Tuesday, March 18, 2008

पाऊस

पाऊस
असं वाटतं....
सगळी दुःख वाहून जाईपर्यंत
या पावसांत एकट्यानंच चिंब भिजावं.
सोबत फ्क्त तुझ्या आठवणी असाव्या,
बाकी कुणीच नसावं.
बरसणाऱ्या या धारांमधे
आसवं सगळी मिसळून जावी.
आसवं माझी पुसायला
तूच परत माझ्याकडे यावी.
अधुरं हे स्वप्नं माझं
आज ना ऊद्या पूर्ण व्हावं
अधुरंच राहणार स्वप्नं हे जाणवतांच
आसवं गाळून जडावलेल्या पापण्यांनी कायमचंच निजावं......

वाट पाहतोय.....
कुणाल.

परतून तू येशील का????


परतून तू येशील का????

तू गेलीस अन बघ,माझ्या कवितेचा विषय संपला.
आयुष्याचा ईथे आशय संपला.
श्वासांशीही चालू आहे अंतिम झगडा,
आता जगण्याचा माझा निश्चय संपला.
जाताना तू, मागे आठवणी का ठेवून गेलीस?
जगण्याची शपथ माझ्याकडून घेताना, आयुष्यभर सोसायला मरणयातना देऊन गेलीस.
खरंतर जीवघेणीच ठरलीए तुझी हि देवघेव.
काळीजंच ऊरलं नाही आता, पण तू सांगतेस
आपल्या प्रेमाची ज्योत या काळजाच्या कोपऱ्यांत सदैव तेवत ठेव.
एक काळ होता असा, माझी स्वप्नंही तुझ्यांच तालावर नाचू लागलेली.
पण आता मात्रं स्वप्नांची फूलं आसवं बनून या डोळ्यांच्या कडांमधे साचू लागली.
काटेरी निवडुंगातही सौंदर्य पाहणारा मी, पण आता मला कोमल फूलही टोचू लागली.
जीवनाच्या सगळ्याच रंगात मला आता दाहकताच दिसू लागली.
अजूनही आठवतो मला तो दिवस.....
त्या मंगलमय सोहळ्यात सारा साज-श्रुंगार माझ्या मनालाच नाही तर तुलाही टोचत होता.
आणि सनईचौघड्याचा मंगलमय सूरही मला भेसूरंच भासत होता.
तुझी जवाबदारी पेलण्यास समर्थ असणारे खांदे आज मात्रं झुकले होते.
कारण मला बिलगलेले पारीजातकाचे फूल आज कुणी परक्यानेच खुडले होते.
तुझ्या नजरेतल पाऊस, तेव्हापासून माझ्या काळजांत बरसतो आहे.
शुष्क डोळ्यांनी जगताना, मी मात्रं तुझ्या ओंजळीत गाळलेल्या माझ्याच आसवांच्या दोन थेंबांसाठी अजूनही तरसतो आहे.
एकदाच मला तू माझ्याच अश्रूंचे दोन थेंब परत देशील का?
माझ्या पापण्यांना ओलावा देण्यासाठीतरी, एकदाच तू परत ईथे येशील का......
परतून तू येशील का????
कुणाल

Monday, March 17, 2008

कॉलेज, कट्टा, कॅंटिन..... = लाईफ.

कॉलेज, कट्टा, कॅंटिन..... = लाईफ.

