Wednesday, August 15, 2012

"पाऊस"


भरुन येतं अवेळी
परत परत..
रेनकोट छत्र्या
सज्ज होतात..
घरात दोऱ्या बांधल्या जातात
कपडे वाळवण्यासाठी
घरच्यांच्या शिव्या खाऊनही
मी रेनकोट विसरतो घरी
आजही "जाणूनबूजून"
अंगावर झेललेला अन मनांत साठवलेला
एकेक थेंब करुन देतो तुझी आठवण
सोबत तू नसतेस पण
तरीही मी चालणं पसंत करतो
"एकट्यानं.."
अशातंच... पाऊसही पाठ फिरवतो..
निळ्याशार आकाशाला नजर लागू नये म्हणून
नभाची तिट लावयला आल्यासारखा
तोही जातो फक्त स्वप्न दाखवून..
.
.
.
तुझीही सवय कधी जाणार कुणास ठाऊक
स्वप्न बनून मिटल्या डोळ्यात दाटून येण्याची
अन
रोज सकाळी बरसायची
"डोळ्यातून गालावर"

कुणाल प्रकाश रुद्राके
(एकदा निघून गेल्यावर, स्वप्न तरी हवी कशाला अशी अवेळी ऊशाला)

आस पुढल्या वेळची...


भेटण्याआधी दाटून येणं नेहमीचं झालंय..
बरसणं मात्र जमेलंच असं नाही..
खुणा पसरतात सर्वदूर
चाहूल तुलाही असतेच
पण..
विरलेल्या हुंदक्यात अन
भरलेल्या नभात...
एकवटतं सारं
बरसण्याआधीच...
ओसरतो मग..
अशीच आस लाऊन पाऊस..
पुढल्या वेळची...

कुणाल प्रकाश रुद्राके

भेटूच लवकर..



तू पोहचल्याची चाहूल दिलीच त्या सरीनं
कितीही नको म्हटलं तरी..
तुलाही माहीतीये
सवय माझी..
निश्चिंत मनानं
डोळे मिटण्याआधी
मिटल्या पापण्यात
ती सर साठवण्याआधी
तुझी खुशाली कळणं
किती गरजेचं असतं...
आता निघाल्याची बातमी नाही..
भेटूच लवकर...

कुणाल प्रकाश रुद्राके

"अजून बी.. गावाभाईर"



अजून बी..
घराभाईर वट्ट्यावर हाय च्याचा कप फुटका
शाळच्या मैदानात हाये त्यो येकटा
अजून बी चिरत्यात गळे, तेच्यावर प्रेम केलं म्हून
सावली तुमच्यासाटी पन तेच्यासाटी राखून ठेवलय ऊन

अजून बी
तेच्याकडं बगते येकेक तुच्च नजर
कागदावर मातर दावत्यात आरक्शनाचं गाजर
तेच्यापायी बी तुमी घेता बडवून उर
गुलामीची हजारो वर्श पन
साट वर्शातंच येतो तुमच्या नाकातोंडातून धूर

अजून बी
आडनाव ऐकून पैल्यांदा ठरवता तुमी जात
पिड्यानपिड्या बर्बाद झाल्या तरी बी जात न्हाई जात
कागदावर्च्या आरक्शनानं काय व्हनार न्हाय
शाळा कालेज सरकारी नौकऱ्यांशिवाय अजून बी लै ठिकानी आरक्शन हाय
कुटं म्हून ईचारता काय
कापडांम्हागं आयाभनीच्या मासाचे लचके तोडायला
गुलामाच्या पाठीवर अजून बी आसूड वडायला
शाळंत डबा खाताना येकटं बसायला
शिवताशिवत नावाचा खेळ खेळायला
खेडोपडी मंदिराभाईर,
समद्यांना पानी पन तेंना आरक्शित कोरडी हीर
तरी बी आरक्शना ईरोधात काडताना गळा
डोळ्यावर कातडं वडा पन ठेवा कदीतरी मनाचा रस्ता मोकळा
.
.
.
लकांनो तुमचा रुबाब अजून बी लै बडा हाय
पन ईसरु नका गावाभाईर आज बी म्हारवाडा हाय!

