कदाचित त्याच्या चेहेऱ्यावरच्या संभ्रमामध्ये आपल्या प्रश्नांची भर नको किंवा आपल्या मनातल्या प्रश्नांना प्रशांतचा चेहेऱ्यावरचा संभ्रमंच पुरेशी उत्तरं देतोय असं त्याला वाटलं असावं.
झाले एवढे गैरसमज, प्रश्न आणि अवघडलेपणा आजच्या दिवसापुरते
बास होते त्याला. प्रशांतचं वागण विचित्र,ऍबनॉर्मल कि गूढ नेमकं कोणत्या कॅटेगरीत
बसतंय हे राजेशला कळत नव्हतं. प्रशांत न सांगता अचानक गायब व्हायचा, कुठे जायचा
काय करायचा हे विचारलं तरी काहीही सांगत नव्हता. राजेशने त्याच्या माग काढत
शोधायचा प्रयत्न केला नव्हता पण हॉलमधल्या खिडकीतून डोकावून बघतना एक नोट केलं
होतं कि तो जेव्हा न सांगता गायब व्हायचा तेव्हा तो नीलाच्या शाळेकडून चालत येताना
दिसायचा.
पुढचे आठ दिवस राजेश फारसे प्रश्न न विचारता प्रशांत सोबत
राहीला, नीलाचा विषय निघाल्यावर प्रशांत आजंही कमालीचा डिस्टर्ब होतोय हे लक्षात
आल्यामुळे त्याने तो विषय कटाक्षाने टाळला. प्रशांतने वेंट व्हावं असं मनातून
कितीही वाटलं तरी त्याने ते प्रशांतवर इंपोज केलं नाही. प्रत्येक प्रॉब्लेमला
ग्यान वाटणं हेच एक सोल्यूशन नसतं हे त्याला लक्षात आलं होतं एव्हाना. प्रशांतला
एकांत हवा होता, आपण जबरदस्ती आलोय, आपल्या असण्यानं त्याला बरं वाटलं नाही तर
किमान त्याच्या अवघडलेपणात आपण भर घालायला नको एवढं तरी त्याने मनोमन ठरवलं होतं.
प्रशांत पूर्वीसारखा फारसा बोलतंही नाही, रादर शांत राहणंच पसंद करतो हे ओळखून त्याने
प्रशांतची शांत राहून साथसोबत केली. तरीही राजेश गेल्याबरोबर आपल्या गळ्याभोवती
आवळलेला फास कोणीतरी सैलावतंय असं वाटलं प्रशांतला. दहा बारा दिवसानंतर तो घरात
एकटा होता, आजूबाजूला कसला आवाज नाही कि कोणाचीही चाहूल नाही. राजेश गेला तेव्हा
संध्याकाळचे जवळपास सात वाजले होते, प्रशांत डोळे मिटून खुर्चीत बसला, त्याची छाती
लयीत वरखाली होत होती, नाकाच्या टोकावर स्वतःचाच श्वासोच्छवास जाणवत होता.
आजूबाजूच्या आवाजाला वजा करत तो शांतपणे श्वासांसोबत एकाग्र होत बसून राहीला. एक
प्रकारचं मेडीटेशनंच होतं ते. त्याला आजवर ठरवून कधीच मेडीटेट करता आलं नव्हतं. आज
मात्र त्याला श्वासांवर तरंगल्यासारखं वाटत होतं. मिटलेल्या डोळ्यात शाळेतल्या
भिंतीवरची चित्र दिसायला सुरुवात होते न होते एवढ्यातंच उदबत्तीच्या वासाने त्याची
तंद्री भंग पावली. प्रशांतच्या घरात देव्हारा वगैरे नसला तरी राजेशला रोज
संध्याकाळी उदबत्ती लावायची सवय होती. प्रशांतशी बाकी सगळ्या गोष्टीत जुळवून
घेतलेल्या राजेशला एवढ्या उदबत्ती लावायच्या सवयीत मात्र बदल करता आला नव्हता आणि प्रशांतनेही
याबद्दल फारशी कुरकुर केली नव्हती. आत्ता मात्र घाईघाईत जागचा उठत प्रशांतने
तिरमिरीत खिडकिच्या सापटीत खोचलेली उदबत्ती ओढून बाहेर फेकून दिली. उदबत्ती पार
घराच्या कंपाऊंड बाहेर पडली असली तरी घरात भरुन राहीलेला वास जायला वेळ लागणार
होता. नीला गेल्यापासून त्याला उदबत्तीचा वास नकोसा वाटायचा कारण तो वास कधीच एकटा
आला नाही. सोबत कायम गुलाल, बुक्का, सुकलेली फुलांचा वास एकत्रितपणे घेऊन यायचा
आणि जाताना न चुकता आठवणींना उरावर ठेऊन जायचा. त्यामुळे तो वास आला रे आला कि
त्याचा जीव घुसमटल्यासारखा व्हायचा, छातीवर जड दगड ठेवल्यासारखं दडपण यायचं, प्रयत्नपूर्वक
श्वास घ्यावा लागायचा आणि बघता बघता डोकं जड होऊन जायचं. कोणीतरी संमोहीत
केल्यासारखा तो स्मशानाकडे ओढला जातोय कि काय असं वाटायचं आणि त्या आठवणीतून बाहेर
पडायला मग फार वेळ जायचा, दमछाक व्हायची पार.
