अवघड वाटत होतं यार सगळं
दोन पाऊलं एक श्वास एकेक क्षण
तुझ्याविना तेव्हा... पण..
पण..
मिटल्या डोळ्यातली थकलेली स्वप्नं
खरं नव्हतं गड्या त्यातंच रमणं
सगळंच होतं तिथल्या तिथं
स्वतःलाच हरवल्यावर शोधायचं कुठं
ढगाळलेलं आभाळ
कोसळणारा पाऊस
क्षितिजाच्या रेषेला जमिनीची हौस
पूर्वेचा रंग सांजेचा संग
चंद्रही तसाच चांदण्यात दंग
मिनिटातले सेकंद
दिवसातले तास
काट्याचं बोचणं फूलांचा वास
नदीची खळखळ पानांची सळसळ
समुद्रही तसाच कधी शांत कधी अवखळ
म्हटलं ना बदललं नाहीच काही
मी चुकलो जरी तसेच्या तसेच अजूनही
आई बाप मित्र अन ताई
ठरवलं मग.. चालायचं पुढं
रातीच्या आंधारापायी दिवसा कोण रडं
पण.. तरी पण...
धुरकटल्या काचेपल्याडचं जग
दिसलं नाही तरी तिथेच असतं बघ
मग फिरतो हात काचेवर
आर्ध्या ओल्या काचेला स्थिरावते नजर..
तसंच अगदी तसंच
काळजातल्या एका धुरकटल्या कोपऱ्यात
असतात आठवणी तुझ्या माझ्या तशाच
फिरतो हात झटकायला धूळ
सारं काही असतं पण जात नाही तुझं खुळ..
अवघड वाटत नाही आता सगळं
जगण्याला रुटीनची लागलीयेत ठिगळं
साधं सोपं शांत जगणं
तुझ्याविना आता... पण..
पण..तरीही...
कुणाल प्रकाश रुद्राके
(काचेच्या भिंतीनं हशील काय? रुटीनचं धुकं?)

No comments:
Post a Comment