लागली होती. एरव्ही गर्दी नसते असं नाही पण गेल्या काही दिवसांपासून एका ठराविक ठिकाणीच गर्दी जमू लागली होती. आषाढातल्या मुसळधार आणि अनिर्बंध कोसळण्यानंतर पाऊस निसर्गनियमाला जागला होता, श्रावण यावर्षी खरोखरंच श्रावण वाटत होता. अन श्रावणाच्या शेवटच्या आठवड्यात तर दिवसभर कडक ऊन असायचं. पण अशा ऊनातंही लोकांची गर्दी कमी होईना म्हणून एक दिवस जाऊन पाहूच या उद्देशानं काल मुद्दामंच तिकडे गेलो. गर्दीला दोन्ही हातांनी बाजूला सारत स्वतःसाठी जागा करत करत पुढे गेलो. ए धक्का देऊ नको, च्यायला आम्ही काय मुक्कामाला ईथे आलोय काय? फुकट मिळालं की सगळ्यात पुढे. असे काही ना काही पुणेरी टोमणे ऐकत पुढच्या रांगेत पोहोचलो. वर्तुळाकार गर्दी केलेल्या लोकांच्या मधोमध एक मध्यमवयीन ईसम मान खाली घालून बसला होता. डोक्यावरचे केस काढून शेंडी ठेवलेली, कानात भिकबाळी, अंगावर धोतर सदरा अन उपरणं. मुंबई पुण्यातून ईतिहासजमा झालेला पेहराव बघून ऊत्सुकता थोडी वाढली पण क्षणातंच डोक्यात विचार आला की च्यायला काय वेडेपणा आहे, कोणीतरी एक अपरिचित व्यक्ती ऐतिहासिक पेहेराव अन वेशभूषा करुन शनिवारवाड्यापाशी येऊन बसतो आणि आपण बघायला गर्दी करतो. आपल्यासारखे सुशिक्षित लोकही असा वेडगळपणा करतातंच. आता या अपिरिचिताचा बुवा होयला वेळ लागणार नाही आता हा चार शब्द बोलेल, विवंचना दूर करण्यासाठी सल्ले देईल, हातचलाखी करुन एखादी जादू दाखवेल आणि लोक याच्या पायावर डोकं ठेवतील जयजयकार करतील असा विचार करत असतानाच गर्दितले कौतुकाचे शब्द ऐकून भानावर आलो. साला क्या जादू आहे, पलक झपकते काम करता है. बघितलंस का? कमाल...आईच्चा एकंच नंबर.. आपसूकंच मान परत त्याच्याकडे वळाली, पहातो तर काय पठ्ठ्याने बघता बघता शेजारी पडलेल्या मातीच्या गोळ्यातून गणपतीची मूर्ती बनवली होती. सराईतपणे मूर्तीला फिनिशींग टच देत त्याने खांद्यावरच्या उपरण्याने कपाळावरचा घाम पुसला. त्याची कलाकारी पाहून अवाक झालेल्या एकाने त्याच्यासमोर टाकण्यासाठी खिशातून चिल्लर काढली तसा त्याचा हात दाबत त्याचा मित्र त्याला म्हणाला थांब, येडा आहे हा... आवडत नाय त्याला असं पैसे फेकलेलं. मागच्या आठवड्यापासून बघतोय पैसे टाकले कोणी कि बिथरतो तो, हा पण बाकी कुणाशी काय बोलत नाय़ हा. गर्दीतून माहिती कानावर पडताच मी ही खिशात घातलेला हात बाहेर काढला अन माझ्यासारखंच गर्दीत नव्यान दाखल झालेल्या बाकिच्या बघ्यांनीही. गर्दी पांगू लागली, पुण्यात गुणी कलाकारांची कमी होती अशातला भाग नाही पण साला याची जादूच वेगळी होती. कसल्याच प्रकारचा साचा न वापरता एकदा मान खाली घातली कि मूर्ती पूर्ण झाल्यावरंच वर बघायचा तो, तसंच आत्ताही पाहीलं. मूर्ती बनवल्याचं समाधान त्याच्या चेहेऱ्यावर स्पष्ट दिसत