Thursday, March 23, 2023

यू हॅव रीच्ड भाग ३

 

दोघांचा आवाज वाढला, ड्रायवरने खाली उतरत प्रशांतच्या बाजूचा दरवाजा उघडून प्रशांतला हाताला धरुन बाहेर खेचायचा प्रयत्न केला. बाचाबाची वाढली तसे आजूबाजूचे लोक जमा झाले, सकाळचा ड्रायवरंही लोकांचा घोळका बाजूला करत करत गाडीपाशी पोचला. काय तमाशा आहे काय म्हणत गर्दी पांगवली, कॅबवाल्याला समजावत ड्रायविंग सीटवर बसवलं, प्रशांतला सर प्लिज चला मी तुम्हाला ड्रॉप करतो म्हणत बाहेर उतरवलं. प्रशांतंही कसलाही प्रतिकार न करता बाहेर आला आणि निमूट सकाळच्या ड्रायवरच्या गाडीत जाऊन बसला. पूर्ण प्रवासात दोघेही एकमेकांशी बोलले नाहीत, प्रशांतचे घर जवळ आल्यावर मात्र ड्रायवरने न रहावून बोलायला सुरुवात केली. 

सर तुम्हाला ऑकवर्ड पोझिशनमध्ये नाही टाकायचं मला पण सर खरंच काळजी वाटली म्हणून बोललो सकाळी. स्मशानात जाऊन बसताय सर दिवस दिवसभर, जिथे सामान्य माणूस जायचं टाळतो, जायला घाबरतो, नाईलाज म्हणून जातो, अगदी स्मशानाच्या रस्त्यावरुन जायचं टळण्यासाठी रस्ता बदलून वेळप्रसंगी लांबच्या रस्त्यानेही जातो, अंत्यविधीला गेलाच कुणाच्या तर जमेल तितक्या लवकर तिथून बाहेर पडतो, सगळ्यांना माहीती असतं कि हेच आपलं शेवटचं डेलस्टीनेशन हेच आहे तरी आपण ईथे कधीच येणार नाही या अविर्भावात स्वतःला फसवत जगतात, होताहोईस्तोवर सगळेचजण तिथे जाणं टाळतात तेच स्मशान तुम्ही रोज सकाळी उठून धावतपळत गाठता. हे माझ्या डोक्याबाहेरचंय, विचित्रंय सर हे. का करताय असं, प्लिज नका करु, मानसिक संतुलन बिघडून जाईल अशानं तुमचं. उद्या तुमच्या ऑफिसमध्ये कळलं कि दिवसभर तुम्ही स्मशानातून काम करताय तर काय परीणाम होतील याचा तरी विचार करा सर. 

इतका वेळ शांत बसलेला प्रशांत खाली उतरता उतरता म्हणाला मला बरं वाटतं म्हणून मी जातो तिथे. एनीवे थॅंक्स.

सर बरं वाटतं? पण हे असं बरं वाटणं नॉर्मल नाहीये ना, तुम्हाला एक सांगू का सर म्हणत तो थोडा चाचपडत बोलला कि स...सर गैरसमज करुन घेऊ नका पण तुम्ही एखाद्या सायकॅट्रीस्टकडे का जाऊन येत नाही?

त्याच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत प्रशांत म्हणाला मी वेडा नाहीये, वेडा नाहीये मी. पैसे किती झाले?

रागावू नका सर पण... बरं जाऊद्या, मी काही पैशासाठी तुम्हाला सोडायला नाही आलोय आत्ता, तुम्ही तर राईडंही बूक केली नाहीयेत. हे माझं कार्ड ठेवा सर, छोटासा बिजनेस ए आपला ट्रॅव्हल्सचा. कधी काहीही लागलं तर फोन करा, माझं नाव निलेश आहे म्हणत त्याने त्याचे नील ट्रॅव्हल्सचे विजिटींग कार्ड प्रशांतच्या हातात दिले.

थॅंक्स म्हणून कार्ड घेत अरे पण पैसे किती झाले ते सांग ना म्हणूम प्रशांतने त्याला आग्रह केला.

सर प्रत्येक गोष्ट पैशासाठी नाही करत माणूस म्हणून त्याने कॅब चालू केली.

मग कशासाठी हे...

सर, तुमचं डेस्टीनेशन ते नाही हे आहे हे सांगायाला, असं म्हणत निलेश हसून निघून गेला.

निलेश गेला पण रात्री उशिरापर्यंत प्रशांतच्या कानात त्याचे शब्द घुमत राहीले. सायकॅट्रीस्टकडे जाऊन या, ते तुमचं डेस्टीनेशन नाहीये, ऑफिसमध्ये कळलं तर काय होईल? मानसिक संतुलन बिघडून जाईल अशानं तुमचं. फिरुन फिरुन तीच ती वाक्य कानात घुमत होती, उत्तरोत्तर आवाजंही वाढत राहीला. डोक्यात घण घातल्यासारखं वाटत राहीलं ढण्ढण्ढण. त्याने घरातल्या घरात चकरा मारल्या, डोळे मिटून मेडीटेट करायचा प्रयत्न केला पण डोळे मिटल्यावर कैलासचा कानाकोपरा मिटल्या डोळ्यात घुमत रहायचा आणि उघडल्यावर कानात निलेशचे शब्द. 

त्याने मनगटावरच्या घड्याळ बघितलं तेव्हा रात्रीचे अडीच वाजले होते. आत्ता उठावं आणि कैलास गाठावं असं त्याला मनोमन वाटू लागलं. कॅब बूक करण्यासाठी त्याने मोबाईल बाहेर काढला पण परत निलेशंच तर राईड अँक्सेप्ट करणार नाही ना या विचाराने त्याची राईड बूक करायची हिंमतंच होईना. त्याचं एक मन म्हणत होतं कि च्यायला कोण हा निलेश, एक कॅब ड्रायवर साधा, काय संबंध त्याचा, मी काय त्याला आन्सरेबल नाहीये, तो कोण मला कुठेही जाण्यापासून अडवणारा आणि एका बाजूला निलेशचे शब्द कानावर ढण्ढणा आदळत होते, तुमचं मानसिक संतुलन बिघडेल, सायकॅट्रीस्टला दाखवा आणि उद्या तुमच्या ऑफिसात कळलं तर हि सगळ्यात जास्त त्रास देणारी वाक्य होती. कॅब बूक करण्यासाठी परत फोन बाहेर काढल्यावर तो स्वतःशी पुटपुटला ऑफिसमध्ये कळलं तर? साला हा निलेशंच ऑफिसमध्ये जाऊन काही बोलायचा नाही ना? हि शंका मनात आल्या आल्या प्रशांतने पटकन फोन खिशात ठेऊन दिला. या सगळ्या गोंधळात पहाटेचे सव्वातीन वाजून गेले होते. त्याने मनाचा हीय्या करुन ठरवलं साला चालतंच जाऊया, निघण्याआधी खिडकीचा पडदा ओढून बंद करताना त्याने बाहेर डोकावून पाहीलं, नजरेच्या टप्प्यात बसणारा पूर्ण रस्ता निर्जन होता, माणूसंच काय एखादं भटकं कुत्रंही दिसत नव्हतं. 

तो घराला कुलूप लावून रस्त्यावर आला आणि नीलाच्या शाळेच्या दारात त्याला निलेश दिसला, म्हणजे निलेशची कॅब दिसली. भेंचोद हा काय दिवसरात्र मला नजरकैदेत ठेवतो का काय असं म्हणत तो चटकन दोन पावलं मागे सरकला. नीलाच्या शाळेवरुन जाण्याशिवाय त्याच्या घरुन जायला दुसरा रस्ताही नव्हता. तो चरफडत परत घरात आला, धुसफुसत एका जागी बसून राहीला. पंधरा मिनिटांनी खिडकितून डोकावून बघितलं तर रस्ता परत पूर्णपणे निर्जन होता. 

निलेशची कॅब कोपऱ्यावर नव्हती, मनातल्या मनात सुटकेचा निश्वास टाकत तो परत बाहेर आला, घराला कुलूप लावून रस्त्यावर आला तर परत नीलाच्या शाळेबाहेर निलेशची कॅब उभी होती. आपल्याला निश्चितंच भास होतोय असं त्याला वाटू लागलं पण पुढे जाऊन चेक करायची हिंमत होईना. त्याची भयंकर चिडचिड होत होती, काय करावं ते सुचेना तेव्हा त्याने रागारागात पायापाशी पडलेला एक दगड उचलून कॅबच्या दिशेने भिरकावला, खळ्ळकन् आवाज आल्या आल्या त्याला त्याची चूक जाणवली. तो आवाजाच्या दिशेने धावत गेला, नीलाच्या शाळेच्या कोपऱ्यावर आणि पूर्ण रस्त्यावर कोणीच नव्हते, कोणतीही गाडीही नव्हती, सगळीकडे सामसूम होती. त्याने घड्याळात पाहीलं तर, सकाळचे सहा वाजले होते. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला होता, शहर अजून गाढ झोपेत होतं, स्वतःला मिटून घेण्याआधी नीलाच्या शाळेपलिकडची रातराणी नेटानं गल्लीच्या रंध्रारंध्रात सुवास पेरत होती. डोळे मिटून त्याने रातराणी पूर्ण दमाने छातीत भरुन घेतली, क्षणात सबंध रात्रीच्या जागरणामुळे आलेली मरगळ कमी झाल्यासारखं वाटलं त्याला. डोळे उघडून पुढे चालू लागणार एवढ्यात त्याला पायाशी त्याने भिरकावलेला दगड आणि इतस्तः पसरलेले काचेचे बारीक तुकडे दिसले. कुठेही काचेची फुटलेली वस्तू, गाडी काहीही दिसत नसताना ईथे काच कशाची फुटली तेच कळेना, जर एखाद्या गाडीच्या काचेवर दगड लागला तर तो गाडीत जाऊन पडायला हवा, रस्त्यावर दगड पडलाच कसा काय आणि पडला तर पडला पण मग सेकंदात गाडी गायब झालीच कुठे आणि कशी? कि हा दगड, या काचा आणि मी हा दगड भिरकावणं हे सगळंच भास आहे? आधीच पूर्ण रात्रभराचं जागरण त्यात ही असली न उमगणारी अन सुटणारी कोडी. त्याचं डोकं काम द्यायचं बंद झालं होतं, या सगळ्याचं मूळ आपल्याला कैलासमध्ये जायच्या ईच्छेमध्येच आहे असं वाटू लागल्याने त्याने कैलासला जाणं टाळायचंच ठरवलं. रात्रभर अंगमेहनतीचं काम केल्यासारखा तो थकला होता, हा थकवा मानसिक पातळीवरचा जास्तं असला तरी झोपेअभावी शरीरालाही आता रीबूटची गरज वाटत होती. असं असूनंही घरी आल्यावर त्याला झोप येईना. रात्रीत घडलेल्या कोणत्या गोष्टी खऱ्या आणि कोणते भास याबद्दल त्याची पुरती गल्लत होऊ लागली होती, एका पॉइंटनंतर त्याने कसलाही विचार करायचा बंद केलं. साला तो निलेश म्हणाला तसा आपल्या डोक्यावर परीणाम तर नाही ना झाला, सायकॅट्रीस्टकडे जावं लागेल का आपल्याला खरंच, बरं खरंच आपलं मानसिक संतुलन बिघडलं असेल तर आपल्याला कसं कळेल कि आपण सायकॅट्रिस्टकडे जायला हवं? एकामागे एक प्रश्नांची न संपणारी माळंच समोर येत होती, उत्तर मात्र कशाचंच नव्हतं.

आजचा दिवस फार व्यस्तं होता त्याचा, तीनेक तासाचं वर्च्युएल इन्स्पेक्शन आणि उरलेल्या वेळात आय.ए.सो. रीसर्टीफिकेशन ऑडिट होतं. दोन्ही मिटींग्जसाठी त्याला कॅमेरा ऑन ठेवावा लागणार होता त्यामुळे आज कैलासमधून काम करणं अशक्य होतं. शेवटी आज कैलासमध्ये जायलाच नको, साला त्या निलेशची कटकटंही जरा कमी होईल असा विचार करुन त्याने घरातल्या डेस्कवर लॅपटॉप अरेंज केला. सगळी कामं उरकता उरकता संध्याकाळचे चार वाजले, त्याला त्या गडबडीत जेवायचीही शुद्ध राहीली नाही. कामं गुंडाळून त्याने नेपमीपेक्षा लवकरंच सुटी केली. चांगला मग भरुन कडक आल्याचा चहा करुन घेतला आणि तो पिता पिता आता कैलासला कसं जावं हा विचार करु लागला. चहा संपवून काहीतरी मनाशी ठरवल्यासारखा तो उठला, पाण्याची बाटली भरुन घेत घराबाहेर पडला नि थेट चालायला सुरुवात केली. दोन दिवसांपासून तो कैलासला गेला नव्हता, तिकडे जाण्याची हि कसली अनामिक ओढ हे त्याला कळत नव्हतं आणि त्याला याचा विचारंही करायचा नव्हता. चालताना त्याची अस्वस्थता वाढलीये, छातीवर कोणीतरी अवजड वस्तू ठेवून दाबतंय असं त्याला वाटत होतं. त्याने चालण्याचा वेग वाढवला, छातीतली धडधड वाढण्यापलिकडे बाकी काहीच झालं नाही. रस्त्याने चालताना त्याला बाकी काहीही दिसत नव्हतं, सगळं लक्ष कुठे निलेश तर दिसत नाहीये ना यावरंच केंद्रीत झालं होतं. कॅब्जचा महापूर आलाय आणि आपण तो पार करत, कधी कॅब्ज तुडवत चाललोय आणि सगळ्या कॅब्जच्या खिडक्यांतून निलेश हात बाहेर काढून आपल्याला मागे खेचतोय, सर जाऊ नका म्हणतोय आणि आपण त्याला दुर्लक्षून रेटून पुढे चाललोय असं काहीबाही वाटत होतं त्याला. आपण पूर्ण दुर्लक्ष करतोय हे लक्षात आल्यावर सर तुमच्या डोक्यावर परीणाम झालाय, सायकॅट्रिस्टकडे घेऊन जाऊ का म्हणत निलेश भेसूर हसतोय असं वाटू लागलं तसा तो आणखी वेगानं चालू लागला, इतकं कि बघणाऱ्याला वाटावं कि धावतोय तो. काही क्षणातंच कैलासचं गेट ओलांडून तो आत आलाय हे त्याच्या लक्षात आलं तसा छातीवरचं वजन गॅसच्या फुग्यासोबत उडून गेल्यासारखं त्याला हलकं हलकं वाटू लागलं. तो त्याच्या नेहमीच्या पारावर जाऊन बसला, म्युट केलेल्या टिव्हीवर जसं फक्त चित्र दिसत राहतं पण आवाज येत नाही तशी त्याला आजूबाजूची हालचाल फक्त दिसत होती पण कानात कसलाही आवाज येत नव्हता. तो डोळे मिटून शांत बसून राहीला, तिथे पोहोचल्यावर नेमकं शब्दात सांगता येणार नाही असं समाधान त्याला जाणवत होतं. किती वेळ गेला कुणास ठाऊक पण अचानक कुणाच्या तरी आर्त किंकाळीने तो भानावर आला. डोळे उघडून पाहीलं तर आजूबाजूला कोणीही नव्हतं पण शोकाकूल लोकांच्या ओक्साबोक्शी रडण्याचे आवाज येत होते. तो आवाजाच्या दिशेने गेला, एक अंत्ययात्रा नुकतीच स्मशानात दाखल झाली होती. तो थेड्या दूरुनंच अंदाज घेत उभा राहीला. लोकांच्या बोलण्यावरुन कोणीतरी तरुणंच मुलगा गेल्याचं कळलं, अशा बातमीने कोणीही हळहळेल तसाच तो सवयीनं हळहळला. मृताचे आप्तेष्ट दुःखातिरेकाने व्याकूळ झाले होते पण त्यात एकजण अगदी शांतपणे मृतदेहापाशी बसून राहीला होता, त्याच्या डोळ्यात टिपूसंही नव्हता न तो काही बोलत होता, फक्त कोऱ्या चेहऱ्याने मृत व्यक्तिच्या चेहेऱ्याकडे एकसारखा बघत होता. अंत्यविधीची तयारी होत आली तसं एकेका जवळच्या व्यक्तिला मृतदेहापासून दूर करणं आणि समजूत घालणं हे मोठं जिकिरीचं झालं होतं. टाहो फोडणाऱ्या स्वकियांना आवरणं हे भयंकर मोठं आव्हान होतं अंत्ययात्रेतल्या लोकांसाठी. बाकी सर्वांना स्वतःला आवरा, डोळे भरुन शेवटचं बघून घ्या वगैरे समजावत असताना त्याला मात्र लोक म्हणत होते आण्णा असं करु नकोस रे, मोकळा हो, आत दाबून ठेऊ नकोस, त्रास होईल तुला. त्याला कोणीतरी रडायला सांगा रे, रडायला हवा तो, असं दाबून ठेवणं बरं नाही त्याच्या प्रकृतीसाठी. आण्णा मात्र शून्यात नजर रोखून बसला होता, मघधूनंच कोणी काय सांगेल त्या यांत्रिक हालचाली करत होता पण डोळ्यात पाण्याचा थेंब नव्हता. सरण रचून मृतदेह सरणावर ठेवल्यावरंही आण्णा मूकपणे शून्यातंच नजर लावून होता. आजूबाजूचे लोक आण्णा मोकळा हो रे असं दाबून ठेऊ नकोस म्हणून विनवण्या करत होते पण त्याने काहीही फरक पडत नव्हता. सगळे नातेवाईक हवालदिल झाले होते, खांदा गदागदा हलवून आण्णा ए आण्णा म्हणणाऱ्या एकालाही आण्णा प्रतिसाद देत नव्हता. कोणास ठाऊक काय विचार करुन पण प्रशांत त्याच्या जागेवरुन पुढे चालत चालत आण्णापाशी जाऊन थांबला. काहीही न बोलता त्याने आण्णाच्या डोळ्यात पाहीलं, दोन्ही दंडाला पकडून त्याला उभं केलं. ईतका वेळ कोणालाही दाद न देणारा आण्णा उभा राहीला, त्याला घट्ट मिठी मारुन प्रशांतने त्याच्या पाठीवर हात फिरवला अन आण्णाने टाहो फोडला. आण्णाचा आवाज उपस्थितांच्या काळजावर चर्र करत घाव करुन गेला. प्रशांत बाजूला झाला तसा आण्णा मटकन् गुडघ्यावर बसला आणि अनिर्बंध ढसाढसा रडला. प्रशांत निर्विकार चेहऱ्याने तिथून निघून परत पारावर येऊन बसला, झाडाला टेकता टेकता तिथेच आडवा झाला. काल रात्रभराचं जागरण, आजचं दिवसभराचं काम आणि सतत केलेले विचार, भास या सगळ्यामुळे दमलेला तो काहीही कळायच्या आत गाढ झोपी गेला तेव्हा रात्रीचे सव्वा आठ होत आले होते. तो जिथे बसायचा तो पार स्मशानाच्या एका टोकाला कोपऱ्यात होता त्यामुळे तिकडे येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ नसायची आणि म्हणूनंच तो तिथे झोपी गेल्याचं फारसं कोणाच्या लक्षात आलं नाही. ज्यांनी पाहिलं त्यांना कोणी तरी दारुडा खूप दारु ढोसून तिथे पडलाय असं वाटल्याने त्याला कोणीच उठवलं नाही. तसंही कोणता सामान्य माणूस स्मशानात कशाला झोपेल तेव्हा कोणाला वेगळी काही शंका यायला. प्रशांत मध्यरात्रीनंतर जागा झाला तेव्हा सभोवताल लाल पिवळ्या ज्वाळांनी भरुन गेला होता, गार हवेचा झोत आला तशी एखाद्या चितेपाशी जाऊन बसून उब घ्यायची अघोरी ईच्छा त्याच्या मनात आली तसा तो मनोमन चपापला, मनात तीव्र अपराधीपणा दाटून आला आणि अंगावर सरसरुन शहारा आला त्याच्या. दंडापासून मनगटापर्यंत उघडे हात त्याने चोळले, पारावरुन उठला आणि स्मशानातल्या नळ कोंडाळ्यावर गेला, मोठा नळ सोडून त्याने थंड पाण्याचे हबकारे चेहेऱ्यावर मारले, पाठोपाठ हातंही धुतले. खिशातला रुमाल काढून चेहरा आणि हात पुसत तो घाईघाईने कैलासच्या बाहेर पडला तेव्हा पहाटेचे साडेतीन वाजले होते.