तिसऱ्यावेळी ड्रायवरने जेव्हा त्याला तुमचं डेस्टिनेशन आलंय
म्हणून कॅब कैलाश स्मशानभूमीबाहेर उभी केली तेव्हा त्याने कसलाही वाद घातला नाही.
कॅब त्या चौकात यायच्याआधीच कसा कोणास ठाऊक पण त्याला उदबत्तीचा वास येऊ लागला
होता. त्याने नाकावरचा मास्क काढून नीट घडी करुन
पॅंटच्या मागच्या खिशात ठेऊन दिला आणि फ्रेश मास्क काढून नाकावर चढवला पण
उदबत्तीचा वास तसूंभरंही कमी झाला नाही. थॅंक्स म्हणत तो कॅबमधून खाली उतरला आणि कसलाही
विचार न करता स्मशानाकडे चालू लागला. विसाव्यासाठी जिथे पहिल्यांदा तिरडी टेकवतात
त्याच्या बरोबर समोर पण स्मशानाबाहेर एक बाकडं होतं त्यावर तो जाऊन बसला. तो
कसलाही विचार करत नव्हता आणि डोक्यात येणाऱ्या कोणत्याच विचाराला किंवा आठवणीला
थोपवायचा प्रयत्न देखील करत नव्हता. आठवणी दाटीवाटी करुन मेंदूच्या कानाकोपऱ्यात
जाऊन बसल्या, छातीवर मणामणाचं ओझं दडपण वाढवू लागलं. आवंढा गिळला तरी खड्यांची
भुकटी गिळल्यासारखा गळा कोरडा पडला. सुइं.... करुन कानात आवाज येऊ लागला. नीला
गेली त्यादिवशी असंच झालं होतं, नीलाचा अचेतन चेहरा बघता बघता त्याला वाटत होतं तो
कोणत्याही क्षणी कोलमडून जाईल पण कोणीतरी आवळून धरल्यासारखा हालचाल करत तो शांतपणे
उभा होता, तो रडला तर बरं होईल अशी आजूबाजूला कुजबूज होती पण कानातल्या सुइं...
आवाजामुळे कि कशामुळे त्याला आजूबाजूचे कसलेच आवाज ऐकू येत नव्हते. तिचा मळवट
भरलेला चेहरा त्याला आत्ताही विसाव्याच्या कठड्यावर दिसत होता. कुणास ठाऊक किती
वेळ तो तिथे बसून होता पण थोड्यावेळाने छातीवरचं दडपण कमी झालं, कानातला आवाजंही
थांबला. तो भानावर आला तेव्हा आजूबाजूला किर्र अंधार झाला होता, सभोवताली वाढणारा
काळोख त्याच्या नाकावर हात ठेवून हळूहळू दबाव वाढवू लागला. एक दीर्घ श्वास घेऊन
त्याने समोर पाहिलं, समोरचा विसाव्याचा कठडा रीकामा होता, परत उदबत्तीचा वास जाणवण्याआधी
तो वीजेचा झटका बसल्यागत जागचा उठला आणि शक्य तेवढ्या पटकन तिथून दूर जाण्यासाठी
त्याने पावलं टाकायला सुरुवात केली. एखादा अदृष्य जड साखळदंड पायात अडकवल्यासारखा
तो पाय खुरडत चालत राहीला तेव्हा त्याच्या डोक्यात आलं कि हा निव्वळ योगायोग
नाहीये, टेक्निकल ग्लिच वगैरेही नसावा, यात काहीतरी खोलवर अर्थ दडलाय, यामागे
काहीतरी कारण आहे, एवरीथिंग हॅपन्स फॉर अ पर्पज आणि धिस इज नॉट अँन एक्सेप्शन इदर.