होतं. लोक आपल्या कामाला निघून गेले पण मी तिथेच थांबलो. थोड्यावेळापूर्वीच या गर्दीला वेडा म्हणनारा मी आता मात्र भान हरपून त्या मूर्तीकडे बघत राहीलो. त्या कलंदर माणसाशी बोलावं असं वाटत होतं मनापासून पण कलाकार माणसं थोडी विचित्रंच असतात त्याला नाही आवडलं तर काय हा विचार मनात असतानाच त्यानं हातानं खूण करुन मला बोलावलं. ईस्त्रीचे कपडे ऑफिसची वेळ कशा कशाचाही विचार न करता मी जाऊन त्याच्या शेजारी बसलो. कसला विचार करतोस बाळा, लोक गेले सगळे तू ही जा, काम नाही तुला? कुठे विकता तुम्ही या मूर्ती? त्याच्या प्रश्नाचं ऊत्तर न देता मी त्याला प्रतिप्रश्न केला. मूर्ती? त्यानं प्रश्नार्थकंच विचारलं. म्हणजे, तुम्हाला जागा नसेल तर मी आमच्या मंडळाच्या मैदानावर जागा द्यायला लावतो आपण तिकडे तुमचा स्टॉल लाऊया, आजकाल साच्याशिवाय बनवलेल्या सुबक मूर्तींना खूप मागणी आहे. मी पटकन बोलून मोकळा झालो. मला आवडतं म्हणून मी मूर्ती बनवतो, विकायला नाही. हां... एखाद्याला आवडली तर तो घेऊन जातो जरा नाराजीनंच उत्तर दिलं त्यांनी. कमाल आहे आजच्या जमान्यात फक्त आवड म्हणून? आणि आवडली तर तशीच देऊन टाकता की? मी त्याच्याकडे बघत बोलायचा थांबलो. हं.. जमाना बदललाय हे खरं बघ, पण काय करु आम्हाला तेव्हापासूनंच आवड, वेड.. काहीही म्हण असं काहीबाही करायची, लोकं जमवायची… पण आता.. सोड जाऊ दे तुला ऊशिर होईल जायला जा तू म्हणत त्यानं माझ्याकडे पाठ केली. मला काही कळेना, तेव्हापासून म्हणजे नक्की केव्हापासून? लोकं जमवायची? एकदा म्हणतोय मूर्त्या करायला आवडतात एकदा म्हणतोय लोकं जमवायला आवडतं. आता याच्याशी बोलल्याशिवाय जायचं नाही, ऑफिसला दांडी मारायला लागली तरी चालेल असं ठरवून मी परत त्याच्यासमोर जाऊन बसलो. काय बोलत होता काका तुम्ही सांगा ना थोडासा हटवादीपणानं म्हणालो. तो दोन मिनिट स्तब्ध बसून राहिला मग कसंनुसं हसत म्हणाला राजा तू सांग कशी चालूये तयारी गणपतीची, मंडळ कुठय तुमचं आणि काय काय करता गणेशोत्सवात? तयारी जोरात चाललीये काका, मंडळ कुठय सांगण्यापेक्षा मी तुम्हाला घेऊनंच जाईन तिकडे आणि काय काय करतो म्हणाल तर आपला मांडव तगडा असतो एकदम, च्यायला सगळ्यात मोठा, आपली मूर्तीसुद्धा ऊंच आहे ना. यावर्षीचा देखावा करायला तर बॉलिवूडचा शिल्पकार बोलावलाय. सकाळ संध्याकाळ आरती होते, आपला गणपती लै फेमस आहे कमीत कमी ३-४ सेलिब्रेटी येतातंच आरतीला. एक दिवस स्थायी समिती अध्यक्षांच्या हस्ते पण आरती असते. अजून? त्याने मधेच प्रश्न विचारला. अजून, मिरवणूक तर बघायलाच पाहिजे तुम्ही आई शप्पथ आपल्या चौकातंच ३-४ तास लागतात, सहा सात पथकं असतात ढोल, ताशा, डि.जे. काय बोलाल ते असतं मी ऊत्साहाने बोलत होतो. अरे वाह, अजून काय करता? तो प्रश्न विचारायचा काही थांबेना. अजून, अं... अजून म्हणत मी विचार करु लागलो तसा तो हसला, म्हणाला बास एवढंच? मी वैतागून विचारलं एवढंच म्हणजे अजून काय पाहिजे तुम्हाला? तेच तर सांगतोय बाळा तुमची ऐकायची तयारी नाही म्हणूनंच मी अर्धवट बोलून थांबलो मगाशी.