चितेची शेकोटी करायचा विचार मनात आल्यामुळे तो भलताच अस्वस्थ झाला होता. पुढचा पूर्ण आठवडा त्याने महत्प्रयासाने कैलासला जायचं टाळलं. त्यानंतरच्या आठवड्यातंही कैलासला जायची अनावर ईच्छा होऊ लागली, ते टाळायचं म्हणून त्याने मुंबईतल्या एका ट्रेनिंगसाठी स्वतःला एनरोल करुन तीन दिवस मुंबई गाठली. पुण्यात परत आल्यावर मात्र त्याला काही केल्या कैलासपासून लांब राहवेना, परत त्या दिवशी झालं होतं तसं छातीवर काहीतरी अवजड वस्तू ठेवून वरुन कोणीतरी दाबल्यासारखं वाटू लागलं त्याला. बराचवेळ ते दडपण सहन करत तो पुणे स्टेशनवरच्या कमसम कॅफेत तसाच बसून राहीला. आता छाती फुटून बारीक बारीक तुकडे आजूबाजूल उडतील असं वाटू लागलं, ताण असह्य झाला तसा त्याने फोन उचलून कॅब बूक केली, नेहमीप्रमाणे ड्रायवरने त्याला कैलासच्या दारात सोडलं, कपड्याची बॅग, लॅपटॉपची बॅकपॅक घेऊन तो जड पावलांनी चालत कैलासमधे शिरला, ईकडे तिकडे न बघता तडक पार गाठला. पारावर टेकून दीर्घ श्वास घेतला नाकात उदबत्त्या, गुलालबुक्का, सुकलेली फुलं, रानफुलं, गवत सगळ्याचा संमिश्र वास आला, तो घशात अडकून जोरदार ठसका लागला आणि त्याला आपल्या टेरीटेरीत आल्याचं फिलींग आलं. नव्याने सिगरेट ओढायला लागलेल्या माणसाला जसा पहिल्या कशला ठसका लागतो डोळे लाल होतात, डोळ्यातून पाणी येतं पण त्याला किक बसते, एक हवंहवंसं डोकं हलकं करणारं फिलींग येतं तसं त्याला होत होतं. त्याने समाधानाने हसत डोळे उघडले, तब्बल बारा दिवसैनंतर तो पारावर येऊन बसला होता. शर्टाच्या बाह्या दुमडत तो नळावव गेला, हात तोंड धुवून एखाद्या साधूने ध्यानस्त बसावं असा तो पारावर येऊन परत डोळे मिटून बसला. संथ लयीत मगाशी ज्या वासाने ठसका लागला होता तोच वास तो छातीत भरुन घेत होता, हळूहळू त्याला तो वास हवाहवासा वाटू लागला होता. त्याला परत अपराधी वाटू लैगलं होतं पण त्याने आज अपराधीप़णाला ओवरपॉवर होऊ द्यायचं नाही असं मनोमन ठरवलं होतं. थोड्यवेळाने पाठ भरुन आली तशी त्याने कपड्यांची बॅग डोक्याखाली घेत पारावरंच अंग टाकून दिलं. निरभ्र आकाशातल्या ताऱ्यांची रांगोळी बघत बघत तो गाढ झोपी गेला. त्या रात्री त्याला कसलीही स्वप्नं पडली नाहीत, दिड आठवड्याने तो शांत झोपी गेला. सकाळी उठला तेव्हा सव्वा आठ वाजले होते, त्याने हाताच्या बाह्या सरळ करत बटनं लावली, तोंडावरुन हात फिरवत जागचा उठला, नीलाच्या समाधीपाशी जाऊन प्रसन्न हसला, आय लव्ह यू म्हणून अर्धा पाऊण तास तिथेच बसून राहीला. मग पारावर बसत त्याने बॅकपॅकमधून लॅपटॉप बाहेर काढला, काही महत्वाच्या मेल्सला रीप्लाय केले, सेटींग्जमध्ये जाऊन आऊट ऑफ ऑफिसचे ऑटो रीप्लाइज ऑफ केले. काल रात्री कमसम मधून पार्सल घेतलेलं सॅंडविच पारावरंच बसून खाल्लं आणि झाडाला टेकत कामाची सुरुवात केली. दहा वाजले होते, कैलासमध्ये वेगवेगळ्या दहाव्याच्या विधीसाठी नातेवाईकांची गर्दी झाली होती. लॅपटॉपचा किबोर्ड बडवता बडवता तो अधूनमधून मान वव करुन बघत होता. कोणाच्या पिंडाला खाती ठेवायचा अवकाश कि वाट बघत असल्यासारखे कावळे शिवत होते तर कोणाला जराशी वाट बघावी लागत होती. पिंडाला कावळा शिवल्यावर इतकावेळ अस्वस्थता परावर्तित करणाऱ्या आप्तेष्टांच्या चेहेऱ्यावर सुटका झाल्याचं समाधान दिसू लागायचं. तुरळक पिंडांना कावळा शिवण्यासाठी जास्त वेळ थांबावं लागत होतं, तोवर घरच्यांची चलबिचल वाढत होती, अस्वस्थ चेहेऱ्याने येरझाऱ्या घालणाऱ्या नातेवाईकांची आणि कुटुंबाची अवस्था पाण्याविना तडफडणाऱ्या माशांसारखी होत होती. ते पुढे येऊन मृतात्म्याला काही बाही करु, कोणालातरी सांभाळू, काळजी करु नकोस आम्ही आहोत वगैरे सांगत होते. एकेक करत जवळपास सगळ्या पिंडांना कावळा शिवला फक्त ‌एक पिंड स्मशानात कावळ्यांचा थवाच्या थवा वर घोंघावत असताना तसच्या तसं पडून राहीलं होतं. पहिली दहा पंधरा मिनिटं सगळे शांत बसले होते, नंतर मग कोणी कोणी कुटुंबातल्या एकेकाला वेगवेगळ्या सूचना करु लागले. आईची काळजी घेईन सांग रे त्याला, मी नीट राहते काळजी करु नका बोल गं, बहिणीला अंतर देणार नाही वचन दे, सूचना थांबेनात. या कोणत्याही गोष्टींनी उपायोग होत नव्हता, कोणीतरी म्हणालं काहीतरी ईच्छा राहीली असणार बघ. घरातल्या एकेकाने पुढे जाऊन आठवेल तसं काय काय बोलून झालं, काहीही उपयोग होईना. बघता बघता पाऊण एक तास झाला, घरातले सगळे हतबल झाले होते, किती तरी कावळे वर घोंघावत असताना एकही कावळा तिकडे फिरकेना, एक दोनदा एक कावळा पिंडापाशी क्षणभर बसला पण पिंडाला न शिवताच परत उडून गेला. कोणीतरी चटकन म्हणालं अरे थोडं लांब थांबा रे त्या पिंडापाशी जाऊ नका सारखे, कावळे खाली यायलाच घाबरतायेत. सगळे पटकन मागे सरकले, कोणी झाडाच्या सावलीत बसून तर कोणी हात पाठीमागे बांधून उभे राहीले. कोणी घोळक्यात उभं राहून एकमेकांच्या कानांत कुजबुजंत होते. या सगळ्यात आता एक तास झाला होता, स्वतःच्याही नकळत प्रशांत पारावरुन उठला, चालत चालत त्या कुटुंबापाशी गेला, क्षणभर तिथे थबकला आणि इकडे तिकडे जणू कोणीच नसल्यागत चालत राहीला ते पिंड ठेवल्या जागी जाऊनंच थांबला. एवढ्यात मागून कोणीतरी ओरडलं, अरे कोण ए हा मागे सरका सांगितलेलं कळत नाही का, परत उडले बघा ते कावळे. प्रशांत शांतपणे तिथे उभा राहीला, एकवार मान वर करुन आभाळातल्या कावळ्यांकडे पाहिलं, एकदा जमिनीवर ठेवलेल्या पिंडाकडे पाहिलं आणि मनातंच निश्चिंत रहा म्हणाला. सगळे वैतागून त्याच्याकडे बघत असतानाच अचानक एका कावळ्याने सूर मारुन खाली येत पिंडावर चोच मारली आणि बघता बघता चारपाच कावळ्यांनी अक्षरशः पिंडावर झडप घातली. प्रशांत मागे वळून न बघता आल्या पावली परत पारावर जाऊन बसला, समाधानी चेहऱ्याने ते कुटुंब निघून गेलं.

जाता जाता त्या कुटुंबातल्या काहीजणांनी दूरुनंच हात जोडून तर काही वयस्कर लोकांनी दोन्ही हातांनी आशिर्वाद दिल्यासारखं केलं त्याच्याकडे बघून. त्याला हे लोक असे का वागतायेत हे उमगलंच नाही.

कोणीतरी संमोहित केल्यासारखा तो पारावर येऊन बसला आणि क्षणभरानं खडबडून जाग आल्यासारखा भानावर आला. आत्ता घडलेला पूर्ण प्रसंग त्याला स्वप्नं किंवा भास असल्यासारखा वाटू लागला. हे घडलंच नाहीये आपल्याला भास झालाय, उघड्या डोळ्यानं आपण स्वप्न बघतोय असंच तो स्वतःला समजावत राहीला. या असल्या अंधश्रद्धांवर त्याचा बिलकुल विश्वास नव्हता, रादर स्पष्टंच सांगायचं तर या अंधश्रद्धांचा त्याला मनापासून तिटकारा होता. साला हे असलं काहीतरी आपल्याकडून होणं शक्यंच नाही, हा भासंच होता, हो भासंच होता निश्चित, तो वारंवार स्वतःला बजावून सांगत होता. तो जितक्या वेळा हा भासंच होता हे मनातल्या मनात रीपिट करत होता तितक्या वेळा त्याला मगाचा प्रसंग ठळकपणे आठवत होता, इतका कि आता तो प्रेक्षक म्हणून पारावर बसला होता आणि तोच प्रसंग परत त्याच्या डोळ्यांसमोर घडत होता. तो स्वतःला चालत चालत पिंडाकडे जाताना बघत होता, त्याने मनातल्या मनात निश्चिंत राहा म्हणालेलं त्याला सुस्पष्ट ऐकू आलं. तो फिरुन परत येताना त्याच्या मागे पिंडावर तुटून पडलेला कावळ्यांचा थवा आणि ते बघून चेहेऱ्यावर समाधान घेऊन तिथून निघालेले मृताचे नातेवाईक दिसले. निश्चिंत राहा, निश्चिंत राहा वारंवार त्याच्या कानात स्वतःच्याच आवाजातले शब्द घुमू लागले. त्याचा या कशावरंच विश्वास बसेना, साला निलेश म्हणतो तसं आपल्या डोक्यावर परीणाम तर नाही ना झाला? त्याच्या डोक्यात नवा प्रश्न आला. मग त्याला आठवलं, डोक्यावर परीणाम झालाय असं निलेश वास्तविक पाहता कधी म्हणलाच नाहीये त्याला. तो फक्त म्हणाला होता कि सर तुम्ही सायकॅट्रिस्टकडे का जात नाही? डोक्यावर परीणाम झालाय हे आपणंच ॲड केलंय. आपणंच बिंबवतोय आपल्याच डोक्यात कि आपल्याच डोक्यावर परीणाम झालाय. झालाय का खरंच? च्यायला असा प्रश्नं का येतोय डोक्यात आपल्या? नको त्या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची नव्हती कारण एकतर ती चुकीचीच मिळण्याची शक्यता होती किंवा खरंतर प्रश्नंच चुकिचे होते. या सगळ्या विचारात तो पारावरुन तिरीमिरीत उठला. निश्चिंत राहा, डोक्यावर परीणाम झालाय हेच फिरुन फिरुन कानात वाजत होतं. त्याने बॅगा उचलल्या आणि अक्षरशः कैलासच्या दरवाजाकडे धावत सुटला. छातीवर परत एकदा अवजड वस्तू ठेऊन वरुन कोणीतरी दाबल्यासारखं वाटू लागलं त्याला, तसा त्याने धावण्याचा वेग अजूनंच वाढवला. कैलासच्या बाहेर आल्यावर ऑटोमॅटीकली कोणीतरी बटन दाबून जादू केल्यागत त्याच्या छातीवरचा दबाव निवळला. चौकात आल्यावर लोकांची, गाड्यांची वर्दळ बघून त्याला स्मशानातून बाहेर पडल्याची जाणीव झाली आणि तो धापा टाकत भर चौकात खाली बसला. लाकडाचा भुस्सा गिळल्यासारखा घसा कोरडा पडला होता, त्याने घाईघाईत बॅकपॅक पाठीवरुन उतरवून त्यातली पाण्याची बाटली बाहेर काढली, ती रीकामी होती. त्याला दरदरुन घाम फुटला होता, अंगातला शर्ट पिळून घ्यावा इतपत ओला झाला होता. तो जमेल तेवढा दीर्ध श्वास घेऊन छातीच्या भात्यात हवा भरुन घ्यायचा प्रयत्न करत होता. एव्हाना कोणीतरी स्मशानातून धावत येऊन अचानक चौकात बसलाय आणि पाठीवरची बॅग उघडून त्यातल्या वस्तू बाहेर काढतोय हे लक्षात आल्याने त्याच्या बाजूने लोकांनी घोळका केला होता. गर्दीकडे बघून उजव्या हाताचा अंगठा वर काढत पाणी द्या म्हणून तो खुणावत होता. कोणीतरी पाणी देईपर्यंत गर्दीतून वाट काढत निलेश तिथे आला आणि प्रशांतला अशा अवस्थेत रस्त्यावर बसलेला पाहून पुरता गांगरला. चला चला जरा हवा येऊ द्या, बाजूला व्हा, गर्दी कमी करा म्हणत त्याने गर्दी पांगवली. प्रशांतचे पाणी पिऊन झाल्यावर बाटली घेऊन गर्दीतल्या ज्या तरुणाची होती त्याला परत केली. प्रशांतच्या बॅगेची चेन लावत बॅग उचलून पाठीला लावली, कपड्यांची बॅग उचलत असताना प्रशांत त्याला अडवत असू दे म्हणाला. त्याने प्रशांतकडे एक निश्चयी कटाक्ष टाकून बॅग उचलली आणि चला म्हणाला. प्रशांत त्याच्यामागे निमूटपणे चालत कॅबमध्ये जाऊन बसला.

