Saturday, November 17, 2012

फरक तर पडतोच... फरक तर पडणारंच



अनपेक्षित नव्हतं तरीही चटका लाऊन गेला... गेल्या तीन दिवसांपासूनंच शंकेची पाल चुकचुकत होती मनात पण तरीही एक वेडी आशा होती. माहीती होतं साहेब लढवय्ये आहेत, अशक्य गोष्टीही शक्य करुन दाखवतात अन आमच्या प्रेमापोटी काहीही करायला तयार होतात. मृत्यूच्या दाढेतूनही तुम्ही परत फिराल अशी खात्री होती, तुमच्याशिवाय महाराष्ट्र अन मराठी मातीचा विचारंच केला नाही. दसरा मेळाव्याला तुमची शाररीक व्यथा पाहून कसंतरीच झालं पोटात. आयुष्यभर डरकाळी फोडणाऱ्या वाघानी हात जोडून विनंती केलेली पाहून भरुन आलं खरंतर. तुमच्या फटकाऱ्यांची सवय होती आम्हाला अन म्हणूनंच दसरा मेळाव्याच्यावेळी तुम्हाला लागणारी धाप काळजाचा ठोका चुकवून गेली आमच्या. क्षणभर वाटलं साहेबांचं आता काही खरं नाही अन दुसऱ्याचं क्षणाला राग आला स्वतःचा असला भलताच विचार केला म्हणून. आयुष्यभर आव्हानं निधड्या छातीनं पेलणारा आमचा वाघ जाता जाता ही मृत्यूला भिडला, पाठ टेकली पण पाठ फिरवली नाही. काल-परवापर्यंत गूगल ईमेजेसमध्ये सर्च केल्यावर वाघाला लाजवेल असा करारी मुद्रेचा आमचा वाघ स्क्रीनवर अवतरायचा पण आज सर्च केल्यावर व्यंगचित्रांपासून सुरुवात करणाऱ्या वाघाच्या एग्झिटची व्यंगचित्र पाहून काळजात चर्र्र्र होतंय. विकीपेडीया, गूगल, फेसबूक सगळीकडे बाळासाहेब असे होते, तसे होते वाचताना नजर धुसर होतेय... कसं सांगू "होते" अन "आहेत" यातला फरक एवढी मोठ्ठी अन न भरणारी पोकळी निर्माण करतोय. तुमच्यावर मनापासून प्रेम करणारे होते, आहेत तसेच तुमच्यावर टिका करणारेही होतेच. पण बाळासाहेबांबद्दल तटस्थ कोणीच नव्हतं.. फरक तर पडायचाच... फरक तर पडतोयंच... फरक तर पडणारंच.. आज तुमचे टिकाकारही म्हणतायेत, टिका करावी तर साहेबांवर अन टिका करावी तर साहेबांनीच. राजकारणात राहूनंही राजकारणी नाही झालात कधी, नाटकीपणा तर कधीच जमला नाही. आमचा आवाज तुम्हीच होता, आमच्या मनातलं आम्हाला कळण्याआधी तुमच्या भाषणातून तुमच्या व्यंगचित्रातून ऐकू येयचं अन दिसायचं आम्हाला. जेव्हा आमचा जन्मही नव्हता झाला तेव्हा तुम्ही सेनेची स्थापना केलीत, सेनेसाठी खस्ता खाल्ल्या, मराठी माणसाला अस्मिता अन आवाज दिलात. तो काळ पाहीला नसूनही आमच्या पिढीवर तुम्ही गारुड केलंत, आमच्या नंतरच्या पिढ्यांनाही तुमच्याबद्दल आतोनात आदर अन आकर्षण आहे. १५-१६ वर्षाच्या मुलांनाही साहेब तुमच्याबद्दल आत्मीयता आहे. काय म्हणावं या प्रेमाला, आपुलकीला?? आमचा आधारवड, आमचा आवाज आमचा वाघ अन आमचा भगवा रंग मिसळला आज अनंतात...
कुठल्या राजकारण्यासाठी आजवर डोळ्यात पाणी नाही आलं.. तुम्ही काय कमवलं ते आमच्या डोळ्यात तरळणाऱ्या पाण्यानीच दाखवून दिलं आज...
फरक तर पडतो साहेब... फरक तर पडणारंच पण तुम्ही "होता" असं नाही म्हणणार कधी... तुम्ही आहात, आहात थेट ईथे या काळजात
वादळ शमलं म्हणणंच चूकीचं आहे... हे वादळ शमणारं नाही.. दिशा बदलली एवढाचं काय तो फरक... आता कूच स्वर्गाकडे, भगवा धडकतोय भगवा फडकतोय सावध व्हा देवराया भगवा वाघ आलाय... कोण म्हणतं स्वर्गात फक्त देवदूत असतात? वाघाचं, हिंदूहृद्‌यसम्राटाचं सिंहासन आता तिथे... अढळ!

