Wednesday, August 15, 2012

"एकटी"...



अशीच होती ती पहिल्यापासून
गजबजाटात "एकटी"
डोळ्याला पाणी अन काळजाला रुखरुख
जवळ तिच्या फार
मित्र होते मोजकेच चार
पण..
एकटेपणा जिव्हाळ्याचा वाटायचा
मेघ दाटायचे डोळ्यात
अन आठवणींचे हुंदके अडकायचे गळ्यात
भरल्या नभासमोर रीते व्हायचे डोळे
तिचं अन नभाचं हितगुज तिचं तिलाच कळे
रातीच्या अंधाराचा वाटायचा आधार
काळोखंच होता आपलासा निर्गुण निराकार
वाटायचं बसून रहावं एकटंच
एकटंच..
त्या चंद्रासारखं..
चांदण्यात राहूनंही होतं सुख पारखं
तिचं तिलाच नाही गवसलं वेदनेचं मूळ
केव्हापासून होतं डोक्यात एकंच खुळ
शोधताना खोल.. खोलवर कुठेतरी
सोबत होते सगळे पण साथ नव्हती खरी
तिनंही सोडला नाद मग शोधायचा
अन जडला उरी छंद "वेदना" जपायचा
जपलंय तिनं.. जोपासलंय आता
एकटेपणाही एकटा वाटत नाही आताशा
तरीही कोणीतरी जातं हिणवून
डोळ्यातल्या मेघाला जरासं खुणवून
कोणी म्हणतं मग.. हळवी, वेडी कोणी सेंटी...
पण...
गोष्ट एकंच खरी..
अशीच होती ती पहिल्यापासून
गजबजाटातही "एकटी"

कुणाल प्रकाश रुद्राके

“अजून एक कप चहा”



पुढे मागे... मागे पुढे...
लयबद्ध हलणारी आरामखुर्ची
बाजूच्या टिपॉयवर ठेवलेला चष्मा
अन चहाचा रीकामा कप
तसंच रीकामं भासणारं घर
घरात फक्त दोघेच दिवसभर
बाबाशिवाय पान न हलणारा चिनू... पण..
वर्क प्रेशर, टार्गेट, डेडलाईन्स सारख्या शब्दात हरवला होता
काल-परवापर्यंत अंगाखांद्यावर खेळणारा तो
आजकाल दोन शब्दांपुरताही वाट्याला येत नव्हता
फावल्या वेळात.. अहं.. सगळाच वेळ फावला वेळ होता
वर्ष होत आलं होतं त्याला रीटायर होऊन
दोघेच.. कधी बोलायचे, कधी भांडायचे अन बऱ्याचदा
शांत बसायचे..
खाण्या पिण्यावर बंधनं.. हालचालींवरही..
बंधनं नव्हती ती फक्त आठवणींवर
चिनूच्या लहानपणी.. घर कसं भरलेलं असायचं
मित्रमंडळी, भावंडं, शेजारी पाजारी
जिवंत.. सचेतन सगळं..
आठवणीत, तंद्री कशी लागली ते त्याचं त्याला कळलं नाही
खुर्चीतंच डोळे मिटून हसत होता तो गालात
तेवढ्यात "ती" आली..
चिन्याशी फोनवर बोलताना हळूच हसली
तिच्या हसण्यानं भानावर येत त्यानं पुढे मागे हलणारी खुर्ची थांबवली
सासूबाईच्या कानात काहीतरी कुजबुजून
ती लगबगीनं आत गेली..
तो आश्चर्यानं बघत राहीला फक्त..
नेहमी गोड खाण्यापिण्यावर बंदी घालणाऱ्या बायकोनं..
त्याच्या जवळचा चहाचा रीकामा कप उचलून विचारलं
"आजोबा" अजून एक कप हवा का "साखर टाकून"

कुणाल प्रकाश रुद्राके

"खर घर"


ईथे कोणी कोणाचं नाही पण
सगळे समदुःखी
कोणाला मुल नाही, कोणाची मुलं परदेशी असतात
कोणाची परीस्थिती नाही, कोणाच्या मुलांनी वाटणी केली पण फक्त ईस्टेटीची
तर कोणी भरल्या घरातून ईथवर आलेले..
आमचे नाना नानी असेच भरल्या घरातले..
दर महिन्याला जातात "घरी" वृद्धाश्रमातून
मुरडणारी नाकं, फुगलेले चेहरे पहायला
तिरकस वाक्य अन टोमणे ऐकायला
पेन्शनमधून साठवलेल्या पैशातून
परवडेल तसं घेऊन जातात काहीबाही
कधीतरीच मिळतं नातवंडांना
अन नेहमीच जातं "केराच्या टोपलीत"
दुखरे गुडघे, पाठ अन मिळणारी वागणूक
सगळ्याकडेच दुर्लक्ष करत
बसून राहतात आपल्याच घरात "परक्यासारखे"
पोरांनी झिडकारलं आई बापाला तरी
आजी आजोबांचं मन राहवत नाही
फक्त नातीला एकदा मांडीवर घेण्यासाठी
तिच्या गालाची साखर चाखण्यासाठी
पण...
ती बाहुली धावते दुडूदुडू
पोरांची नजर अडवते त्यांना
तिला उचलण्यापासून
डोळे भरुन पाहतात तिला
भरल्या डोळ्यानं घरातून निघण्याआधी
आपल्या "खऱ्या घरी" जाण्यासाठी

