Monday, April 15, 2013

मैत्र जीवांचे



To all the friends who have been with me through thick & thin & will always be... And even to all those who parted ways with me...

आठवतं की नाही
कि आठवूनंच देत नाही..
कसंय ना विचित्रंच सगळं
तेव्हापेक्षा आज सगळंच वेगळं
तेव्हा खेळायचो लपंडाव..
लपलेल्या मित्राला शोधण्यासाठी धावाधाव
आज मित्रांचं हरवणं तसं रुटिनंच झालंय
कोण शोधणार कोणाला
स्वतःची स्वतःशीच भेट होणं
ईथे कठिण झालंय
मोकळे रस्ते...
रस्त्यावरचं क्रिकेट
ईकडे मारलं की आऊट
तिकडे दोन रन
कॉमन फिल्डर
काय काय होते नाही नियम
अजबंच सगळं तरीही त्यात आनंद मिळायचा कायम
अंगणातली लंगडी
बहीणींबरोबरची टिपरीपाणी
चल्लसआठ
उन्हाळ्याच्या सुट्टीतलं
झाडाखालचं बदाम सात
आता ना उन्हाळ्याची सुट्टी ना ते खेळ
कशाचा कशाशी बसवायचा मेळ?
डबडं ऐसपैस...
डबडं उडवून हैया SSSSSकरुन ओरडायचं
पाठीवरचा धप्पा, पत्र्यावरचा टप्पा
खिशातल्या गोट्यांची खळखळ
मित्राला लागल्यावर होणारी तळमळ
चोर पोलिस शिवणापाणी
आता एफबी व्हॉट्स ॲपवर
हाय हॅलो लाईक उनलाईक कमेंट्स काय काय आणि
विष आमृत मधे मित्रानं दिलेलं आमृत
एकमेकांच्या खोड्य़ांना येणारा ऊत
मित्रांचं रींगण
माझ्य़ा आईचं पत्र हरवल्याची आरोळी
शिरापुरीची झोळी
शिवाजी म्हणतो म्हटल्यावर सांगेल ते करणारे मित्र
अन आज फक्त लिस्टमधे संख्या वाढवणारे मित्र
टिपी टिपी टिप टॉप व्हॉट कलर यू वाँट
"माझा रंग सांगू का" विचारणार कोणाला?
आंधळ्या कोशिंबीरीतली डोळ्यावरची पट्टी
तशीच ठेवायची सवय लागलीये आम्हाला
कसले राजा राणी अन चोर शिपाई
आता नुसती कुतरओढ ती ही पैश्यापायी
"मुलीत मुलगा लांबोडा
जे म्हणतात तेच असतात"
काय होत्या भाबड्या कल्पना
आता वाक्य मोठी मोठी ओठी
च्यायला फुकाच्या वल्गना
भोवरा, विटी दांडू, कबड्डी, लिगोरी..
एकट्यानं बसून व्हिडिओ गेम, लॅपटॉपवरचा कट्टा नव्हता तेव्हा
होती मित्रांची भेट खरी
तळ्यात मळ्यात खेळता खेळता
परीस्थिती खरंच तशी झालीये
पैसा अन स्पर्धा नाचवेल तसं नाचायची वेळ आमच्यावर आलीये

तेव्हा खेळ खेळायचो
आता खेळ मांडलाय
तेव्हाचं एक चांगलं होतं
आर्ध्यावर सोडता येयचा डाव
अन आता...
रोजचाच झालाय लिलाव
लपलेले मित्र जातात हरवून
पाठीवर ना कुणाचा रट्टा "धप्पा" म्हणून
गेला तर जाऊ दे म्हणत आपणही देतोच की सोडून...

पण... पण सोडून देताना
आजूबाजूच्या गर्दित एकट्यानंच जगताना
अन थकलेल्या मनानं मांडलेला डाव सावरताना
हवेच चार दोन तरी आपल्या जीवाभावाचे
म्हणून म्हणतो खेळ खुशाल सोडा, डावही खुशाल मोडा
पण तोडू नका "मैत्र जीवांचे"

कुणाल प्रकाश रुद्राके.