पुढचा एक किलोमीटरभर कोणी काहीच बोललं नाही, मग प्रशांतने तो ऑकवर्ड सायलेंस ब्रेक केला.

थॅंक यू निलेश

….

मी ॲक्च्युअली, असं म्हणून पुढे काय बोलावं यासाठी शब्दांची जुळवाजुळव करु लागला. त्याचा स्ट्रगल बघून निलेश म्हणाला असू द्या सर कसलीही स्पष्टीकरणं नकोएत मला आणि अर्थात मी कोण आहे तुम्ही मला कसलीही स्पष्टीकरणं द्यायला? बाकी काही नाही पण नशीबाने मी आत्ताच चौकात एक राईड संपवली होती आणि अचानक झालेली गर्दी बघून मी काय झालंय हे चेक करायच्या कुतुहलापोटी तिथे आलो, बघतो तर भर रस्त्यात बसलेल्या तुमची ही अशी अवस्था. सर बघवत नाही ही अशी एखाद्या चांगल्या घरातल्या माणसाची अवस्था. घरी कोण कोण असतं तुमच्या? त्यांच्याशी मनमोकळं बोला एकदा हवंतर, सायकॅट्रीस्टकडे नाही जायचं हे समजू शकतो पण घरातल्या माणसांशी तरी बोला. सर अशाने काहीतरी विपरीत होऊन बसेल, माणसानं बोलून मोकळं होणं गरजेचं असतं. सगळ्या गोष्टी आत दाबून ठेवाल तर प्रेशर कुकर होईल एक दिवस, आणि प्रेशर कुकरलाही प्रेशर रीलीज करावं लागतं नाहीतर बर्स्ट होतो एकदाच.

प्रशांत शून्यात नजर लावून शांत बसून ऐकत होता. घर आलं तशी निलेशने गाडी थांबवली. कधी बोलावं वाटलं तर सांगा सर, मी येईन म्हणाला. प्रशांत गाडीतून उतरला, खिडकीतून वाकून आत बघत निलेशला म्हणाला सॉरी यार, आणि खरंच थॅंक्स. दोघंही एकमेकांकडे बघत असताना प्रशांतने त्याला विचारलं घरी येतोस? म्हणजे ये ना चहा घेऊया एकत्र. निलेश काहीही बोलायच्या आधी नाही म्हणू नकोस यार चल म्हणत निलेश येणार या खात्रीने त्याने चालायला सुरुवात केली. निलेश रस्त्याच्या कडेला व्यवस्थित गाडी पार्क करुन येईपर्यंत प्रशांत कुलूप उघडून घरात गेला होता. सोफ्यावर बसलेल्या निलेशच्या पुढ्यात पाण्याचा ग्लास ठेवून प्रशांतने किचनमध्ये जाताजाता काय घेशील चहा कि कॉफी विचारलं. काहीही चालेल सर म्हणत त्याने सभोवार नजर फिरवली. तीन पांढऱ्या शुभ्र भिंती आणि एक निळीशार. मोठ्या खिडकीत ठेवलेल्या फुलांच्या कुंड्या, त्यातली काही फुलं सुकलेली तर काहींनी तग धरलेला. गेल्या काही दिवसांत त्यांना पाणी दिलं गेलं नसावं. निळ्या भिंतीवर पांढऱ्या रंगाची नाजूक नक्षी काढलेली, मधोमध एक मोठ्ठा कपल फोटो, पडणाऱ्या तिला हात देणारे सर आणि तशातंही खळखळून हसणारे ते दोघे. कदाचित ठरवून काढलेला कॅंडीड फोटो. ही नक्कीच सरांची बायको असणार असं स्वतःशीच म्हणत तो उभा राहत भिंतीवरची बारीक, सुबक नक्षी न्याहळू लागला आणि तेवढ्यात दोन कप चहा घेऊन प्रशांत हॉलमध्ये आला.

सर घर सुंदर आहे तुमचं

थॅंऽक्यू!

स्पेशिअली या निळ्या भिंतीवरची नक्षी आणि चित्रं सुरेख आहेत.

थॅंक्स निलेश, ती सगळी कलाकारी नीलाची, आय मीन माझ्या बायकोची.

आईशपथ, ग्रेटंच ओ सर. मला वाटलं होतं प्रोफेशनल आर्टीस्टकडून करुन घेतलंय. प्रोफेशनल आर्टीस्टंच आहेत का मॅडम?

नाही नाही रे, हे आपलं आवड म्हणून.

ओह, भारीच आहे हे सर. मॅडम नाहीत वाटतं आज घरी?

हंमम, नाहीये, ती नसते इथे आता.

इथे नसते? म्हणजे? ओह आय ॲम सॉरी मी फारंच पर्सनल गोष्टी…

नाही रे दॅटस ओके, ती नसते म्हणजे ती गेली साडेचार महिने झाले.

काऽय..  स्स सर सॉरी, तुम्ही त्यामुळे कैलास…

नाही नाही तसं नाहीये ते

मग, म्हणजे.. तुम्हाला कंफर्टेबल असेल तर… कारण बोलल्याने, म्हणजे फाऽयदा, आय मीन

अरे हो कळलं, एवढा अडखळू नकोस. सांगतो काय झालं ते.

असं म्हणून प्रशांतने निलेशला नीलाचं जाणं ते कॅबने त्याला चुकून कैलास स्मशानभूमीपाशी सोडणं पासून ते स्मशानात जायला चाचपडणाऱ्या त्याला स्मशानात वेळ घालवायला कसं आवडू लागलं हे सगळं सांगितलं.

सर हे कायच्या काय विचित्र वाटतंय.

आहेच विचित्र अरे.

म्हणजे तुम्हाला कळतंय तर.

हो, कळतंय पण वळत नाहीये दाद्या.

सर एक बोललो तर रागावणार नाहीत ना?

बोल बोल, मला माहितीये तू काय बोलणारेस ते.

काय?

तुझा विश्वास बसत नाहीये या गोष्टीवर असंच ना?

आं, क काय?

नाही ना बसते विश्वास.

हो, म्हणजे नाही… म्हणजे विश्वास बसत नाहीये. पण तुम्हाला कसं कळलं.

अरे या गोष्टी माझ्यासोबत घडलेल्या असूनंही माझाच विश्वास बसत नाहीये तर तुझा काय विश्वास बसणार. बाय द वे सगळ्यात जास्तं अविश्वसनीय काय वाटलं तुला? एक उत्सुकता म्हणून प्रशांतने त्याला विचारलं.

अं.. सग..ळ्यात जास्तंऽ सांगायचं तर म्हणत निलेशने अडखळत सांगायला सुरुवात केली. सगळ्यात जास्तं हेच कि तुम्ही कॅब बुक करताना तुमच्या घरचं लोकेशन टाकल्यावर कॅब तुम्हाला कैलास स्मशानभूमी बाहेर नेऊन सोडते. हे केवळ अशक्य आहे सर.

का अशक्य आहे?

मी गेली सहा वर्ष कॅब चालवतोय, हि सगळी सिस्टिम टेक्निकली एवढी स्ट्रॉंग आहे ना कि जीपीएस गंडणं आणि ते ही वारंवार गंडणं हि अशक्यप्राय गोष्ट आहे सर.

प्रशांत जागचा उठून खिडकीपाशी जाऊन उभा राहीला आणि बाहेर बघत बघत म्हणाला खोटं बोलत नाहीये मी, एक दिवस मी प्रूव करुन दाखवेन तुला निलेश.

सर तुम्ही खोटं बोलताय असं म्हणायचं नाहीये मला पण..

बरं ते सोड म्हणत प्रशांतने निलेशचं वाक्य मधेच तोडत खिडकीतून बाहेर बोट दाखवत त्याला विचारलं काय रे ही मागची काच कशी काय फुटली?

काय सांगू सर तुम्हाला, मध्यंतरी एक आठवडा फुल नाईट केली. एकदा घरी जाताना कोणीतरी कैलास स्मशानाबाहेर दगड मारला फेकून.

निलेश कैलास बाहेर नाही म्हणून एक मोठा पॉज घेतला त्याने आणि म्हणाला याऽ पलिकडच्या कोपऱ्यावर.

सर कैलास बाहेर घडला ओ प्रकार, इथे पलिकडे नाही.

निलेश जऽरा थांब, मी तुला तारीख आणि वेळंही सांगतो कधी झालंय हे. तो आठवायचा प्रयत्न करतोय हे त्याच्या चेहेऱ्यावरुन कळत होतं. त्याच दिवशी ऑडीट होतं असं म्हणत त्याने खिशातला फोन काढून काहीतरी चेक केलं आंनि म्हणाला २४ सप्टेंबर, सोमवार होता. सकाळचे पाच अठ्ठावन्न झाले होते. तू माझ्या गल्लीच्या कोपऱ्यावर उभा होतास.

सऽर तारीख तर बरोबर सांगताय, वेळंही कदाचित तीच असेल पण

पण काय निलेश? तू कोपऱ्यावर गाडी घेऊन उभा होतास. मला कैलासमध्ये जायची जाम अनावर ईच्छा झाली होती. मी याच खिडकीतून बाहेरचा अखंड रस्ता स्कॅन केला, कोणीही नव्हतं रस्त्यावर. मग मी कुलूप लावून घराबाहेर पडलो तर कोपऱ्यावर तू दिसलास. आय मीन एकदा दिसलास, परत गायब झालास आणि परत आलास, जणू माझ्यावर पाळत ठेवत होतास लपूनछपून.

कैलासला जायचं तर तो कोपरा पार करावाच लागणार होता. तू तिथून हलण्याची चिन्हं दिसेनात, मला भास होतोय कि तू खरंच तिथे आहेस हे कळेना तेव्हा तिरीमिरीत मी एक दगड उचलला आणि कसलाही विचार न करता तुझ्या गाडीच्या दिशेने भिरकावला. दगडाने अचूक तुझ्या गाडीच्या मागच्या काचेचा वेध घेतला, काही कळायच्या आत काच फुटली आणि आपली चूक झालीये हे मला जाणवलं. मी लगबगीने तिथे आलो पण तोवर तू गेला होतास, क्षणभरापूर्वी डोळ्यासमोर कार होती पण मी तिथे पोहोचलो तर कसा कोणास ठाऊक तू तिथे नव्हतास, पण तिथे दगड आणि काचेचे विखुरलेले तुकडे होते.

सर, गोष्ट तर भारी सांगिलीत तुम्ही पण डॉटस् कनेक्ट होत नाहीयेत. म्हणजे बघा कामधंदा सोडून मी तुमच्यावर पाळत का ठेवेन? कोणतीही राईड नसताना सकाळी सहा वाजता तुमच्या घराच्या कोपऱ्यावर का थांबून राहीन? आणि जर तुम्ही फेकलेल्या दगडाने गाडीची काच फुटली असेल तर सर दगड रस्त्यावर कसा, तो तर गाडीत पडला पाहीजे ना?

एक्झॅक्टली, मलाही तेच वाटलं होतं कि दगड बाहेर कसा पडला? पण पडला होता खरं.

सर तुमच्या घरचं लोकेशन टाकल्यावर कॅब स्मशानाबाहेर सोडते हे अशक्य आहे हे मी सांगितलं तेव्हा तुम्ही खिडकीत उभे होता, पुढे काही बोलता येणार नाही हे लक्षात आल्यावर तुम्हाला विषय बदलायची गरज वाटली आणि तेवढ्यात तुम्हाला खाली माझी गाडी दिसली, मागची काच फुटलेली. मग काय तुम्ही गोष्ट रचलीत पण दुर्दैवाने ती खोटी आहे.

डोकं फिरलंय का तुझं, तू आहेस कोण मी तुझ्याशी खोटं बोलायला. काही कशाला लपवेन मी तुझ्यापासून?

सॉरी सर, पण माझ्या गाडीची काच कैलासच्या पलिकडच्या चौकात फुटलीये हे मी प्रूव्ह करु शकतो. कारण मी इंश्युरंससाठी अप्लाय केल्यावर त्या सर्वेयरने समोरच्या दुकानातल्या सीसीटिव्हीवरुन तो प्रसंग डाऊनलोड करुन घेतलाय, त्यात फक्त काच फुटताना दिसतेय, कोणी दगड फेकला ते दिसत नाहीये. आणि तुमचं म्हणणं खरं मानायचं तर तुम्ही फेकलेला दगड इथून सहासात किलोमीटरवर जाऊन थेट माझ्या गाडीची काच फोडू शकणार नाही ना?

परत एकदा आपल्याला भास तर होत नाहीयेत ना असा विचार प्रशांतच्या मनात येऊ लागला, तो विचार झटकून टाकावा तर आपल्या डोक्यावर परीणाम झालाय असं वाटू लागलं त्याला.

सर प्लिज गैरसमज करुन घेऊ नका पण मॅडमच्या जाण्यानं कदाचित तुम्हाला प्रचंड मानसिक धक्का बसलाय, त्या ताणामुळे तुम्हाला भास होत असतील, न घडलेल्या गोष्टी घडतायेत असं वाटत असेल तर यासाठी तज्ञांची मदत घ्यायला काय हरकत आहे. बाकी सगळं सोडा सर, कदाचित भास होत नाहीयेत, हे खरंच घडतंय असं जरी आपण मान्य केलं तरी त्यामुळे तुमचं रुटीन पार डिस्टर्ब होत नाहीये का? त्रास होत नाहीये?

तुला खरं सांगू निलेश त्रास तर सोडंच पण मला समाधान मिळतं स्मशानात बसून. तिथे जाण्याला काहीही कारण नसतं पण तिथे गेल्यावर सगळा स्ट्रेस गेल्यासारखं हलकं हलकं वाटतं.

सर पण हे विचित्र नाही वाटत तुम्हाला? रेग्युलर आयुष्य डिस्टर्ब नाही होत याने, दूरगामी परीणाम काय होतील याचे, विचार तरी केला आहे का कधी? बाकी सगळं सोडा पण मॅडम आज असत्या तर तुम्ही हे असं केलं असतं? आणि केलं असतं तर मॅडमला काय वाटलं असतं. खूप साधेसाधे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारले तर तुमचं तुम्हाला कळेल हे चुकिचं आहे.

अरे यार मला हा सगळा विचार करायचाच नाहीये, खूप दिवसांनी कशाने तरी समाधान मिळतंय मला, ते मनमोकळेपणानं कसलाही विचार न करता मला घेऊ दे.

पण सर...

हे बघ हे असलं लेक्चर ऐकावं लागतं आणि तू बघितलंस तर टोकतोस हे टाळण्यासाठी मी अक्षरशः दिवसा ऐवजी रात्री स्मशानात जायला सुरुवात केलीये आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रात्री तिथे जाणं हे जास्तंच समाधान देणारं आहे, ती अनुभूती मी शब्दात वर्णन करुच शकणार नाही, रादर मला करायचीही नाही. नाही म्हणायला काही रेअर अनुभव थोडे.. असं म्हणून तो बोलायचा थांबला.

सर तुम्ही हे थांबवावं असं मला वाटतं म्हणून तो ईतका वेळ हातात धरलेला चहाचा रीकामा कप टिपॉयवर ठेवत जायला निघाला.

थॅंक्स निलेश.. भेटूया परत, तेव्हा मी पुराव्यासहित सिध्द करेन कि लोकेशन घरचं टाकलं तरी कॅब कैलासलाच सोडते.

