बऱ्याच दिवसांपासून मुक्काबाजबद्दल वाचत होतो, जगभर वेगवेगळ्या फिल्म फेस्टीवल्समध्ये वाहवा मिळवलेल्या मुक्काबाजचं ट्रेलर बघितल्यापासून पिच्चर बघायचाच हे ठरवलं होतं. And I must say it's worth the wait.
पात्रांची निवड, अभिनय, कथा, गाणी, बॅकग्राउंड स्कोअर, डायरेक्शन सगळ्याचीच भट्टी पर्फेक्ट जमून आलीये.
अनुराग कश्यपला जे लोक फॉलो करतात त्यांना एव्हाना त्याचं व्यक्तिमत्वं, त्याचे विचार कशाप्रकारचे आहेत हे बऱ्यापैकी समजलेलं असावं. घाबरणं त्याच्या गावीच नाही, अंगावर आलं की तो शिंगावर घेतो, तो सोशल मेडीयावरही शोषितांचा आवाज होतो किंवा चुकीच्या गोष्टी आणि लोकांविरुद्ध आवाज उठवतो. त्याचं हे व्यक्तिमत्वं विशेष त्याच्या सिनेमांतूनही ठळकपणे दिसत राहतं.
मुक्काबाजमधे तो बॉक्सिंगमधल्या आणि पर्यायानं खेळातल्या राजकारणावर प्रभावीपणे बोट ठेवतोच पण तो त्याची गोष्ट फक्त तेवढ्यापुरती मर्यादीत ठेवत नाही तर देशामधल्या सद्यपरीस्थितीलाही तो त्या कथेमध्ये अगदी बेमालूमपणे गुंफतो. फिल्मच्या ओपनिंग सीनमध्येच काहीजण तोंडावर फडकी बांधून गायी वाहून नेणाऱ्या पोरांना बांधून मारत असतात, मोबाईलच्या कॅमेऱ्यात त्यांचा विडिओ काढताना, "ईन को मारने के लिये ले जा रहे थे बोल" असं कॅमेऱ्यासमोर बोलायची जबरदस्ती करताना दिसतात. या सीनचा तसा फिल्मच्या कथेशी थेट संबंध नाही पण उत्तर प्रदेशमधली sociopolitical परीस्थिती कशीये हे दाखवण्याचं आणि प्रेक्षकाच्या मनावर ठसवण्याचं काम हा दोनेक मिनिटाचा सीन पर्फेक्टली करतो. सद्यपरिस्थितीवर भाष्य करण्याचं अजून एक उदाहरण म्हणजे श्रवणच्या दलित कोचला त्याचा शेजारी मेजवानीनंतर उरलेलं मटन आणून देतो आणि त्यानंतर दोनंच मिनिटात जमाव घरात घुसून गायीचं मांस शिजवलं म्हणून त्याला आणि श्रवणला बेदम मारतो.
श्रवण (विनित कुमार सिंग) आणि सुनैना (झोया हुसैन) यांच्यातल्या प्रेमकथेला वेगवेगळे अँगल्स आहेत. सुनैना भगवानदास मिश्राची (जिमि शेरगिल) पुतणी आहे. भगवानदास मिश्रा हा बरेलीमधला बॉक्सिंगचा सर्वेसर्वा आहे, तिथल्या सगळ्या नवोदित बॉक्सर्सचा तो गुरु आहे, शिवाय जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये कोणता खेळाडू खेळवायचा कोणत्या गटात खेळवायचा हे सगळं भगवानदासच्या हातात आहे. नावाप्रमाणेच तो भगवान म्हणजे देव आहे, कुठल्याही परीस्थितीत त्याला विरोध करणारे बॉक्सर्स बरेलीमध्ये नाहीत. विरोध हा शब्दंच त्याच्या डिक्शनरीमध्ये नाही, त्यामुळे त्याला विरोध करणाऱ्या श्रवणचं करीयर कुजवण्याच्या ईरेला तो पेटतो. घरात गावात कोणाचीही त्याच्याविरोधात ब्र काढायची हिंमत नाही आणि त्याला अपवाद ठरते फिल्मची नायिका सुनैना. सुनैना मुकी आहे पण त्याच्याविरोधात सगळ्यात मोठा आवाज तिचा आहे आणि तो आवाज तिच्या देहबोलीतून आणि नजरेतून दिसत राहतो. तिच्या पात्राला सुनैना नाव देणंही त्यामुळे अगदी चपखलंच. सुनैनावर लव्ह अॅट फर्स्ट जडलेल्या श्रवणसमोर तिच्याशी लग्न करण्यासाठी नोकरी मिळवण्याची अट असते आणि त्यामुळेच फार मोठी स्वप्नं नसतात त्याची. त्याला सुनैनाशी लग्न करण्यासाठी जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत जिंकून रेल्वेमध्ये नोकरी मिळवायचीये बास पण त्यासाठी त्याला भगवानदासचा विरोध मोडून काढावा लागणार आहे. श्रवण आणि भगवानदासमधला हा संघर्ष मोठ्या पडद्यावर बघणं हा एक अमेझिंग अनुभव आहे.