आत्ताशी सुरुवात आहे



कसे गेले नाही दिवस..
कधी भेटलो रे आपण?
आठवतंय तुला??
अगदी काल परवाच..
कित्ती कित्ती वर्ष झाली
ओळखतोय एकमेकांना
तरीही..
फ्रेश नातं..
अगदी थोड्यावेळापूर्वी बरसलेल्या
टपोऱ्या पावसारखं
वहीतल्या शेवटच्या पानावरंच
रमायचो आपण जास्त
फुली गोळा, चित्र विचित्र नक्षी
अन त्यातंच चोरुन लिहिलेलं
एकमेकांचं नाव..
अजून जपून ठेवलीयेत मी ती पानं
एकटी असते तेव्हा
मांडते टेबलावर, भरभरुन बघते
अन हसते स्वतःशीच खुळ्यासारखी
काय काय करायचास नाही
मला चिडवण्यासाठी..
अन माझ्या नाकावरचा राग पाहून
चेव चढायचा तुला अजून
मी ही फुरंगटून बसायचे मग
मला हसवण्यासाठी पायाशी आणून ठेवायचास जग
लग्न ठरल्यानंतर..
रोजंच संध्याकाळी धरुन ठेवायचास हात
घरी जायला रोजचाच ऊशीर
डोळे वटारुनंच आई घ्यायची आत
काय काय केलं आपण..
कुठे कुठे फिरलो..
नॅचरल्स, केन हाऊस, कॉफी शॉप्स..
भांडलो तंटलो चिडलो जरी एकमेकांवर
तरी ओवाळून टाकतोस ना जीव माझ्या खुश असण्यावर
करते ना मी ही चूका परत परत वेड्यासारख्या
पण तरीही घेतोस ना समजून मला
अगदी लहान लेकरासारखा..
सासर माहेर असं कधी
जाणवूनंच दिलं नाहीस अंतर
काय अन किती बोलू
डोळ्यातूनंच व्यक्त व्हावं त्यापेक्षा खरंतर
अजूनही चालत रहावं वाटतं चांदण्यात
तुझ्यासोबत तासन्‌तास.
सगळंच नवीन असल्याचा होतो भास
कसे गेले नाही दिवस
तरीही सगळं सग्गळं
अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतं
अन तूही तसाच आहेस..
अजूनही "वेडा"
माझ्यासाठी आणि आपल्या प्रेमासाठी...

जपशील ना हे वेड असंच...??? नेहमी??

(काहीही विचारते नाही मी कधी कधी खुळ्यासारखी)

थांबतेय ईथेच.. सगळ्याच कवितांना शेवट नसतो..
कारण आपली तर आत्ताशी सुरुवात आहे.

कुणाल प्रकाश रुद्राके

ठरवलंय मी ही



ठरवलंय मी ही

ठरवलंय मी ही आज तुझ्यावर नाहीच रागवायचं
तुझ्या प्रेमाखातंर आज मीच पदरी झुकतं माप घ्यायचं

तुझ्या डोळ्यातून कडवट पाणी आज सांडूच देणार नाही
माझ्या तोंडची ती गोड वाणी तुला भांडूच देणार नाही
आता छोट्या मोठ्या भांडणांना चटकन विसरायचं

ठरवलंय मी ही आज तुझ्यावर नाहीच रागवायचं
तुझ्या प्रेमाखातंर आज मीच पदरी झुकतं माप घ्यायचं

मी नाही तर अजून कोण गं प्रेमाची साखर पेरणार?
राग सोडून द्यायचा हट्ट पण मीच धरणार
ए बहिणीचा लाड-हट्ट सारं भावानंच ना पुरवायचं

ठरवलंय मी ही आज तुझ्यावर नाहीच रागवायचं
तुझ्या प्रेमाखातंर आज मीच पदरी झुकतं माप घ्यायचं

तुझ्या चेहऱ्यावर त्या रागाला जागा मी देणारंच नाही
बघ तू.... जीभेवरही गोड शब्दांशिवाय काही येणारंच नाही.
तुला आवडेल असंच सगळं करायचं

ठरवलंय मी ही आज तुझ्यावर नाहीच रागवायचं
तुझ्या प्रेमाखातंर आज मीच पदरी झुकतं माप घ्यायचं

माहितेय मला आज हरुनही मी जिंकणार आहे
तो लटका राग, तो रुसवा एका क्षणातंच संपणार आहे
अन ते संपवता संपवता तुला मात्र थोडसं नाटक करायचंय

