राजेश घरी पोहोचला तेव्हा त्याच्या चेहेऱ्यावर वैताग स्पष्ट दिसत होता. खुर्चीत बसून अर्धा ग्लास पाणी पिऊन, हाशहुश करुन झाल्यावर प्रशांतने काहीतरी बोलायचं म्हणून सुरुवात केली, काय रे कसा झाला प्रवास? घर सापडायला काही अडचण नाही ना आली? ऱाजेशचा चेहरा अजूनंही नॉर्मल झाला नव्हता.
बस चहा घेऊन
येतो म्हणून तो
आत सटकणार तेवढ्यात
राजेशने बोलायला सुरुवात
केली.
वर्षश्राध्द नेमकं आहे
कधी?
परवा १४ तारखेला
आहे, फोनवर
बोललो होतो की
रे आपण.
हंमम, तुझा फोन बंद
का होता मगाशी?
कधी रे, मी
सहसा फोन बंद
ठेवत नाही यार.
१ वाजून ४३ मिनिटांनी फोन केला होता, नंतर १:४७ मग २:०३ आणि परत सव्वादोनला केला होता. प्रत्येकवेळी तुझा फोन
स्विचऑफ येत होता, फोनमधून नजर हटवत त्याच्याकडे बघत बोलत
होता राजेश.
काय बोलतोस अरे माझा फोन क्षणभरंही बंद नव्हता या वेळात.
मला बंद लागला म्हणून बोललो मी.
कदाचित नेटवर्कचा काहीतरी इश्यू असेल, सोड.
हंमम तसंही असेल कदाचित.
आलोच मी, म्हणत प्रशांत आत सटकला. एकतर हा जबरदस्ती मागे
लागून भेटायला आलाय आणि आता हा माझीच उलटतपासणी करणार असं पुटपुटत त्याने चहासाठी
पातेलं गॅसवर चढवलं.
प्रशांत काय रे माझी कॅब मी बूक करतो म्हणत असूनंही तू बूक
केलीस आणि परत मला कसला विचारतोस की घर सापडायला काही अडचण तर आली नाही ना?
अरे बाबा कधीकधी नवखे कॅब ड्रायवर असतात आणि माझं घर जरा
आतल्या बाजूला आहे, हमखास नवे ड्रायवर एखादं वळण मिस करतात आणि
मग शोधत बसावं लागतं, गोंधळ होतो.
अच्छा तसं होय मला वाटलं...
गॅसवर उकळणारा चहा तसाच ठेऊन प्रशांत जरा कातावूनंच
किचेनच्या दारातून डोकावून बोलला काय वाटलं?
सोड ना काही नाही.
नाही नाही, काही नाही कसं? काहीतरी बोलणार होतास तू, बोलता बोलता
थांबण्यापेक्षा बोलायचंच नाही आणि विषय काढला तर पूर्ण बोलायचं, हे असले डोक्यात किडे सोडून गप्पं बसायचं नाही. बोल चल.
स्पष्टंच बोलायचं तर मला वाटलं जाणूनबुजून चुकिचा पत्ता
दिलास कि काय कॅब ड्रायवरला
तुझं डोकं वगैरे फिरलंय का रे राजा? एकतंर मी आत्ता कोणालाही भेटायच्या मानसिकतेत नव्हतो, तुला तसं स्पष्टं सांगूनंही तू मागे लागलास आणि आता घरी आल्यावर मला
विचारतोयेस की जाणूनबुजून.... हं, च्यायला चुकीचा पत्ता दिला
असता तर घर तरी सापडलं असतं का रे तुला?
पश्या कॅब ड्रायवर चुकला तर याच एरीयात जवळपास फिरत राहायला
हवा ना?
हो अर्थातंच!
मग ईथून किमान साडेपाच किलोमीटर लांब नको त्याच पत्त्यावर
मला नेऊन वर सर तुमचं डेस्टीनेशन आलंय हे का म्हणाला असेल तो?
काय?
