Friday, February 11, 2011

मैत्र


मैत्र... एक नाव आपल्या सर्वांचं
मैत्र... एक गाव आपल्या हक्काचं
मैत्र... म्हणजे ठाव आपल्या काळजाचा
मैत्र... एक ठेका त्याच काळजाच्या ठोक्यांचा
मैत्र... एक साथ सुख-दुःखाची
मैत्र... एक साद खऱ्या सख्याची
मैत्र... म्हणजे मैत्री, मैत्र म्हणजे दोस्ती
मैत्र म्हणजे मौज मजा अन मैत्र म्हणजेच मस्ती
मैत्र म्हणजे यारी जीवाहूनी प्यारी
मैत्रंच आहे माझ्यासाठी दुनिया सारी
मैत्र म्हणजे तू, मी मैत्र म्हणजे आपण सर्व
"मैत्र" म्हणजे हरेक क्षण मैत्र म्हणजे निरंतर "पर्व"

कुणाल

काहीतरी चुकतंय



काहीतरी चुकतंय, काय ते कळत नाही
आणि या "काय"चं उत्तर काही केल्या मिळत नाही.
शाळा कॉलेज नोकरी धंदा
कुठेतरी नक्कीच झालाय वांदा
गाडी बंगला पैश्याचा पाऊस
व्यवहारी जगात गुदमरतेय हौस
पगार केबिन ए.सी. पी.सी.
सॅटिस्फॅक्शनची व्याख्या करायची कशी?
कशी ते काही कळत नाही
आणि या "कशी"चं उत्तर काही केल्या मिळत नाही.
फेसबूक ऑर्कुट चॅटींग मेसेज
कट्ट्याला रीप्लेस करतीए वेबस्पेस.
मित्रांचं बदलणारं आयुष्य फॊटॊतंच बघायचं
खरखुरं आयुष्य सोडून वर्च्युअ‍ॅलिटीमधे जगायचं
कॉम्प्युटरवरच्या कट्ट्याला खऱ्या कट्ट्याची सर नाही.
आपल्याच जगण्याची आपल्यालाच का कदर नाही?
का ते कळत नाही
आणि या "का"चं उत्तर काही केल्या मिळत नाही.
सकाळची लगबग ऑफिसची वेळ
टार्गेट अ‍ॅम्बिशन पर्सनल लाईफ.. कशाचाच कशाशी बसत नाही मेळ
लाहानपणीचे फुटलेले गुडघे अन खरचटलेलं ढोपर
त्यापेक्षा आजकालचा मार बसतो जबर
इथे असतो थेट काळजावर घाव
व्यवहार अन वर्च्युअ‍ॅलिटीच्या जगात आठवतं मग मैतराचं गाव
मैतराच्या गावाला कधीतरी भेट द्यावी
आठवणीत नको.. मला पावला पावलावर तुमची साथ हवी.
हपापलेल्या जगातली आकड्याची वाट, कधीतरी आपण सोडून द्यावी
मैतराच्या साक्षीनं गाठावी क्षितिजं नवी.
कळतंय मला चुकतंय काय
म्हणनार नाही या कायचं उत्तर मिळतंच नाय
हं.. काय विचारता राव, काय का अन कसं?
तुम्हाला पण कळेल करा फक्त मी सांगतो तसं
एक दिवस तरी स्वच्छंद जगावं, मैतराचं गाणं मनसोक्त गावं
जगण्य़ाचा असा करावा जल्लोष, सारं विसरुन व्हावं बेहोश
नको कशाची तक्रार न द्यावा कुणाला दोष
खोट्याच्या दुनियेत जपावा फक्त मैत्रीचा हा रेशीम कोश

तुमचाच मैत्र

कुणाल

Sunday, February 6, 2011

शून्य


हो, शून्य! खरंच, खरंच तू शून्य

हं.. शून्यच तू माझ्याशिवाय

पण या शून्याला का कुणाचा आधार हवाय?

"शून्य" म्हणजे उगम साऱ्याचा, काळोखातही लखलखणाऱ्या 
ताऱ्याचा

वादळापूर्वीच्या शांत वाऱ्याचा, दिम्माखात चमकणाऱ्या हिऱ्याचा

शून्य म्हणजे सुरुवात अन शून्यातंच शेवट.. अशा सर्वसंपन्न

शून्यावर का निराशेचे सावट?

