रात्रभर डोळ्यात
भिजू घातलेली "स्वप्नं"
दुसऱ्या दिवशी पहाटे
कोणीही ऊठण्याआधी
काढून... पिळून...
काळजात वाळत घालतो..
मग सुरु होतो दिवस..
पण असंच कधीतरी..
राहतात काही तशीच
डोळ्यात... भिजत..
अन मग एखाद्या
छोट्याशा धक्यानंही
ओघळ येतात गालावर
नजर चुकवत
कसनुसं हसून
टिपायचे मग पटकन
दुसऱ्या दिवशी मात्र
न चुकता.. पहिल्यांदा
विल्हेवाट लावायची त्यांची
असंच चालत आलंय आजवर
तरीही अजून बिनघोर
डुंबतात ती डोळ्यात रातभर
आता मात्र कठिण वाटतंय सगळं
कारण संपत आलंय आता दोन्ही...
स्वप्न सुकवायची काळजातली जागा
अन
भिजू घालायला लागणारं डोळ्यातलं पाणीही
के पी आर
(काल परवा पर्यंत बोलके वाटणारे डोळे
आज मात्र निर्जीव वाटतात तुम्हाला... हं.. चालायचंच)

No comments:
Post a Comment