कट्टा, कॉलेज, कॅफे, हॉस्टेल अन
गर्ल्स हॉस्टेलच्या त्या पायऱ्या.
यारी, दोस्ती, पोरी, टिंगल अन
आयुष्यभर साथ देण्याच्या वाहलेल्या शपथा गहिऱ्या.
अभ्यास? अरे हट... अभ्यास कसला????
तेव्हा होतं फक्त कॅंटिन.
वयंच होतं अल्लड तेव्हा,
सगळ्यांचं जेमतेम नाईन्टीन....
दिवस-रात्र टाईमपास फक्त
सिन्सिअरीटीला मात्र सुट्टी सक्त.
मित्र म्हणायचे..... मित्र म्हणायचे, तू नसलास तर कट्ट्याचा ईतिहास कोण घडवेल?
येणाऱ्या जाणाऱ्या पोरींना आज कोण चिडवेल?
कुण्या तुझ्याशिवाय कट्टा सुनासुना वाटतो यार.
लेक्चर सोडा ओ पण कट्ट्यासाठी तरी कॉलेजला जायचोचजरी दुपार झाली पार....
एक दिवस दांडी मारली तर मित्रांचे शंभर फोन.
अरे भ***, अरे एकटा काय करतोस घरी?त्रासिक असायचा टोन....
एखादी तरी पोरगी आवडायची प्रत्येकाला.
चकाचक कपडे, झक्कास शूज.... मग
तिच्यासाठीच आवरुन बसायचे कट्ट्यावर मिरवायला.
स्वयंघोषित गर्लफ़्रेंड आली की सर्वांच चिडवणं सुरु.
बॅड ईंम्प्रेशन टाळण्यासाठी तोंड लपवूनंच बसायचा मग लव्ह गुरु.
कट्यावरंच जायचा तेव्हा सारा दिवस.
एखादंतरी लेक्चर करावं आम्ही म्हणून शिक्षक बोलायचे देवाला नवस.
लोकलाईट असूनही रात्री होस्टेलची रुम ठरलेली.
दिवसभराच्या धिंगाण्यानंतरही असायची थोडी मस्ती ऊरलेली.
शिव्या वाचवण्यासाठी नेहमीचं होतं घरात छतावरुन शिरणं.
आईबापाची होती भीती पण तरीही सोडलं नाही रात्रीअपरात्री फिरणं.
खरंच तेव्हा मी माझ्या मनाचाच नाही कॉलेजचाही राजा होतो.
कसलंच टेंशन नाही, "अपनी यहा चलती है" म्हणत आम्ही फक्त मजाच करत होतो.
वाटायचं तेव्हा खरंच माझ्याशिवाय कॉलेज बंद पडेल.
मी नाही आलो ईथे तर सगळ्यांचंच अडेल.
रीझल्ट???? पास, फेल, सेकंड क्लास, तुरळकंच फर्स्ट क्लास तरी सारे एकदम खुश.
आज शेवटचा रीझल्ट, मित्रांच्या ताटातुटीच्या विचारानं मात्र सारेच मनातून नाखुश.
मार्कांसाठी ईथे कोण कॉलेजला आलं होतं.
धमाल, मस्ती, धिंगाण्याची चार वर्ष पण आता मात्र एकटेपण ऊरलं होतं.
कॉलेज संपून आज चार वर्ष पूर्ण झाली.
पण नेमकी कालंच त्या आठवणींनी आसवं बनून डोळ्यात का गर्दी केली????
म्हणून काल एकटाच कॉलेजला जाऊन आलो.
कट्टा, कॅफे, हॉस्टेल, कॅंटीन सारं जसच्या तसं पाहून आलो.
अजूनही तिथे तेचं रुटिन पाहून हबकून गेलो.
कारण कॅंटीन, मुलं, मुली सारंच पूर्वीसारखं....फक्त मीच त्यातून ऑड मॅन आऊट झालो.
कट्ट्यावर तशीच गर्दी, पण कट्ट्याचा ईतिहास कुणी दुसराचं "कुण्या" चालवत होता.
माझ्यातला "कुणाल" मात्र आठवणीतून जागा करण्यासाठी मलांच गदागदा हलवत होता.
डोळ्यातल्या पाण्याच्या जागी अचानक चेहऱ्यावर स्मितहास्य आलं....
नव्या कट्टागॅंगनं शब्दाविनांच माझ्या सोनेरी काळाशी भाष्य केलं....
कुणाल.

Saturday, March 15, 2008

अनामिक भटकंती



ती निरव शांतता भंग करत फोन वाजला....
"हाय" पलिकडून आवाज तिचा.
कुठे आहेस तू? आवाजातलं आश्चर्य लपवत प्रश्न माझा.
मी???? मी अजूनही ऊभी आहे रे तिथेच वाटेकडॆ डोळे लावून.
ऊत्तरादाखल फक्त एक सुस्कारा सोडू शकलो मी, न रहावून.
सोड, नको तो विषय, तू कसा आहेस बोल.
हं..... मस्त मजेत, खोटंच बोलताना आवाज गेला खोल.
दोन मिनिट दोघेही शांत, स्तब्ध.
भेटशील का रे एकदाच, शांतता चिरत कानावर, अहं.... काळजापर्यंत पोहोचले ते शब्द.
मी खूप खूप दूर गेलोय गं, परतणं आता शक्य नाही.
अरे जाण्याआधी चार क्षण हवे तुझ्या सहवासाचे,नाहीतरी मलाही माहित्येय आता परतण्यात तसं तथ्य नाही.
ती... माझ्या मनावर गोंदून ठेवीन मी, शेवटचे हे क्षण.
मी.... बर भेटूया, नाही तरी यापेक्षा काय देऊ शकतो मी तुला, या आठवणीच तुला माझ्याकडून आंदण.
ती संभ्रमावस्थेत.... आपली ही शेवटची भेट????
मी.... काय समजावं मी, हा एक प्रश्न कि तुझा निर्णयच थेट?
तिच्या नजरेतील असहायता सारं काही सांगून गेली.
पहिल्यांदाच शब्दाच्या भाषेवर नजरेची भाषा मात करुन गेली.
भेट तर आम्ही काळाशी लढून घडवून आणली...
मात्र नियतीने विरहाची बीजे पेरली...
आगतिकता डोळ्यांत, शब्द मनाच्या कोपऱ्यात...
विचारांची आणीबाणी...अन कर्तव्य हृदयात...
मग कर्तव्याची अबोल शाल पांघरुन,ती निघाली...
न रॊखता तिला, मीही माझी परतीची वाट धरली....