हो आणि चुकीच्या पत्त्यावर पोहचून तुला फोन लावल्यावर जर
पाऊण एक तास तुझा फोनंच लागत नसेल रादर स्विचऑफ असेल तर काय समजावं माणसाने? कि नजरचुकिने चुकीच्या पत्त्यावर कॅब बूक केलीये मित्राने अशी स्वत:ची
समजूत घालून घ्यावी काय?
अरे काय बरळतोयेस?
बरळतोय? कैलास स्मशानभूमी बाहेर
गाडी उभी करुन ड्रायवर म्हणाला तुमचं डेस्टीनेशन आलंय. आजूबाजूला एकंही घर दिसेना
तेव्हा मी विचारलं त्याला की काहीतरी चुकतंय का, मला माझ्या
मित्राच्या घरी जायचंय. त्यावर त्याने मला त्याच्या ॲपवर फिड केलेलं डेस्टीनेशन
दाखवून माझी बोलती बंद केली. तुला फोन केला तर फोन स्विचऑफ, एकदोन
मिनिट नाही तर पुढचा पाऊण तास फोन बंदंच? त्या ड्रायवरला
थांबायची रीक्वेस्ट केली तर तोही नवी राईड बूक झाल्यामुळे निघून गेला. काय काय
उद्योग करुन मी तुझ्या घरी पोहोचलोय माहीतीये का? तू कॅब बूक
केल्यानंतर मी जेवढ्या वेळात ईथे पोहोचायला हवा होतो त्यापेक्षा दोन तास उशिरा
पोहोचूनंही तू कॅज्युअली विचारतोयेस की घर सापडायला अडचण तर नाही ना आली? का नाही वाटणार मला की तू जाणूनबुजून चुकीचा पत्ता दिलास त्या कॅब
ड्रायवरला?
राजेशचं बोलणं संपायच्या आधीच प्रशांतची तंद्री लागली होती.
त्याला आठवत होतं की दहा महिन्यापूर्वी असंच झालं होतं. तीन आठवड्यात ही पाचवी वेळ
होती घरी जाण्यासाठी कॅब बूक केल्यानंतर ड्रायवरने स्मशानापाशी सोडून तुमचं
डेस्टिनेशन आलंय म्हणून सांगायची. आता त्याचं डोकं काम देईनासं झालं होतं, असं होण्याचं काहीही कारण नव्हतं खरंतर कारण त्याचं घर कैलासपासून किमान
सहा एक किलोमीटर लांब होतं. पहिल्या दोन वेळेस त्याने ड्रायवरशी वाद तरी घातला
होता पण नंतर त्याने ते ही सडून दिलं होतं, कारण प्रत्येकवेळी ड्रायवरने त्याचे
बूकिंग डिटेल्स दाखवून डेस्टीनेशन तुम्हीच एंटर करता साहेब माझी काय चूक म्हणून
त्याचं तोंड बंद केलं होतं. पहिल्या वेळी तर तो रात्री उशिरा ऑफिसमधून घरी जायला
निघाला होता. कोविड प्रोटोकॉल्समुळे खिडकीच्या काचा बंद करुन एसी लावायची परवानगी नव्हती.