कुणाल प्रकाश रुद्राके

"तू फक्त हो म्हण"



मी एकटा असताना
मी असून नसताना
असशील का तू
मला हसवण्यासाठी
विनाकारण हसशील का तू
वाटेल कधीतरी एकटं
तेव्हा धरायला हात
जिंकेन जग जेव्हा
थोपटायला पाठ
वाटेल फिरावं उगाच
रात्रीचं गाडीवरुन
येशील का एका फोनवर तेव्हा तू घरुन
वाटेल जेव्हा सारं संपल्यासारखं
नसेल कोणीच आजूबाजूला आपल्यासारखं
वाटेल जेव्हा नसावं कोणीच सोबत
बसावं अंधारलेल्या आभाळाकडे एकट्यानंच बघत
असशील का तू
माझ्यातली धुमसणारी शांतता समजून घ्यायला
येशील का तू तेव्हा मुक्यानंच साथ द्यायला
कधीतरी वाटेल असंही
वागावं वेड्यासारखं
कोणीही कशाचाच उगाच लावू नये अर्थ
असशील का तेव्हा खळखळून हसायला
आवडेल ना तुलाही कधी असं वेड्यासारखं वागायला
म्हणेन जेव्हा मी
सोड एकटं मला
घुटमळशील ना तिथे साथ माझी द्यायला
पाहीन तुझ्याकडे मग मी वैतागून
ठेवशील ना खांद्यावर हात न रहावून
अन जेव्हा तुला बोलवेन मी परत
येशील ना तू तेव्हाही खरंच
वाटेल जेव्हा बोलावं तिच्याबद्दल जरासं
खांद्यावर तुझ्या डोकं ठेवून रडावं जरासं
असशील ना तेव्हा मला मिठीत घ्यायला
वेडेपणा माझा असाच सहन करायला

कटींग चहा वडा पाव
लगोर्ची लपंडाव
तिला छेडताना
उंच उंच उडताना
शाळेच्या निरोपसमारंभात
कॉलेजच्या धांगडधिंग्यात
आयुष्याच्या रहाटगाडग्यात
असशील ना तू सुख दुःख
यशापयश शेअर करायला
"तू" फक्त "हो" म्हण..
अजून हवं काय जगायला!!

मैतरा तू फक्त मागून बघ
तुझ्यासाठीच आहे हा जीव
तुझ्यासाठी हसत ओलांडीन मी
मरणाचीही शीव...

तुझाच मैत्र

कुणाल प्रकाश रुद्राके

"कदाचित"



बीप. बीप...
C.C.D. @ 6?? त्याचा मेसेज
“:)” तिचा रीप्लाय
उत्तरादाखल स्माईली पाठवायची
सवयंच होती तिला
नेहमीप्रमाणे ऊशिराच आला तो..
त्यांच्या नेहमीच्या जागेवर
ती वाट पहातंच होती
मोबाईलशी खेळत..
सॉरी सॉरी सॉरी..
कान धरुन नाटकी थाटात बोलला तो
काय करु अगं.. किती ट्रॅफिक असतं एस.पी.च्या चौकात
तिनं त्याची नक्कल केली.. तो ओशाळला
अन ती हसली खळखळून
तिच्या हसण्यामधे त्याच्या हसण्याचा आवाज मिसळला
सगळं कसं पाठ झालंय नाही आपल्याला..
एकमेकांच्या सवयी, कारणं
आवड निवड.. तिच्या डोळ्याला डोळा भिडवत म्हणाला तो
हंम्म्म..? चटकन नजर वळवत दुजोरा दिला तिने
ए गेल्या चार वर्षात काय धमाल केली ना आपण
तिचा हात हातात घेऊन बोलू लागला तो
सिंहगड, दुर्गा, मुळशी, पानशेत..
ई स्क्वेअर, आयनॉक्स, सगळे मॉल्स
त्याचं  वाक्य जोडत बोलली ती
सुजाताची मस्तानी, नॅचरल्सचं आईस्क्रिम
आणि आणि..
हाऊ कॅन आय फर्गेट... C.C.D.
तो बोलत असतानाच वेटरने कॉफी आणून ठेवली
येस! एकंच कप दोघात शेअर करतो... थोडासा खट्याळपणे बोलला तो
"कदाचित शेवटचा"
त्याच्या हातातून हात सोडवून घेत बोलली ती

कॉफिवरचं हार्ट शेप क्रिम टॉपिंग
धूसर दिसू लागलं तिला
तसं टिश्यू पेपर उचलून बोलू लागली ती
काय करु रे.. किती प्रयत्न केला
पपा ऐकतंच नाही..
मला खोटी आशा नाही दाखवायची तुला
आवंढा गिळत बोलली ती एका दमात

त्यानं प्रतिक्रिया देण्याआधीच
त्याच्या गालावरुन हलकेच हात फिरवून
कॉफीशॉपच्या बाहेर पडली ती..
ईतकावेळ भरभरुन बोलणारा तो
तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे गोठल्यागत बघत राहिला..
कॉफीवरचं हार्ट विरलं..
तो तिथेच बसला होता..