कुणाल प्रकाश रुद्राके

"जोकर"


माझं प्रेम होतं तिच्यावर, सांगितलं तिला तसं
ती मात्र हसायची हे ऐकून
.
.
.
मग मीही करायचो चेहरा पत्ते पिसून "जोकर" काढल्यागत

के.पी. आर

"निकाल"


कर्णकर्कश्श किंचाळीनंतर
भिनलेली स्मशानशांतता
मनावर, काळजार, जगण्यावर
अन आपणंच मागं राहीलं असण्यावर
पोरकेपणाचं लेबल चिकटू द्यायचं नव्हतं "तिच्यावर..."
लेक स्वतःची गमावल्यावर
जगायचं होतं फक्त तिच्या लेकीसाठी खरंतर
.
.
.
.
कसं जगले कसं निभावलं???
प्रश्न न संपणारे पण सगळ्याला एकंच उत्तर
मी "अशिक्षीत" पण...
तिच्या प्रगतिपुस्तकात मला "निकाल" माझा दिसतो
आईबापामागे पोरकं झालं नाही "लेकरु"
हा विश्वास त्यामधे असतो

के.पी. आर

"पाऊस"


निम्मा जुलै गेला
पावसाचा अजून पत्ता नाही
“यावर्षी अजून एकदापण आपण दोघं सिंहगडला गेलो नाही”
“शीट यार वॉशिंग सेंटर्स बंद नाही पडणार ना? मला गाडी अस्वच्छ आवडत नाही बिलकुल”
“माझी टेरेसवरची फूलं सुकणार”
“मला सकाळ संध्याकाळ आंघोळ करावी लागते, च्यायला बोअर मारुन घ्यावी”
“फिश टँकचं पाणी दर महिन्याला बदलणं अवघडंच वाटतय”
“कमी प्रेशरनं पाणी आलं तर तळमजल्यावरुन पाणी कोण भरणार”
“मिनरल वॉटरवाल्यांचं फावणार गड्या”
"च्यामारी दुष्काळ जाहीर झाला तर निधी तरी मिळेल लाटायला"
“ए पाऊस पडणार रे खुद्द पवार साहेबांनी दिलासा दिलाय मग पाऊस काय चीज आहे”
“अन नाही पडला तर काय फरक पडतो?”
“सिटीमधे टँकरनी का असेना पाणी मिळेलंच”
“प्यायच्या पाण्याला मोजायचे पैसे…”
.
.
.
.
“सगळ्यांचं सगळं होईल व्यवस्थित...
माझ्या लेकराच्या शाळेच्या फिसाठी यावर्षीही पैसा नाही
शाळेतून नाव कमी होणार
दातावर मारायला दिडकी नाही, इंदूच्या लग्नाला कुठून येणार
पडक्या माळाकडं भरल्या डोळ्यानं बघणाऱ्या मायंला कसं समजवू?
जित्तेपणी घर मरताना नाय बघू शकत”
पावसानं अजून ओढ दिली तर...
किमान मी लटकल्या दोरीला
सरकारी प्यॅकेज तरी मिळंल
 घराला "जगायला"!


के.पी.आर

"पाऊस"


भरुन येतं अवेळी
परत परत..
रेनकोट छत्र्या
सज्ज होतात..
घरात दोऱ्या बांधल्या जातात
कपडे वाळवण्यासाठी
घरच्यांच्या शिव्या खाऊनही
मी रेनकोट विसरतो घरी
आजही "जाणूनबूजून"
अंगावर झेललेला अन मनांत साठवलेला
एकेक थेंब करुन देतो तुझी आठवण
सोबत तू नसतेस पण
तरीही मी चालणं पसंत करतो
"एकट्यानं.."
अशातंच... पाऊसही पाठ फिरवतो..
निळ्याशार आकाशाला नजर लागू नये म्हणून
नभाची तिट लावयला आल्यासारखा
तोही जातो फक्त स्वप्न दाखवून..
.
.
.
तुझीही सवय कधी जाणार कुणास ठाऊक
स्वप्न बनून मिटल्या डोळ्यात दाटून येण्याची
अन
रोज सकाळी बरसायची
"डोळ्यातून गालावर"

कुणाल प्रकाश रुद्राके
(एकदा निघून गेल्यावर, स्वप्न तरी हवी कशाला अशी अवेळी ऊशाला)

आस पुढल्या वेळची...


भेटण्याआधी दाटून येणं नेहमीचं झालंय..
बरसणं मात्र जमेलंच असं नाही..
खुणा पसरतात सर्वदूर
चाहूल तुलाही असतेच
पण..
विरलेल्या हुंदक्यात अन
भरलेल्या नभात...
एकवटतं सारं
बरसण्याआधीच...
ओसरतो मग..
अशीच आस लाऊन पाऊस..
पुढल्या वेळची...