आज सूर्य मावळताना जरा जास्तच झाला भगवा
वाघाला असा नेताना आसमंतही जरा हळवा
निधड्या छातीनं घेतला निरोप मराठी मनाचा
"वाघ" म्हणवून घेण्याचा साहेबांशिवाय अधिकार नाही कुणाचा

एक पर्व जिवंत राहील काळजात सदैव

कुणाल प्रकाश रुद्राके.


Thursday, August 30, 2012

"झूठी उम्मीद"



उस सुनी गली का सन्नाटा...
चाँदनीने भी सुन लिया
चाँद ने हथेली पे
यादो को चुन लिया
आँखोसे भी झलकती है यादें वोही
बीते कल से टकराती है राहे नयी
तेरी आँखे आज भी
जानी पेहचानी लगती है
तेरे होठो की हसी अब तक
मेरी धडकन को ठगती है..
है रश्क तुम्हे मेरी खामोशी से
देख लेना एक दफा आँखो मे मेरी भी अपनी खुशीसे
पर न देखना ऐसे की
मै नजर चुरा लू..
दबा के रखी अल्फाजो मे जो बात
उसे आँखो से बता दू
अब तो खामोशी ही देती है हरदम साथ..
बताना चाहता हू तुम्हे भी एक ही बात..
अब के जाओगे तो मुड के न देखना फिर से..
सख्त नफरत है मुझे ऐसी झूठी उम्मीद से..


कुणाल प्रकाश रुद्राके
(ऊम्मीद का दामन न छोडना था हमे... हम तो मजबूर तब हुए, जब ऊम्मीदने दामन हमारा छोड दिया)

Wednesday, August 29, 2012

"राजे तुम्ही परत या”




रस्त्यावरच्या रक्ताला रंग धर्माचा दिलाय
मनामनातल्या दऱ्यांमधे चेव जातीपातीला आलाय
एकेकाचं भरलंय पोट, पैशानं ठासून ठासून
माणूसकीच्या गळ्याला लावलंय नख चक्क डोळे झाकून
"मी माझा"च्या जयघोषानं आसमंत भरलाय
पायाखालचं बघताना फक्त स्वार्थीपणा उरलाय
स्वाभिमान तर आम्ही ठेवलाय कधीच गुंडाळून
शोधला जीवाचं रान करुन पण मिळेना पिढ्यानंपिढ्या धुंडाळून
आयाबहीणींची आब्रू वेशीवर टांगलीए
वासना दिवसाढवळ्या चव्हाट्यावर आणलीये
पदराआडच्या शालिनतेचा कधीच गळा दाबलाय
कंबरेचं सोडून डोक्याला बांधण्यात प्रत्येकजण रमलाय
खून दरोडा बलात्कार अन घोटाळ्याच्या बातम्या रोज तोंडी लावतो आम्ही
स्वैराचार अन अराजकतेची आहे १०० टक्के हमी
चरफडतो, हळहळतो, घेतो राग गिळून
डोळेही केलेत कोरडे आसवं सगळी पिळून
अम्हाला नेहमीच वाटतं..
आता शिवाजी जन्माला यावा पण यावा शेजारच्या घरात
त्याला लढताना पाहू आम्ही ऊभं राहून दारात
श्रींची ईच्छा अन तुमच्या कर्तृत्वानं तुम्ही स्वराज्य ऊभं केलंत
आमच्यासारख्या नालायकांच्या हाती तुम्ही सोनं का हो दिलंत?
"सगळं छान चाललंय... या एकदा बघायला"
असं म्हणायची आमची लायकी नाही
स्वराज्य घडवण्यापेक्षा बिघडवण्यात आम्ही सोडली नाही कसर काही.
म्हणूनंच आज तुमची परत वाटतेय गरज
स्वार्थापुरती माणसं जोडायचं आमच्यात आहे कसब
म्हणूनंच म्हणतो...
"राजे तुम्ही परत या... आम्ही बांगड्या भरल्यात"
तुमच्या स्वराज्य अन सुराज्याच्या आता फक्त आठवणीच उरल्यात...