....कुणाल.


Wednesday, March 12, 2008

"आमचा बाप"

"आमचा बाप"
बापानं खस्ता खाल्ल्या म्हणून सारं घर दोन वेळेस पोटभर जेवलं.
त्यानं दिवस-रात्रं एक केले म्हणून, घर सारं सुखानं निजलं.
नोकरी करुनही रात्री त्यानं रीक्षा चालवली.
त्यानं मीटर डाऊन करुन दिवसेंदिवस वाढणारी आमची प्रत्येक गरज भागवली.
तापानं फणफणलो कधी तरी आईच्या डोळ्यांत टचकन पाणी यायचं.
पण वरवर कठोर दिसणाऱ्या बापाला मात्रं दोन घास जेवण करणही मग जड जायचं.
ऎन उमेदिचा काळ त्यानं हौसमौज न करता आमच्या संगोपनात घालवला.
खिशाला शिमगा असला कधी तरी आम्हाला मात्र नेहमीच त्यानं दिवाळसण दाखवला.
स्वतःच्या बापासमोर तोंडही न उघडणारा आमचा बाप, माझ्याशी मात्र कुठल्याही विषयावर मनमोकळ्या गप्पा मारतो.
त्याची आवड कधीही आमच्यावर न लादता, आमच्याच आवडीनं जगण्याचा आग्रह तो आमच्याकडे धरतो.
लहाणपणी राग अनावर झालाच जर कधी तर गालावर पाच बोटं तो उमटवायचा.
पण त्याच रात्री घरी येताना मला आवडतं म्हणून खायला बटरस्कॉच आईस्क्रिम आणायचा.
पोराला ईंजिनियर बनवायचं स्वप्नं बघताना, प्रसंगी स्वतः दुकानात काम करतानाही लाज नाही वाटली त्याला.
पण पंनास हजार फी भरुनही, नापास झाल्यावर, पहिलीच चूक म्हणून मोठ्या मनानं माफ केलं त्यानं मला.
शाळेत असताना कॅमलची कंपास आवडूनही बघायलाही नाही मिळाली त्याला, पण आम्हाला हवी ती गोष्ट मिळाली नाही असं कधीच नाही घडलं.
गाडी,मोबाईल आणि सगळा ऎशआराम पुरवला त्यानं, पण कुठलीच गोष्ट आमच्याकडे नाही म्हणून आमचं कधीच नाही नडलं.
आमचा बाप कडक शिस्तीचा आहे, असं मित्रांना सांगताना आम्ही कुत्सितपणे हसतो.
पण रात्री तासभर ऊशीरा पोहोचलो घरी तर, येईल गं, म्हणून आईला समजवताना तोच बाप स्वतः मात्र वाटेकडे माझ्या डोळा लावून बसतो.
"आई" घराचं सौभाग्य असली तरी "बाप" म्हणजे घराचं अस्तित्व असतं.
बापाशिवाय कुठल्या घरालाही घराचं असं स्वत्व नसतं.
एक माणूस म्हणून भले त्याच्या जीवनांत असेल तो सर्वांसाठी सामान्य.
पण आदर्श बापाचं मूर्तिमंत ऊदाहरण असंच असावं हे त्याच सर्वांना आहे मनापासून मान्य.
वय वर्ष्रे ५८, तरी आमचा बाप अजून न थकता कष्ट ऊपसतोय.
त्याला सुखी-समाधानी बघायचं आहे म्हणूनंच मी ही शोधतोय मला कुठे सूर आता गवसतोय.
"भाऊ" तुमचांच
कुणाल
१२/०६/०७