त्याच्याशिवाय ती असली जरी ईत्यादी, तरी सागराला अथांग

बनविते तिच नदी

तिच्यातूनंच तो घेतसे आकार, का शोधावा नदीनं त्या सागरामधे

आधार?

सर्वांपासून स्वतंत्र आहे तुझं अस्तित्व, ओळख स्वतःचं महत्व

जप आता स्वत्व, साऱ्या विश्वाचं तुझ्यातंच दडलंय बघ सत्व

तुझ्याशी युती तरंच खरी गती, तुझ्याशिवाय अशक्य साऱ्यांचीच

प्रगती

शून्य नसे फक्त आकड्यांच्या गर्दीतला अजून एक अंक

शून्याची ताकदंच बनवते रंकाला राजा अन राजालाही रंक

आत्मसिद्ध तू आत्मविश्वासंच असू दे जगण्याचं तत्व

आता मात्र विरु देऊ नकोस कुणातही तू तुझं अस्तित्व

एकटेपणाचं ते झुगार आता शल्य

अजेय तेजोमय जगण्याचं आहे तुझ्यात कौशल्य

खरंच खरंच तू शून्य तरीही अतुल्य खरंच तू अमूल्य

हो हो.. शून्यच तू माझ्यासोबत अन माझ्याशिवाय...

फरक फक्त एवढाच

तुझ्याशिवाय माझं काहीच नाही मोल

अन तू एक शून्य.. तरीही अनमोल



कुणाल.

Sunday, January 30, 2011

"कारण उघड्या डोळ्यानं स्वप्नं बघता येत नाहित"




रात्रीचे साडे बारा... हि काय घरी येण्याची वेळ झाली.. झोपेत कुस बदलता बदलता आई त्याला बोलली.
ऑफिसचा युनिफॉर्म बदलून तो सो कॉल्ड फ्रेश झाला.
एक वाजता बिछान्यावर पडता पडता त्यानं नंबर डायल केला.
त्यानं तिला किंवा तिनं त्याला रात्री अपरात्री फोन करण्यात नवीन असं काही नव्हतं.
तरीही फोन उचलून ती म्हणाली,"एवढ्या उशिरा...?"
हा शेवटचा कॉल... आज मनमोकळ्या गप्पा मारु.. आठवणीत रात्र जागवू..
उद्यापासून आपले रस्ते वेगळे... शांतपणे म्हणाला तो.
भेटी-गाठी, मैत्री, मजा-मस्ती... प्रेम...
आठवणींचे एकेक पदर उलगडताना रात्रही पूर्वेकडे झुकत होती..
अन ती म्हणाली.. अरे एवढं बोललो आपण, पण आठवतंय तुला सगळ्यात पहिलं इंटरॅक्शन कधी झालं होतं आपलं?
हं.. कॉलेजच्या स्टेजवर.. नाटकात काम केलेलं आपण, तू माझ्या गर्लफ्रेंडची भूमिका केली होतीस..
आणि म्हणाली होतीस... "फार ओव्हरअ‍ॅक्टींग करतो.."... अगदी कालपरवा घडल्यासारखं सांगितलं त्यानं
ती - हो.. आणि तेव्हा बाकी सगळेही म्हणाले होते.. काय विजोड पेअर आहे..
तो - हं.. होना अन काहिजण अजूनंही म्हणतात..
चल मी झोपतो.. खूप थकलोय..
ती - शेवटचा कॉल.. थोडा वेळ अजून बोल ना.. परत कुणास ठाऊक कधी कॉन्टॅक्ट...
नको गं खरच खूप थकलोय.. आता तर डोळेही मिटताएत आपोआप.. तिचं वाक्य मधेच तोडत बोलला तो.
ठिके.. आय डोन्ट नो आय शुड से धिस ऑर नॉट... बट आय़ लव्ह यू.. ती आवंढा गिळत बोलली
काय रे तू असा.. कशाला डोळे मिटू द्यायचे ते..
कारण... उघड्या डोळ्यानं स्वप्नं नाही बघता येत...थकलेल्या आवाजातले त्याचे शब्द..
अन फोन बंद...
.
.
.
सकाळी... परत फोन वाजला तिचा.. डोळे चुरचुरत होते..
झोपेतंच फोन उचलला तिनं... अन खडबडून जागी झाली ती
"तो गेल्याच्या बातमीनं"...
दहा पंधरा दिवस झाले... त्याच्या ऑर्कुट फेसबूक प्रोफाईलवर मित्रांचे "रेस्ट इन पिस" मेसेजेस पोस्ट होत राहिले..
धक्यातून जरा सावरत तिनं लिहिलेला मेसेज मात्र बोलका होता...
"त्याचं जाणं चटका लावून गेलं...
निजताना मिटलेले डोळे त्यानं उघडलेच नाही परत कधी
"उघड्या डोळ्यानं स्वप्नं बघता येत नाहित"... म्हणालाच होता तो...
डोळे मिटण्या आधी...