कुणाल प्रकाश रुद्राके

Wednesday, August 15, 2012

१५ ऑगस्ट - २६ जानेवारी


ए काय बघतोएस रे?
२६/११ ला २ वर्ष झाली रे आज..
ते सोड रे.. सोनी लाव..
आज सनी लिऑनची एंट्री होणारे बिग बॉसमधे..
अरे बातमी ऐकलीस का?
चीन पूर्वेकडचा भाग गिळण्याच्या तयारीत आहे..
च्यायला विचार करुन काय होणारे?
कोलावरी डी ऐकलंस का?
तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही
काँग्रेसची पुरती वाट लागणार या ईलेक्शनला
भाजप तरी कुठे चमकणारे?
आयचा घो.. एकजण मत देण्याच्या लायकीचा नाहीये..
मी तर सुट्टी टाकलीये मतदानाला जोडून
तू पण येतोस का? गोव्याला चाल्लोय!!
अरे पण मतदान??
सोड बे तू ना लई डोकं खातोस
च्यायला बजेटमधे काय वाट लावली रे यावेळेस
ए माझ्या बापा गप बस ना मॅच बघू दे सच्याची शंभरावी सेंच्यूरी होणार रे आज
गुवाहाटी मधला प्रकार पाहीलास का? डोकं सुन्न झालं रे
कुठे पाहीला.. साला कित्येक साईटवर शोधलं पण अनसेन्सॉर्ड कुठेच नाय
जिकडं तिकडं ब्लर्ड व्हिडिओज.. काय बघायला मिळालंच नाय
आणि ती बावळट मॉडेल पाहीलीस?? तिरंग्याची बिकीनी... लिमिट क्रॉस केलं यार यांनी आता
जोड्यानं हाणलं पाहीजे तिला... पण त्याआधी त्या फोटोग्राफरला.. साला काय लांबून फोटो काढलाय
आर्थिक मंदीबद्दल काही ठोस पावलं उचलत नाही राव सरकार
तुला काय वाटतं जिस्म २ बघायला पैसे घालवायचे? मी तर ३-४ व्हिडिओ आधीच डाऊनलोड केलेत... टॉरेंट जिंदाबाद
सत्यमेव जयते पाहीलंस??? किती चांगलं काम करतोय आमिर.. त्याच्यावरही टिका करतायेत साले..
आयचा घो त्या आमिरच्या.. आधी त्यानी रविवार खराब केला आता तू कर...
पुण्यात साखळी स्फोट झालेत.. तू कुठे आहेस, ठिके आहेस ना?
फोन ठेव रे मी पिक्चर बघतोय "भारतीय"
आसाममधे भयंकर परीस्थिती आहे रे..
का काय झालं?
अरे लोक मरताएत अन तू म्हण...
च्यायला आपण तरी कुठे जगतोय?
रझा अ‍ॅकॅडमीनी नंगानाच घातला पाहीलास का?
भेंचोद... पैसे वाया गेले रे.. काहीच नाही त्या जिस्म २ मधे.. च्यायला त्या महेश भटच्या..
महागाई जाम वाढलीये राव.. सगळंच पार..
ए तू डोक्याची मंडई नको करत जाऊ रे.. च्यायला या देशात काही बदलणार नाही.. काहीच नाही...
बर उद्या काय करतोएस? सकाळी शाळेत येणार का?
तुझ्या तर आयला ए का डोकं खातोस रे... एक दिवस सुट्टी आहे.. उद्या निवांत उठणार..
अन उद्या काय कौतुक आहे रे शाळेचं
उद्याचं कौतुक ना..
देश स्वातंत्र झाला होता उद्याच्या दिवशी.. हेच एक ६०-६५ वर्षापूर्वी
झोप तू.. आराम कर..
तुझ्या-माझ्यासारखे निष्क्रीय भडवे सुरक्षितपणे झोपावे.. अन
तिरंग्यावर कोणाची वाईट नजर पडू नये म्हणून रात्रीचा दिवस करणाऱ्या जवानांप्रति आदर म्हणून तरी जाईन म्हणतो
उद्या सकाळी शाळेत...
बदलणार काहीच नाही शाळेत गेल्यानं...
अंगावर शहारा तेवढा येईल राष्ट्रगीत ऐकताना...
डोळ्यात पाणीही येईल "भारत माता की जय" म्हणून ओरडताना..
मग आपण मोकाट...
किमान २६ जानेवारीपर्यंत...
देशाला नावं ठेवायला...