ठरवलंय मी ही आज तुझ्यावर नाहीच रागवायचं
तुझ्या प्रेमाखातंर आज मीच पदरी झुकतं माप घ्यायचं


कुणाल

असा राम



अंगावर मळके कपडे
तुटकी बटनं..
वाढलेले दाढीचे खुंटं
खोल गेलेले डोळे
अन त्याच डोळ्यात
भीती, आशा, काळजी...
भूक, संताप, असहाय्यता
संमिश्र भाव..
त्यावर पडदा ओढणारं
खारं पाणी
अंगातली शक्ती संपल्यागत
पाय खुरडत खुरडत
आला तो..
मोठ्या आशेनं
हुंदका रोखत बोलला
गुरं मेली चाऱ्याविना
समदं शिवार बी करपलं
बायका पोरांसाटी बी दोन घास न्हाईत
अन्नाचा कन सोडाच पन
थेंबभर पानी बी न्हाई पेलो परवाच्यानं...
समदं संपलं बापू आता तुमीच वाचवा
म्हणत त्यानं पायावर डोकं ठेऊन
हंबरडा फोडला
बापूंच्या दोन शिष्यांनी
धरलं त्याला बखोटीला..
"का म्हून बोंबलायलास बे पोट्ट्या
आज बापूंची होळी हाये"
म्हणत ढकलला त्याला तिथून..
थेंबभर पाण्यासाठी तरसणारा तो
पडून राहिला तसाच मग
रंगीत पाण्याच्या चिखलात...

के. पी. आर
(असा रामही नको अन बापूही नको आम्हाला)

रेशीमगाठ



काळजाचं माप ओलांडलं होतंस पहिल्याच भेटीत
आज फक्त गृहप्रवेश सर्वसंमत्तीनं ऐटीत
सप्तपदीची सात पावलं कोरली या मनावर
आशिर्वादाच्या अक्षताही माथ्यावरती अनावर
मायपित्याच्या डोळ्यातलं न लपणारं समाधान
ओठावरचं हसू तुझ्या अन हरपलेलं माझं भान
हात असा घेऊन हाती सात जन्माची साथ ही
सनई चौघड्याच्या सूरासंगे बांधली रेशीमगाठ ही

कुणाल

Tuesday, March 5, 2013

"क्रांती-प्राजक्ता"(ताई-माई)



रुद्राक्यांच्या ताम्हणातल्या या दोन वाती.
एकीचं नाव प्राजक्ता तर एक आहे क्रांती.
प्रसिद्ध कीती कबड्डीपटू नाबर भगिनी, थोरलीची तर होती विश्वात साऱ्या ख्याती.
तिच्या नावावरुनंच ठेवलं भाऊंनी ज्येष्ठ कन्येचं नाव मग "क्रांती".
आजोबा (काका) नेहमीच म्हणत, तुझ्यात दिसते मला माझी आई.
अन म्हणूनंच धाकटीचं नामकरण केलं त्यांनी "माई"
पहिल्यापसूनंच माई हट्टी होती थोडी.
अभ्यासाचीही नव्हती तिला म्हणावी अशी गोडी.
ताई मात्र तिघांमधे होती एकदम समजूतदार.
अभ्यासातही असायची कामगिरी तिची चमकदार.
"क्रांती".... नावाप्रमाणेच तिच्या वागण्या-बोलण्यातही आहे वेगळेपणा.
"NO NONSENSE GIRL" आहे ती, तिला चालत नाही कसलाच थिल्लरपणा.
मुलगी असूनही तिनं समर्थपणे पेललेली थोरल्या मुलाची भूमिका सर्वांनी पाहिलीए.
कठीण परीस्थितीत नेहमीच ती भाऊंच्याही खांद्याला खांदा लावून ऊभी राहीलीए.

"प्राजक्ता".... पारीजातकाच्या फूलापरीच आहे तिचं रुप.
सार्थ ठरवलंय नाव तिनं "माई", सर्वांचीच करते माया खूप.
देण्यासाठी हात तिचा नेहमीच सढळ असतो.
फायद्या-तोट्याचा त्यामधे मग कधीच विचार नसतो.
लिहिणार किती, बोलणार किती????
आमच्याच दोन श्वासांना शब्दांमधे तोलणार किती????
लग्न झालं, घर बदललं.....
नाव गाव सारं बदललं....
सावळे अन भिक्षावतीमठांच्या घरातूनही या दोनही "वाती" माहेरच्या ताम्हणात तेवत आहेत.
"प्रकाशाच्या" कुटुंबाला त्याच अजूनही "प्रकाशमय" ठेवत आहेत....