आता मी ईरेला पेटलो होतो, ऐकायचंच होतं मला काय सांगतोय तो ते. नाही आता सांगाच काय बोलत होता ते मी हट्टंच धरला त्याच्याकडे. उपरण्यानं परत एकदा कपाळावरचा घाम पुसत बोलू लागला तो. हं.. तर आम्हाला हे वेडंच पहिल्यापासून लोक गोळा करायचे म्हणजे संघटित करायचे. तेव्हाची लोकंही निराळीच अन काळही निराळाच बघ. सायबानी बंदी घातली होती, जमावबंदी. कोणाला असा घोळका करुन वावरता येयचं नाही, एकत्र आल्याशिवाय काही होणारसुद्धा नव्हतं. चारजण एकत्र आले तर विचारांना चालना मिळेल, विधायक कार्य होईल, समाजासाठी लढता येईल अन सायबाच्या गुलामगिरीतून बाहेर पडता येईल असं सतत वाटत रहायचं सगळ्यांनाच, हं.. पण एकत्र कसं येयचं, जमावबंदी मोडायची कशी हा मोठा प्रश्न होता सगळ्यांसमोर. एवढं बोलून काहीतरी विचार करत असल्यासारखं त्यानं शून्यात नजर रोखून धरली अन मग त्यानंच घडवलेल्या मूर्तीकडे बोट दाखवून बोलू लागला. या, या बाप्पानंच आम्हाला त्यावेळी मार्ग दाखवला. धार्मिक गोष्टींसाठी एकत्र येयला बंदी नव्हती, सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाला, त्यानिमित्तानं लोक एकत्र येऊ लागले. सायबाला ईथे जमावबंदी करता येईना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी अवस्था झाली त्याची. प्रबोधन झालं, समाज एकत्र आला, एकत्र आला एका समान उद्देशासाठी, एकाच ध्येयासाठी आणि ते ध्येय होतं स्वराज्य मिळवळ्याचं. फक्त गणेशोत्सवानं नाही साध्य झालं ते ध्येय पण, पण हातभार लागला बाळा, हातभार नक्कीच लागला, चार पावलं पुढेच झाली होती वाटचाल, परत पीछेहाट नाही झाली. एवढं बोलून तो थांबला, स्वातंत्रपूर्व काळातल्या आठवणींनं त्याच्या डोळ्यात पाणी आलं, गळा दाटून आल्यानं त्याला पुढे बोलता येईना. काका हा ईतिहास तर मला माहितीये काका, तुम्ही परत, म्हणजे.. मी चाचपडत बोलायला सुरुवात केली. हं.. परत का सांगताय असंच म्हणायचंय ना तुला? अरे माहिती सगळ्यांनाच आहे पण जरासा विसर पडलाय का असं वाटतंय. मोठा मांडव, रस्त्यावर खड्डे, ट्रॅफिकला अडथळा, अव्वाच्यासव्वा वर्गणी, बेशिस्त मिरवणूका, दारु, जुगार, महिलांची छेडछाड यासाठीच का रे चालू केला गणेशोत्सव? माहीतीये म्हणतोस. हो, हो मलाही माहितीये सगळेच असं करत नाहीत पण असं करणाऱ्यांची संख्या जास्तय बाळा. अजून काय करता म्हणालो तर विचारतोस अजून काय हवं तुम्हाला? आणि मंडळं तरी किती रे? हा नाका तो रस्ता, प्रत्येक गल्लीचा राजा. टोप्यांवर छापून जाहिरातबाजी करता नवसाचा गणपती? हं.. कमाल आहे.. माझं मंडळ मोठं, माझं पथक मोठं, माझा खर्च मोठा...