अभिनयाच्या पातळीवर विनितकुमार सिंगसोबतंच बाकी सर्वांनीच कम्माल केलीये. विनितने तर फिल्मसाठी बॉक्सिंगचं प्रोफेशनल ट्रेनिंग घेतलंय, त्याची तब्येत आणि सामन्यांच्याआधीची तयारी बघणं इज अ रीयल ट्रिट. त्याचा रागाने एकवटलेला पंच, बायको हरवलेली असताना चेहेऱ्यावरची असहायता आणि एकूणंच बॉक्सरची देहबोली त्याने ईतक्या प्रभावी आणि प्रामाणिकपणे मांडलीये की तुम्ही त्याच्या प्रेमात पडल्याशिवाय राहू शकत नाही.
जिमि शेरगिलने रंगवलेला खलनायक जबरदस्त. आडदांड तब्यत नाही की दिसायला क्रूर नाही तरीही भगवानदास मिश्राची भीतीही वाटते आणि रागंही येतो. उच्च जातीचा असल्याचा माज आणि अहंकार त्याच्या चेहेऱ्यावरुन ओसंडून वाहत राहतो. हम ब्राह्मण है हम आदेश देते है असं म्हणतो तेव्हा किंवा बाटलीत लघवी करुन श्रवणला अमृत समझ के गटक जाओ जीवनदान मिल जायेगा म्हणतो तेव्हा किंवा वेटर ईन के लिये अलग जग मे पानी ले के आओ म्हणतो तेव्हा किंवा जेव्हा जेव्हा पडद्यावर श्रवणसोबत त्याचा संघर्ष रंगतो तेव्हा प्रेक्षकांना त्याची चिड आल्याशिवाय राहत नाही.
नवोदित झोयानंही सुनैनाची भूमिका एकदम ताकदिनं निभावलीये.
रवि किशनंही श्रवणच्या दलित कोचच्या भूमिकेत पर्फेक्ट. खेळाबद्दल पॅशन असणारा, विशेषतः पेलेचा खेळ बघून फूटबॉल आवडणारा पण दलित असल्यानं संधी नाकारण्यात आलेला, बाकीचे त्रास देतात म्हणून एकेकाला बुकलून काढणारा लहान मुलगा पुढे जाऊन बॉक्सर बनतो आणि तरुणपणातंही संधी न मिळाल्याने नंतर सच्ची पॅशन असलेल्या चेल्याच्या शोधात बॉक्सिंगचा कोच बनतो. भगवानदास आणि तो समोरा समोर आल्यावर भगवान त्याला विचारतो कौन हो... ब्राह्मण हो, क्षत्रिय हो, कायस्थ हो? तेव्हा तो उत्तर देतो, उसी चौथी जात के है जो आप को मुँह से बोली नही जाती, हरीजन. तो सीन म्हणा की अभी येह तुम्हे खुद तय करना है के तुम्हे मुक्काबाज बनना है या मुक्केबाज रवि किशन जीव ओतून काम करतो.
