Tuesday, February 19, 2013

आयुष्य जगायचंच राहीलं



मी माझ्याशीच बोलताना
काटा बनून स्वतःलाच सलताना
गेले खोलवर
सोबतीला फक्त जर तर
दिसली नाही जखम कोणाला वरुन
ना रक्ताळली ना भळभळली पण
राहीली मनात खोलवर घर करुन
मग धावताना स्वतःपासून...
ठेचकाळले स्वतःलाच...
पडले, रडले अन कंटाळलेही
पण चालूच राहीला खेळ रुतण्याचा..
स्वतःच स्वतःला जीवघेणं बोचण्याचा..
मग वाटलं एक दिवस..
संपवावं सारं..
मिटल्या डोळ्यानं तरी वाटेल बरं..
चकचकतं पातं सेव्हन ओ क्लॉकचं फिरवावं मनगटावरुन
सांडत रहावा जीव थेंब थेंब शरीरातून..
केला निर्धार अन चिमटीत पकडलं
पाहून त्याला पाऊल जागीच अडखळलं
"ताय झालं मम्मा तुला? नतो ना लुशू"
त्याचे बोबडे शब्द पडले कानावर..
अन आजवर स्वतःशीच बोलणारी मी आले मग भानावर
त्याला मिठी मारताना पातं पडलं हातातून गळून
अन डोळ्यात अडकलेले जर तर आले गालावर ओघळून
"ताय झालं मम्मा, नतो ना ललू"
रडवेल्या आवाजात बोलला तो न रहावून
सुख सुख ते काय असतं वेगळं याहून??
झिडकारलं जर तर भिरकावलं पातं
पुसले व्रण अन स्वीकारलं नातं
ईवल्याशा त्यानं माझ्याकडं हळूच हसून पाहीलं
कळलं मलाही तेव्हाच "जर तरच्या" पलिकडे आयुष्य जगायचंच राहीलं

अरे हो.. आता काळजी करु नका, मी मजेत आहे... रादर आम्ही सगळेच!

कुणाल प्रकाश रुद्राके
(त्याच्या निरागस डोळ्यांनीच शिकवलं मला उद्याची चिंता सोडायला
अन माझ्या चौकोनी कुटुंबानी शिकवलं हसत दुःखाला भिडायला)

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...