उघड्या खिडकीतून येणारा गार वारा आणि त्यात दिवसभर काम करुन थकल्यामुळे तो
कॅबमध्ये बसल्या बसल्या गाढ झोपी गेला. गेल्या दिड महिन्यात त्याला कितीही प्रयत्न
करुनंही झोप येत नव्हती, अगदी झोपेच्या गोळ्यांनाही जे जमलं नव्हतं ते आज गार
वाऱ्यानं साध्य केलं होतं. शिवाय खूप दिवसानंतर आज त्याने पूर्ण वेळ काम केलं
होतं, कामात पूर्ण लक्ष देऊन काम केलं होतं. मेंदूला खऱ्या अर्थाने आज वेगवेगळे
विषय मिळाले होते विचार करायला आणि विचार करुन थकायला. एखाद्या चित्रकाराने
मुक्तचित्र काढावं असा मेंदू इतक्या दिवसातल्या चकव्यातून बाहेर पडत मोकळेपणानं कामावर
लक्ष केंद्रीत करत होता. त्यामुळे घरी निघतानाच त्याला आज वाटत होतं कि खूप
दिवसांनी त्याला आज झोप लागणार आहे. एरवी गर्दीच्यावेळी ऑफिसपासून घरी जायला किमान
दोन तास लागायचे त्याला पण रात्रीच्यावेळी रहदारी कमी असताना सव्वा तासात सहज
पोहोचायचा तो. झोपताना त्याला वाटलं काही नाही तर किमान तासभर झोपायला मिळेल पण
जेमतेम चाळीसेक मिनिटांत त्याला ड्रायव्हरने आवाज देऊन उठवलं. तळघरातून कोणाचा तरी
दबका आवाज येत असल्यासारखा त्याला भास झाला, ड्रायवरने परत जोरात आवाज दिल्यावर तो
खडबडून जागा झाला.
सर पोहोचलोय आपण.
त्याने डोळे किलकिले करत आजूबाजूला पाहिलं, काहीच कळेना मग
त्याने डोळे चोळले तरीही आजूबाजूचा परीसर त्याला अनोळखीच वाटत राहीला.
सर... सर
ड्रायवरच्या आवाजाने भानावर येत तो हंमम म्हणाला. दार उघडून
बाहेर जाता जाता तो ड्रायवरला म्हणाला हे कुठे आलोय आपण?
सर तुमच्याच लोकेशनला घेऊन आलोय मी.
अरे हो, पण एरीया कोणता आहे हा?
त्याच्याकडे अविश्वासाने बघत, कल्याण नगर ड्रायवर म्हणाला
उतरण्यासाठी कॅबमधून बाहेर काढलेला पाय आत घेत त्याने दार
बंद केलं आणि म्हणाला माझं घर नाणेवाडीला आहे.
तर मग? ड्रायवरने थोडसं वैतागूनंच विचारलं त्याला.
तर मग तिकडे ड्रॉप आहे माझा.
सर तुमचं घर कुठे का असेना तुम्ही लोकेशन ईथलं टाकलंय.
अरे काय डोकं फिरलंय का तुझं? घरी जायचं असताना मी इथलं
लोकेशन का टाकेन. रात्रीची वेळ बघून नाटकं करु नकोस चल लवकर.
सर पहिले तुम्ही नीट बोला, एकतर तुम्ही गाडीत बसल्यावर मी
कन्फर्म करण्यासाठी विचारलं होतं तुम्हाला कि सर कुठे जायचंय तर तुम्ही म्हणालात
लोकेशन एंटर केलंय. पाच मिनिटांनी परत विचारावं म्हणलं तर तुम्ही गाढ झोपी गेला
होता.
त्याने वैतागून मोबाईल खिशातून काढून बघितला तर त्याची राईड
कंप्लीट झाल्याचं आणि फिडबॅक देण्यासाठी नोटीफिकेशन आलं होतं त्याला. आपसूकंच
त्याचा आवेश कमी झाला पण आपण हे लोकेशन का टाकलं असावं हे त्याला काही केल्या
लक्षात येईना. आपणंच काहीतरी गल्लत केलीये हे ड्रायवरला कळू नये म्हणून आवाजात
खोटीच जरब कायम राखत तो ड्रायवरला म्हणाला बरं बाबा तू बरोबर मी चूक, आता परत
माझ्या घरचं लोकोशन टाकतो, चल तू मला नाणेवाडीला सोड.
सर तसं नाही करता येणार ड्रायवर ठामपणे बोलला.
अरे चल बाबा, हवे तर एक्स्ट्रा पैसे घे म्हणत तो डोळे मिटून
सीटला रेलला.
आहो सर राइडस् फक्त ॲपवरुन घेता येतात ओ, तुमची राइड इथे
संपत्येय म्हणून मी ऑलरेडी पुढची राइड ॲक्सेप्ट केलीये. प्लिज तुम्ही उतरा आता.