बीप..बीप.. तिचा मेसेज
“जमलं तर माफ कर मला..लव्ह यू, टेक केअर अँड किप “:)”
त्यानं रीप्लाय केला...
यू टेक केअर टू...

“:)” कदाचित शेवटचं!!


कुणाल प्रकाश रुद्राके

"पहिला पाऊस"



बस स्टॉपवरची गर्दी
रणरणतं ऊन
गाड्यांचा गोंगाट अन..
उडणारी धूळ
त्यातही धूराची भर घालत
येणारी बस..
धक्के बुक्के खात..
महत्प्रयासानं मिळवलेली जागा
लाल डब्याची खडखड
अन ऊशीर झाल्यानं होणारा त्रागा..
धूळीनं माखलेल्या चेहऱ्यानं
गाठायचं ऑफिस..
बॉसची कटकट
कलिग्जचे टोमणे
तापणाऱ्या दिवसासोबत
वाढतंच राहतात..
दिवसभर काम उपसून
ती तयार होते
बसची खडखड, धक्के बुक्के अन धुळीचे लोट
सहन करायला..
बॅग भरता भरता
ध्यानी मनी नसताना
येतं आभाळ भरुन..
"उशीर करु नकोस, लवकर निघ" येतो फोन घरुन
घामेजलेल्या चेहऱ्यानं ती परत बसस्टॉपवर येते
अन नेमका तेव्हाच तो गाठतो..
"मुसळधार"
तुटक्या शेडमधून.. गर्दीला चुकवत
पोहचतो तिच्यापर्यंत..
बॅगेतलं प्लॅस्टिकचं फोल्डर
धरते ती डोक्यावर अन..
तेवढ्यात परत फोन वाजतो..
एक दोन तीन... कित्येक रिंग होतात...
बंद पडायच्या आत
उचलते ती लगबगीनं..
"पहिल्या पावसाच्या शुभेच्छा"
बोलतो तो पलिकडून
ईतकावेळ त्रासलेली "ती"
हसते मग खळखळून..
ह्यॅ असं काय... तुटक्या शेडमधे
गर्दीत लपून...
भेटतात का पावसाला असं चोरून???
एवढंच बोलून ठेवतो तो फोन
बरसत्या पावसात शोधत राहतात त्याला
तिचे आश्चर्यानं भरलेले डोळे दोन
बाईक रस्त्याच्या कडेला लाऊन
हसत असतो तो तिच्याकडे पाहून
पाऊस, गर्दी, रस्ता...
सारं सारं विसरुन ती त्याला बिलगते...
त्या गोड मिठीचं महत्व पावसालाही समजते
एवढ्यात वाजतात हॉर्न्स...
येतात दोघे भानावर..
बाईकवर पावसाचे थेंब झेलतानाच
"आय लव्ह यू"
मागून तिचे शब्द येतात त्याच्या कानावर...
उत्तरादाखल तो फक्त हसतो
अन पहिला पाऊस असाच
त्या दोघांच्या प्रेमात भिजतो

कुणाल प्रकाश रुद्राके

"पाऊस"


असाच पाऊस कोसळल्यावर
मी सावरु कसा  स्वतःला
तुला डोळ्यात साठवून
वादळ घेऊ कसं उशाला?