Sunday, March 9, 2008

भेकड शौर्य.
लहानगे ऊभे असहाय्यपणे आभाळाकडे हात करुन.
वाहता वाहता सुकले अश्रू त्या दोन गालावरुन.
निपचित पडली भावंडं उथळ त्या थडग्यात.
अन्यायाच्या रणावर शोधताहेत पित्याला, अडकले दुर्दैवाच्या रहाटगाडग्यात.
अपमानित राष्ट्र आज दृष्टीहीन झालं.
संकट असं रे का यांच्यावर आलं???
कुणी म्हणे तो शूर ईथे येऊन गेला.
पण तोच शूर आज शूर न दिसला मला.
शूरांचा शूर आज भासे भेकड.
झुकल्या खांद्यावर मिरवतो निष्पापांच्या दुःखाचं जोखडं.
दिसतंय अन्यायाच्या धरतीवर निष्पापांचं रक्त शिंपलेलं.
राक्षसी सुखाच्या हव्यासापोटी त्यानं फक्त दुःखंच जिंकलेलं.
डागडूजी तरी कशी करावी, सारी घरही जळून झाली खाक.
सुवासिनीच्या भाळी कुंकवाच्या जागी दिसते आता राख.
मरणाचा वास साऱ्या आसमंतात पसरला.
रक्ताचे अश्रू सांडताना सांगते ती, तो शूर ईथे येऊन गेला.
कायमचे मालवले दिवे दारुगोळ्यानं जाळून आकाश.
मरणाच्या दारी उभं अजून एक कुटुंब हताश.
धास्तावलंय पोर ते, त्याच्याच आसवाला आपलंसं करायला.
कारण सांगतंय कुणीतरी..... तो आज ईथे येऊन गेला.
पण तोच शूर आज शूर न दिसला मला.
दिसतंय अन्यायाच्या धरतीवर निष्पापांचं रक्त शिंपलेलं.
राक्षसी सुखाच्या हव्यासापोटी त्यानं फक्त दुःखंच जिंकलेलं.
लहानगे ऊभे असहाय्यपणे आभाळाकडे हात करुन.
पण कुणीही करत नाही प्रतिप्रश्न, आमच्यावरंच का हा अन्याय म्हणून???????
अबालवृद्ध झुकले गुडघ्यावर नशीबाचा फेरा स्वीकारुन.
बायकापोरीही कापल्या गेल्या अत्याचार करुन.
एका पिढीचा सूर्य तिरस्कारानं काळवंडला.
होय खरंच तो आज ईथे येऊन गेला....पण तोच शूर आज शूर न दिसला मला.
दिसतंय अन्यायाच्या धरतीवर निष्पापांचं रक्त शिंपलेलं.
राक्षसी सुखाच्या हव्यासापोटी त्यानं फक्त दुःखंच जिंकलेलं.
त्यानं फक्त दुःखंच जिंकलेलं.........
कुणाल.
(प्रेरणा - नो ब्रेव्हरी हे ईंग्रजी गाणं)

Tuesday, January 1, 2008

वणवा!




वणवा!
तुझं तरुण रक्त आज उसळंत आहे.
तुझ्यांत ठासून भरलेला असंतोषच बाहेर काढण्यासाठी जणू ते सळसळंत आहे.
असंतोषाची ठिणगी बाहेर पडून वणव्याचं घेईल रुप.
अराजकता जाळताना, आगीत तुझेही हात होरपळतील खूप.
जळतानाही नवसंजीवनी मिळाल्यासारखा अराजकतेचा राक्षस पुन्हा ऊभा राहिल.
त्या क्षणी मात्र सांभाळ स्वतःला, कारण तेव्हा तुझा संयम तुला सोडून जाईल.
देशभरातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या नि मंत्र्यांचे घोटाळे.
दिवाळखोरी जाहिर करुन सहकारी संस्थांना ठोकलेले टाळे.
शेतकाऱ्यांच्या जमिनी मातीमोल किंमतीत विकून, स्पेशल ईकॉनिक झोनला दिलेली परवानगी.
सरकारी खर्चानंच जणू, शेतकऱ्याची केली मृत्यूलोकी रवानगी.
जेसिका, प्रियदर्शनी काय नि कोठेवाडि काय अजूनहि स्त्रीयांची होते ईथे विटंबना.
यांत मी काय करु नि कसं हे बदलू, या विचाराने आपल्यांच मनाची होणारी कुचंबणा.
राजकारणी नि गुंडामधला आता कळतंच नाही फरक.
हे सारं पाहून तुझ्या डोळ्यांत अश्रू उभे राहतील नि पेटून ऊठशील तू खरंच.
तेव्हा मात्र अश्रू थोपवू नकोस, त्यांना मोकळी वाट करुन दे.
डोळ्यातल्या पाण्याचंच रुपांतर आता या वणव्यामधे होऊ दे.
हा वणवांच आता अनिर्बंधपणे सारं अराजक जाळून टाकेल.
सत्यासाठी पेटून उठलो तरंच आता या देशाची अस्मिता टिकेल!