ड्रायवर काकुळतीला येऊन त्याला विनंती करत होता. तरीही तो बधत नाही म्हटल्यावर
ड्रायवर चिडला, म्हणाला साहेब जबरदस्ती करायला लावू नका, हवं तर माझी पुढची राइड
इथून पाऊण किलोमीटरवर आहे तिथे तुम्हाला ड्रॉप करतो. मला काहीही ज्यादाचे पैसे नको
पण प्लिज मला समजून घ्या.
विनाकारण विषय वाढवायला नको म्हणून काहीही न बोलता तो दार
उघडून बाहेर पडला. खाली उतरला तसं समोर कैलास स्मशान दिसलं, सॉरी सर म्हणत ड्रायवर
निघून गेला. गेल्या दिड महिन्यापासून तासभर का असेना झोप लागावी म्हणून जीवाचा
आटापिटा करत होता, ती झोप आज लागली होती. अर्ध्या तासातंच डोळे उघडल्यावर ज्यातून
बाहेर पडण्यासाठी तो झगडत होता ती गोष्ट समोर होती. नीलाला जाऊन तीन महिने झाले
होते, तिचं अचानक जाणं त्याला स्वीकारता येत नव्हतं. आधुनिक मेडीकल सायंसलाही
तिच्या असं अचानक जाण्याचं पक्कं कारण सांगता आलं नाही, पोस्टमॉर्टेम रीपोर्टही
अजून मिळाला नव्हता पण डॉक्टर्सचं म्हणणं होतं कि तिचं हृद्य बंद पडलं. असं कसं
अचानक बंद पडू शकतं कोणाचं हृद्य, आणि तेही नीलाचं? शी ईज सो फुल ऑफ लाईफ. दिड
महिन्यानंतरंही तिचा मनातल्या मनातंही भूतकाळात उल्लेख करायला जमत नव्हतं त्याला.
मध्यरात्रीची वेळ, कोविडमुळे वातावरणात भरुन राहीलेली भयाण शांतता, चहुबाजूला
निर्जन रस्ता, रात्रीचा अंगावर येणारा किर्र आवाज, मधूनंच वाजणारे ॲब्युलंसचे
सायरन. स्मशानापासून पन्नास फूटावर उभा असूनंही त्याला नाकात तो माती,
गुलालबुक्का, फुलं, कापूर अगरबत्ती या सगळ्याचा एकत्र होऊन येणारा स्मशानातला
टिपिकल वास जाणवला. एरवी याच सगळ्याचा वास दुसऱ्या ठिकाणी वेगळाच वाटतो पण स्मशानात
कदाचित त्यात मृतदेहाचे वास मिसळत असावे, माणसाने जग सोडून जाताना मागे राहीलेल्या
शिळ्या, वर्षानुवर्षे कुजलेल्या ईच्छांचाही निचरा होऊन त्यांचाही वास वातावरणात
मिसळत असावा कदाचित. त्याच्याही नकळत तो दोन पावलं स्मशानाकडे चालत गेला आणि मग
कोणीतरी मागून आवाज दिल्यासारखा भानावर आला.
राजेश त्याला आवाज देत होता, पश्या ए पश्या कुठे तंद्री
लागलीये? ठिक आहेस ना? सोड चल ते कॅब आणि पत्ता प्रकरण.
कसंनुसं हंमम म्हणत त्याने वेळ मारुन नेली. चहापाणी
झाल्यावर तू आराम कर प्रवासात थकला असशील म्हणत तो काही कामं उरकण्यासाठी बाहेर
पडला. राजेश अरे मीही येतो म्हणतोय हे पाठमोऱ्या प्रशांतला लक्षात आलेलं असूनंही तो
ऐकलं नसल्यासारखा निघून गेला. त्याला थोडावेळ कोणीच सोबत नको होतं, खरंतर त्याला
आजकाल कोणीच सोबत नको असायचं म्हणूनंच त्याने राजेशला येऊ नकोस सांगितलं होतं. तो
जबरदस्तीने आलाच तेव्हा अर्जंट कामाचं कारण काढून जाणं हा प्रशांतसाठी सगळ्यात सेफ
ऑप्शन होता.