फिल्ममधली सगळीचं गाणी मस्तं आहेत आणि ती पर्फेक्ट टायमिंगला येतात मग ते हम पहला धक्का नही मारे असो, पैंतरा असो की बहुत हुवा सम्मान असो सगळीच गाणी फिल्मचा आलेख सतत चढता ठेवण्यात मदत करतात.
अनुरागचं डायरेक्शन अप्रतिम आहे हे वेगळं सांगायची गरज नाही. सामाजिक आर्थिक परिस्थिती कमालीची आणि टोकाची भिन्न असणाऱ्या नायक नायिकेची कहाणी पडद्यावर मांडताना तो सद्यपरिस्थितीत असणारे कळीचे/चिघळलेले मुद्दे जागोजागी पेरतो. नायकावर होणारा अन्याय बघताना आपल्याला कमालीचा राग येतो, रक्तं उसळतं, त्या नायकाची लढाई आपल्याला आपली लढाई वाटायला लागते, आपल्या देशात पैसा आणि पॉवरच्या जोरावर काहीही करता येतं याचा प्रत्यय येतो, आपण असल्या पॉवरफुल भिकारचोटांच्यामध्ये राहतोय आणि त्यांचं आपण काहीही वाकडं करु शकत नाही यामुळे आपल्याला असहाय्य वाटू लागत आणि आपली चिड अजूनंच वाढते. एक डायरेक्टर म्हणून अनुराग ईथे जिंकतो असं मला वाटतं. राजकारणामुळे खेळाडू आणि खेळाची लागलेली वाट, डोपिंग, बॉक्सिंगच्या स्पर्धेसाठी राखून ठेवलेला हॉल स्वतःच्या कार्यक्रमासाठी पुढाऱ्याने ऐनवेळी बळकावणे, कुठेतरी उजाड रानात होणाऱ्या स्पर्धा, कोट्यातून मिळणारी सरकारी नोकरी किंवा राजकारण्याचा बॉडीगार्ड होण्यासाठी बॉक्सिंग करणारी तरुण पोरं, तब्येत कमवून पुढाऱ्याच्या मागेपुढे हांजी हांजी करत फिरणारी तरुण पिढी, स्पोर्ट्स कोट्यातून सरकारी नोकरी लागलेल्या पोरांना वरीष्ठांकडून मिळणारी वागणूक सगळे सगळे बारकावे अनुराग खूपंच चांगल्या पद्धतीनं मांडतो.
फिल्ममधले संवादही खुसखुशीत आणि जबरदस्त आहेत.
ईज्जत पे (इथे "ज"चा उच्चार "ज्ज्य" असा करायचा) हग चुके हो नाम पे मुत चुके हो
आप ने ऐसे कौनसे झंडे गडे है? आप का एक अचिबमेंट बताओ हमे. अरे हम ई तो जीत के लाये है जिस से आप किल भी नही ठोक सकते लेकीन उस के उपर जो ढक्कन है ना बहोत काम आता है मुँह पे लगाओ तो बकवास बंद और नीचे लगाओ तो हगवास
वगैरे वगैरे डायलॉग्ज जमून आलेत.
शेवटी भगवानला पंचेस मारताना प्रत्येक पंचसोबत भारत माता क्की ज्जय, भारत माता क्की ज्जय डायलॉगचा वापर करुन जमवून आणलेला sarcasmही बेस्ट.
जिमि शेरगिल आणि विनितच्या जुगलबंदीसाठी, अप्रतिम अभिनयासाठी, जबरदस्त डायरेक्शसाठी आणि फिल्ममध्ये जे जे काय हवं ते सगळं देणारं एक उत्कृष्ठं पॅकेज म्हणून मुक्काबाज बघायलाच हवा.
तळटीप: सद्याची एकूण सामाजिक राजकीय परिस्थिती बघता अनुरागला ट्रोल करणे, मोर्चा काढणे, ठराविक सीन्सवर बंदी घालायची आणि अनुरागला पाकिस्तानात पाठवण्याची मागणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केपी आर