आमचं आमचं आमचं, अरे मूळ उद्देशंच गुंडाळून ठेवलात लेकांनो, एकत्र येऊन काय करु शकत नाही तुम्ही? करण्यासारखं खूप आहे रे. आलेल्या वर्गणीतून चार गरीब पोरांना शिकवा, घ्या जवाबदारी. तुमच्या भागातल्या पोरीबाळींच्या संरक्षणासाठी करा काही, त्या उत्तराखंडात जलसमाधी मिळाली हजारो संसारांना, द्या ना फाटा एक वर्ष देखाव्याला, द्या मदत पूरग्रस्तांना, सीमेवर शहिद झालेल्या जवानांना. या एकत्र द्या लढा साठेबाजी विरुद्ध, पुढाऱ्यांच्या मनमानी कारभारा विरुद्ध, लाल फितीत अडकलेल्या प्रकल्पांना सोडवा, द्या ना आवाज याच्यासाठी, अरे तुम्हाला बास म्हणावं लागेल एवढे हात येतील मदतीला. एकत्र येयचं ते काय फक्त दहा दिवस गाणं बजावणं करायला? तेव्हाचे प्रश्न वेगळे, तेव्हाचा समाज वेगळा अरे पण वेगळे असले तरीही आजही प्रश्न आहेतंच ना मग करा ना प्रयत्न तुमच्यापरीनं उत्तरं शोधण्याचा. जा जाऊन सांग तुझ्या मंडळात यातलं काहीतरी करु आपणं नको आपल्याला भपका, बाप्पाची पूजा करु मनापासून अन सामाजिक बांधिलकीसुद्धा जपू आणि ती ही मनापासून. बोल, सांगशील? तर येतो मीसुद्धा, नेणार होतास ना मंडळ दाखवायला. तो पोटतिडकिनं बोलत होता. आता माझी नजर शून्यात होती त्यानं दोन्ही खांद्याला धरुन गदागदा हलवत विचारलं मला, आहे तयारी? मी भानावर येत नकारार्थी मान हलवली.
काही न बोलता त्यानं मागे ठेवलेली पुणेरी पगडी उचलून डोक्यावर घातली. निघताना माझ्या पाठीवर हात ठेऊन म्हणाला बाप्पा तुम्हाला सुबुद्धी देवो. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहीलो मी वेड्यासारखा, भानातून गेल्यासारखं कानात घुमत राहिले शब्द त्याचे. तो कॉर्पोरेशनच्या दिशेला चालू लागला अन मी भानावर आलो, पुणेरी पगडी, धोतर, सदरा, उपरणं, भिकबाळी, झुपकेदार मिशा... लोकमान्य?? मनातल्या मनात म्हणालो मी स्वतःशी. रस्त्यावरची गर्दी, वाहनं सगळं विसरुन मी धावत सुटलो त्यांच्यामागे. मी मागून आवाज दिला त्यांना, काका काका थांबा पण ते थांबले नाहीत. मी पहात होतो त्यांना, मुठेच्या पूलावर मध्यभागी जाऊन थांबले ते. मी जीवाच्या आकांतानं ओरडलो थांबा काका काय करताय. माझ्याकडे पाहून म्हणाले ते ईथेच येता ना तुम्ही गणपती विसर्जनाला? मी फक्त होकारार्थी मान हलवली. एकत्र येण्याचा उद्देश तर तुम्ही केव्हाच बुडवलात राजा आता मी तरी थांबून काय करु? म्हणत त्यांनी मान वळवली. काका म्हणून मी त्यांच्याकडे धावलो अन त्यांनी कठड्यावरुन उडी मारली... धप्प... पाण्यात पडल्याचा आवाज आला. उपरणं, पगडी तरंगत राहिले पूराच्या पाण्यात... मी आजही विचार करतोय ती आत्महत्या होती का खून....?