कुणाल प्रकाश रुद्राके
ताक: (हवे आहेत- २६ जानेवारी अन १५ ऑगस्ट व्यतिरीक्तही देशाचं विचार करणाऱ्या या संभाषणामधल्या सकारत्मक वृत्तीचे तरुण... नक्कीच मिळतील आशा आहे.. अजूनही)

"फ्रेंडशिप डे"



ऑगस्ट महिन्याचा पहिला रविवार
फ्रेंडशिप डे!! हंम्म फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा दिवस..
आमच्यावेळी नव्हतं असं म्हणत नाक मुरडायचा तो आजवर
पण आज एकही मित्र राहीला नव्हता बरोबर
तेव्हा रंगायचे गप्पांचे फड
साक्षीला असायचा पाराचा वड
चौक, कट्टा, टिंगल, मस्करी, मजा
दोस्तीसाठी हरेक दिवस असायचा ताजा
आज फ्रेंडशिप बँडमागे लपलेले हात धरायला नाहीत कोणी आपले
सुख दुःखात घट्ट हात धरणारे आठवले त्याला सगळे
खुर्चीत बसल्या बसल्या
मिटल्या डोळ्यासमोर एकेक नावं येत गेली
अशोक, सत्त्या, अज्या, रव्या
अंत्या, सोम्या, आप्पा, माउली
खिशातून डायरी काढून त्यानं सुरुवात केली
एकेकाचा नंबर डायल करायला
कोणाचा नंबर बंद, कोणाचा फोन स्विच ऑफ
तर कोणी गेल्याची बातमी त्याच्या मुलानी दिली
टि पॉयवर पडलेल्या डायरीची पानं फडफडत राहीली
एकटेपणा अजूनंच जाणवू लागला त्याला
का कुणास ठाऊक आजच्या काळातल्या
फ्रेंडशिप डेचं महत्व पटलं त्याला
काठीचा आधार घेऊन उठणार तेवढ्यात तिनं हात पुढे केला
मागच्या हातात काहीतरी लपवत
ईवल्याशा हाताने डोळे झाकले त्याचे
हॅपी फ्रेंडशिप डे म्हणत त्याच्या हातात काहीतरी ठेवलं जेव्हा
नातीच्या रंगलेल्या फ्रॉककडे पाहून आश्चर्य वाटलं तेव्हा
ग्रिटींग कार्डवर लिहिलं होतं तिच्या हस्ताक्षरात
"टू माय फर्स्ट अँड बेस्ट फ्रेंड, हॅप्पी फ्रेंडशिप डे ग्रँडपा"


कुणाल प्रकाश रुद्राके

Happy friendship day to all of you
Loads of Love
Kunal

तुझ्या राखीसाठी...


आठवतं का गं तुलाही..
लहानपणीची लुटुपुटूची भांडणं
तुझं घर ऊन्हात बांधायला निघणारा मी
अन तुझे केस ओढूनही आई भाऊंसमोर एक चकार शब्दही न काढणारी तू
रात्री लाईट घालवून मला दाखवलेली भीती
अन किंचाळत मी तुला घट्ट मारलेली मिठी
एवढ्या तेवढ्यावरुन गाल फुगवून बसणारी तू
अन चार-दोन दिवसाच्या अबोल्यानंतर पहिल्यांदा बोलणारा मी
तुझ्या पर्समधून चोरुन खालेल्या कॅडबऱ्या
गणराजचा डोसा अन एस.एस.चा वडापाव
शाहरुखच्या पिक्चरची माझ्यासाठी ब्लॅकनं काढलेली तिकिटं
अन दोन आठवडे कॉलेजमधून चालत येऊन
तुझ्यासाठी मी साठवलेले पैसे..
एकेक रुपया साठवून भाऊबीज अन रक्षाबंधनासाठी जमवलेली ओवाळणी
लग्नाच्या दिवशी जाताना गळ्यात पडून रडलेली तू
तुला वाईट वाटू नये म्हणून...
तू पाठमोरी होईपर्यंत मी रोखलेले अश्रू..
काय माहीत का पण आज
राहून राहून आठवतंय सारं
तुला वाटत असेल काय झालं याला
खरं सांगायचं तर
हात अगदीच मोकळा नसतो..
ताई बांधते ना राखी
झालंच तर..
बाकीच्या बहीणी पण येतात घरी...
भरतो हात...
पण माझी राखी पुढे की तुझी???
या चढाओढीला मिस करतो
मनापासून...
अगदीच मोकळा नसतो हात.. पण तरीही...
पुढची जागा ताई अन मी मोकळीच ठेवतो
तुझ्या राखीसाठी...