हंह.. मागेही सांगितलं होतं, परत सांगतो सर काहीही मदत लागली तर फोन करा, नंबर आहे आता तुमच्याकडे माझा आणि हो खरंच सायकॅट्रिस्टकडे जाऊन या मदत होईल. दिवसरात्र विनाकारण स्मशानात राहणं, स्मशानाची ओढ वाटणं नॉर्मल माणसाचं लक्षण नाहीये सर. येतो मी.

साला हा निलेश मदत करतो याबद्दल काही वादंच नाही पण जेव्हा जेव्हा भेटतो तेव्हा डोक्यात किडे सोडूनंच जातो यार. मलाही कळतंय कि, कळत नाही अशातला काही भाग नाहीये कि स्मशानात राहणं हे काही ठिक नाही, कोणत्याही नॉर्मल माणसाला स्मशानाचं अट्रॅक्शन वाटणारंच नाही, रादर येताजाता वाटेतंही स्मशान लागू नये म्हणून दक्षता घेणारी माणसं असतात आणि आपण येता जाता सोडा आवर्जून एखाद्या मॉलमध्ये... छ्यॅ मॉल नाही एखाद्या योग शिबिरामध्ये मेडिटेशनला गेल्यासारखं स्मशानात जाऊन बसतोय. स्मशानात बसणं हेच आपलं मेडिटेशन झालंय च्यायला, काय असेल ते असेल तिथे बसलं कि शांत वाटतं, डोक्यात चांगलेवाईट कसलेच विचार येत नाहीत, कसले प्रश्न पडत नाहीत, न कशाची चिंता वाटते न काळजी, या भौतिक जगाशी जोडणारे सगळे पाश सुटून जातात, एखादं बटन दाबून स्वतःला जगाशी डिसकनेक्ट करीवं तशी अवस्था होते, नाही म्हणायला आपण असतो या जगातंच पण या जगाचे नसतो. नेमक्या शब्दात सांगता येणार नाही अशी काहीशी विचित्र पण हवीहवीशी, न धड अध्यात्मिक ना निद्रिस्त अवस्था. जगण्याला क्षणभंगूर का म्हणत असतील लोक काय माहीत, खरंतर मरण क्षणात येतं पण त्याआधी आणि त्यानंतरंही जगण्याला सीमाच नाही. स्मशानातल्या त्या ट्रांसमध्ये मृत्यूपश्चात जीवन अनुभवतो कि काय आपण? साला हे नेमकं कसलं स्ट्रेसबस्टर? हा भलताच विलक्षण प्रकार आहे... कि निलेश म्हणतो तसा विचित्र प्रकार आहे. एवढं मात्र नक्की कि नॉर्मल नाहीये हे. जगण्या अलिकडे नाही, मरणाच्या पलिकडे नाही, साला कोणत्या अवस्थेबद्दल बोलतोय आपण, मरणाला क्षणभंगूर म्हणतोय? निलेश म्हणतो तसा डोक्यावर परीणाम तर नाही ना झाला? फ्फक, निलेश आपल्याला डोक्यावर परीणाम झालाय असं एकदाही बोलला नाहीये. आ....ह, रागाच्या भरात त्याने टिपॉयवर आवळलेली मूठ दाण्णकन् आपटली आणि त्या हादऱ्याने निलेशने मगाशी ठेवलेल्या रीकाम्या कपातला चहा उसळून बाहेर आला. री का म्या कपातला चहा? व्हॉट द फक, हा कप आत्ता दोन मिनिटापूर्वी रीकामा होता, निलेशने ठेवला तेव्हा आपण बघितलं होतं, कप रीकामाच होता कि आपल्याला भास झाला कप रीकामा असल्याचा. आपल्या वागण्याचा राग येऊन चहा तसाच ठेऊन गेला कि काय निलेश? पण मग आपल्याशी बोलता बोलता निलेशने चहाचे दोनतीन घोट घेतल्याचं आपल्याला स्पष्टं आठवतंय. भेंचोद दोनतीन घोट घेतले असतील तर कपातून चहा उसळून बाहेर येण्याएवढा काठोकाठ कसा काय भरलेला असू शकतो? साला चहा प्यायलाच नाही का निलेश? पण मग मगाशी कप मोकळा कसा होता? चहा पिणं हे तर नंतर, निलेश आला होता ना आपल्यासोबत घरी? कि... तो आल्याचाच आपल्याला भास झाला? हा विचार डोक्यात येताच त्याच्या अंगावर सर्रकन काटा आला अन पुढच्याच क्षणी त्याला दरदरुन घाम सुटला, मगाशी कैलासबाहेर झाला होता अगदी तसाच किंबहुना थोडा जास्तंच घसा लाकडाचा भुस्सा, वीटेची भुकटी गिळल्यासारखा कोरडा झाला. आता काय करावं हे सुचेना तसा त्याने टिपॉयवरचा कपभर चहा घटाघटा पिऊन टाकला, साला एखाद्या हवाबंद डब्यात जसं काहीही भरता येत नाही तसाच अगदी तसाच चहा त्याच्या घशातून खाली उतरत नव्हता. या सगळ्याचा त्याच्या मनावर भयंकर ताण आला, कोणीतरी संथपणे मेंदू पोखरुन आरपार बीळ पाडत असल्यासारखं वाटू लागलं, हातातला कप टिपॉयवर ठेवत पाय पसरुन तो सोफ्यावरंच आडवा झाला आणि काही कळण्याआधी स्वतःला त्याने झोपेच्या स्वाधीन करुन टाकलं.

      

क्रमशः             

टू डू लिस्ट

 


रोजच्या टू डू लिस्ट सोबत फरफटत

दिवस तोल गेल्यासारखा संपतो क्षणात

अन रात्रीला खो देऊन, येतो परत फिरुन पापणी लवेस्तोवर

आपण स्तब्ध एका जागी, अविचल

मन उधळतं चौखूर, भरारुन शिवून येतं आभाळाला

अन थकून छातीच्या पिंजऱ्यात धडधडंत राहतं एका लयीत

रुटीनच्या गिरणीत भरडत राहतात दिवसा मागून दिवस

यातून बाहेर पडायचंय म्हणत

जात्याच्या दोन्ही तळ्यांना छन्नी हतोड्यानं टाकी लावतो आपण मन लावून

सभोवताली बघतो तेव्हा दिसते गर्दी

गर्दीतला प्रत्येक चेहरा आपलाच असतो

तरीही एकाही चेहेऱ्याला आयडेंटीटी नसते स्वतःची

आपलीच ओळख पटत नाही आपल्याला

आरश्यानं फसवल्यासारखं आपल्याच धडावर अनोळखी चेहरे दिसू लागतात

एका पाठोपाठ चेहरे तपासताना आपण कोण हेच आठवेनासं होतं

वर्तमानाच्या या केऑसमधून वाट काढत मागे चालावं वाटतं फार

पण चकवा लागल्यासारखे आपण येत राहतो फिरुन फिरुन तिथेच

मागे नेणारी वाट हरवलीये हे कळेपर्यंत

काल आणि आजच्या तळी मधोमध भरडतंच राहतात दिवस निरंतर

मागे निसटलेल्या कोऱ्या पानांवरची अस्सल कविता

मन भरुन वाचावी वाटते

पण गर्दी रेटत राहते नेटानं पुढं

रुटीनचा दगड पायाला बांधून

ढकलते दिवसाच्या गडद विहिरीत

टू डू लिस्टचा गाळ उपसत गाठता येत नाही तळ

मग फरफट… दिवस संपवण्यासाठी

आणि रात्र उशाला घेण्यासाठी परत… परत परत

 

केपी आर


Friday, January 27, 2023

यू हॅव रीच्ड भाग २

 

कदाचित त्याच्या चेहेऱ्यावरच्या संभ्रमामध्ये आपल्या प्रश्नांची भर नको किंवा आपल्या मनातल्या प्रश्नांना प्रशांतचा चेहेऱ्यावरचा संभ्रमंच पुरेशी उत्तरं देतोय असं त्याला वाटलं असावं.

झाले एवढे गैरसमज, प्रश्न आणि अवघडलेपणा आजच्या दिवसापुरते बास होते त्याला. प्रशांतचं वागण विचित्र,ऍबनॉर्मल कि गूढ नेमकं कोणत्या कॅटेगरीत बसतंय हे राजेशला कळत नव्हतं. प्रशांत न सांगता अचानक गायब व्हायचा, कुठे जायचा काय करायचा हे विचारलं तरी काहीही सांगत नव्हता. राजेशने त्याच्या माग काढत शोधायचा प्रयत्न केला नव्हता पण हॉलमधल्या खिडकीतून डोकावून बघतना एक नोट केलं होतं कि तो जेव्हा न सांगता गायब व्हायचा तेव्हा तो नीलाच्या शाळेकडून चालत येताना दिसायचा.

पुढचे आठ दिवस राजेश फारसे प्रश्न न विचारता प्रशांत सोबत राहीला, नीलाचा विषय निघाल्यावर प्रशांत आजंही कमालीचा डिस्टर्ब होतोय हे लक्षात आल्यामुळे त्याने तो विषय कटाक्षाने टाळला. प्रशांतने वेंट व्हावं असं मनातून कितीही वाटलं तरी त्याने ते प्रशांतवर इंपोज केलं नाही. प्रत्येक प्रॉब्लेमला ग्यान वाटणं हेच एक सोल्यूशन नसतं हे त्याला लक्षात आलं होतं एव्हाना. प्रशांतला एकांत हवा होता, आपण जबरदस्ती आलोय, आपल्या असण्यानं त्याला बरं वाटलं नाही तर किमान त्याच्या अवघडलेपणात आपण भर घालायला नको एवढं तरी त्याने मनोमन ठरवलं होतं. प्रशांत पूर्वीसारखा फारसा बोलतंही नाही, रादर शांत राहणंच पसंद करतो हे ओळखून त्याने प्रशांतची शांत राहून साथसोबत केली. तरीही राजेश गेल्याबरोबर आपल्या गळ्याभोवती आवळलेला फास कोणीतरी सैलावतंय असं वाटलं प्रशांतला. दहा बारा दिवसानंतर तो घरात एकटा होता, आजूबाजूला कसला आवाज नाही कि कोणाचीही चाहूल नाही. राजेश गेला तेव्हा संध्याकाळचे जवळपास सात वाजले होते, प्रशांत डोळे मिटून खुर्चीत बसला, त्याची छाती लयीत वरखाली होत होती, नाकाच्या टोकावर स्वतःचाच श्वासोच्छवास जाणवत होता. आजूबाजूच्या आवाजाला वजा करत तो शांतपणे श्वासांसोबत एकाग्र होत बसून राहीला. एक प्रकारचं मेडीटेशनंच होतं ते. त्याला आजवर ठरवून कधीच मेडीटेट करता आलं नव्हतं. आज मात्र त्याला श्वासांवर तरंगल्यासारखं वाटत होतं. मिटलेल्या डोळ्यात शाळेतल्या भिंतीवरची चित्र दिसायला सुरुवात होते न होते एवढ्यातंच उदबत्तीच्या वासाने त्याची तंद्री भंग पावली. प्रशांतच्या घरात देव्हारा वगैरे नसला तरी राजेशला रोज संध्याकाळी उदबत्ती लावायची सवय होती. प्रशांतशी बाकी सगळ्या गोष्टीत जुळवून घेतलेल्या राजेशला एवढ्या उदबत्ती लावायच्या सवयीत मात्र बदल करता आला नव्हता आणि प्रशांतनेही याबद्दल फारशी कुरकुर केली नव्हती. आत्ता मात्र घाईघाईत जागचा उठत प्रशांतने तिरमिरीत खिडकिच्या सापटीत खोचलेली उदबत्ती ओढून बाहेर फेकून दिली. उदबत्ती पार घराच्या कंपाऊंड बाहेर पडली असली तरी घरात भरुन राहीलेला वास जायला वेळ लागणार होता. नीला गेल्यापासून त्याला उदबत्तीचा वास नकोसा वाटायचा कारण तो वास कधीच एकटा आला नाही. सोबत कायम गुलाल, बुक्का, सुकलेली फुलांचा वास एकत्रितपणे घेऊन यायचा आणि जाताना न चुकता आठवणींना उरावर ठेऊन जायचा. त्यामुळे तो वास आला रे आला कि त्याचा जीव घुसमटल्यासारखा व्हायचा, छातीवर जड दगड ठेवल्यासारखं दडपण यायचं, प्रयत्नपूर्वक श्वास घ्यावा लागायचा आणि बघता बघता डोकं जड होऊन जायचं. कोणीतरी संमोहीत केल्यासारखा तो स्मशानाकडे ओढला जातोय कि काय असं वाटायचं आणि त्या आठवणीतून बाहेर पडायला मग फार वेळ जायचा, दमछाक व्हायची पार.

तिसऱ्यावेळी ड्रायवरने जेव्हा त्याला तुमचं डेस्टिनेशन आलंय म्हणून कॅब कैलाश स्मशानभूमीबाहेर उभी केली तेव्हा त्याने कसलाही वाद घातला नाही. कॅब त्या चौकात यायच्याआधीच कसा कोणास ठाऊक पण त्याला उदबत्तीचा वास येऊ लागला होता. त्याने नाकावरचा मास्क काढून नीट घडी करुन  पॅंटच्या मागच्या खिशात ठेऊन दिला आणि फ्रेश मास्क काढून नाकावर चढवला पण उदबत्तीचा वास तसूंभरंही कमी झाला नाही. थॅंक्स म्हणत तो कॅबमधून खाली उतरला आणि कसलाही विचार न करता स्मशानाकडे चालू लागला. विसाव्यासाठी जिथे पहिल्यांदा तिरडी टेकवतात त्याच्या बरोबर समोर पण स्मशानाबाहेर एक बाकडं होतं त्यावर तो जाऊन बसला. तो कसलाही विचार करत नव्हता आणि डोक्यात येणाऱ्या कोणत्याच विचाराला किंवा आठवणीला थोपवायचा प्रयत्न देखील करत नव्हता. आठवणी दाटीवाटी करुन मेंदूच्या कानाकोपऱ्यात जाऊन बसल्या, छातीवर मणामणाचं ओझं दडपण वाढवू लागलं. आवंढा गिळला तरी खड्यांची भुकटी गिळल्यासारखा गळा कोरडा पडला. सुइं.... करुन कानात आवाज येऊ लागला. नीला गेली त्यादिवशी असंच झालं होतं, नीलाचा अचेतन चेहरा बघता बघता त्याला वाटत होतं तो कोणत्याही क्षणी कोलमडून जाईल पण कोणीतरी आवळून धरल्यासारखा हालचाल करत तो शांतपणे उभा होता, तो रडला तर बरं होईल अशी आजूबाजूला कुजबूज होती पण कानातल्या सुइं... आवाजामुळे कि कशामुळे त्याला आजूबाजूचे कसलेच आवाज ऐकू येत नव्हते. तिचा मळवट भरलेला चेहरा त्याला आत्ताही विसाव्याच्या कठड्यावर दिसत होता. कुणास ठाऊक किती वेळ तो तिथे बसून होता पण थोड्यावेळाने छातीवरचं दडपण कमी झालं, कानातला आवाजंही थांबला. तो भानावर आला तेव्हा आजूबाजूला किर्र अंधार झाला होता, सभोवताली वाढणारा काळोख त्याच्या नाकावर हात ठेवून हळूहळू दबाव वाढवू लागला. एक दीर्घ श्वास घेऊन त्याने समोर पाहिलं, समोरचा विसाव्याचा कठडा रीकामा होता, परत उदबत्तीचा वास जाणवण्याआधी तो वीजेचा झटका बसल्यागत जागचा उठला आणि शक्य तेवढ्या पटकन तिथून दूर जाण्यासाठी त्याने पावलं टाकायला सुरुवात केली. एखादा अदृष्य जड साखळदंड पायात अडकवल्यासारखा तो पाय खुरडत चालत राहीला तेव्हा त्याच्या डोक्यात आलं कि हा निव्वळ योगायोग नाहीये, टेक्निकल ग्लिच वगैरेही नसावा, यात काहीतरी खोलवर अर्थ दडलाय, यामागे काहीतरी कारण आहे, एवरीथिंग हॅपन्स फॉर अ पर्पज आणि धिस इज नॉट अँन एक्सेप्शन इदर.