हा योगायोग नाहीये, यामागे
काहीतरी कारण एहे हे डोक्यात आल्यापासून हा टेक्निकल ग्लिच आहे का हे त्याला
पडताळून पाहायचंच होतं. कॅबने प्रवास करायची पुढची संधी आल्यावर त्याने त्याच्या
एका ज्युनियर कलिगला बोलावून त्याच्यासाठी कॅब बुक करायची रीक्वेस्ट केली, म्हणाला
त्याच्या मोबाईलमध्ये काहीतरी एरर येतोय. प्रिपेड करु नकोस, पैसे मी कॅश देईन
सांगून काहीतरी कामात असल्याचं भासवस राहीला. कलिगने बुकि ग डिटेल्स शेअर केले,
निघताना ओटीपी सांगितला. लोकेशन बरोबर टाकलंयेस ना रे विचारुन तो ऑफिसमधून निघाला.
कॅब जसजशी पुढे जाऊ लागली तसतशी त्याच्या छातीतली धडधड वाढू लागली. कैलास
स्मशानभूमीला वळसा घेत कॅब पुढे निघाली तशी याची मनोमन खात्री होऊ लागली कि
काहीतरी टेक्निकल लोचा याच्या सेलच्या लोकेशन सेटींग्जमध्ये आहे. तो खिशातून फोन बाहेर
काढून चेक करु लागला तेवढ्यात त्याला ड्रायवरचा आवाज कानावर पडला, सॉरी सर एक
टर्नंच मिस केला मी मगाशी, हे घ्या आलंय तुमचं डेस्टीनेशन. त्याने मान वर करुन
पाहीलं, त्याची कॅब कैलास स्मशानभूमी बाहेर उभी होती. कसलीही कटकट कुरकुर न करता
त्याने ड्रायवरला पैसे देत कॅब बाहेर पाऊल टाकलं. टेक्निकल ग्लिचंही नाही यावर आता
शिक्कामोर्तब झालं होतं. हे उगाचंच परत परत घडत नाहीये हे त्यानं मनोमन मान्य करुन
टाकलं. लहानपणापासून स्मशानासारख्या जागेविषयी मनात असलेली भीती किंवा एक खोलवर अस्वस्थ
करणारी भावना असल्यामुळे परत परत तिथे येऊनंही तो इतके दिवस आत जाण्यापासून
स्वतःला रोखत होता, रादर तो पुढे जाऊच शकत नव्हता. आज मात्र कसलाही विचार न करता
झपाझप पावलं उचलंत तो स्मशानात गेला. एखादी गोष्ट मनातून ठरवलेली असेल तर जशी
आश्वासक कृती केली जाते तसा तो पुढे काय करायचंय हे प्लान्ड असल्यासारखा वावरत
होता. रात्रीचे साडेदहा वाजले होते, स्मशानातंही ऑफिस अवर्स संपल्यासारखी शांतता
होती, कोणाचीही येजा नाही. कैलास शहराच्या मध्यवर्ती भागातलं सगळ्यात जुनं आणि
मोठं स्मशान होतं. पूर्वी तिथे फक्त दहन संस्काराचे विधी होत असतं, गेल्या काही
वर्षापासून आतला एक मोठा कोपरा दफन विधीसाठी राखून ठेवला होता. प्रशांत नीलाच्या
समाधीपाशी येऊन थांबला, काही क्षण तिथे उभा राहील्यानंतर तो चक्क कसलाही विचार न
करता खाली मांडी घालून बसला. त्याला जमिनीखाली आरपार नीलाचा मळवट भरलेला चेहरा
दिसत होता, शांत झोपल्यासारखी भासत होती ती त्याला. चेहऱ्यावर कणभर वेदना नाही,
जीव गेल्याच्या कसल्याही खुणा नाहीत. कसला आवाज झाला तर तिची झोपमोड होईल असं
वाटलं त्याला. धडपडतंच खिशातला फोन काढून त्याने तो सायलेंटवर टाकला आणि तो