कुणाल

Tuesday, February 2, 2010

"होम कॉलिंग"



एक पाऊल पुढे आणि मागचं सारंच संपणार होतं
जीवन-मरणाच्या लढाईत आज मरणंच जिंकणार होतं
संपणार होता तो अन त्याच्यासोबत...
अपयाशाचा कलंक
राजा बनायला चाललेला एक अपयशी रंक
थांबवता येत नाही म्हणून चालू असलेला श्वास
जगण्यावर असलेला-नसलेला विश्वास
कधीहि न संपणारी अविरत मालिका ती अपयशाची
उरी बाळगलेली खोटी आशा ती यशाची
मैत्री प्रेम नि नात्यांची सारी ती बंधनं
थकलेल्या काळजाची सारी ती स्पंदनं
अपयशाच्या खपलीखाली जपलेली जिवंत वेदना
अपयशाच्याच धास्तीनं मेलेली संवेदना
स्वप्नं सत्य आशा निराशा....
टचके टोमणे अन होणारी फरफट आताशा.
जिद्द स्पर्धा हाल-अपेष्टा...
अपेक्षांच्या ओझ्याखाली होणारी चेष्टा

पाऊल पुढे टाकणार तेवढ्यात फोन त्याचा वाजला
"होम कॉलिंग"...
पाणावलेल्या डोळ्यानंच त्यानं फोनवरचा मजकूर वाचला.
"होम" या एका शब्दानंच त्याचं पाऊल तिथंच अडलं
अन चूक स्वतःची उमजून ते पोर ढसाढसा रडलं
घरातून अजूनही त्याला कोणीतरी बोलावत होतं
अपयशाच्या दरीतही त्याला यश खुणावत होतं.
त्यालाही कळून चुकलं,"टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही"
यशाची चावी सहजासहजी अशी कुणाच्याही हाती देव पण देत नाही.
मागे फिरत परत जिंकण्याचा त्याने केला मग निर्धार.
कारण घरच्यांची माया, मित्रांचं प्रेम अन जिद्दिचा होता त्याला आधार.
माघार घेऊनही आज तो खरंतर जिंकला होता...
अपयश आणि निराशेचा अंधःकार प्रेम अन जिद्दिच्या संधीप्रकाशानं संपला होता...

कुणाल प्रकाश रुद्राके.


"घरी कोणीतरी वाट पहात आहे"