हा योगायोग नाहीये, यामागे काहीतरी कारण एहे हे डोक्यात आल्यापासून हा टेक्निकल ग्लिच आहे का हे त्याला पडताळून पाहायचंच होतं. कॅबने प्रवास करायची पुढची संधी आल्यावर त्याने त्याच्या एका ज्युनियर कलिगला बोलावून त्याच्यासाठी कॅब बुक करायची रीक्वेस्ट केली, म्हणाला त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी एरर येतोय. प्रिपेड करु नकोस, पैसे मी कॅश देईन सांगून काहीतरी कामात असल्याचं भासवस राहीला. कलिगने बुकि ग डिटेल्स शेअर केले, निघताना ओटीपी सांगितला. लोकेशन बरोबर टाकलंयेस ना रे विचारुन तो ऑफिसमधून निघाला. कॅब जसजशी पुढे जाऊ लागली तसतशी त्याच्या छातीतली धडधड वाढू लागली. कैलास स्मशानभूमीला वळसा घेत कॅब पुढे निघाली तशी याची मनोमन खात्री होऊ लागली कि काहीतरी टेक्निकल लोचा याच्या सेलच्या लोकेशन सेटींग्जमध्ये आहे. तो खिशातून फोन बाहेर काढून चेक करु लागला तेवढ्यात त्याला ड्रायवरचा आवाज कानावर पडला, सॉरी सर एक टर्नंच मिस केला मी मगाशी, हे घ्या आलंय तुमचं डेस्टीनेशन. त्याने मान वर करुन पाहीलं, त्याची कॅब कैलास स्मशानभूमी बाहेर उभी होती. कसलीही कटकट कुरकुर न करता त्याने ड्रायवरला पैसे देत कॅब बाहेर पाऊल टाकलं. टेक्निकल ग्लिचंही नाही यावर आता शिक्कामोर्तब झालं होतं. हे उगाचंच परत परत घडत नाहीये हे त्यानं मनोमन मान्य करुन टाकलं. लहानपणापासून स्मशानासारख्या जागेविषयी मनात असलेली भीती किंवा एक खोलवर अस्वस्थ करणारी भावना असल्यामुळे परत परत तिथे येऊनंही तो इतके दिवस आत जाण्यापासून स्वतःला रोखत होता, रादर तो पुढे जाऊच शकत नव्हता. आज मात्र कसलाही विचार न करता झपाझप पावलं उचलंत तो स्मशानात गेला. एखादी गोष्ट मनातून ठरवलेली असेल तर जशी आश्वासक कृती केली जाते तसा तो पुढे काय करायचंय हे प्लान्ड असल्यासारखा वावरत होता. रात्रीचे साडेदहा वाजले होते, स्मशानातंही ऑफिस अवर्स संपल्यासारखी शांतता होती, कोणाचीही येजा नाही. कैलास शहराच्या मध्यवर्ती भागातलं सगळ्यात जुनं आणि मोठं स्मशान होतं. पूर्वी तिथे फक्त दहन संस्काराचे विधी होत असतं, गेल्या काही वर्षापासून आतला एक मोठा कोपरा दफन विधीसाठी राखून ठेवला होता. प्रशांत नीलाच्या समाधीपाशी येऊन थांबला, काही क्षण तिथे उभा राहील्यानंतर तो चक्क कसलाही विचार न करता खाली मांडी घालून बसला. त्याला जमिनीखाली आरपार नीलाचा मळवट भरलेला चेहरा दिसत होता, शांत झोपल्यासारखी भासत होती ती त्याला. चेहऱ्यावर कणभर वेदना नाही, जीव गेल्याच्या कसल्याही खुणा नाहीत. कसला आवाज झाला तर तिची झोपमोड होईल असं वाटलं त्याला. धडपडतंच खिशातला फोन काढून त्याने तो सायलेंटवर टाकला आणि तो जमिनीखालच्या नीलाच्या चेहेऱ्याकडे एकटक बघत राहीला. थोड्यावेळाने पायापाशी काहीतरी वळवळल्याचं जाणवल्यामुळे त्याने नीलाच्या चेहेऱ्यावरची नजर हटवत पायाकडे पाहीलं. तिथल्या काळोखात स्वतःचंच बोट स्वतःच्या डोळ्यात गेलं तरी कळलं नसतं कदाचित तर पायापाशी काय वळवळतंय हे दिसणं तर दूरची गोष्ट होती. त्याने खिशातल्या मोबाईलची टॉर्च चालू करुन पायापाशी पाहीलं, विशेष काही नाही थोडे मुंगळे लगबगीत येजा करत होते, पंखाच्या मुंग्याही होत्या आणि एक भूईमूगाच्या शेंगेच्या आकाराचा यापूर्वी कधीही न पाहीलेला किडा बुटाच्या कडेवरुन आत शिरायचा प्रयत्न करत होता, त्याने पटकन तो झटकला आणि टॉर्च आजूबाजूला फिरवत तो कुठे पडला असेल तो शोधू लागला. ज्या दिशेला झटकला होता तिथे टॉर्चच्या उजेडात तो कुठेही दिसेना तेव्हा त्याने तो नाद सोडून दिला आणि मोबाईल खिशात ठेवण्याआधी परत एकदा पायापाशी टॉर्च नेत बघितलं. मुंगळे, लालकाळ्या मुंग्यांच्या रांगा, बारीकसे किडेच किडे सगळीकडे दिसत होते. जमिनीवर एवढ्या किड्यामुंग्या तर जमिनीखाली काय परीस्थिती असेल याचा विचार करुन त्याला भयानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याने तोंड फिरवून परत नीलाचा चेहरा दिसत होता त्या दिशेला पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर मुंग्यांची रांग चालताना दिसू लागली. बघता बघता तिच्या चेहेऱ्यावरचा मळवट पूर्ण मुंग्यांनी भरुन गेला पण नीला तशीच निश्चलपणे पडून राहीली होती. हाताला जे येईल त्याने जमिन उकरुन तिला बाहेर काढावं आणि बिलगून बसावसं वाटू लागलं त्याला. घाईघाईत असहाय्यपणे दोन्ही हाताने माती बाजूला करत उकरायचा अयशस्वी प्रयत्न केला त्याने अन क्षणातंच त्याला त्याची चूक जाणवली. मातीने माखलेले हात घेऊन हताशपणे बसून राहीला तो आणि काही कळण्याआधी त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ओक्साबोक्षी रडत नव्हता तो पण नीला गेल्यापासून फक्त गप्प बसणारा तो, कुठेतरी मोकळा होणं गरजेचं होतं त्याला. नीला आता नाहीये हे सत्यंच स्वीकारणं त्याला आजवर जड जात होतं, त्या अक्सेपटंसची आज सुरुवात झाली होती. तिकडून निघण्याआधी समोरच्या उंच कंपाऊंड वॉलच्या पायथ्याशी उगवलेली दोनचार रानफुलं तोडून नीलाच्या पायाशी ठेवली त्याने. शोभेच्या फुलांपेक्षा रानफुलं फार आवडायची तिला. शहराबाहेर बाईक राईडसाठी गेलेच कधी तर ती वेगवेगळी फुलं तोडून गुच्छ करुन घ्यायची. कशाला तोडतेस विचारलं तर म्हणायची तसंही ती एखादा दिवसंच राहतात रे, त्यांना वास नसतो, नशीबात चकचकीत फ्लॉवरपॉट नसतो पण भुरळ पाडतात मला. एकदोन दिवसात सुकतात, दॅट इज द होल ब्युटी. दे किप रीमाइंडींग अस दॅट इव्हन इफ समथिंग मेक्स अस हॅपी, इट इज नॉट परमनंट.... रादर नथिंग इज.

मोकळं झालेलं घरात आता अजूनंच एकटं एकटं वाटू लागलं, इतके दिवस ती परत येईल असं त्याला वाटत होतं, का कुणास ठाऊक कारण तिचे सगळे अंत्यसंस्कार त्याने स्वतःच्या हाताने पार पाडले होते. तीचं नसणं स्वीकारणं भयानक अवघड होतं यात वादंच नाही पण ती परत येईलंच असं त्याला वाटायचं किंवा त्या घरात एकटं राहण्यासाठी त्याने या अतर्क्य गोष्टीचा आधार घेतला होता. ती आता परत न येण्याच्या प्रवासाला कायमची निघून गेलीये हे स्वीकारायला सुरुवात केल्यामुळे कदाचित घराचा मोकळेपणा जास्तं अंगावर येत होता त्याच्या. त्या दिवसानंतर स्मशानाबद्दल एक अनामिक ओढ वाटू लागली त्याला. चारेक दिवस कंट्रोल केल्यावर तो शनिवारी सुटीच्या दिवशी सकाळी चालायला म्हणून बाहेर पडला ते थेट नीलाच्या समाधीपाशी गेला. तिथे पोहोचेपर्यंत त्याच्या छातीतली धडघड आतोनात वाढली होती, कानात धड धड धड आवाज येत होता. खूप दिवसांनी आपल्या जीवाभावाच्या माणसाला भेटत असल्याचं फिलींग येऊ लागलं होतं. तिथे पोहोचल्यावर मात्र सगळी अस्वस्थता विरुन गेली, थंड वाऱ्याच्या झुळुक आली, एक दीर्घ श्वास घेत तो तिथे मांडी घालून बसला. काहीही न बोलता तिथे शांत बसून राहणंही समाधानकारक वाटत होतं त्याला. ते दोघे फिरायला जायचे तेव्हा असेच एकमेकांशेजारी काहीही न बोलता शांत बसून राहत असत. थोड्यावेळाने त्याच्याकडे झुकत नीला त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत असे. तसं बसल्याने तिला मनापासून आश्वासक वाटायचं. तुझी फेवरेट जागा कोणती विचारल्यावर त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत “ही” म्हणाली होती ती एकदा.

सुरुवातीला अर्धा तास वगैरे तिथे थांबणारा तो नंतर तास न् तास कैलास स्मशान भूमीत घालवू लागला. पहिले काही दिवस तिथले कर्मचारी त्याला हटकत असत नंतर त्यांच्याशीही त्याची ओळख झाली, नंतर वीकेंडसला त्याचा पूर्ण दिवस कैलासमध्ये जाऊ लागला. हळूहळू वीकडेजलाही त्याचे पाय कैलासकडे वळू लागले. तिथली शांतता त्याला आवडायची, स्मशानाच्या मागे वाहणाऱ्या नदीचा आवाज, पक्षांचा किलबिलाट आणि रात्रीच्या अंधारात तिथून दिसणारं आभाळ त्याला खेचून न्यायचं तिथे. खरंच तो खेचला जातोय असे भास होऊ लागले होते त्याला. एक दिवस असाच सकाळी उठल्यापासून त्याला कैलासमध्ये जाऊन बसावसं वाटू लागलं. कितीही दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तरी डोळ्यासमोर कैलास दिसू लागलं. सकाळच्या सत्रात दोन महत्वाच्या वर्च्युएल मिटींग्ज होत्या, दुपारी लंचला वेळ मिळाला तरी मेहरबानी म्हणावी असं त्याचं स्केड्यूल पॅक होतं आज. चहाचा कप थंड होऊन समोर तसाच पडला होता, वेळ जाईल तशी त्याची चलबिचल वाढत होती. एखाद्या व्यसनी माणसाकडून त्याचं व्यसनाचं साधन काढून घेतल्यावर जशी अवस्था होते तसा तो अस्वस्थ झाला होता. काही क्षण तसाच बसून राहील्यावर काहीतरी आठल्यासारखा तो लगबगीनं जागचा उठला, चहाचा कप तसाच सोडून त्याने गडबडीत आंघोळ उरकली, घराला कुलूप लावून धावतपळत बाहेर पडत कॅब पकडली आणि कैलास गाठलं. मिटींग सुरु व्हायला पंधरा मिनिट बाकी होते. एव्हाना त्याला कैलासचा कानाकोपरा माहीत झाला होता. कोपऱ्यातल्या एका प्रशस्त पारावर जाऊन बसत त्याने पाठीवरची बॅग काढली आणि लॅपटॉप चालू करुन हेडफोन कानात सारले. मिटींगला लॉगइन करुन त्याने अखंड मिटींग तिथे बसून अटेंड केली, त्याची स्मशानातली पहिली मिटींग. सकाळी बॅगेतला लॅपटॉप बाहेर काढताना आलेला अवघडलेपणा तोच लॅपटॉप रात्री बॅगेत ठेवताना पार गायब झाला होता. स्मशानातनं काम करणं हळूहळू अंगवळणी पडू लागलं त्याच्या. तुरळक कधीतरी मृतांचे नातेवाईक रडल्याचा आवाज आल्यावर कलीग्ज किंवा क्लाएंटस बॅकग्राऊंड नॉइजबद्दल तक्रार करत असत, कोणाकडे टिव्ही चालू असेल तर बंद करा म्हणत. असल्या मोजक्या अनकंफर्टेबल सिच्युएशंस वगळता त्याचं काम सुरळीत चालू होतं. स्मशानात वेळ घालवणं त्याच्या मनस्वास्थ्यासाठी मेडीटेशनसारखं वर्क करत होतं.

एके दिवशी कॅबने प्रवास करत असताना त्याला ड्रायवर चाचपडत म्हणाला स्सर एक गोष्टं विचारु का?

खिडकीतून बाहेर बघत तो हंमम म्हणाला.

सर कदाचित नोट केलं असेल तुम्हीही कि गेल्या सहा महिन्यात कदाचित पंचवीस ते तीस वेळा तुम्ही माझ्या कॅबमध्ये बसलाहात.

अच्छा हो का म्हणून त्याने ड्रायवरकडे बघायला सुरुवात केली.

ड्रायवर अधूनमधून आरशात बघत बोलत होता. सुरुवातीला मला वाटायचं आजूबाजूला कुठेतरी काम असेल तुमचं किंवा इथे कोणीतरी सहकारी वगैरे पिकअप करत असेल तुम्हाला. पण एकदा सकाळी सकाळी तुम्हाला ड्रॉप केल्यावर तुम्ही धावतपळतंच स्मशानात गेलात, वाटलं कोणीतरी ओळखीचं गेलं असावं, विधी उरकून कामाला जाणार असाल तसेच. पण चार दिवसांनी तुम्ही योगायोगाने माझीच कॅब बूक केलीत सर आणि परत सेम तशाच लगबगीत तुम्ही स्मशानात गेलात तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं.

प्रशांतची आरशातून त्याच्याकडे बघणाऱ्या ड्रायवरशी नजरानजर झाली तसं त्याने चटकन दुसरीकडे मान वळवली.

सर मी पुढची राईड न घेता तासभर तिथे थांबून राहीलो पण तुम्ही बाहेर आला नाहीत. माझी उत्सुकता जास्तंच ताणली गेली सर, मग मी निश्चय करुन आतमध्ये म्हणजे स्मशानात आलो. बरंच इकडेतिकडे शोधून झाल्यावर तुम्ही मागच्या बाजूला एका मोठ्या झाडाखाली पारावर लॅपटॉप काढून बसलेले दिसलात. मी आजूबाजूला चक्कर मारुन आलो आणि मला धक्काच बसला. कारण सर त्यादिवशी तिथे एकंही मृतदेह अंत्यविधीसाठी वेटींगवर नव्हता. मी तिथल्या एका कर्मचाऱ्याला भेटून खोटंच म्हणालो की समोरच्या घरातले आजोबा गेलेत, कॉर्पोरेशनच्या पासाव्यतिरीक्त काही लागणार नाही ना? बोलता बोलता विद्युतदाहीनीला किंवा पारंपारीक विधीला किती वेळ लागेल विचारल्यावर तो म्हणाला आज अजून तरी नंबर नाहीयेत. मी तुमच्याकडे बघत थेटंच त्याला माझी शंका विचारली कि मला वाटलं हे साहेब पुढे आलेत आणि डेडबॉडी यायची वाट बघत बसले आहेत. त्यावर तो कॅज्युअली बोलला ते कोणाची वाट बघत नाहीत, ते नेहमी ईथेच बसून काम करतात. आता माझे डोळे पांढरे व्हायची वेळ आली होती. तिथून मी जे बाहेर पडलो ते दोन दिवस गाडीवर नाही गेलो, तापाने फणफणलो होतो. त्यानंतर सर तुम्हाला पिकअप करायला आल्यावर नाक्यावरुन चारपाच वेळा राईड कॅंसल करुन भुर्दंड सहन केलाय मी. मग एकदिवस मी धीर एकवटून दिवसभर तुमच्या मागावर राहीलो, दिवसभर स्मशानातून काम करत होता सर तुम्ही, अधेमध्ये दोन अंत्यविधीच्या ठिकाणी जाऊन ओक्साबोक्षी रडणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या पाठीवर हात ठेवलात, तुमच्या फक्त स्पर्शाने ते शांत झाले. तुम्ही रात्री उशिरा कैलासमधून बॅग आवरुन निघालात. मला शंका होती तुम्ही काहीतरी अघोरी प्रकार करत असाल पण तुम्ही रात्री बॅग आवरुन कोपऱ्यातल्या एका समाधीपाशी जाऊन तिथलीच रानटी फुलं तोडून वाहीलीत आणि निघालात. तुम्ही निघाल्यावर आघोरी काही करत असाल ही शंका दूर झाली. तसंही आघोरी करणारा कोण दिवसाढवळ्या सगळ्यांसमोर असा स्मशानात जाऊन बसेल नाय का.