कुणाल प्रकाश रुद्राके

(वाट बघतो पोस्टानं येणाऱ्या तुझ्या राखीची, प्रॉमिस सगळ्यात पुढेच बांधेन)

"कागदाच्या होड्या"


बाहेर पाऊस पडत होता.. रीमझिम..
तेच संगीत ऐकत बसला होता तो, शाल पांघरुन
आश्चर्य वाटलं त्याला... अन थोडसं वाईटही
पहिल्या पावसात भिजण्याचे दिवस गेले आपले
असे किती पहिले पाऊस आताशा वाया गेले आपले
एक उसासा टाकून डोळे मिटले त्यानं.. खुर्चीतंच
डोळ्यासमोर उलघडत राहीला आठवणींचा पट
पाण्यातल्या होड्या.. डबक्यातल्या उड्या
रेनकोटच्या घड्या मित्रांच्या खोड्या
सर्दीचं औषध शाळेला सुट्टी
तशातही भिजायला बोलवणारा पाऊसही हट्टी
चिखल माती पन्हाळीचं पाणी
पावसाचं संगीत अन पावसाचीच गाणी
मळलेला गणवेश आईचा धपाटा
पावसात भिजण्याचा लावलेला सपाटा
वाटलं त्यालाही आता..
शाल भिरकावून आपणही भिजावं
सुरकुतलेल्या चेहऱ्यानं पावसासोबत थोडसं हसावं
एवढ्यात.. कुणीतरी ओढली त्याची शाल
डोळे उघडून बघताच फुगवून बसला गाल..
हाताला धरुन नेलं त्यानं गच्चीवर
आऊटलेटला बोळा लाऊन पाणी साठवलं गच्चीभर
कागदाच्या होड्या दोघांनीही पाण्यामधे सोडल्या
मनातल्या आठवणी पावसाला मनसोक्त भिडल्या
खाली येऊन गुपचुप दोघांनी अंग पुसलं
कपडे बदलून पिल्लू त्याच्या कुशीत बसलं
भजी तळता तळता तिनं चहाचा कप भरला
"काय चाललंय दोघांचं?" आजीनं दरडावताच
नातवानं त्याला हळूच डोळा मारला

कुणाल प्रकाश रुद्राके

"एकटी"...



अशीच होती ती पहिल्यापासून
गजबजाटात "एकटी"
डोळ्याला पाणी अन काळजाला रुखरुख
जवळ तिच्या फार
मित्र होते मोजकेच चार
पण..
एकटेपणा जिव्हाळ्याचा वाटायचा
मेघ दाटायचे डोळ्यात
अन आठवणींचे हुंदके अडकायचे गळ्यात
भरल्या नभासमोर रीते व्हायचे डोळे
तिचं अन नभाचं हितगुज तिचं तिलाच कळे
रातीच्या अंधाराचा वाटायचा आधार
काळोखंच होता आपलासा निर्गुण निराकार
वाटायचं बसून रहावं एकटंच
एकटंच..
त्या चंद्रासारखं..
चांदण्यात राहूनंही होतं सुख पारखं
तिचं तिलाच नाही गवसलं वेदनेचं मूळ
केव्हापासून होतं डोक्यात एकंच खुळ
शोधताना खोल.. खोलवर कुठेतरी
सोबत होते सगळे पण साथ नव्हती खरी
तिनंही सोडला नाद मग शोधायचा
अन जडला उरी छंद "वेदना" जपायचा
जपलंय तिनं.. जोपासलंय आता
एकटेपणाही एकटा वाटत नाही आताशा
तरीही कोणीतरी जातं हिणवून
डोळ्यातल्या मेघाला जरासं खुणवून
कोणी म्हणतं मग.. हळवी, वेडी कोणी सेंटी...
पण...
गोष्ट एकंच खरी..
अशीच होती ती पहिल्यापासून
गजबजाटातही "एकटी"