के.पी. आर.
(जनतेला एकत्र कसं आणता येईल हा विचार करत गिरगाव चौपाटीवर गणपती मूर्ती करत बसायचे लोकमान्य टिळक, तेव्हा लोक तिथे गोळा होयचे असं एकत्र येण्याला बंदी नव्हती ब्रिटीश राज्यकर्त्यांची आणि त्यातूनंच लोकमान्य टिळकांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना सुचली)

गणपती बाप्पा मोरया, बाप्पा सुबुद्धी दे आम्हा सर्वांना

Monday, April 15, 2013

मैत्र जीवांचे



To all the friends who have been with me through thick & thin & will always be... And even to all those who parted ways with me...

आठवतं की नाही
कि आठवूनंच देत नाही..
कसंय ना विचित्रंच सगळं
तेव्हापेक्षा आज सगळंच वेगळं
तेव्हा खेळायचो लपंडाव..
लपलेल्या मित्राला शोधण्यासाठी धावाधाव
आज मित्रांचं हरवणं तसं रुटिनंच झालंय
कोण शोधणार कोणाला
स्वतःची स्वतःशीच भेट होणं
ईथे कठिण झालंय
मोकळे रस्ते...
रस्त्यावरचं क्रिकेट
ईकडे मारलं की आऊट
तिकडे दोन रन
कॉमन फिल्डर
काय काय होते नाही नियम
अजबंच सगळं तरीही त्यात आनंद मिळायचा कायम
अंगणातली लंगडी
बहीणींबरोबरची टिपरीपाणी
चल्लसआठ
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं
झाडाखालचं बदाम सात
आता ना उन्हाळ्याची सुट्टी ना ते खेळ
कशाचा कशाशी बसवायचा मेळ?
डबडं ऐसपैस...
डबडं उडवून हैया SSSSSकरुन ओरडायचं
पाठीवरचा धप्पा, पत्र्यावरचा टप्पा
खिशातल्या गोट्यांची खळखळ
मित्राला लागल्यावर होणारी तळमळ
चोर पोलिस शिवणापाणी
आता एफबी व्हॉट्स ॲपवर
हाय हॅलो लाईक उनलाईक कमेंट्स काय काय आणि
विष आमृत मधे मित्रानं दिलेलं आमृत
एकमेकांच्या खोड्य़ांना येणारा ऊत
मित्रांचं रींगण
माझ्य़ा आईचं पत्र हरवल्याची आरोळी
शिरापुरीची झोळी
शिवाजी म्हणतो म्हटल्यावर सांगेल ते करणारे मित्र
अन आज फक्त लिस्टमधे संख्या वाढवणारे मित्र
टिपी टिपी टिप टॉप व्हॉट कलर यू वाँट
"माझा रंग सांगू का" विचारणार कोणाला?
आंधळ्या कोशिंबीरीतली डोळ्यावरची पट्टी
तशीच ठेवायची सवय लागलीये आम्हाला
कसले राजा राणी अन चोर शिपाई
आता नुसती कुतरओढ ती ही पैश्यापायी
"मुलीत मुलगा लांबोडा
जे म्हणतात तेच असतात"
काय होत्या भाबड्या कल्पना
आता वाक्य मोठी मोठी ओठी
च्यायला फुकाच्या वल्गना
भोवरा, विटी दांडू, कबड्डी, लिगोरी..
एकट्यानं बसून व्हिडिओ गेम, लॅपटॉपवरचा कट्टा नव्हता तेव्हा
होती मित्रांची भेट खरी
तळ्यात मळ्यात खेळता खेळता
परीस्थिती खरंच तशी झालीये
पैसा अन स्पर्धा नाचवेल तसं नाचायची वेळ आमच्यावर आलीये

तेव्हा खेळ खेळायचो
आता खेळ मांडलाय
तेव्हाचं एक चांगलं होतं
आर्ध्यावर सोडता येयचा डाव
अन आता...
रोजचाच झालाय लिलाव
लपलेले मित्र जातात हरवून
पाठीवर ना कुणाचा रट्टा "धप्पा" म्हणून
गेला तर जाऊ दे म्हणत आपणही देतोच की सोडून...

पण... पण सोडून देताना
आजूबाजूच्या गर्दित एकट्यानंच जगताना
अन थकलेल्या मनानं मांडलेला डाव सावरताना
हवेच चार दोन तरी आपल्या जीवाभावाचे
म्हणून म्हणतो खेळ खुशाल सोडा, डावही खुशाल मोडा
पण तोडू नका "मैत्र जीवांचे"

कुणाल प्रकाश रुद्राके.

आत्ताशी सुरुवात आहे



कसे गेले नाही दिवस..
कधी भेटलो रे आपण?
आठवतंय तुला??
अगदी काल परवाच..
कित्ती कित्ती वर्ष झाली
ओळखतोय एकमेकांना
तरीही..
फ्रेश नातं..
अगदी थोड्यावेळापूर्वी बरसलेल्या
टपोऱ्या पावसारखं
वहीतल्या शेवटच्या पानावरंच
रमायचो आपण जास्त
फुली गोळा, चित्र विचित्र नक्षी
अन त्यातंच चोरुन लिहिलेलं
एकमेकांचं नाव..
अजून जपून ठेवलीयेत मी ती पानं
एकटी असते तेव्हा
मांडते टेबलावर, भरभरुन बघते
अन हसते स्वतःशीच खुळ्यासारखी
काय काय करायचास नाही
मला चिडवण्यासाठी..
अन माझ्या नाकावरचा राग पाहून
चेव चढायचा तुला अजून
मी ही फुरंगटून बसायचे मग
मला हसवण्यासाठी पायाशी आणून ठेवायचास जग
लग्न ठरल्यानंतर..
रोजंच संध्याकाळी धरुन ठेवायचास हात
घरी जायला रोजचाच ऊशीर
डोळे वटारुनंच आई घ्यायची आत
काय काय केलं आपण..
कुठे कुठे फिरलो..
नॅचरल्स, केन हाऊस, कॉफी शॉप्स..
भांडलो तंटलो चिडलो जरी एकमेकांवर
तरी ओवाळून टाकतोस ना जीव माझ्या खुश असण्यावर
करते ना मी ही चूका परत परत वेड्यासारख्या
पण तरीही घेतोस ना समजून मला
अगदी लहान लेकरासारखा..
सासर माहेर असं कधी
जाणवूनंच दिलं नाहीस अंतर
काय अन किती बोलू
डोळ्यातूनंच व्यक्त व्हावं त्यापेक्षा खरंतर
अजूनही चालत रहावं वाटतं चांदण्यात
तुझ्यासोबत तासन्‌तास.
सगळंच नवीन असल्याचा होतो भास
कसे गेले नाही दिवस
तरीही सगळं सग्गळं
अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतं
अन तूही तसाच आहेस..
अजूनही "वेडा"
माझ्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठी...