तुमच्यातलांच एक....
कुणाल.

"शापित चंद्र"


"शापित चंद्र"
ज्याची भीती होती तेच घडलं आहे.
कितीही नाकारलं सत्य, तरी आता सारं संपलं आहे.
ऊद्याचा सूर्य तुला माझ्यापासून दूर घेऊन जाईल.
धगधगणाऱ्या सूर्याच्या आगीत माझ्या लखलखणाऱ्या चांदण्याची राख राख होऊन जाईल.
मध्यान्हीपर्यंत क्षणाक्षणाला विरहाची धग अजूनंच वाढू लागेल.
मग चांदणीच्या भेटीसाठी चंद्र तो, दैवाकडे जणू दयेची भिकंच मागू लागेल.
रात्रीच्या काळोखाबरोबर लखलखणाऱ्या चांदण्या आभाळांत येतीलही परत.पण....
पण तो चंद्र तिथे नसेल.
रात्रीच्या काळोखाबरोबर लखलखणाऱ्या चांदण्या आभाळांत येतीलही परत.
पण, उद्याच्या सूर्यामुळे त्या चंद्राला लागलेलं ग्रहण कधी सुटेल का आता खरंच? कधी सुटेल का आता खरंच?
तुझांच ........
शापित चंद्र
कुणाल

यशाचं शिखर खुणावतेच ना!!!!


रात्र!


Wednesday, August 8, 2007

सलाम!

सलाम!


मुंबईला सलाम, मुंबईकरांना सलाम.
स्फ़ोटाचंहि राजकारंण करणाऱ्या राजकारण्यांना सलाम.
क्रूरतेला जातीय रंग देणाऱ्या नराधमांना सलाम.
मैत्रीचा हात पुढे करून पाठित खंजीर खुपसणाऱ्या मित्रराष्ट्राला सलाम.
डोळे मिटून दूध पिणाऱ्या या अमेरिकेला सलाम.
पक्षनिष्ठेच्या नावाखाली दंगे नि तोड्फ़ोड करणाऱ्या पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना सलाम.
मतपेटिसाठि दाढि कुरवाळणाऱ्या नि भगवं पांघरणाऱ्या धर्मनिरपेक्ष पुढाऱ्यांना सलाम.
आज या तर ऊद्या त्या पक्षात ऊड्या मारणाऱ्या स्वार्थी नेत्यांना सलाम.
प्रत्येकवेळी चांगला नेता मिळवण्याच्या वेड्या आशेनं मतदान करणाऱ्य़ा मतदाराला सलाम.
मतदारांचा विश्वासघात करणाऱ्या सगळ्या पक्षांना सलाम.
फ़क्त पैशासाठी कायद्याची मोड्तोड करून देशद्रोह्यांसाठी लढणाऱ्या कायदेपंडितांना सलाम.
देशद्रोह्यांपुढे लाचार झालेल्या न्यायसंस्थेला सलाम.
डोळे मिटून, मूग गिळून बसण्याच्या वृत्तीला सलाम.
प्रत्येक मुद्दावर पोटतिडकिनं चर्चा करणाऱ्या सामान्य माणसाला सलाम.
चोर सोडून संन्याशाला फ़ाशी देणाऱ्या या सिस्टेमला सलाम.
न्यायासाठी तडफ़डणाऱ्या हजारो-लाखो निरपराधांना सलाम.
न्यायदानाच्या पवित्र कार्याला विलंब लावणाऱ्या न्यायदेवतेला सलाम.
अन्यायाच्या विरोधात आवाज ऊठवणाऱ्या नि अन्यायातंच पिचून मरणाऱ्या या सगळ्यांना सलाम.
चारी विश्व दारीदयात जगणाऱ्या गरीब जनतेला सलाम.
पैश्याच्या गादिवर लोळणाऱ्या धनिक मंत्र्यांना सलाम.
मेलेल्याच्याहि टाळूवरचं लोणी खाण्याच्या या प्रवृत्तीला सलाम.
दिवसेंदिवस बोथंट होत जाणाऱ्या या भावनेला सलाम.
क्षणाचाही विलंब न लावता सुरळीत होणाऱ्या कालचक्राला सलाम.
सलाम!
मुंबईला सलाम!
मुंबईकरांना सलाम!
कुणाल.


दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...