डान्स क्लास बंद केला म्हणून आत्महत्या, सातवीतल्या मुलाची शाळेत गळफास घेऊन आत्महत्या, परीक्षेत नापास झाल्यामुळे आत्महत्या, प्रेमभंग झाला म्हणून आत्महत्या... एकापाठोपाठ एक बातम्या येत होत्या, येत आहेत.. आत्महत्यांचं सत्र अजून चालूच आहे. हे सारं बघून, ऐकून मनात एक विचार आला, च्यायला शिक्षणपद्धती, यंत्रणा, मानसिकता, जीवघेणी स्पर्धा, अवाजवी अपेक्षा, ताण या तत्सम गोष्टींवर केस ठोकता येत नाही. तसं झालं असतं तर आजवर अगणित वेळा यांना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावली गेली असती.
आठवतंय? आठवतंय.... लहानपणी खूप खेळायचो आपण, दंगा-मस्ती, धमाल करायचो अगदी. ठेचकळायचो, पडायचो अन लागायचंही भरपूर. पण पडायच्या भीतीनं धावणं, खेळणं सोडून दिलं का आपण कधी? नाही ना? बरीच स्वप्नं बघतो आपण, काही पूर्ण होतात तर काही अधुरी राहतात. पण म्हणून स्वप्न बघणं सोडून द्यायचं का, प्रयत्न करणं सोडून द्यायचं का अन सगळ्यात महत्वाचं म्हणजे "जगणं" सोडून द्यायचं का? रोज संध्याकाळी दिवालवतो आपण, आपल्या आजूबाजूचा परीसर उजळवून टाकतो तो. पण त्या प्रकाशाची पाठराखण अंधारंच करत असतो. अंधार आहे म्हणून दिव्याला आणि त्याच्या प्रकाशाला महत्व आहे. अगदी तसंच आपल्या जीवनांत आपल्या यशाची पाठराखण अपयश करीत असतं.
आईची माया, बपाचा आधार, भावंडांच्या खोड्या, मित्रांसोबतचे सोनेरी दिवस... या सगळ्या गोष्टींना मागे सोडून आयुष्य संपवण्या ईतकं का अपयश मोठं आहे? नक्कीच नाही... माहित्येय मला, असं वाटतं कधी कधी कीयशाकडे जाणारे सगळे रस्ते संपले. पण आपल्या विचारांपलिकडेही नव्या वाटा आहेत. फक्त त्या शोधण्याची, त्यातलीच एक मनापासून निवडण्याची आणि त्या वाटेवर यशस्वी होईपर्यंत चालण्याची जिद्द मनात असायला हवी. आत्महत्या तर एक पळवाट आहे. शेवटी निर्णय आपल्या हाती आहे, नवी वाट शोधायची की फक्त एकपळवाट आपलीशी करायची? सारं धाडस एकवटून आत्महत्या करायचा निर्णय घेण्यापेक्षा, तेच सारं धाडस, जिद्दएकटून आयुष्य घडवायचा निश्चय करा मग बघा यश कसं जोमानं बहरतं आयुष्यात.

शालेय परीक्षांमधे नापास झालेले/ चमकलेले आपल्यातले कित्येक चेहरे आज आयुष्याच्या परीक्षेत पास होऊनयशाच्या शिखरावर आहेत.

सचिन तेंडूलकर - महविद्यालयाचं कधीही तोंड पाहिलेला हा मनुष्य क्रिकेट जगतात आज साऱ्या मोजमापासाठी परिमाण ठरतोय.

अब्राहम लिंकन - आयुष्यभर ज्या अपयशानं त्याची पाठ सोडली नाही त्याच अपयशाला चितपट करुन त्या अपयशाच्या छाताडावर लोकशाहीचा यशस्वी झेंडा रोवला त्याने जगासाठी.

गुलजार - उर्दूमध्ये नापास (विश्वास बसतंच नाही ना) गेली चार दशकं यांच्या शायरीनं तमाम रसिकांना वेडलावलंय.

इंदिरा गांधी - "गुंगी गुडिया" म्हणून याच "आयर्न लेडी"ला विरोधकांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीला हिणवलं होतं.
या सर्वांनी यश मिळवलं कारण त्यांचा स्वतःवर, त्यांनी निवडलेल्या वाटेवर विश्वास होता, अन सर्वात महत्वाचंम्हणजे त्यांच्यात अपयशातून सावरून जिंकण्याची जिद्द होती. स्वतःवर विश्वास ठेवा, यश तुमच्या पायावर लोळण घालेल.

कॉलेजात असताना पहिल्यांदाच बाईक घेऊन दिली होती घरच्यांनी. अन एकदा बेदरकारपणे वेगात बाईक चालावाताना एका वळणावर बोर्ड वाचला, "वाहन जपून चालवा, घरी कोणीतरी वाट पहात आहे"... त्या दिवासानंतर निष्काळजीपणे गाडी चालवायला मन धजावलंच नाही कधी... तुमच्या आई-वडिल, भावंड, मित्रमंडळींच्या वतीनं एकंच प्रेमळ विनंती आहे मित्रांनो "घरी कोणीतरी वाट पहात आहे" हा बोर्ड शाळा कॉलेजात लावायची वेळ येऊदेऊ नका.

कुणाल प्रकाश रुद्राके.