कुणाल.

Thursday, February 21, 2013

रातीच्या वाटेवरचा दिस



रातीच्या वाटेवरचा दिस अन दिसाला गिळणारी रात
ठासून ठासून भरलेली भीती येकेका क्शनात.
उगवतीचा सूर्य बी काळा ठिक्कार
काळजाच्या खिडकीतून कवडसा पाडायला आशेचा नकार.
गोठलेल्या भावनेला आसवांचा स्पर्श ओला
वैऱ्यापरीस बी वंगाळ चिंतायला मनाचा मार्ग खुला.
माज्यात झिरपनारं दुःख अन दुःखातंच मिसळनारा मी
काळजाचा हरेक ठोका वडतोय निराशेचीच री.
आशेच्या किरनाला काळोखंच दिसतोय.
कष्टानं मांडलेला खेळ उधळून नियतीचा नवा डाव हसतोय.
सुखाच्या ठिनगीला दुःखाचाच कोळसा जाळतोय
उद्याच्या भीतीनं सुखाला नजरे पल्याड ठेउन मी त्योच त्यो कोळसा उगाळतोय.
कितीबी काळवंडलं तरी ढगाला आसतेच ना चंदेरी किनार
इश्वास हाय मला येक दिस नक्कीच लखलखाट व्हनार.
आरं इंद्रधनुनं लपवले जरी रंग पन लाभलाय मला बी वादळाचा संग.
इजेची ताकद हाय माज्यात...

इजेपरीसंच कडाडीन अन इजेपरीसंच पेटीन
येक दिस सुखाच्या गारव्याला सुखाच्याच बरसातीत कडकडून भेटीन.

कुणाल.


Tuesday, February 19, 2013

तरीही "तुझाच"



तुझ्या त्या घट्ट पकडीतून
नव्हतंच सुटायचं मला.. पण...
वळलेल्या मुठीतून रेती सुटावी कण्‌कण
तसाच निसटत राहीलो... माझ्याही नकळत
अन सुरु झाली ससेहोलपालट मग
भरती अन ओहोटीच्या चक्रात
दिसायचीस तू ईथे एकटी
किनाऱ्यावर.. समुद्राशी गुजगोष्टी करताना
अन मी मात्र ओढला जायचो
खोल खोल खोल... असहाय्य...
कधी धडकलो तुझ्या पायापर्यंत
थांबलो क्षणभर तिथे.. पण...
पुढच्याच लाटेसोबत प्रवास परतीचा
गोंधळून टाकणारं सगळं..
असंच घडत राहीलंय आजवर
आता मात्र विचार करायचंच सोडून दिलंय मी
झोकून दिलंय स्वतःला त्या किनाऱ्यावर
कळून चुकलंय आता
आयुष्य असंच जाणार
किनाऱ्यावरच्या वादळात..
..
...
मी उसवंत नव्हतो वीण
एक प्रयत्न मात्र केला केविलवाणा
समुद्र अन तुझ्यातली दरी सांधण्याचा... अपयशी!!!

-- ना तुझा ना त्याचा

तरीही "तुझाच"

वादळातही अन वादळानंतरही

कुणाल

ना आता थांबणार मी



सरधोपट मार्गावर का उगी रमणार मी
मी शोधली वाट माझी ना आता थांबणार मी
भले एकटी आज ईथे
वाटेवरही फक्त काटे
तुच्छ लेखणाऱ्या नजरा त्या
उपहासाचे कटाक्ष आणि
साठवलेत काळजामध्ये
डोळ्यातलंही रोखलंय पाणी
विरोधाला निर्धार म्हणतो ना आता रडणार मी
मी शोधली वाट माझी ना आता थांबणार मी

लटपटले कधी पाय जरी
ठेचकाळले धडपडले तरी
चालत राहण्याची जिद्द खरी
राखेतूनही झेपावेन मी निश्चित त्या नभावरी
हारण्याची आता न भीती
आव्हानांची मशाल हाती
पेटून उठले जिद्दीनं ज्या आग ना विझणार ती
मी शोधली वाट माझी ना आता थांबणार मी