कुणाल प्रकाश रुद्राके

“अजून एक कप चहा”



पुढे मागे... मागे पुढे...
लयबद्ध हलणारी आरामखुर्ची
बाजूच्या टिपॉयवर ठेवलेला चष्मा
अन चहाचा रीकामा कप
तसंच रीकामं भासणारं घर
घरात फक्त दोघेच दिवसभर
बाबाशिवाय पान न हलणारा चिनू... पण..
वर्क प्रेशर, टार्गेट, डेडलाईन्स सारख्या शब्दात हरवला होता
काल-परवापर्यंत अंगाखांद्यावर खेळणारा तो
आजकाल दोन शब्दांपुरताही वाट्याला येत नव्हता
फावल्या वेळात.. अहं.. सगळाच वेळ फावला वेळ होता
वर्ष होत आलं होतं त्याला रीटायर होऊन
दोघेच.. कधी बोलायचे, कधी भांडायचे अन बऱ्याचदा
शांत बसायचे..
खाण्या पिण्यावर बंधनं.. हालचालींवरही..
बंधनं नव्हती ती फक्त आठवणींवर
चिनूच्या लहानपणी.. घर कसं भरलेलं असायचं
मित्रमंडळी, भावंडं, शेजारी पाजारी
जिवंत.. सचेतन सगळं..
आठवणीत, तंद्री कशी लागली ते त्याचं त्याला कळलं नाही
खुर्चीतंच डोळे मिटून हसत होता तो गालात
तेवढ्यात "ती" आली..
चिन्याशी फोनवर बोलताना हळूच हसली
तिच्या हसण्यानं भानावर येत त्यानं पुढे मागे हलणारी खुर्ची थांबवली
सासूबाईच्या कानात काहीतरी कुजबुजून
ती लगबगीनं आत गेली..
तो आश्चर्यानं बघत राहीला फक्त..
नेहमी गोड खाण्यापिण्यावर बंदी घालणाऱ्या बायकोनं..
त्याच्या जवळचा चहाचा रीकामा कप उचलून विचारलं
"आजोबा" अजून एक कप हवा का "साखर टाकून"

कुणाल प्रकाश रुद्राके

"खर घर"


ईथे कोणी कोणाचं नाही पण
सगळे समदुःखी
कोणाला मुल नाही, कोणाची मुलं परदेशी असतात
कोणाची परीस्थिती नाही, कोणाच्या मुलांनी वाटणी केली पण फक्त ईस्टेटीची
तर कोणी भरल्या घरातून ईथवर आलेले..
आमचे नाना नानी असेच भरल्या घरातले..
दर महिन्याला जातात "घरी" वृद्धाश्रमातून
मुरडणारी नाकं, फुगलेले चेहरे पहायला
तिरकस वाक्य अन टोमणे ऐकायला
पेन्शनमधून साठवलेल्या पैशातून
परवडेल तसं घेऊन जातात काहीबाही
कधीतरीच मिळतं नातवंडांना
अन नेहमीच जातं "केराच्या टोपलीत"
दुखरे गुडघे, पाठ अन मिळणारी वागणूक
सगळ्याकडेच दुर्लक्ष करत
बसून राहतात आपल्याच घरात "परक्यासारखे"
पोरांनी झिडकारलं आई बापाला तरी
आजी आजोबांचं मन राहवत नाही
फक्त नातीला एकदा मांडीवर घेण्यासाठी
तिच्या गालाची साखर चाखण्यासाठी
पण...
ती बाहुली धावते दुडूदुडू
पोरांची नजर अडवते त्यांना
तिला उचलण्यापासून
डोळे भरुन पाहतात तिला
भरल्या डोळ्यानं घरातून निघण्याआधी
आपल्या "खऱ्या घरी" जाण्यासाठी

कुणाल प्रकाश रुद्राके

"जोकर"


माझं प्रेम होतं तिच्यावर, सांगितलं तिला तसं
ती मात्र हसायची हे ऐकून
.
.
.
मग मीही करायचो चेहरा पत्ते पिसून "जोकर" काढल्यागत

के.पी. आर

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...