कुणाल प्रकाश रुद्राके

भेटूच लवकर..



तू पोहचल्याची चाहूल दिलीच त्या सरीनं
कितीही नको म्हटलं तरी..
तुलाही माहीतीये
सवय माझी..
निश्चिंत मनानं
डोळे मिटण्याआधी
मिटल्या पापण्यात
ती सर साठवण्याआधी
तुझी खुशाली कळणं
किती गरजेचं असतं...
आता निघाल्याची बातमी नाही..
भेटूच लवकर...

कुणाल प्रकाश रुद्राके

"अजून बी.. गावाभाईर"



अजून बी..
घराभाईर वट्ट्यावर हाय च्याचा कप फुटका
शाळच्या मैदानात हाये त्यो येकटा
अजून बी चिरत्यात गळे, तेच्यावर प्रेम केलं म्हून
सावली तुमच्यासाटी पन तेच्यासाटी राखून ठेवलय ऊन

अजून बी
तेच्याकडं बगते येकेक तुच्च नजर
कागदावर मातर दावत्यात आरक्शनाचं गाजर
तेच्यापायी बी तुमी घेता बडवून उर
गुलामीची हजारो वर्श पन
साट वर्शातंच येतो तुमच्या नाकातोंडातून धूर

अजून बी
आडनाव ऐकून पैल्यांदा ठरवता तुमी जात
पिड्यानपिड्या बर्बाद झाल्या तरी बी जात न्हाई जात
कागदावर्च्या आरक्शनानं काय व्हनार न्हाय
शाळा कालेज सरकारी नौकऱ्यांशिवाय अजून बी लै ठिकानी आरक्शन हाय
कुटं म्हून ईचारता काय
कापडांम्हागं आयाभनीच्या मासाचे लचके तोडायला
गुलामाच्या पाठीवर अजून बी आसूड वडायला
शाळंत डबा खाताना येकटं बसायला
शिवताशिवत नावाचा खेळ खेळायला
खेडोपडी मंदिराभाईर,
समद्यांना पानी पन तेंना आरक्शित कोरडी हीर
तरी बी आरक्शना ईरोधात काडताना गळा
डोळ्यावर कातडं वडा पन ठेवा कदीतरी मनाचा रस्ता मोकळा
.
.
.
लकांनो तुमचा रुबाब अजून बी लै बडा हाय
पन ईसरु नका गावाभाईर आज बी म्हारवाडा हाय!

कुणाल प्रकाश रुद्राके

"तू फक्त हो म्हण"



मी एकटा असताना
मी असून नसताना
असशील का तू
मला हसवण्यासाठी
विनाकारण हसशील का तू
वाटेल कधीतरी एकटं
तेव्हा धरायला हात
जिंकेन जग जेव्हा
थोपटायला पाठ
वाटेल फिरावं उगाच
रात्रीचं गाडीवरुन
येशील का एका फोनवर तेव्हा तू घरुन
वाटेल जेव्हा सारं संपल्यासारखं
नसेल कोणीच आजूबाजूला आपल्यासारखं
वाटेल जेव्हा नसावं कोणीच सोबत
बसावं अंधारलेल्या आभाळाकडे एकट्यानंच बघत
असशील का तू
माझ्यातली धुमसणारी शांतता समजून घ्यायला
येशील का तू तेव्हा मुक्यानंच साथ द्यायला
कधीतरी वाटेल असंही
वागावं वेड्यासारखं
कोणीही कशाचाच उगाच लावू नये अर्थ
असशील का तेव्हा खळखळून हसायला
आवडेल ना तुलाही कधी असं वेड्यासारखं वागायला
म्हणेन जेव्हा मी
सोड एकटं मला
घुटमळशील ना तिथे साथ माझी द्यायला
पाहीन तुझ्याकडे मग मी वैतागून
ठेवशील ना खांद्यावर हात न रहावून
अन जेव्हा तुला बोलवेन मी परत
येशील ना तू तेव्हाही खरंच
वाटेल जेव्हा बोलावं तिच्याबद्दल जरासं
खांद्यावर तुझ्या डोकं ठेवून रडावं जरासं
असशील ना तेव्हा मला मिठीत घ्यायला
वेडेपणा माझा असाच सहन करायला

कटींग चहा वडा पाव
लगोर्ची लपंडाव
तिला छेडताना
उंच उंच उडताना
शाळेच्या निरोपसमारंभात
कॉलेजच्या धांगडधिंग्यात
आयुष्याच्या रहाटगाडग्यात
असशील ना तू सुख दुःख
यशापयश शेअर करायला
"तू" फक्त "हो" म्हण..
अजून हवं काय जगायला!!

मैतरा तू फक्त मागून बघ
तुझ्यासाठीच आहे हा जीव
तुझ्यासाठी हसत ओलांडीन मी
मरणाचीही शीव...

तुझाच मैत्र

कुणाल प्रकाश रुद्राके

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...