प्रशांतने काहीही प्रतिसाद दिला नाही.

तो पुढे बोलत होता, साहेब एक सांगू का, कारणाशिवाय असं स्मशानात बसणं चांगलं नाही.

तुला कोण म्हणालं मी कारणाशिवाय, बोलता बोलता मध्येच थांबत त्याने ड्रायवरला गाडी बाजूला घ्यायला लावली.

सर तुमचं डेस्टीनेशन नाही आलंय अजून म्हणत ड्रायवरने गाडी बाजूला घेतली.

काहीही न बोलता प्रशांत खाली उतरला, निघता निघता खिडकीतून ड्रायवरकडे बघत परत माझा पाठलाग केलास तर याद राख म्हणाला.

तो पुढे निघाला तेव्हा पाठीमागून कानावर ड्रायवरचा आवाज पडला सर काळजी वाटली म्हणून बोललो.

ड्रायवरच्या अनावश्यक बडबडीमुळे त्याचं कशात लक्ष लागेना, परत नवी कॅब बूक करुन तो सरळ ऑफिसमध्ये गेला. सर काळजी वाटली म्हणून बोललो हे ड्रायवरचे शब्द विनाकारणंच त्याच्या कानात घुमत राहीले. तसंही कैलासमध्ये बसायला त्याचं आज मन लागलं नसतं. संध्याकाळी त्यानं घरी जाण्यासाठी कॅब बूक केली तर नेहमीप्रमाणे ती कैलास बाहेर आली, तो खाली उतरणार तेवढ्यात त्याला रस्त्यापलिकडच्या टपरीवर सकाळचा ड्रायवर दिसला. आता हा परत ग्यान वाटत बसेल या भीतीने त्याने ड्रायवरला हे माझं डेस्टीनेशन नाहीये हे सांगितलं, बघता बघता विषय वादावर आला.


क्रमशः


Friday, January 6, 2023

यू हॅव रीचड्


 राजेश घरी पोहोचला तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावर वैताग स्पष्ट दिसत होता. खुर्चीत बसून अर्धा ग्लास पाणी पिऊन, हाशहुश करुन झाल्यावर प्रशांतने काहीतरी बोलायचं म्हणून सुरुवात केली, काय रे कसा झाला प्रवास? घर सापडायला काही अडचण नाही ना आली? ऱाजेशचा चेहरा अजूनंही नॉर्मल झाला नव्हता.

बस चहा घेऊन येतो म्हणून तो आत सटकणार तेवढ्यात राजेशने बोलायला सुरुवात केली.

वर्षश्राध्द नेमकं आहे कधी?

परवा १४ तारखेला आहे, फोनवर बोललो होतो की रे आपण.

हंमम, तुझा फोन बंद का होता मगाशी?

कधी रे, मी सहसा फोन बंद ठेवत नाही यार.

१ वाजून ४३ मिनिटांनी फोन केला होता, नंतर १:४७ मग २:०३ आणि परत सव्वादोनला केला होता. प्रत्येकवेळी तुझा फोन स्विचऑफ येत होता, फोनमधून नजर हटवत त्याच्याकडे बघत बोलत होता राजेश.

काय बोलतोस अरे माझा फोन क्षणभरंही बंद नव्हता या वेळात.

मला बंद लागला म्हणून बोललो मी.

कदाचित नेटवर्कचा काहीतरी इश्यू असेल, सोड.

हंमम तसंही असेल कदाचित.

आलोच मी, म्हणत प्रशांत आत सटकला. एकतर हा जबरदस्ती मागे लागून भेटायला आलाय आणि आता हा माझीच उलटतपासणी करणार असं पुटपुटत त्याने चहासाठी पातेलं गॅसवर चढवलं.

प्रशांत काय रे माझी कॅब मी बूक करतो म्हणत असूनंही तू बूक केलीस आणि परत मला कसला विचारतोस की घर सापडायला काही अडचण तर आली नाही ना?

अरे बाबा कधीकधी नवखे कॅब ड्रायवर असतात आणि माझं घर जरा आतल्या बाजूला आहे, हमखास नवे ड्रायवर एखादं वळण मिस करतात आणि मग शोधत बसावं लागतं, गोंधळ होतो.

अच्छा तसं होय मला वाटलं...

गॅसवर उकळणारा चहा तसाच ठेऊन प्रशांत जरा कातावूनंच किचेनच्या दारातून डोकावून बोलला काय वाटलं?

सोड ना काही नाही.

नाही नाही, काही नाही कसं? काहीतरी बोलणार होतास तू, बोलता बोलता थांबण्यापेक्षा बोलायचंच नाही आणि विषय काढला तर पूर्ण बोलायचं, हे असले डोक्यात किडे सोडून गप्पं बसायचं नाही. बोल चल.

स्पष्टंच बोलायचं तर मला वाटलं जाणूनबुजून चुकिचा पत्ता दिलास कि काय कॅब ड्रायवरला

तुझं डोकं वगैरे फिरलंय का रे राजा? एकतंर मी आत्ता कोणालाही भेटायच्या मानसिकतेत नव्हतो, तुला तसं स्पष्टं सांगूनंही तू मागे लागलास आणि आता घरी आल्यावर मला विचारतोयेस की जाणूनबुजून.... हं, च्यायला चुकीचा पत्ता दिला असता तर घर तरी सापडलं असतं का रे तुला?

पश्या कॅब ड्रायवर चुकला तर याच एरीयात जवळपास फिरत राहायला हवा ना?

हो अर्थातंच!

मग ईथून किमान साडेपाच किलोमीटर लांब नको त्याच पत्त्यावर मला नेऊन वर सर तुमचं डेस्टीनेशन आलंय हे का म्हणाला असेल तो?

काय?

हो आणि चुकीच्या पत्त्यावर पोहचून तुला फोन लावल्यावर जर पाऊण एक तास तुझा ‍फोनंच लागत नसेल रादर स्विचऑफ असेल तर काय समजावं माणसाने? कि नजरचुकिने चुकीच्या पत्त्यावर कॅब बूक केलीये मित्राने अशी स्वत:ची समजूत घालून घ्यावी काय?

अरे काय बरळतोयेस?

बरळतोय? कैलास स्मशानभूमी बाहेर गाडी उभी करुन ड्रायवर म्हणाला तुमचं डेस्टीनेशन आलंय. आजूबाजूला एकंही घर दिसेना तेव्हा मी विचारलं त्याला की काहीतरी चुकतंय का, मला माझ्या मित्राच्या घरी जायचंय. त्यावर त्याने मला त्याच्या ॲपवर फिड केलेलं डेस्टीनेशन दाखवून माझी बोलती बंद केली. तुला फोन केला तर फोन स्विचऑफ, एकदोन मिनिट नाही तर पुढचा पाऊण तास फोन बंदंच? त्या ड्रायवरला थांबायची रीक्वेस्ट केली तर तोही नवी राईड बूक झाल्यामुळे निघून गेला. काय काय उद्योग करुन मी तुझ्या घरी पोहोचलोय माहीतीये का? तू कॅब बूक केल्यानंतर मी जेवढ्या वेळात ईथे पोहोचायला हवा होतो त्यापेक्षा दोन तास उशिरा पोहोचूनंही तू कॅज्युअली विचारतोयेस की घर सापडायला अडचण तर नाही ना आली? का नाही वाटणार मला की तू जाणूनबुजून चुकीचा पत्ता दिलास त्या कॅब ड्रायवरला?

राजेशचं बोलणं संपायच्या आधीच प्रशांतची तंद्री लागली होती. त्याला आठवत होतं की दहा महिन्यापूर्वी असंच झालं होतं. तीन आठवड्यात ही पाचवी वेळ होती घरी जाण्यासाठी कॅब बूक केल्यानंतर ड्रायवरने स्मशानापाशी सोडून तुमचं डेस्टिनेशन आलंय म्हणून सांगायची. आता त्याचं डोकं काम देईनासं झालं होतं, असं होण्याचं काहीही कारण नव्हतं खरंतर कारण त्याचं घर कैलासपासून किमान सहा एक किलोमीटर लांब होतं. पहिल्या दोन वेळेस त्याने ड्रायवरशी वाद तरी घातला होता पण नंतर त्याने ते ही सडून दिलं होतं, कारण प्रत्येकवेळी ड्रायवरने त्याचे बूकिंग डिटेल्स दाखवून डेस्टीनेशन तुम्‍हीच एंटर करता साहेब माझी काय चूक म्हणून त्याचं तोंड बंद केलं होतं. पहिल्या वेळी तर तो रात्री उशिरा ऑफिसमधून घरी जायला निघाला होता. कोविड प्रोटोकॉल्समुळे खिडकीच्या काचा बंद करुन एसी लावायची परवानगी नव्हती. उघड्या खिडकीतून येणारा गार वारा आणि त्यात दिवसभर काम करुन थकल्यामुळे तो कॅबमध्ये बसल्या बसल्या गाढ झोपी गेला. गेल्या दिड महिन्यात त्याला कितीही प्रयत्न करुनंही झोप येत नव्हती, अगदी झोपेच्या गोळ्यांनाही जे जमलं नव्हतं ते आज गार वाऱ्यानं साध्य केलं होतं. शिवाय खूप दिवसानंतर आज त्याने पूर्ण वेळ काम केलं होतं, कामात पूर्ण लक्ष देऊन काम केलं होतं. मेंदूला खऱ्या अर्थाने आज वेगवेगळे विषय मिळाले होते विचार करायला आणि विचार करुन थकायला. एखाद्या चित्रकाराने मुक्तचित्र काढावं असा मेंदू इतक्या दिवसातल्या चकव्यातून बाहेर पडत मोकळेपणानं कामावर लक्ष केंद्रीत करत होता. त्यामुळे घरी निघतानाच त्याला आज वाटत होतं कि खूप दिवसांनी त्याला आज झोप लागणार आहे. एरवी गर्दीच्यावेळी ऑफिसपासून घरी जायला किमान दोन तास लागायचे त्याला पण रात्रीच्यावेळी रहदारी कमी असताना सव्वा तासात सहज पोहोचायचा तो. झोपताना त्याला वाटलं काही नाही तर किमान तासभर झोपायला मिळेल पण जेमतेम चाळीसेक मिनिटांत त्याला ड्रायव्हरने आवाज देऊन उठवलं. तळघरातून कोणाचा तरी दबका आवाज येत असल्यासारखा त्याला भास झाला, ड्रायवरने परत जोरात आवाज दिल्यावर तो खडबडून जागा झाला.

सर पोहोचलोय आपण.

त्याने डोळे किलकिले करत आजूबाजूला पाहिलं, काहीच कळेना मग त्याने डोळे चोळले तरीही आजूबाजूचा परीसर त्याला अनोळखीच वाटत राहीला.                                                      

सर... सर

ड्रायवरच्या आवाजाने भानावर येत तो हंमम म्हणाला. दार उघडून बाहेर जाता जाता तो ड्रायवरला म्हणाला हे कुठे आलोय आपण?

सर तुमच्याच लोकेशनला घेऊन आलोय मी.

अरे हो, पण एरीया कोणता आहे हा?

त्याच्याकडे अविश्वासाने बघत, कल्याण नगर ड्रायवर म्हणाला

उतरण्यासाठी कॅबमधून बाहेर काढलेला पाय आत घेत त्याने दार बंद केलं आणि म्हणाला माझं घर नाणेवाडीला आहे.
तर मग? ड्रायवरने थोडसं वैतागूनंच विचारलं त्याला.

तर मग तिकडे ड्रॉप आहे माझा.

सर तुमचं घर कुठे का असेना तुम्ही लोकेशन ईथलं टाकलंय.

अरे काय डोकं फिरलंय का तुझं? घरी जायचं असताना मी इथलं लोकेशन का टाकेन. रात्रीची वेळ बघून नाटकं करु नकोस चल लवकर.

सर पहिले तुम्ही नीट बोला, एकतर तुम्ही गाडीत बसल्यावर मी कन्फर्म करण्यासाठी विचारलं होतं तुम्हाला कि सर कुठे जायचंय तर तुम्ही म्हणालात लोकेशन एंटर केलंय. पाच मिनिटांनी परत विचारावं म्हणलं तर तुम्ही गाढ झोपी गेला होता.

त्याने वैतागून मोबाईल खिशातून काढून बघितला तर त्याची राईड कंप्लीट झाल्याचं आणि फिडबॅक देण्यासाठी नोटीफिकेशन आलं होतं त्याला. आपसूकंच त्याचा आवेश कमी झाला पण आपण हे लोकेशन का टाकलं असावं हे त्याला काही केल्या लक्षात येईना. आपणंच काहीतरी गल्लत केलीये हे ड्रायवरला कळू नये म्हणून आवाजात खोटीच जरब कायम राखत तो ड्रायवरला म्हणाला बरं बाबा तू बरोबर मी चूक, आता परत माझ्या घरचं लोकोशन टाकतो, चल तू मला नाणेवाडीला सोड.

सर तसं नाही करता येणार ड्रायवर ठामपणे बोलला.

अरे चल बाबा, हवे तर एक्स्ट्रा पैसे घे म्हणत तो डोळे मिटून सीटला रेलला.

आहो सर राइडस् फक्त ॲपवरुन घेता येतात ओ, तुमची राइड इथे संपत्येय म्हणून मी ऑलरेडी पुढची राइड ॲक्सेप्ट केलीये. प्लिज तुम्ही उतरा आता. ड्रायवर काकुळतीला येऊन त्याला विनंती करत होता. तरीही तो बधत नाही म्हटल्यावर ड्रायवर चिडला, म्हणाला साहेब जबरदस्ती करायला लावू नका, हवं तर माझी पुढची राइड इथून पाऊण किलोमीटरवर आहे तिथे तुम्हाला ड्रॉप करतो. मला काहीही ज्यादाचे पैसे नको पण प्लिज मला समजून घ्या.


विनाकारण विषय वाढवायला नको म्हणून काहीही न बोलता तो दार उघडून बाहेर पडला. खाली उतरला तसं समोर कैलास स्मशान दिसलं, सॉरी सर म्हणत ड्रायवर निघून गेला. गेल्या दिड महिन्यापासून तासभर का असेना झोप लागावी म्हणून जीवाचा आटापिटा करत होता, ती झोप आज लागली होती. अर्ध्या तासातंच डोळे उघडल्यावर ज्यातून बाहेर पडण्यासाठी तो झगडत होता ती गोष्ट समोर होती. नीलाला जाऊन तीन महिने झाले होते, तिचं अचानक जाणं त्याला स्वीकारता येत नव्हतं. आधुनिक मेडीकल सायंसलाही तिच्या असं अचानक जाण्याचं पक्कं कारण सांगता आलं नाही, पोस्टमॉर्टेम रीपोर्टही अजून मिळाला नव्हता पण डॉक्टर्सचं म्हणणं होतं कि तिचं हृद्य बंद पडलं. असं कसं अचानक बंद पडू शकतं कोणाचं हृद्य, आणि तेही नीलाचं? शी ईज सो फुल ऑफ लाईफ. दिड महिन्यानंतरंही तिचा मनातल्या मनातंही भूतकाळात उल्लेख करायला जमत नव्हतं त्याला. मध्यरात्रीची वेळ, कोविडमुळे वातावरणात भरुन राहीलेली भयाण शांतता, चहुबाजूला निर्जन रस्ता, रात्रीचा अंगावर येणारा किर्र आवाज, मधूनंच वाजणारे ॲब्युलंसचे सायरन. स्मशानापासून पन्नास फूटावर उभा असूनंही त्याला नाकात तो माती, गुलालबुक्का, फुलं, कापूर अगरबत्ती या सगळ्याचा एकत्र होऊन येणारा स्मशानातला टिपिकल वास जाणवला. एरवी याच सगळ्याचा वास दुसऱ्या ठिकाणी वेगळाच वाटतो पण स्मशानात कदाचित त्यात मृतदेहाचे वास मिसळत असावे, माणसाने जग सोडून जाताना मागे राहीलेल्या शिळ्या, वर्षानुवर्षे कुजलेल्या ईच्छांचाही निचरा होऊन त्यांचाही वास वातावरणात मिसळत असावा कदाचित. त्याच्याही नकळत तो दोन पावलं स्मशानाकडे चालत गेला आणि मग कोणीतरी मागून आवाज दिल्यासारखा भानावर आला.


राजेश त्याला आवाज देत होता, पश्या ए पश्या कुठे तंद्री लागलीये? ठिक आहेस ना? सोड चल ते कॅब आणि पत्ता प्रकरण.