घरातून निघताना हातात एक मोकळी पिशवी घ्यायला तो विसरला
नाही. परत येताना त्या पिशवीत काहीबाही कोंबून आणलं कि कुठे गेला होतास काय काम
होतं वगैरे फुटकळ प्रश्नांना बगल देता यावा एवढा एकंच उद्देश त्यामागे होता.
नीलाला लहान मुलं फार आवडायची म्हणून लॉकडाऊनच्या दोन महिने आधीच तिने प्रशांतला सांगितलं होतं कि तिला हा आयटीतला जॉब सोडून प्रिप्रायमरी शाळा चालू करायची होती. तिने त्यासाठी कराव्या लागणाऱ्या कोर्सला ॲडमिशनंही घेतली होती. त्या दोघांनी त्यांच्याच कॉलनीतला एक बंगला रेंटवर घ्यायचा निश्चित केला होता. डिपॉजिटची रक्कम, रेंट सगळं फायनल झालं होतं. डिपॉजिट देऊन नीलाला हवं तसं बंगल्याचं रिनोवेशन करायला सुरुवात केली होती दोघांनी. तिच्या एका इंटेरीअर डेकोरेटर मैत्रिणीने छोटे छोटे पण मस्तं हटके चेंजेस सुचवले होते. याऊपर पहिल्यापासून चित्र काढायची हौस असल्यामुळे वीकेंडसला मोकळ्या वेळात भिंतींवर छोटी मोठी चित्र नीला स्वतः काढत होती. सगळं कसं ठरवल्यासारखं चाललं होतं, जसं काय शी वॉज डेस्टीन्ड फॉर इट. तीनेक महिन्यात ती रीजाईन करणार हे ठरलं होतं, पुढच्या दोन महिन्यात रीलिविंग आणि तिच्या प्रिप्रायमरीची पहिली बॅच फ्लोअरवर जाणार होती. पण म्हणतात ना लाईफ इज वॉट हॅपन्स टू यू व्हेन यू आर बिजी मेकींग आदर प्लान्स अगदी तसंच झालं. जगभर थैमान माजवणारा वुहान वासरस बघता बघता भारतात आला आणि कोणालाही कळायच्या आत संपूर्ण भारत लॉकडाऊन मध्ये गेला. त्यांच्याच कॉलनीतला, दोन घरं सोडून पलिकडचा बंगला शाळेसाठी रेंटवन घेतला असल्याने जोवर चित्रांसाठी रंग वगैरे साहित्य शिल्लक होतं तोवर नीला रोज वर्कफ्रॉम होमची कामं उरकल्यावर तिकडे जाऊन जमेल तशी आणि आवडेल तशी चित्र भिंतीवर काढायची. नुसत्या सिरीज आणि सिनेमे बघण्यापेक्षा हे बेटर वाटायचं तिला. पंधरावीस दिवसात साहित्यातली एकेक करत सगळ्या वस्तू संपल्या तेव्हा फक्त अर्धवट तयार झालेल्या शाळेत चक्कर टाकून येणं आणि शाळा चालू झाल्यावर तिथे कशी वर्दळ आणि लहान मुलांचा किलबिलाट असेल हे विज्युअलाईज करणं हा नीलाचा फेवरेट पास्ट टाईम झाला होता.
बंगल्याच्या आवारात त्यांनी एक सॅंडपिट करुन घेतलं
होतं. नीला प्रशांतला उत्साहात सांगायची प्रशांत आपल्या मुलांना बिनधास्त मातीत
खेळू द्यायचं आपण. “आपली मुलं” असं नुसतं म्हणल्यानेही तिला फार बरं वाटायचं.