Wednesday, June 17, 2009

तुलाच शोधतोय

तुलाच शोधतोय!

अश्रूंनाही मोल असतं, हे जाणंवलं तू दूर गेल्यावर
मिटल्या पापण्यातही आसवंच होती स्वप्नांत तू दिसल्यावर.
तेव्हापासून शोधतोय तुला, तुलाच शोधतोय....
तुलाच शोधतोय,
काळ्याभोर मेघांनी झाकोळलेल्या चांदण्या शोधताना.
अमावस्येच्या रात्री त्या आभाळाकडे चंद्रकोरीची भिक मागतांना.
अनोळखी भासणारा माझांच चेहरा आरश्यांत निरखून बघताना.
जूनांच एस एम एस काढून परत परत वाचतांना.
तुझ्यांच स्वप्नांत रात्रं सारी जागतांना.
पहाटेच्या त्या फितूर स्वप्नांकडे झाल्यागेल्याची दाद मागतांना
आसवांचे मोती मूकपणे गिळतांना.
दिखव्याखांतर का असेना, सर्वांदेखत असहाय्यपणे हसताना.
माझ्या स्वप्नांची चिता जाळून, आठवणींची राख वेचताना.
मनावर चढलेले आठवणींचे सारे रंग माझ्यांच मनाविरुद्ध पुसतांना.
हातून निसटलेले सारे क्षण आठवणींच्या कप्प्यात साठवतांना.
तुझ्यासोबतचे सारे गोड क्षण कटू मनाने आठवतांना.
तुलांच शोधतोय नि शोधत राहिन मातीत या मिसळतांना......
मरणाकडून मरणाकडे प्रवास माझा करताना.
तुलांच शोधतोय तुकड्या तुकड्यांत जगतांना.
तुलांच शोधतोय खरंच कण-कण मरतांना... कण-कण मरतांना.......

तुझांच????


कुणाल.


तो आणि ती


तो आणि ती!!!!!!

तो - आता तर सवयंच झालीए
तुझ्याशिवाय जगण्याची.
रात्र रात्र जागून त्या चंद्रातही
तुझाच चेहरा शोधण्याची.

ती - पण त्या चंद्रालही आहे खोड
तुझ्याच अंगणी पहुडण्याची.

तो - रोज पहुडला जरी माझ्या अंगणी
तरी त्याला आहे सवय अमावस्येच्या रात्री मला दगा देण्याची.

ती - अमावस्येची रात्र जरी आली
तुझ्या माझ्या प्रितीला काळी तिट लावून गेली.

तो - शोधूनही दिसेना तिट ती
नजर आता थकली आहे.
कसली प्रिती नि कसलं प्रेम
वेदना मात्र ऊरी माझ्या जपली आहे.

ती - लपलीए ती प्रित तुझ्या नि माझ्या ऊरी
आणि झालीए रातीची गत फुलपाखरापरी.

तो - फुलपाखरं ऊडली सारी
मागे आठवंण ठेऊन.
रंगच आठवतो प्रितीचे रोज रात्री
काळोखाची चादर लेऊन.

ती - त्या झालरीतंच खरं गुपित दडवलं आहे
प्रेमाची साक्ष देणाऱ्या क्षणांना
जगापासून लपवलं आहे.

तो - क्षण सारे आता हवेमधे विरले आहेत
चंद्राच्या भेटीसाठी तारेही रात्र रात्र झुरले आहेत
आठवणीचे गीत तेवढे माझ्या ओठी ऊरले आहे
माझ्या प्रत्येक शब्दाने तिलाच फक्त स्मरले आहे.........
तिलाचं फक्त स्मरले आहे.


कुणाल.