कसंनुसं हंमम म्हणत त्याने वेळ मारुन नेली. चहापाणी झाल्यावर तू आराम कर प्रवासात थकला असशील म्हणत तो काही कामं उरकण्यासाठी बाहेर पडला. राजेश अरे मीही येतो म्हणतोय हे पाठमोऱ्या प्रशांतला लक्षात आलेलं असूनंही तो ऐकलं नसल्यासारखा निघून गेला. त्याला थोडावेळ कोणीच सोबत नको होतं, खरंतर त्याला आजकाल कोणीच सोबत नको असायचं म्हणूनंच त्याने राजेशला येऊ नकोस सांगितलं होतं. तो जबरदस्तीने आलाच तेव्हा अर्जंट कामाचं कारण काढून जाणं हा प्रशांतसाठी सगळ्यात सेफ ऑप्शन होता.

घरातून निघताना हातात एक मोकळी पिशवी घ्यायला तो विसरला नाही. परत येताना त्या पिशवीत काहीबाही कोंबून आणलं कि कुठे गेला होतास काय काम होतं वगैरे फुटकळ प्रश्नांना बगल देता यावा एवढा एकंच उद्देश त्यामागे होता.


नीलाला लहान मुलं फार आवडायची म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिने आधीच तिने प्रशांतला सांगितलं होतं कि तिला हा आयटीतला जॉब सोडून प्रिप्रायमरी शाळा चालू करायची होती. तिने त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कोर्सला ॲडमिशनंही घेतली होती. त्या दोघांनी त्यांच्याच कॉलनीतला एक बंगला रेंटवर घ्यायचा निश्चित केला होता. डिपॉजिटची रक्कम, रेंट सगळं फायनल झालं होतं. डिपॉजिट देऊन नीलाला हवं तसं बंगल्याचं रिनोवेशन करायला सुरुवात केली होती दोघांनी. तिच्या एका इंटेरीअर डेकोरेटर मैत्रिणीने छोटे छोटे पण मस्तं हटके चेंजेस सुचवले होते. याऊपर पहिल्यापासून चित्र काढायची हौस असल्यामुळे वीकेंडसला मोकळ्या वेळात भिंतींवर छोटी मोठी चित्र नीला स्वतः काढत होती. सगळं कसं ठरवल्यासारखं चाललं होतं, जसं काय शी वॉज डेस्टीन्ड फॉर इट. तीनेक महिन्यात ती रीजाईन करणार हे ठरलं होतं, पुढच्या दोन महिन्यात रीलिविंग आणि तिच्या प्रिप्रायमरीची पहिली बॅच फ्लोअरवर जाणार होती. पण म्हणतात ना लाईफ इज वॉट हॅपन्स टू यू व्हेन यू आर बिजी मेकींग आदर प्लान्स अगदी तसंच झालं. जगभर थैमान माजवणारा वुहान वासरस बघता बघता भारतात आला आणि कोणालाही कळायच्या आत संपूर्ण भारत लॉकडाऊन मध्ये गेला. त्यांच्याच कॉलनीतला, दोन घरं सोडून पलिकडचा बंगला शाळेसाठी रेंटवन घेतला असल्याने जोवर चित्रांसाठी रंग वगैरे साहित्य शिल्लक होतं तोवर नीला रोज वर्कफ्रॉम होमची कामं उरकल्यावर तिकडे जाऊन जमेल तशी आणि आवडेल तशी चित्र भिंतीवर काढायची. नुसत्या सिरीज आणि सिनेमे बघण्यापेक्षा हे बेटर वाटायचं तिला. पंधरावीस दिवसात साहित्यातली एकेक करत सगळ्या वस्तू संपल्या तेव्हा फक्त अर्धवट तयार झालेल्या शाळेत चक्कर टाकून येणं आणि शाळा चालू झाल्यावर तिथे कशी वर्दळ आणि लहान मुलांचा किलबिलाट असेल हे विज्युअलाईज करणं हा नीलाचा फेवरेट पास्ट टाईम झाला होता. 


बंगल्याच्या आवारात त्यांनी एक सॅंडपिट करुन घेतलं होतं. नीला प्रशांतला उत्साहात सांगायची प्रशांत आपल्या मुलांना बिनधास्त मातीत खेळू द्यायचं आपण. “आपली मुलं” असं नुसतं म्हणल्यानेही तिला फार बरं वाटायचं. प्रशांत गालातल्या गालात हसत तन्मयतेने तिचे प्लान्स ऐकत बसायचा. आज ना उद्या आपण बॅक टू नॉर्मल जाऊ आणि आपलं स्वप्नं आता हाकेच्या अंतरावर आलंय हे तिच्या स्वप्नाळू डोळ्यात स्पष्ट दिसायचं प्रशांतला. पण नियतीला तिचं स्वप्नं प्रत्यक्षात उतरणं मान्यंच नव्हतं कदाचित. कोविड लॉकडाऊनच्या काळात एकाही बाहेरच्या व्यक्तिच्या संपर्कात आले नव्हते ते दोघे, संपूर्ण जग ज्या वायरसमुळे धास्तावलेलं होतं तो त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता जवळपास शून्यंच होती. सगळं सुरळीत चाललं होतं, लॉकडाऊनंही आता टप्प्याटप्प्याने उठवायला हरकत नाही असं सरकार बोलू लागलं होतं तेव्हाचं नेमकं एके दिवशी रात्रीच्या जेवणानंतर चक्कर मारायला म्हणून बाहेर गेलेली नीला परत घरी आलीच नाही. तिच्या अर्ध्या तयाव झालेल्या शाळेसमोरुन चालत जात असताना कोणालाही कळायच्या आत ती कोसळली आणि तिथेच तिने शेवटचा श्वास घेतला. तिला दवाखान्यात न्यायची किमान संधीही प्रशांतला मिळाली नाही. पंधरा मिनिटांपूर्वी शतपावली करुन येते म्हणून घरातून बाहेर पडलेली धडधाकट बायको कोणालाही काही कळायच्या आत शांतपणे शेवटचा श्वास घेऊन कसलीही हिंट न देता आपला आणि या जगाचा निरोप घेते हे ॲक्सेप्ट करणं प्रशांतसाठी फार कठीण होतं. पहिला दिड महिना तर तो कंप्लीट डिनायल मोड मध्येच होता. या सगळ्याचा आतोनात त्रास करुन घेत घेत त्याने मागचं अखंड वर्ष काढलं होतं. या सगळ्याला परत परत उजाळा द्यायचा नाही हे त्याने मनात टरवून टाकलं होतं. जून्या आठवणींना मोठ्या प्रयत्नांनी थोपवून धरल्यानंतर त्या आठवणींमध्ये हात धरुन नेणाऱ्या व्यक्तिंना भेटणं तो जाणूनबुजून टाळत आला होता. राजेश आल्यानंतर नीलाचा विषय न काढताही तो त्या आठवणींमध्ये तो आपसूकंच ओढला गेला होता.


कर्मकांडं किंवा रेग्युलर धार्मिक विधींमध्ये नीला आणि प्रशांत दोघांचाही विश्वास नव्हताच मूळात, त्यामुळे नीलाच्या वर्षश्राद्धाला सगळ्या विधींना कात्री लावत पाच पंचवीस गरीब मुलांना नीलाच्या अर्ध्या तयार शाळेत जेवायला घालायचं प्रशांतने ठरवलं होतं आणि त्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून गोष्टींची काही पुस्तकं त्यांना वाटावी असं त्याला वाटत होतं. त्यासाठी प्रशांतने आप्पा बळवंत चौकात आपला मोर्चा वळवला. त्यासोबत ठरवलेल्या जुजबी वस्तू खरेदी करुन पिशवीत भरत त्याने संध्याकाळी कॅब घेतली, कॅब बूक करताना लक्षपूर्वक डेस्टीनेशन एंटर केलं. 


गाडी आप्पा बळवंत चौकातून निघाली तसा तो सजगपणे रस्त्याकडे बघू लागला. आज रस्त्यावर रहदारी नेहमीपेक्षा जरा जास्तंच होती. अलका टॉकिज चौकापर्यंत एरवी वीस मिनिट फार झाले असते पण आजच्या गर्दीमध्ये रमणबागेच्या कॉर्नरला पोहोचता पोहोचताच अर्धा तास झाला होता. सजग राहायच्या नादात डोळे जास्तं ताणल्यामुळे कि काय त्याचं डोकं जड होऊ लागलं होतं, अशातंच त्याचा डोळा कधी लागला हे त्याचं त्याला कळलं नाही. ड्रायवरने आवाज देऊन उठवलं तेव्हा समोर कैलाश स्मशानभूमी होती. एक अवाक्षर न काढता त्याने गाडीचा दरवाजा उघडला, त्याच्या मागे दार बंद करताना ड्रायवरला थँक यू म्हणाला आणि स्मशानाकडे चालू लागला. चालताना त्याला आजूबाजूला कोणीही आणि काहीही दिसत नव्हतं. त्याने चारीही बाजूला मान वळवून परत परत चेक केलं तेव्हा त्याला नीलाने शाळेच्या भिंतीवर काढलेली चित्र पुसटशी दिसू लागली. तो जसजसा पुढे जात होता तसतशी ती चित्र ठळक होऊ लागली जणू तो शाळेतूनंच चालतोय. नव्याने रंगवलेल्या शाळेच्या भिंतींचा वास येत होता, नीलाने कौतुकाने सांगितलेला एकेक प्लान तिच्या आवाजात ऐकू येत होता. काही क्षणात तो स्मशानात पोहोचून पलिकडच्या कोपऱ्यात गेला. त्या कोपऱ्यात नीलाची समाधी होती. एकदा गप्पा मारता मारता नीला त्याला म्हणाली होती कि मी जेव्हा मरेन ना तेव्हा मला जाळू नकोस मला आगीची फार भीती वाटते, मला पुरशील प्रॉमिस कर, या मातीत मिसळून जाऊनंच माझा प्रवास पूर्ण होईल असं वाटतं. काहीतरीच बोलतेस म्हणत त्याने विषय बंद केला होता तेव्हा त्याला वाटलं नव्हतं कि खरोखरीच एक दिवस ती असा तिचा प्रवास अर्ध्यावर सोडून जाईल तेव्हा तिचा तो प्रवास पूर्णत्वास नेण्यासाठी तिला तो त्याच्या स्वतःच्या हातून माती देईल. तिच्या समाधीपाशी पोहोचता पोहोचता तिने शाळेतल्या कोपऱ्यातल्या एका खिडकीत लावलेल्या वाळ्याच्या पडद्याचा वास आला, डोळे मिटून एका दीर्घ श्वासासोबत तो वास छातीत भरुन घेत असताना मातीत मिसळलेल्या गुलालबुक्का आणि उदबत्तीच्या उग्र धुराचा संमिश्र वास त्याचा नाकात शिरला. ठसका लागला म्हणून त्याने डोळे उघडले तर कॅब ड्रायवर त्याला आवाज देऊन सर तुमचं डेस्टीनेशन आलंय सांगत उठवायचा प्रयत्न करत होता. डोळे चोळत चोळत त्याने संध्याकाळच्या अंधाराला भेदत आजूबाजूला बघायचा प्रयत्न केला, कॅब नीलाच्या शाळेपाशी थांबली होती. तो थॅंक्स म्हणत कॅबमधून उतरला आणि संध्याकाळच्या थंड वाऱ्यासोबत त्याला शाळेतल्या वाळ्याचा पडद्याचा मंद सुवास आला. शाळेकडे वळून न बघता प्रशांत घराच्या दिशेने निघाला. घरी पोहोचल्यावर राजेशने काहीही विचारण्याआधी त्याने हातातली पिशवी राजेशसमोर ठेऊन त्याला ती पुस्तकं आणायचं कारण सांगितलं. का कुणास ठाऊक पण राजेशने प्रशांतला कसलेच प्रश्न विचारले नाहीत.



क्रमशः

Tuesday, July 26, 2022

नींद

 

शहर के इस चकाचौंध से

अपने नींद का सौदा करते है

बस ज़िंदा है, ये जताने के लिए

पल पल यहाँ मरते है

अपने ही कंधों पे ढोंते है

उम्मीदों की अधमरी लाशें

माथे की शिकन में खोयी है जो,

वो राहें कौन कैसे तलाशे?

होंठों की हंसी न जाने कहाँ लापता है

बस माज़ी के पास ही तो दिल के अरमानों का पता है

हर रोज़ न जाने क्यूँ ये हारी हुई बाज़ी खेलते है

अपनी ही परछाई से मुँह मोड़ने वाले सिकंदर यहाँ कोने कोने में मिलते है

सुकून तो सिर्फ़ किताबों, फ़लसफ़ों में दिखता है

या फिर अगर पैसा हो जेबों में तो खरीद लो  बाज़ारों में बिकता है

किस मंज़िल की तलाश में ऐसे भागादौड़ी  मे जीते है

इत्मिनान से तो भाई साहब यहाँ पे क़ब्रों में मुर्दे ही सोते है

 

हंह.. शहर के इस चकाचौंध से

अपने नींद का सौदा करते है…

 

केपी आर

 

Tuesday, July 19, 2022

दोघं - भाग १४


 

 

मी डोळे किलकिले करत, हाताने आजूबाजूचा बिछाना चाचपून मोबाईल शोधायला सुरुवात केली. डोळे उघडायची ईच्छा होत नव्हतीच पण बंद खोलीमध्ये नेमके किती वाजलेत याचा अंदाजंच येईना. उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूंना दहा वेळा हात फिरवूनंही मोबाईल हाताला लागेना म्हणल्यावर माझा संताप होऊ लागला. आधीच पाठ अवघडल्यासारखी दुखत असल्यानं पोटावर झोपून एक पाय गुडघ्यात दुमडून फक्तं पडून रहावं थोडावेळ असं वाटत होतं. झोपेतून उठायची ईच्छा नसली तरीही डोक्यात मोबाईल शोधायचा किडा घुसल्यामुळे माझी चलबिचल चालू झाली होती. झोपताना हातात असलेला मोबाईल असा काही कुठे हरवणार नव्हता पण एखादी गोष्ट डोक्यात आली आणि ती केली नाही कि माझी ॲंग्झायटी कायमंच वाढते.

 मी वैतागून, मनाविरुद्धच का असेना पण दुखरी पाठ संभाळत बिछान्यावर उठून बसले. बसल्या जागी मोठ्या प्रयत्नाने डोळे उघडून सगळ्या बेडवर नजर फिरवली, खोलीत अंधार असला तरी अंधाराला एव्हाना नजर सरावली होती. मोबाईल कुठेच दिसंत नव्हता. च्चकं करत मी जागचं उठत भिंतीवरचं लाईटचं बटन दाबलं, डोळ्यावर भक्कं उजेड पडताच गच्च डोळे मिटून घेतले आणि चाचपडंत भिंतीवर हात ठेवून अंदाजानेच परत बटन बंद केलं. बेडच्या आजूबाजूलाही फोन दिसला नाही तेव्हा मरु दे म्हणत परत बेडवर अंग टाकून देताना आधी उशी सरळ केली आणि उशी खालून काहीतरी काचेची वस्तू चमकली. उशीखाली हात घातल्या घातल्या हाताला फोन लागला. फोन बाहेर काढून फक्त स्क्रिनवर टॅप केलं. नऊ पंनास, हंह म्हणत फोन परत उशीखाली सारला आणि परत बेडवर पडून राहीले. पायापाशी पडलेलं पांघरुण पायानेच कमरेपर्यंत वर ओढलं आणि मग तिथून खेचून डोकं झाकत डोक्याखाली खोचताना मला आठवलं काल वेदर ॲपवर पाहीलं तेव्हा आजचं लोएस्ट टेंपरेचर मायनस आठ दाखवत होतं.

रुममधला हिटर चालू असला तरीही डोक्यावरुन पांघरुण घेतल्यावर मिळणारं समाधान वेगळंच होतं. मला झोपून जेमतेम साडे तीन तास झाले होते. एवढं कमी झोपून चालायचं नाही म्हणून मी परत झोपायचा प्रयत्न केला, खरंतर अयशस्वी प्रयत्न केला. गेल्या कित्येक दिवसात मला झोप अशी लागतंच नाहीये आणि कालची रात्रंही त्याला निश्चितंच अपवाद नव्हती.

घरातले सगळे नेटफ्लिक्सवर पिक्चर बघून बारा साडेबाराला झोपी गेले असावे. त्यानंतर मी रीमोटशी निरर्थक चाळा करत नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार वगैरे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काही धडाचं कंटेंट मिळतंय का हे शोधण्याचा प्रयत्न केला. खरंतर डोळ्यांसमोर दिसणाऱ्या एकाही चित्राकडे माझं अजिबात लक्ष नव्हतं पण झोपेशी साताजन्माचं वैर असल्यासारखं निशाचर आयुष्य जगायचंच म्हणल्यावर एकटेपणा घालवायला काहीतरी चाळा हवा म्हणून मी वेड्यासारखे पंधरावीस मिनिट वेगवेगळे पिक्चर्स, सिरीज वगैरे ब्राउज केल्या. बघण्यालायक काहीच मिळत नाही म्हणून शेवटी टिव्ही तसाच चालू ठेऊन मी जागची उठले. स्क्रिनवर युट्यूब, प्राईम, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, ॲपल टिव्ही, झी वगैरे वगैरेंच्या टाईल्स दिसत राहील्या.