प्रशांत गालातल्या गालात हसत तन्मयतेने तिचे प्लान्स ऐकत बसायचा. आज ना उद्या आपण
बॅक टू नॉर्मल जाऊ आणि आपलं स्वप्नं आता हाकेच्या अंतरावर आलंय हे तिच्या
स्वप्नाळू डोळ्यात स्पष्ट दिसायचं प्रशांतला. पण नियतीला तिचं स्वप्नं प्रत्यक्षात
उतरणं मान्यंच नव्हतं कदाचित. कोविड लॉकडाऊनच्या काळात एकाही बाहेरच्या
व्यक्तिच्या संपर्कात आले नव्हते ते दोघे, संपूर्ण जग ज्या वायरसमुळे धास्तावलेलं
होतं तो त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता जवळपास शून्यंच होती. सगळं सुरळीत
चाललं होतं, लॉकडाऊनंही आता टप्प्याटप्प्याने उठवायला हरकत नाही असं सरकार बोलू
लागलं होतं तेव्हाचं नेमकं एके दिवशी रात्रीच्या जेवणानंतर चक्कर मारायला म्हणून
बाहेर गेलेली नीला परत घरी आलीच नाही. तिच्या अर्ध्या तयाव झालेल्या शाळेसमोरुन
चालत जात असताना कोणालाही कळायच्या आत ती कोसळली आणि तिथेच तिने शेवटचा श्वास
घेतला. तिला दवाखान्यात न्यायची किमान संधीही प्रशांतला मिळाली नाही. पंधरा
मिनिटांपूर्वी शतपावली करुन येते म्हणून घरातून बाहेर पडलेली धडधाकट बायको
कोणालाही काही कळायच्या आत शांतपणे शेवटचा श्वास घेऊन कसलीही हिंट न देता आपला आणि
या जगाचा निरोप घेते हे ॲक्सेप्ट करणं प्रशांतसाठी फार कठीण होतं. पहिला दिड महिना
तर तो कंप्लीट डिनायल मोड मध्येच होता. या सगळ्याचा आतोनात त्रास करुन घेत घेत
त्याने मागचं अखंड वर्ष काढलं होतं. या सगळ्याला परत परत उजाळा द्यायचा नाही हे
त्याने मनात टरवून टाकलं होतं. जून्या आठवणींना मोठ्या प्रयत्नांनी थोपवून
धरल्यानंतर त्या आठवणींमध्ये हात धरुन नेणाऱ्या व्यक्तिंना भेटणं तो जाणूनबुजून
टाळत आला होता. राजेश आल्यानंतर नीलाचा विषय न काढताही तो त्या आठवणींमध्ये तो
आपसूकंच ओढला गेला होता.
कर्मकांडं किंवा रेग्युलर धार्मिक विधींमध्ये नीला आणि प्रशांत दोघांचाही विश्वास नव्हताच मूळात, त्यामुळे नीलाच्या वर्षश्राद्धाला सगळ्या विधींना कात्री लावत पाच पंचवीस गरीब मुलांना नीलाच्या अर्ध्या तयार शाळेत जेवायला घालायचं प्रशांतने ठरवलं होतं आणि त्यांना वाचनाची आवड लागावी म्हणून गोष्टींची काही पुस्तकं त्यांना वाटावी असं त्याला वाटत होतं. त्यासाठी प्रशांतने आप्पा बळवंत चौकात आपला मोर्चा वळवला. त्यासोबत ठरवलेल्या जुजबी वस्तू खरेदी करुन पिशवीत भरत त्याने संध्याकाळी कॅब घेतली, कॅब बूक करताना लक्षपूर्वक डेस्टीनेशन एंटर केलं.