जपशील ना हे वेड असंच...??? नेहमी??

(काहीही विचारते नाही मी कधी कधी खुळ्यासारखी)

थांबतेय ईथेच.. सगळ्याच कवितांना शेवट नसतो..
कारण आपली तर आत्ताशी सुरुवात आहे.

कुणाल प्रकाश रुद्राके

ठरवलंय मी ही



ठरवलंय मी ही

ठरवलंय मी ही आज तुझ्यावर नाहीच रागवायचं
तुझ्या प्रेमाखातंर आज मीच पदरी झुकतं माप घ्यायचं

तुझ्या डोळ्यातून कडवट पाणी आज सांडूच देणार नाही
माझ्या तोंडची ती गोड वाणी तुला भांडूच देणार नाही
आता छोट्या मोठ्या भांडणांना चटकन विसरायचं

ठरवलंय मी ही आज तुझ्यावर नाहीच रागवायचं
तुझ्या प्रेमाखातंर आज मीच पदरी झुकतं माप घ्यायचं

मी नाही तर अजून कोण गं प्रेमाची साखर पेरणार?
राग सोडून द्यायचा हट्ट पण मीच धरणार
ए बहिणीचा लाड-हट्ट सारं भावानंच ना पुरवायचं

ठरवलंय मी ही आज तुझ्यावर नाहीच रागवायचं
तुझ्या प्रेमाखातंर आज मीच पदरी झुकतं माप घ्यायचं

तुझ्या चेहऱ्यावर त्या रागाला जागा मी देणारंच नाही
बघ तू.... जीभेवरही गोड शब्दांशिवाय काही येणारंच नाही.
तुला आवडेल असंच सगळं करायचं

ठरवलंय मी ही आज तुझ्यावर नाहीच रागवायचं
तुझ्या प्रेमाखातंर आज मीच पदरी झुकतं माप घ्यायचं

माहितेय मला आज हरुनही मी जिंकणार आहे
तो लटका राग, तो रुसवा एका क्षणातंच संपणार आहे
अन ते संपवता संपवता तुला मात्र थोडसं नाटक करायचंय

ठरवलंय मी ही आज तुझ्यावर नाहीच रागवायचं
तुझ्या प्रेमाखातंर आज मीच पदरी झुकतं माप घ्यायचं


कुणाल

असा राम



अंगावर मळके कपडे
तुटकी बटनं..
वाढलेले दाढीचे खुंटं
खोल गेलेले डोळे
अन त्याच डोळ्यात
भीती, आशा, काळजी...
भूक, संताप, असहाय्यता
संमिश्र भाव..
त्यावर पडदा ओढणारं
खारं पाणी
अंगातली शक्ती संपल्यागत
पाय खुरडत खुरडत
आला तो..
मोठ्या आशेनं
हुंदका रोखत बोलला
गुरं मेली चाऱ्याविना
समदं शिवार बी करपलं
बायका पोरांसाटी बी दोन घास न्हाईत
अन्नाचा कन सोडाच पन
थेंबभर पानी बी न्हाई पेलो परवाच्यानं...
समदं संपलं बापू आता तुमीच वाचवा
म्हणत त्यानं पायावर डोकं ठेऊन
हंबरडा फोडला
बापूंच्या दोन शिष्यांनी
धरलं त्याला बखोटीला..
"का म्हून बोंबलायलास बे पोट्ट्या
आज बापूंची होळी हाये"
म्हणत ढकलला त्याला तिथून..
थेंबभर पाण्यासाठी तरसणारा तो
पडून राहिला तसाच मग
रंगीत पाण्याच्या चिखलात...