जमिनीखालच्या नीलाच्या चेहेऱ्याकडे एकटक बघत राहीला. थोड्यावेळाने पायापाशी
काहीतरी वळवळल्याचं जाणवल्यामुळे त्याने नीलाच्या चेहेऱ्यावरची नजर हटवत पायाकडे
पाहीलं. तिथल्या काळोखात स्वतःचंच बोट स्वतःच्या डोळ्यात गेलं तरी कळलं नसतं
कदाचित तर पायापाशी काय वळवळतंय हे दिसणं तर दूरची गोष्ट होती. त्याने खिशातल्या
मोबाईलची टॉर्च चालू करुन पायापाशी पाहीलं, विशेष काही नाही थोडे मुंगळे लगबगीत
येजा करत होते, पंखाच्या मुंग्याही होत्या आणि एक भूईमूगाच्या शेंगेच्या आकाराचा
यापूर्वी कधीही न पाहीलेला किडा बुटाच्या कडेवरुन आत शिरायचा प्रयत्न करत होता,
त्याने पटकन तो झटकला आणि टॉर्च आजूबाजूला फिरवत तो कुठे पडला असेल तो शोधू लागला.
ज्या दिशेला झटकला होता तिथे टॉर्चच्या उजेडात तो कुठेही दिसेना तेव्हा त्याने तो
नाद सोडून दिला आणि मोबाईल खिशात ठेवण्याआधी परत एकदा पायापाशी टॉर्च नेत बघितलं.
मुंगळे, लालकाळ्या मुंग्यांच्या रांगा, बारीकसे किडेच किडे सगळीकडे दिसत होते.
जमिनीवर एवढ्या किड्यामुंग्या तर जमिनीखाली काय परीस्थिती असेल याचा विचार करुन
त्याला भयानक अस्वस्थ वाटू लागलं. त्याने तोंड फिरवून परत नीलाचा चेहरा दिसत होता
त्या दिशेला पाहिलं तर तिच्या चेहऱ्यावर मुंग्यांची रांग चालताना दिसू लागली. बघता
बघता तिच्या चेहेऱ्यावरचा मळवट पूर्ण मुंग्यांनी भरुन गेला पण नीला तशीच निश्चलपणे
पडून राहीली होती. हाताला जे येईल त्याने जमिन उकरुन तिला बाहेर काढावं आणि बिलगून
बसावसं वाटू लागलं त्याला. घाईघाईत असहाय्यपणे दोन्ही हाताने माती बाजूला करत
उकरायचा अयशस्वी प्रयत्न केला त्याने अन क्षणातंच त्याला त्याची चूक जाणवली.
मातीने माखलेले हात घेऊन हताशपणे बसून राहीला तो आणि काही कळण्याआधी त्याच्या
डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ओक्साबोक्षी रडत नव्हता तो पण नीला
गेल्यापासून फक्त गप्प बसणारा तो, कुठेतरी मोकळा होणं गरजेचं होतं त्याला. नीला
आता नाहीये हे सत्यंच स्वीकारणं त्याला आजवर जड जात होतं, त्या अक्सेपटंसची आज
सुरुवात झाली होती. तिकडून निघण्याआधी समोरच्या उंच कंपाऊंड वॉलच्या पायथ्याशी
उगवलेली दोनचार रानफुलं तोडून नीलाच्या पायाशी ठेवली त्याने. शोभेच्या फुलांपेक्षा
रानफुलं फार आवडायची तिला. शहराबाहेर बाईक राईडसाठी गेलेच कधी तर ती वेगवेगळी फुलं
तोडून गुच्छ करुन घ्यायची. कशाला तोडतेस विचारलं तर म्हणायची तसंही ती एखादा
दिवसंच राहतात रे, त्यांना वास नसतो, नशीबात चकचकीत फ्लॉवरपॉट नसतो पण भुरळ पाडतात
मला. एकदोन दिवसात सुकतात, दॅट इज द होल ब्युटी. दे किप रीमाइंडींग अस दॅट इव्हन
इफ समथिंग मेक्स अस हॅपी, इट इज नॉट परमनंट.... रादर नथिंग इज.