दिशाहीन म्हणता म्हणता
हिणवा मला खुशाल आता
खुणावतो शिखर माथा
चढणीची मग कशाला चिंता
फिरवलीत नजर आज पार
उद्या जपाल पाऊलखुणा याच जीवापाड
अवकाशाला घालून गवसणी
नाळ जमिनीची ना तुटणार ही
लढणार भिडणार आव्हानांना अन निश्चितंच जिंकणार मी
मी शोधली वाट माझी ना आता थांबणार मी

कुणाल प्रकाश रुद्राके

Special thanx to Sneha Barge... A chat with her made me write this one
And dedicated to all the admirers & haters of today's woman. They actually help her fight against the odds & achieve the position she aims for :)

आठवणी



ए मामाए मामा
मामी नाईये मामी भुई गेली
आज्जी भो
काक्का मो
पाश एतेय
हिरा एतेय
बायं चल
चॉक्की
फिय्या
चीचीए चीची
न्यू न्यू
हाए हा...
चाई गाई
हे काये
एहेह नाही
एय
मामा मला नाई जायचं
शब्द घुमतायेत अजूनंही कानात
पोटाची मिठी अजून जाणवते
वाटतं कुणीतरी खुणवतंय.. लाजून
दाराकडे बोट दाखवून
गाडी लावताना वाटतं..
खिडकीतून बघत असेल तो
मामा गेम मॉलमधे जायचं... प्लीSSSSज
हात ओढून म्हणेल तीही
मग हात वळतात स्काईपकडे
तुम्ही दिसता बोलता
दूधाची तहाना भागते ताकावर
उरलेल्या वेळात मात्र जाणवतं
परत एकदा...
ईस्त्री केलेलं घर
रीकामंच असतं खरंतर
घरात ईन मीन चार डोकी
चौघांचेही डोळे बघत असतात वाट
पण चहूबाजूला दिसतात फक्त आठवणी
अन मग पलटायची पानं कॅलेंडरची
तुमच्या पुढच्या भेटीपर्यंत
तोपर्यंत आहेतंच... आठवणी

मामा
(पुढल्या वेळेस तोही बोलेल स्पष्ट अन
तीही करेल जरा जास्तंच हट्ट...
वाट बघतोय मीही हट्टीपणानी)

डुलकीची भ्रांत



Photo Source: (AP Photo/Channi Anand) AP

गाड्यांचा धूर धूळ
रस्त्यावरच्या टग्यांची अरेरावी
रणरणतं ऊन
अन साला नेमकं तेव्हाच..
पेट्रोलचा काटा तळाला..
ए.सी. बंद, ओघानंच
सगळं सहन करत
गाडी थांबवली त्यानं..
गजबजत्या चौकात.. नाईलाजानंच...
लाल दिवाही वाकुल्या दाखवत होता त्याला
कपाळावरचा घाम पुसत
तिच्या हालचाली टिपत होता तो
१८-२० वर्षाची असावी
कळकटलेले कपडे अन अंगही..
गाडीजवळ जाताच चेहेऱ्यावर असहाय्य भाव
कोणाला फक्त आर्जवं तर
कोणाच्या गाडीच्या काचेवर टक्‌टक
तिचा स्पर्श होताच..
वैतागून हात झटकणारे अन
शिव्या हासडणारे लोक..
ती मागे वळूनही न पहाता
पसरत होती हात एकेका पुढं
कडेवर रडणारं पोर
धूळीनं माखलेले गाल
आणि गालावर सुकलेले आसवांचे ओघळ
रडून रडून कदाचित थकलेलं तिचं पोर
असंच मान टाकून झोपी गेलं तिच्या कडेवर
मुठभर मासही नाही ना तिच्या ना त्याच्या अंगावर
ती एकेक पाऊल पुढे टाकत असतानाच
कानावर बायकोचा आवाज
"ए खिडक्या बंद कर रे, सोनूला झोप लागलीये... बिचकतोय तो"
सवयीनं काचा वर सरकवताना
ती उभी गाडी शेजारी.. ओशाळभूत नजरेनं त्याच्याकडे बघत..
रणरणत्या ऊनात, धूर धूळ अन कर्कश्श्य गोंगाटात
तिचं पोर निजलेलं शांत...
अन वर सरकवल्या काचेच्या गाडीतही
आम्हाला सोनूच्या डुलकीची भ्रांत

कुणाल प्रकाश रुद्राके

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...