मोबाईल हातात घेत हॉलमध्ये इकडून तिकडे, तिकडून इकडे घिरट्या मारायला सुरुवात केली. एकच्या सुमारास चालायचं थांबून सोफ्यावर बसले. फेसबूक चालू केल्यावर लक्षात आलं कि लोकांच्या शिळ्या पोस्ट वाचूनंच वेळ मारुन न्यावी लागणार आहे कारण इंडीयात आता सकाळचे जेमतेम साडे सहा वाजले आहेत. एकतंर लोक साखर झोपेत आहेत किंवा जे उठलेत त्यांना कामाला जाण्याची, कुठेतरी पोहोचण्याची लगबग आहे. आत्ता कोणीही ऑनलाइन बोलणार नाही, फारतर आपल्या गुड मॉर्निंगला जी.एम. + हसणारा इमोजीने रीप्लाय येईल एखादा. नाहीतर कोणी बोललंच तर काय गं झोपली नाहीस अजून? एक वाजला असेल की गं तिकडे आता? वेळेत झोपत जा, एवढं असं जागरण करणं चांगलं नाही बिलकुल, म्हणत आपली सपशेल शाळा घेतली जाईल.

च्यायला मीही आता चाळीस वर्षांची झाल्येय आणि या गोष्टी मला कळतंच नसतील अशा रीतीने जो तो मला शाणपणा का शिकवतो काय माहीत म्हणत मी मेसेंजर उघडायचाच टाळलं. एफबीची वॉल स्क्रोल करत असताना माझ्या लक्षात आलं साला आपल्या मामाने एकदा आपल्याला टोकलं होतं की सकाळी बघितलं तर तुझे लाईक्स पडत असतात वेगवेगळ्या पोस्टींवर, तेव्हा मध्यरात्र उलटून गेलेली असते तिकडे. निद्रानाश झाल्यासारखी निम्म्या रात्रीचं एफबीवर काय करत असतेस? माझा नवरा मला कधीच तू ऑनलाइन काय करतेस असले प्रश्न विचारत नाही पण बाकी सगळ्या जगाला माझ्या ऑनलाइन ऑफलाइन ॲक्टीविटीज बद्दल कुतुहल असतं. म्हणजे काय तर ज्याला त्याला शाणपणा फक्त मलाच शिकवायचा असतो. असं मनात आल्या आल्या मला अपराधीपणा जाणवू लागला. आपल्या सत्तर वर्षाच्या मामाला कुतुहल नाही काळजी असते म्हणूनंच तो असं बोलत असावा हे न कळण्या इतपत सर्किट नाहीये मी पण मला ना आजकाल सगळ्यांच्याच प्रश्नांमुळे भयानक चिडचिड होते. आता यांना कसं सांगावं की निद्रानाश खरंच झालाय माझा हे मला कळतंच नाहीये.

मी मग एफबी वरवर चाळून दोनचार पोस्टस लाईक केल्या, एखादी लव्ह आणि एखाददुसरीवर कमेंट करुन बंद करुन टाकली. फक्त सव्वा वाजला होता म्हणजे घरचे झोपल्यापासून आपण दोन दिवस टाईमपास करायचा प्रयत्न करतोय कि काय असं वाटत असताना वास्तविक पाहता फक्त पंचेचाळीस मिनिट झालेले होते. ईतक्यात झोप येण्याची पुसटशीही शक्यता नव्हती. वॉटसॅप उघडलं तर शाळाकॉलेजफॅमिली वगैरे ग्रुपांवर गुडमॉर्निंगवाले फुलांचे फोटो आणि संकष्टी चतुर्थीवाले शुभेच्छापर मेसेजेस येऊन पडले होते. इथेही कोणालाही गुडमॉर्निंग म्हणून रीप्लाय करण्यात तोच धोका होता… शा…ळा. मला कोणाचेही स्टेटस बघण्यात स्वारस्य नसतं.

 वैतागून स्क्रिन लॉक करत मी चरफडतंच बेडरुममध्ये गेले. गेले वीस तास खड्डे खणून दमल्यासारखा माझा नवरा गाऽढ झोपला होता. त्याला गदागदा हलवून जागं करावं आणि उठून बसायला लावावं असा अघोरी विचार माझ्या डोक्यात आला. ड्रेसिंग टेबलासमोरच्या खुर्चीवर बसून मी त्याच्याकडे एकटक बघत बसले. संथ लयीत त्याच्या छातीचा भाता वरखाली होत होता. बेडला वळसा घालत मी पलिकडच्या मोठ्या खिडकीशी जाऊन उभी राहीले आणि ब्लाइंडस सरकवंत काचेतून बाहेरचं जग बघायला सुरुवात केली. टेंपरेचर मायनस चारच्या आसपास होतं, बाहेर पिंजलेला कापूस हवेत उडत उडत खाली पडावा असा स्नो पडत होता. सुरुवातीला इकडे आले तेव्हा मध्यरात्री, पहाटे, दुपारी कधीही स्नो पडला तर उत्साहात बाहेर जाऊन स्नोमॅन बनव, फोटो विडीयो काढ, बर्फात खेळ असले प्रकार चालायचे. आता आभाळातून तरंगत तरंगत जमिनीवर पसरणाऱ्या पांढऱ्याशुभ्र कापसाचं कणभर सोयरसुतक उरलं नाहीये मला.  बाहेर सर्वदूर पसरलेल्या काळ्यामिट्ट अंधारावर डागासारखे पडणारे पांढरे पुंजके वाढत चालले होते.  आजूबाजूला किर्र काळोख आणि बघता बघता पांढरी होत जाणारी जमिन. मधूनंच रस्त्यावरून जाणारी एखादी गाडी. पावणे दोन होत आले होते पण झोप येण्याची सुतराम शक्यता दिसत नव्हती. मग मी रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या मोजायचं ठरवलं.

 

एक…. पुढची पंधरा मिनिटं रस्ता झाकत मुक्यानं पडणारा सफेद बर्फ तेवढा सातत्याने दिसत राहीला. सोळाव्या मिनिटाला दुसरी गाडी आली. दोन…. म्हणतमी चिकाटीने रस्त्यावर डोळे रोखून धरले. किमान दहा गाड्या दिसल्याशिवाय ईथून हलायचं नाही असं मी उगाचंच मनाशी ठरवून टाकलं. साडेतीन वाजेपर्यंत म्हणजे पुढच्या पावणे दोन तासात मला रस्त्यावरून जाणाऱ्या आणि येणाऱ्या मिळून फक्त चार गाड्या दिसल्या.

आता तळपाय आणि कंबर भरुन आली होती माझी. मानेच्या मागे डावा हात ठेवून हलकेच दाबत मी एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे मान वळवली. मागे न बघता सावकाशीने बेडच्या कोपऱ्यावर बसत मी नजर तशीच खिडकीतून बाहेर रोखून धरली. एखादं चित्र फ्रेम करुन भिंतीवर टांगावं इतका निश्चल भवताल होता. गर्द काळ्या रात्रीवर पांढरा शुभ्र बर्फ अंथरला होता. जो बर्फ सात वर्षांपूर्वी मला आतोनात आनंद द्यायचा तोच बर्फ बघून माझ्या चेहऱ्यावरची रेघंही हलत नाही आता. एक दीर्घ उसासा टाकून, हंमम व्हाईट डिप्रेशन म्हणत मी क्षणभरंच डोळे मिटले आणि तेवढ्यात अंगावर येणाऱ्या शांततेला चिरत ऱ्हूऽम करत गाडीचा आवाज आला. डोळे उघडून मी पाच म्हणत पुढचा आकडा मोजला, तीन चाळीस झाले होते.

 

 डोळ्यावर झोपेचा लवलेश नसला तरी आता डोकं जड होऊ लागलं होतं. नेमक्या चार गाड्या मोजल्या की पाच याचा हिशेब लावताना मेंदूची धावपळ होऊ लागली होती. निर्जन रस्त्याकडे बघता बघता गेली कित्येक वर्ष आपण ईथेच उभे आहोत असा भास मला होऊ लागला होता. नजरेच्या टप्प्यात येणाऱ्या रस्त्यावर चिटपाखरुही दिसत नव्हतं. आत्ता पहाटेचे चार वाजत आले म्हणून नाही तर दिवसाही यापेक्षा वेगळा अनुभव येत नाही. तास न् तास चित्रातल्या खिडकीसारखी निश्चलंच असते माझी खिडकी. सव्वा चार वाजल्यावर माझा संयम हळूहळू संपू लागला होता.  पावणे दोन ते सव्वा चार, या अडीच तासात पाच गाड्या रस्त्यावर दिसल्या मला. भारतात लॉकडाऊन मध्येही अर्ध्या तासात यापेक्षा जास्तं गाड्या रस्त्यावर दिसल्या असतील लोकांना. शांतता अंगावर येणे म्हणजे शब्दशः काय असतं याचा खराखुरा अनुभव घ्यायचाच असेल तर माझ्या घरच्यांनी विंटरमध्ये इथे येऊन जास्तं नाही पण सगळं सोडून दोनेक महीने राहून बघितलं पाहीजे. स्वतःच्या रीटर्न फ्लाईटमध्ये मला भारतात परत चल म्हणून मागे लागले नाहीत तर नाव बदलून टाकेन मी.

 

रुममध्ये हिटर चालू असूनंही कानाला गारवा जाणवू लागला होता, पायाची बोटं तर कधीचीच गाऽर पडली होती. बाहेर परत एकदा बघितलं तर बर्फ पडायचा थांबला होता. पार्क केलेल्या गाड्या, झाडं, फेन्सिंग, फूटपाथ रस्ता सगळीकडे बर्फाचा थर जमा झाला होता आणि त्यावर रात्रीचा गडद अंधार चमकत होता. पावणे पाच झाले होते गाड्यांचा काऊंट पाचच्या पुढे गेला नव्हता. गाड्या मोजण्याचा हट्ट सोडून मी बेडवर पडून पांघरुणात शिरले तेव्हा बंद डोळ्यात सुया टोचल्यासारखं जाणवत होतं. घशात जळजळ होत होती. मी परत उठून बसले, दोन्ही हातात जड झालेलं डोकं दोन मिनिट धरल्यानंतर झटक्यात अंगावरचं पांघरुण बाजूला करुन पलिकडच्या ड्रॉवरमधल्या स्लीपिंग पिल्सचं पाकीट काढलं. एका पाठोपाठ सगळ्याच्या सगळ्या दहा गोळ्या खाव्या असं वाटत होतं. आणि मग ड्रॉवरमधली सगळी पाकीटं काढून त्या सत्तर गोळ्या एका दमात संपवाव्या असं वाटू लागलं. मी मोठ्या प्रयत्नानं आजूबाजूला बघितलं, खिडकी पॉजंच झालेली होती, नवरा अजूनंही तेवढाच गाऽढ झोपला होता. रुमच्या बाहेर जात मी पोरांच्या बेडरुमचा दरवाजा हळूच ढकलला, पहाटेच्या साखर झोपेत पोरांच्या चेहेऱ्यावर आतोनात निरागस भाव दिसत होते. मी तसाच दरवाजा ओढून घेत बंद केला. माघारी फिरत माझ्या रुममध्ये आले आणि एकंच गोळी खाऊन पांघरुणात शिरले तोपर्यंत सव्वा पाच झाले होते. डोळे मिटण्याआधी एकवार परत मोबाईलकडे बघितलं, मोबाईल उचलून स्टॅच्यू झालेल्या खिडकिच्या फ्रेमचा फोटो क्लिक केला, स्टेटसला ठेवत इट्स स्नोइंग म्हणून कॅप्शन लिहून पुढे हसणारी इमोजी डकवली.

 

डोळे मिटले पण एखाद्या प्रवासात मॅपवरची दिशा न कळल्यामुळे एक्झॅक्टली उलट्या दिशेने चालायला सुरुवात करावी तशी झोप माझ्यापासून दूर दूर चालल्याचंच फिलिंग येऊ लागलं. साडेपाच वाजून गेले असतील म्हणत मी डोळे तसेच बंद ठेवले. आता मात्र उठायचं नाही असा मनोमन निर्धार केला. इकडे आल्यानंतरच्या पहिल्या स्नोच्या आठवणी डोळ्यासमोर आणत पडून राहीले. अर्ध्या पाऊण तासानंतर म्हणजे टेक्निकली सव्वा सहाला वगैरे झोपी गेले असावे.

 

मी मनाविरुद्धंच उठून घरभर फिरले. नवऱ्याने पोरांचं आवरुन त्यांना शाळेत सोडलं असावं, तोही ऑफिसला गेला होता. मी परत खिडकीत जाऊन बसले, पहाटे पॉज झालेली फ्रेम अजूनंही प्ले झाली नव्हती. रस्त्यावर गाडी, एखादा माणूस तर सोडाच पण साधं कुत्र… अहं, चिटपाखरुही नव्हतं. नजर जिथवर पोहोचते तिथवर फक्त आणि फक्त पांढरा शुभ्र बर्फाचा थर दिसत होता. फरक फक्त एवढाच कि आत्ता रात्रीसारखा कभिन्न काळोख नव्हता, कधीही कोसळायला सुरुवात होईल असं वाटावं एवढं आभाळ भरुन आलं असलं तरी आजूबाजूला दिवसाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. अजून चारपाच तासात परत रात्र होणार आहे. तिला थोपवता येत नाही आणि दिवसाला धरुन ठेवता येत नाही. धरुन ठेवलं तरी तो एकाकीपणा शिवाय बाकी काही देत नाही. जास्तं विचार न करता खिडकीतून त्याच निर्जन रस्त्याचा फोटो काढून मी एफबीवर टाकला. हा त्याच कॅटेगरीतला फोटो होता ज्याला किमान सातआठशे लाईक्स, लव्ह, वॉव रीॲक्ट येणार होते. मोबाईल वर ढिगाने गुडमॉर्निंगवाले मेसेजेस आणि पहाटेच्या स्टेटसवर सतराशे साठ वॉव, यू आर सो लकी, आय एन्वी यू वाले रीप्लाईज येऊन पडले होते. मी कोऱ्या चेहेऱ्याने मोबाईल लॉक केला, ड्रॉवरमधलं पाकीट काढून परत एक गोळी खाल्ली, ग्लासाभर पाणी प्यायले.

 

हे सगळं जसंच्या तसं डायरीत उतरवून काढत खाली आजची तारीख टाकली. दिवस रेंगळत असला तरी वेगानं रात्रीत कन्वर्ट होतोय हे जाणवत असताना मी माझ्यापुरता दिवस संपवून डोळे मिटले, गाड्यांचा काऊंट अजूनंही पाचच्या पुढे गेला नाही. आज कदाचित अठराव्यांदा मी सगळ्या स्लीपिंग पिल्स एका दमात खायची स्ट्रॉंग अर्ज दाबून टाकली. आता रात्रीच्या अंधारातंच डोळे उघडावे म्हणत मी पांघरुणात शिरले. बाहेर व्हाईट डिप्रेशन एखाद्या शाईच्या थेंबानं टिपकागद व्यापून टाकावा तसं आकारानं वाढतंच राहीलं.

 

हा सगळा मजकूर पाचव्यांदा वाचून अविश्वासाने मान हलवत त्याने डायरी बंद केली.  आपण भारतात राहायला आलो या गोष्टीला आता तिसरं वर्ष चालू असून स्नो आता फक्त आठवणीत आणि डायरीतंच उरलाय. भारतात लोक बिजी असतात, तुला माणसं आणि त्यांचा वेळ मिळणं कठीण आहे हे सांगितल्यावर तिने कायम दुर्लक्ष केलं. आजच्या घडीला दुर्दैवाने भारतात येऊनंही तिच्या वाट्याला एकांतंच आलाय हे तिच्या पचनी पडेनासं झालंय. म्हणून तिचा मेंदू सतत डिनायल मोडमध्ये जातोय. कालच्याच पानावर तिच्या डायरीत अजूनंही स्नो पडतोय, ती डायरीत अजूनंही भारताबाहेर राहत्येय. आजंही ती मानसिकरीत्या तिला अपेक्षित असलेल्या आपल्या माणसांनी गजबजलेल्या भारतात परत येण्यासाठी झगडतेय. तिला कसं सांगू आपण आलोय परत पण तिच्या कल्पनेतला भारत आता अस्तित्वातंच राहीलेला नाहीये.

 

केपी आर


दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...