मोकळं झालेलं घरात आता अजूनंच
एकटं एकटं वाटू लागलं, इतके दिवस ती परत येईल असं त्याला वाटत होतं, का कुणास ठाऊक
कारण तिचे सगळे अंत्यसंस्कार त्याने स्वतःच्या हाताने पार पाडले होते. तीचं नसणं
स्वीकारणं भयानक अवघड होतं यात वादंच नाही पण ती परत येईलंच असं त्याला वाटायचं
किंवा त्या घरात एकटं राहण्यासाठी त्याने या अतर्क्य गोष्टीचा आधार घेतला होता. ती
आता परत न येण्याच्या प्रवासाला कायमची निघून गेलीये हे स्वीकारायला सुरुवात
केल्यामुळे कदाचित घराचा मोकळेपणा जास्तं अंगावर येत होता त्याच्या. त्या
दिवसानंतर स्मशानाबद्दल एक अनामिक ओढ वाटू लागली त्याला. चारेक दिवस कंट्रोल
केल्यावर तो शनिवारी सुटीच्या दिवशी सकाळी चालायला म्हणून बाहेर पडला ते थेट
नीलाच्या समाधीपाशी गेला. तिथे पोहोचेपर्यंत त्याच्या छातीतली धडघड आतोनात वाढली
होती, कानात धड धड धड आवाज येत होता. खूप दिवसांनी आपल्या जीवाभावाच्या माणसाला
भेटत असल्याचं फिलींग येऊ लागलं होतं. तिथे पोहोचल्यावर मात्र सगळी अस्वस्थता
विरुन गेली, थंड वाऱ्याच्या झुळुक आली, एक दीर्घ श्वास घेत तो तिथे मांडी घालून
बसला. काहीही न बोलता तिथे शांत बसून राहणंही समाधानकारक वाटत होतं त्याला. ते
दोघे फिरायला जायचे तेव्हा असेच एकमेकांशेजारी काहीही न बोलता शांत बसून राहत असत.
थोड्यावेळाने त्याच्याकडे झुकत नीला त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत असे. तसं
बसल्याने तिला मनापासून आश्वासक वाटायचं. तुझी फेवरेट जागा कोणती विचारल्यावर
त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत “ही” म्हणाली होती ती एकदा.
सुरुवातीला
अर्धा तास वगैरे तिथे थांबणारा तो नंतर तास न् तास कैलास स्मशान भूमीत घालवू
लागला. पहिले काही दिवस तिथले कर्मचारी त्याला हटकत असत नंतर त्यांच्याशीही त्याची
ओळख झाली, नंतर वीकेंडसला त्याचा पूर्ण दिवस कैलासमध्ये जाऊ लागला. हळूहळू
वीकडेजलाही त्याचे पाय कैलासकडे वळू लागले. तिथली शांतता त्याला आवडायची,
स्मशानाच्या मागे वाहणाऱ्या नदीचा आवाज, पक्षांचा किलबिलाट आणि रात्रीच्या अंधारात
तिथून दिसणारं आभाळ त्याला खेचून न्यायचं तिथे. खरंच तो खेचला जातोय असे भास होऊ
लागले होते त्याला. एक दिवस असाच सकाळी उठल्यापासून त्याला कैलासमध्ये जाऊन बसावसं
वाटू लागलं. कितीही दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तरी डोळ्यासमोर कैलास दिसू
लागलं. सकाळच्या सत्रात दोन महत्वाच्या वर्च्युएल मिटींग्ज होत्या, दुपारी लंचला
वेळ मिळाला तरी मेहरबानी म्हणावी असं त्याचं स्केड्यूल पॅक होतं आज. चहाचा कप थंड
होऊन समोर तसाच पडला होता, वेळ जाईल तशी त्याची चलबिचल वाढत होती. एखाद्या व्यसनी
माणसाकडून त्याचं व्यसनाचं साधन काढून घेतल्यावर जशी अवस्था होते तसा तो अस्वस्थ
झाला होता. काही क्षण तसाच बसून राहील्यावर काहीतरी आठल्यासारखा तो लगबगीनं जागचा
उठला, चहाचा कप तसाच सोडून त्याने गडबडीत आंघोळ उरकली, घराला कुलूप लावून धावतपळत
बाहेर पडत कॅब पकडली आणि कैलास गाठलं. मिटींग सुरु व्हायला पंधरा मिनिट बाकी होते.