के. पी. आर
(असा रामही नको अन बापूही नको आम्हाला)

रेशीमगाठ



काळजाचं माप ओलांडलं होतंस पहिल्याच भेटीत
आज फक्त गृहप्रवेश सर्वसंमत्तीनं ऐटीत
सप्तपदीची सात पावलं कोरली या मनावर
आशिर्वादाच्या अक्षताही माथ्यावरती अनावर
मायपित्याच्या डोळ्यातलं न लपणारं समाधान
ओठावरचं हसू तुझ्या अन हरपलेलं माझं भान
हात असा घेऊन हाती सात जन्माची साथ ही
सनई चौघड्याच्या सूरासंगे बांधली रेशीमगाठ ही

कुणाल

Tuesday, March 5, 2013

"क्रांती-प्राजक्ता"(ताई-माई)



रुद्राक्यांच्या ताम्हणातल्या या दोन वाती.
एकीचं नाव प्राजक्ता तर एक आहे क्रांती.
प्रसिद्ध कीती कबड्डीपटू नाबर भगिनी, थोरलीची तर होती विश्वात साऱ्या ख्याती.
तिच्या नावावरुनंच ठेवलं भाऊंनी ज्येष्ठ कन्येचं नाव मग "क्रांती".
आजोबा (काका) नेहमीच म्हणत, तुझ्यात दिसते मला माझी आई.
अन म्हणूनंच धाकटीचं नामकरण केलं त्यांनी "माई"
पहिल्यापसूनंच माई हट्टी होती थोडी.
अभ्यासाचीही नव्हती तिला म्हणावी अशी गोडी.
ताई मात्र तिघांमधे होती एकदम समजूतदार.
अभ्यासातही असायची कामगिरी तिची चमकदार.
"क्रांती".... नावाप्रमाणेच तिच्या वागण्या-बोलण्यातही आहे वेगळेपणा.
"NO NONSENSE GIRL" आहे ती, तिला चालत नाही कसलाच थिल्लरपणा.
मुलगी असूनही तिनं समर्थपणे पेललेली थोरल्या मुलाची भूमिका सर्वांनी पाहिलीए.
कठीण परीस्थितीत नेहमीच ती भाऊंच्याही खांद्याला खांदा लावून ऊभी राहीलीए.

"प्राजक्ता".... पारीजातकाच्या फूलापरीच आहे तिचं रुप.
सार्थ ठरवलंय नाव तिनं "माई", सर्वांचीच करते माया खूप.
देण्यासाठी हात तिचा नेहमीच सढळ असतो.
फायद्या-तोट्याचा त्यामधे मग कधीच विचार नसतो.
लिहिणार किती, बोलणार किती????
आमच्याच दोन श्वासांना शब्दांमधे तोलणार किती????
लग्न झालं, घर बदललं.....
नाव गाव सारं बदललं....
सावळे अन भिक्षावतीमठांच्या घरातूनही या दोनही "वाती" माहेरच्या ताम्हणात तेवत आहेत.
"प्रकाशाच्या" कुटुंबाला त्याच अजूनही "प्रकाशमय" ठेवत आहेत....


कुणाल.

Thursday, February 21, 2013

रातीच्या वाटेवरचा दिस



रातीच्या वाटेवरचा दिस अन दिसाला गिळणारी रात
ठासून ठासून भरलेली भीती येकेका क्शनात.
उगवतीचा सूर्य बी काळा ठिक्कार
काळजाच्या खिडकीतून कवडसा पाडायला आशेचा नकार.
गोठलेल्या भावनेला आसवांचा स्पर्श ओला
वैऱ्यापरीस बी वंगाळ चिंतायला मनाचा मार्ग खुला.
माज्यात झिरपनारं दुःख अन दुःखातंच मिसळनारा मी
काळजाचा हरेक ठोका वडतोय निराशेचीच री.
आशेच्या किरनाला काळोखंच दिसतोय.
कष्टानं मांडलेला खेळ उधळून नियतीचा नवा डाव हसतोय.
सुखाच्या ठिनगीला दुःखाचाच कोळसा जाळतोय
उद्याच्या भीतीनं सुखाला नजरे पल्याड ठेउन मी त्योच त्यो कोळसा उगाळतोय.
कितीबी काळवंडलं तरी ढगाला आसतेच ना चंदेरी किनार
इश्वास हाय मला येक दिस नक्कीच लखलखाट व्हनार.
आरं इंद्रधनुनं लपवले जरी रंग पन लाभलाय मला बी वादळाचा संग.
इजेची ताकद हाय माज्यात...

इजेपरीसंच कडाडीन अन इजेपरीसंच पेटीन
येक दिस सुखाच्या गारव्याला सुखाच्याच बरसातीत कडकडून भेटीन.

कुणाल.