भरुन येणाऱ्या आभाळाची
वाट पहायाची तुझ्यासाठी
काजळणारी रात आठवांत
जागायची तुझ्यासाठी
थांबवेन कशाला सर
जगतोय त्यासाठीच खरंतर

म्हणूनंच म्हणतो
पुढल्यावेळेस...
कोसळणाऱ्या "तू" मधे
मीही जाईन वाहून..
थकलोय खरंच...
एकेका थेंबाची वाट पाहून

कुणाल प्रकाश रुद्राके

"तू परत येईपर्यंत"



सोफ्यावरच्या उश्या..बेडशीट
व्हरांड्यातल्या आराम खुर्च्या
चप्पल स्टॅंडची बंद दारं
ड्रेसिंगटेबलवरच्या वस्तू
फ्लॉवरपॉटमधली "खोटी" फुलं
टिपॉयवरचे न्यूजपेपर
आईभाऊंचा चष्म्याचा बॉक्स
लॅपटॉप, मोबाईल, रीमोट कंट्रोल..
हॉलच्या उघड्या खिडक्या, जिन्याकडे उघडणारं दार
बिस्कीटाचे पुडे, मातीच्या मूर्त्या
सगळं सगळं तसंच असतं जागच्या जागी
घडी विस्कटत नाही कशाचीच
पसारा नाही, सारं काही असतं हाताशीच
नीट नेटकं..ईस्त्री केलेलं घर
सारं काही असूनही खायला उठतं
काचेच्या वस्तू फुटत नाहीत
फ्रिजचं दार आपटत नाही
टिव्हीचा आवाज वाढत नाही
कोणी कुणाची खोडीसुद्धा काढत नाही
खेळण्यातला बेडूक, डॉल, टेडी...
सगळ्यावर धूळ चढते..
धूळ झटकल्याचा आव आणून...
हात फिरवतो एकेका खेळण्यावरुन
तास न तास उगाच...
घरातला एकेक कोपरा माझ्यासोबत
वाट बघत राहतो तुमची असाच
वाटेत काहीही नसतं
पाऊलं तरीही अडखळतात
भास होतो
उगाचंच फोन वाजल्याचा
कोणीतरी सोबत असल्याचा
दबक्या पावलानं येऊन शेजारी बसल्याचा
पायाला हळूच गुदगुल्या करुन हसल्याचा
अशाच हसतात, डोळ्यात भरतात अन
साथही देतात "आठवणी"
पुढल्यावेळेस "तू" लेकरांना घेऊन परत येईपर्यंत

कुणाल प्रकाश रुद्राके

"सावळी आठवं"



सांजेच्या भाळी छटा उदास
कातरवेळी तुझा भास उगाच
केशराचं खुळ क्षितिजाच्या पार
चांदण्याचा सडा तरी एकलं शिवार
झुळूक वाऱ्याची कि श्वास तुझा
चांदव्यावरही विरहाचा डाग असा
भिरभिरणाऱ्या मेघाला
हळवी सांज सावरणारी...
अन स्वप्नात तुझ्या
रातही सुखावणारी..
अशीच विरली सांज
सरली रात अजून एक
परत एकदा
हुरहुरत्या प्रभेची सावळ्या आठवांशी गळाभेट

कुणाल प्रकाश रुद्राके

"कप्पा"



सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या
एकत्र पाहिलेल्या सिनेमाची तिकिटं
टोलची बिलं
रीफील संपलेले पेन्स
पी.एल.मधल्या नोट्स
तुझं नाव, फुली गोळा, रेघोट्या, कोड्यांनी
भरलेली वहीची पानं
ग्रिटींग कार्ड्स
तू दिलेल्या चॉकलेट्सचे रॅपर्स
एकेक अल्फाबेट्सचे बीड्स एकत्र करुन लिहिलेली आपली नावं
आयकार्ड साईझ फोटोज
चारोळी लिहिलेला टिश्यू पेपर
पर्फ्युमची रीकामी बॉटल
समवन स्पेशल सी.डी.चं फक्त कव्हर
पैंजणातून निखळलेलं घुंगरु
आपण फक्त मित्र असताना
तू लिहिलेलं पत्र
आणि
कधी एकेकाळी केलेल्या कवितांची
जपलेली वही
काल सारं काही तसंच्या तसं ठेवलं मी परत
कपाटाच्या "त्या" कप्प्यात...
खूप दिवस सांगत होते आई-डॅडा आवरायला
काल लक्षात आलं
आवरता येत नाही अन
बंदही करता येत नाहीत कुलुपामागे
"आठवणी"
चाळावल्या जातात फक्त..
अन पसरतात घरभर
कायमच्या
आपण मात्र खुळे
जगत राहतो खोटं "त्यांच्याशिवाय"

कुणाल प्रकाश रुद्राके

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...