एव्हाना त्याला कैलासचा कानाकोपरा माहीत झाला होता. कोपऱ्यातल्या एका प्रशस्त
पारावर जाऊन बसत त्याने पाठीवरची बॅग काढली आणि लॅपटॉप चालू करुन हेडफोन कानात
सारले. मिटींगला लॉगइन करुन त्याने अखंड मिटींग तिथे बसून अटेंड केली, त्याची
स्मशानातली पहिली मिटींग. सकाळी बॅगेतला लॅपटॉप बाहेर काढताना आलेला अवघडलेपणा तोच
लॅपटॉप रात्री बॅगेत ठेवताना पार गायब झाला होता. स्मशानातनं काम करणं हळूहळू
अंगवळणी पडू लागलं त्याच्या. तुरळक कधीतरी मृतांचे नातेवाईक रडल्याचा आवाज आल्यावर
कलीग्ज किंवा क्लाएंटस बॅकग्राऊंड नॉइजबद्दल तक्रार करत असत, कोणाकडे टिव्ही चालू
असेल तर बंद करा म्हणत. असल्या मोजक्या अनकंफर्टेबल सिच्युएशंस वगळता त्याचं काम
सुरळीत चालू होतं. स्मशानात वेळ घालवणं त्याच्या मनस्वास्थ्यासाठी मेडीटेशनसारखं
वर्क करत होतं.
एके
दिवशी कॅबने प्रवास करत असताना त्याला ड्रायवर चाचपडत म्हणाला स्सर एक गोष्टं
विचारु का?
खिडकीतून
बाहेर बघत तो हंमम म्हणाला.
सर
कदाचित नोट केलं असेल तुम्हीही कि गेल्या सहा महिन्यात कदाचित पंचवीस ते तीस वेळा
तुम्ही माझ्या कॅबमध्ये बसलाहात.
अच्छा
हो का म्हणून त्याने ड्रायवरकडे बघायला सुरुवात केली.
ड्रायवर
अधूनमधून आरशात बघत बोलत होता. सुरुवातीला मला वाटायचं आजूबाजूला कुठेतरी काम असेल
तुमचं किंवा इथे कोणीतरी सहकारी वगैरे पिकअप करत असेल तुम्हाला. पण एकदा सकाळी
सकाळी तुम्हाला ड्रॉप केल्यावर तुम्ही धावतपळतंच स्मशानात गेलात, वाटलं कोणीतरी
ओळखीचं गेलं असावं, विधी उरकून कामाला जाणार असाल तसेच. पण चार दिवसांनी तुम्ही
योगायोगाने माझीच कॅब बूक केलीत सर आणि परत सेम तशाच लगबगीत तुम्ही स्मशानात गेलात
तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं.
प्रशांतची
आरशातून त्याच्याकडे बघणाऱ्या ड्रायवरशी नजरानजर झाली तसं त्याने चटकन दुसरीकडे
मान वळवली.
सर मी
पुढची राईड न घेता तासभर तिथे थांबून राहीलो पण तुम्ही बाहेर आला नाहीत. माझी
उत्सुकता जास्तंच ताणली गेली सर, मग मी निश्चय करुन आतमध्ये म्हणजे स्मशानात आलो. बरंच
इकडेतिकडे शोधून झाल्यावर तुम्ही मागच्या बाजूला एका मोठ्या झाडाखाली पारावर
लॅपटॉप काढून बसलेले दिसलात. मी आजूबाजूला चक्कर मारुन आलो आणि मला धक्काच बसला.