Tuesday, February 19, 2013

तरीही "तुझाच"



तुझ्या त्या घट्ट पकडीतून
नव्हतंच सुटायचं मला.. पण...
वळलेल्या मुठीतून रेती सुटावी कण्‌कण
तसाच निसटत राहीलो... माझ्याही नकळत
अन सुरु झाली ससेहोलपालट मग
भरती अन ओहोटीच्या चक्रात
दिसायचीस तू ईथे एकटी
किनाऱ्यावर.. समुद्राशी गुजगोष्टी करताना
अन मी मात्र ओढला जायचो
खोल खोल खोल... असहाय्य...
कधी धडकलो तुझ्या पायापर्यंत
थांबलो क्षणभर तिथे.. पण...
पुढच्याच लाटेसोबत प्रवास परतीचा
गोंधळून टाकणारं सगळं..
असंच घडत राहीलंय आजवर
आता मात्र विचार करायचंच सोडून दिलंय मी
झोकून दिलंय स्वतःला त्या किनाऱ्यावर
कळून चुकलंय आता
आयुष्य असंच जाणार
किनाऱ्यावरच्या वादळात..
..
...
मी उसवंत नव्हतो वीण
एक प्रयत्न मात्र केला केविलवाणा
समुद्र अन तुझ्यातली दरी सांधण्याचा... अपयशी!!!

-- ना तुझा ना त्याचा

तरीही "तुझाच"

वादळातही अन वादळानंतरही

कुणाल

ना आता थांबणार मी



सरधोपट मार्गावर का उगी रमणार मी
मी शोधली वाट माझी ना आता थांबणार मी
भले एकटी आज ईथे
वाटेवरही फक्त काटे
तुच्छ लेखणाऱ्या नजरा त्या
उपहासाचे कटाक्ष आणि
साठवलेत काळजामध्ये
डोळ्यातलंही रोखलंय पाणी
विरोधाला निर्धार म्हणतो ना आता रडणार मी
मी शोधली वाट माझी ना आता थांबणार मी

लटपटले कधी पाय जरी
ठेचकाळले धडपडले तरी
चालत राहण्याची जिद्द खरी
राखेतूनही झेपावेन मी निश्चित त्या नभावरी
हारण्याची आता न भीती
आव्हानांची मशाल हाती
पेटून उठले जिद्दीनं ज्या आग ना विझणार ती
मी शोधली वाट माझी ना आता थांबणार मी

दिशाहीन म्हणता म्हणता
हिणवा मला खुशाल आता
खुणावतो शिखर माथा
चढणीची मग कशाला चिंता
फिरवलीत नजर आज पार
उद्या जपाल पाऊलखुणा याच जीवापाड
अवकाशाला घालून गवसणी
नाळ जमिनीची ना तुटणार ही
लढणार भिडणार आव्हानांना अन निश्चितंच जिंकणार मी
मी शोधली वाट माझी ना आता थांबणार मी

कुणाल प्रकाश रुद्राके

Special thanx to Sneha Barge... A chat with her made me write this one
And dedicated to all the admirers & haters of today's woman. They actually help her fight against the odds & achieve the position she aims for :)

आठवणी



ए मामाए मामा
मामी नाईये मामी भुई गेली
आज्जी भो
काक्का मो
पाश एतेय
हिरा एतेय
बायं चल
चॉक्की
फिय्या
चीचीए चीची
न्यू न्यू
हाए हा...
चाई गाई
हे काये
एहेह नाही
एय
मामा मला नाई जायचं
शब्द घुमतायेत अजूनंही कानात
पोटाची मिठी अजून जाणवते
वाटतं कुणीतरी खुणवतंय.. लाजून
दाराकडे बोट दाखवून
गाडी लावताना वाटतं..
खिडकीतून बघत असेल तो
मामा गेम मॉलमधे जायचं... प्लीSSSSज
हात ओढून म्हणेल तीही
मग हात वळतात स्काईपकडे
तुम्ही दिसता बोलता
दूधाची तहाना भागते ताकावर
उरलेल्या वेळात मात्र जाणवतं
परत एकदा...
ईस्त्री केलेलं घर
रीकामंच असतं खरंतर
घरात ईन मीन चार डोकी
चौघांचेही डोळे बघत असतात वाट
पण चहूबाजूला दिसतात फक्त आठवणी
अन मग पलटायची पानं कॅलेंडरची
तुमच्या पुढच्या भेटीपर्यंत
तोपर्यंत आहेतंच... आठवणी

मामा
(पुढल्या वेळेस तोही बोलेल स्पष्ट अन
तीही करेल जरा जास्तंच हट्ट...
वाट बघतोय मीही हट्टीपणानी)

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...