गाडी आप्पा बळवंत चौकातून निघाली तसा तो सजगपणे रस्त्याकडे बघू लागला. आज
रस्त्यावर रहदारी नेहमीपेक्षा जरा जास्तंच होती. अलका टॉकिज चौकापर्यंत एरवी वीस
मिनिट फार झाले असते पण आजच्या गर्दीमध्ये रमणबागेच्या कॉर्नरला पोहोचता पोहोचताच
अर्धा तास झाला होता. सजग राहायच्या नादात डोळे जास्तं ताणल्यामुळे कि काय त्याचं
डोकं जड होऊ लागलं होतं, अशातंच त्याचा डोळा कधी लागला हे त्याचं त्याला कळलं
नाही. ड्रायवरने आवाज देऊन उठवलं तेव्हा समोर कैलाश स्मशानभूमी होती. एक अवाक्षर न
काढता त्याने गाडीचा दरवाजा उघडला, त्याच्या मागे दार बंद करताना ड्रायवरला थँक यू
म्हणाला आणि स्मशानाकडे चालू लागला. चालताना त्याला आजूबाजूला कोणीही आणि काहीही
दिसत नव्हतं. त्याने चारीही बाजूला मान वळवून परत परत चेक केलं तेव्हा त्याला
नीलाने शाळेच्या भिंतीवर काढलेली चित्र पुसटशी दिसू लागली. तो जसजसा पुढे जात होता
तसतशी ती चित्र ठळक होऊ लागली जणू तो शाळेतूनंच चालतोय. नव्याने रंगवलेल्या
शाळेच्या भिंतींचा वास येत होता, नीलाने कौतुकाने सांगितलेला एकेक प्लान तिच्या
आवाजात ऐकू येत होता. काही क्षणात तो स्मशानात पोहोचून पलिकडच्या कोपऱ्यात गेला.
त्या कोपऱ्यात नीलाची समाधी होती. एकदा गप्पा मारता मारता नीला त्याला म्हणाली
होती कि मी जेव्हा मरेन ना तेव्हा मला जाळू नकोस मला आगीची फार भीती वाटते, मला
पुरशील प्रॉमिस कर, या मातीत मिसळून जाऊनंच माझा प्रवास पूर्ण होईल असं वाटतं. काहीतरीच
बोलतेस म्हणत त्याने विषय बंद केला होता तेव्हा त्याला वाटलं नव्हतं कि खरोखरीच एक
दिवस ती असा तिचा प्रवास अर्ध्यावर सोडून जाईल तेव्हा तिचा तो प्रवास पूर्णत्वास
नेण्यासाठी तिला तो त्याच्या स्वतःच्या हातून माती देईल. तिच्या समाधीपाशी पोहोचता
पोहोचता तिने शाळेतल्या कोपऱ्यातल्या एका खिडकीत लावलेल्या वाळ्याच्या पडद्याचा
वास आला, डोळे मिटून एका दीर्घ श्वासासोबत तो वास छातीत भरुन घेत असताना मातीत
मिसळलेल्या गुलालबुक्का आणि उदबत्तीच्या उग्र धुराचा संमिश्र वास त्याचा नाकात
शिरला. ठसका लागला म्हणून त्याने डोळे उघडले तर कॅब ड्रायवर त्याला आवाज देऊन सर
तुमचं डेस्टीनेशन आलंय सांगत उठवायचा प्रयत्न करत होता. डोळे चोळत चोळत त्याने
संध्याकाळच्या अंधाराला भेदत आजूबाजूला बघायचा प्रयत्न केला, कॅब नीलाच्या
शाळेपाशी थांबली होती. तो थॅंक्स म्हणत कॅबमधून उतरला आणि संध्याकाळच्या थंड वाऱ्यासोबत
त्याला शाळेतल्या वाळ्याचा पडद्याचा मंद सुवास आला. शाळेकडे वळून न बघता प्रशांत
घराच्या दिशेने निघाला. घरी पोहोचल्यावर राजेशने काहीही विचारण्याआधी त्याने
हातातली पिशवी राजेशसमोर ठेऊन त्याला ती पुस्तकं आणायचं कारण सांगितलं. का कुणास
ठाऊक पण राजेशने प्रशांतला कसलेच प्रश्न विचारले नाहीत.

No comments:
Post a Comment