कारण सर त्यादिवशी तिथे एकंही मृतदेह अंत्यविधीसाठी वेटींगवर नव्हता. मी तिथल्या
एका कर्मचाऱ्याला भेटून खोटंच म्हणालो की समोरच्या घरातले आजोबा गेलेत,
कॉर्पोरेशनच्या पासाव्यतिरीक्त काही लागणार नाही ना? बोलता बोलता विद्युतदाहीनीला
किंवा पारंपारीक विधीला किती वेळ लागेल विचारल्यावर तो म्हणाला आज अजून तरी नंबर
नाहीयेत. मी तुमच्याकडे बघत थेटंच त्याला माझी शंका विचारली कि मला वाटलं हे साहेब
पुढे आलेत आणि डेडबॉडी यायची वाट बघत बसले आहेत. त्यावर तो कॅज्युअली बोलला ते
कोणाची वाट बघत नाहीत, ते नेहमी ईथेच बसून काम करतात. आता माझे डोळे पांढरे
व्हायची वेळ आली होती. तिथून मी जे बाहेर पडलो ते दोन दिवस गाडीवर नाही गेलो,
तापाने फणफणलो होतो. त्यानंतर सर तुम्हाला पिकअप करायला आल्यावर नाक्यावरुन चारपाच
वेळा राईड कॅंसल करुन भुर्दंड सहन केलाय मी. मग एकदिवस मी धीर एकवटून दिवसभर
तुमच्या मागावर राहीलो, दिवसभर स्मशानातून काम करत होता सर तुम्ही, अधेमध्ये दोन
अंत्यविधीच्या ठिकाणी जाऊन ओक्साबोक्षी रडणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या पाठीवर हात
ठेवलात, तुमच्या फक्त स्पर्शाने ते शांत झाले. तुम्ही रात्री उशिरा कैलासमधून बॅग
आवरुन निघालात. मला शंका होती तुम्ही काहीतरी अघोरी प्रकार करत असाल पण तुम्ही
रात्री बॅग आवरुन कोपऱ्यातल्या एका समाधीपाशी जाऊन तिथलीच रानटी फुलं तोडून
वाहीलीत आणि निघालात. तुम्ही निघाल्यावर आघोरी काही करत असाल ही शंका दूर झाली.
तसंही आघोरी करणारा कोण दिवसाढवळ्या सगळ्यांसमोर असा स्मशानात जाऊन बसेल नाय का.
प्रशांतने
काहीही प्रतिसाद दिला नाही.
तो
पुढे बोलत होता, साहेब एक सांगू का, कारणाशिवाय असं स्मशानात बसणं चांगलं नाही.
तुला
कोण म्हणालं मी कारणाशिवाय, बोलता बोलता मध्येच थांबत त्याने ड्रायवरला गाडी
बाजूला घ्यायला लावली.
सर
तुमचं डेस्टीनेशन नाही आलंय अजून म्हणत ड्रायवरने गाडी बाजूला घेतली.
काहीही
न बोलता प्रशांत खाली उतरला, निघता निघता खिडकीतून ड्रायवरकडे बघत परत माझा पाठलाग
केलास तर याद राख म्हणाला.
तो
पुढे निघाला तेव्हा पाठीमागून कानावर ड्रायवरचा आवाज पडला सर काळजी वाटली म्हणून
बोललो.
ड्रायवरच्या
अनावश्यक बडबडीमुळे त्याचं कशात लक्ष लागेना, परत नवी कॅब बूक करुन तो सरळ
ऑफिसमध्ये गेला. सर काळजी वाटली म्हणून बोललो हे ड्रायवरचे शब्द विनाकारणंच त्याच्या
कानात घुमत राहीले. तसंही कैलासमध्ये बसायला त्याचं आज मन लागलं नसतं. संध्याकाळी
त्यानं घरी जाण्यासाठी कॅब बूक केली तर नेहमीप्रमाणे ती कैलास बाहेर आली, तो खाली
उतरणार तेवढ्यात त्याला रस्त्यापलिकडच्या टपरीवर सकाळचा ड्रायवर दिसला. आता हा परत
ग्यान वाटत बसेल या भीतीने त्याने ड्रायवरला हे माझं डेस्टीनेशन नाहीये हे
सांगितलं, बघता बघता विषय वादावर आला.
क्रमशः