Tuesday, June 16, 2009

ईन्जिनिअरींग

ईन्जिनिअरींग
पूर्ण सेमीस्टर कट्ट्यावर बसणारा प्रत्येकजण, आपण फावल्या वेळेत ईन्जिनिअरींगही करतोय हे सोयीस्कररीत्या विसरलेला असतो.
पण आता सबमिशनच्या लास्ट डेट्स ची चाहूल लागताच, त्याच्याही नकळ्त फाईलींच्या ढिगाऱ्यामधे तो अचानक घसरलेला असतो.
कॉलेजच्या नावाखाली दिवसाही हॉस्टेलच्या रूमवर झोपा काढणारे डोळे आता रात्र-रात्र जागतात.
एकेका सबजेक्टचं सबमिशन पूर्ण करण्यासठी सारेच एकमेकांकडे आता झेरॉक्स आणि राईट-अप्स मागतांत.
घाई-गडबडीत, थोडंफार वगळून, कसं का असेना एकेक फाईल आता कंप्लिट होऊ लागते.
कष्टाची सवय नसल्यानं डोळे, पाठ, कंबर, हात; सारं शरीरंच आता निर्वाणीची भाषा बोलू लागते.
रात्र जागून काढण्यासाठी चहा-कॉफीच्या टपरीवर रात्रीही वर्दळ वाढू लागते.
एरव्ही तास न तास बुड न हलवणारी गर्दीही आता एक कप चहा-कॉफीतंच तिथून पाय काढू लागते.
कणभरही माहीती नसलेले राईट-अप्स कॉपी केल्यावर फाईल चेक करण्याची आता येते वेळ.
आज ये, ऊद्या ये या निरोपांबरोबर एकेका प्रोफेसरकडे खेटे घालण्याचा सुरु होतो मग खेळ.
यामधे भर म्हणून की काय नोटिस बोर्डावर झळकते डिफॉल्टर्स लिस्ट.
रेग्युलरली इर्रेग्युलर असणाऱ्या भावी ईन्जिनियरच्या सबमिशनच्या कहाणीत येते आता नवीनंच ट्विस्ट.
ऊद्याच्या एन्जिनियरचं सबमिशन चेक करुन डिटेन्शन टाळण्यासाठी पाच-पाच पेपर लिहून आणण्याची शिक्षा निश्चित होते.
याचं-त्याचं कॉपी करुन, जमेल तेवढं वगळून ही शिक्षाही मान खाली घालून आता भोगली जाते.
या एका महिन्यापुरता मात्र प्रत्येकालांच ईन्जिनिअरींगचा मनापासून तिटकारा येऊ लागतो.
सगळ्यांचे नखरे सहन करताना प्रत्येकजण प्रोफेसरपासून एच.ओ.डि आणि प्रिन्सिपललाही शिव्यांची लाखोली वाहू लागतो.
पि.एल. चालू झाली तरी अजून एकेका विषयाची तोंडओळखही व्हायची असते.
कुठल्या सबजेक्टला कोणत्या ऑथरचं पुस्तक वापरायचं हे ही अजून ठरलेले नसते.
सबमिशन संपून अभ्यासाला सुरुवात करेपर्यंत डोळे पांढरे व्हायची वेळ येऊ लागते.
स्कोरींगचं भूत मानगुटीवरून उतरून, कट-टू-कट मॅजिक फिगर गाठण्याची महत्वकांक्षा आता मनी पूनर्जन्म घेऊ लागते.
दिवसभर कट्ट्यावर दिसणाऱ्या टाळक्यांची गर्दी आता लायब्ररीमधे होऊ लागते जमा.
दिवस-रात्र पुस्तकांत डोकं खपवून अभ्यास करताना, खाणं-पिणं नि तब्येतीची कुणालांच नसते तमा.
असांच एकेक दिवस मोजताना परीक्षेचा तो अप्रिय दिवस येऊन ठेपतो.
कितही अभ्यास केला तरी एक्झामच्या पहिल्या बेलबरोबर प्रत्येकाच्या काळजाचा ठोका चुकतो.
एकेका पेपरबरोबर एटिकेटिच्या लिस्टमधे पडू लागते भर.
एटिकेटिमधे का असेना पास होण्याची खात्री होतांच, पुढच्या सेमिस्टरला मात्रं ऑल-क्लिअर होण्याची योजना मनी करू लागते घर.
शेवटचा पेपर संपताच पुढच्या सेमिस्टरला पहिल्यापासून अभ्यास करायचा, असं प्रत्येकजण अगदी शपथेवर ठरवतो.
पण पुढच्या सेमिस्टरच्या पहिल्या दिवसापासून कट्ट्याचा ईतिहासंच प्रत्येकजण ईमाने-एतबारे गिरवतो.


असांच एक ईन्जिनिअर.......

कुणाल.


दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...