Wednesday, August 15, 2012

सावल्यांचं अस्तित्व


सावल्यांचं अस्तित्व मानत चालला होता तो खरं
कळत का नव्हतं त्याला, आभासामधे जगणं नव्हतं बरं
खरं खोटं करायचं नव्हतं
सावल्यांशिवाय जगायचं नव्हतं
म्हणूनंच.. विरघळू लागला तोही सावलीत आताशा
मागे राहिल्या सावल्या फक्त काळोखाच्या

कुणाल प्रकाश रुद्राके

मी मराठी मी मराठी



मी मराठी मी मराठी

मातीत मिसळतानाही उठणार मी.
विझता विझता असाच पुन्हा पेटणार मी.
अनिर्बंध चौखूर विजयाचा रथ उधळणार मी.
आसमंतात "भगवा" रंग मिसळणार मी.

अरे मी म्हणजे कोण विचारता काय????
जन्म घेतला जिच्या पोटी ती मराठी माझी माय.
छाताडावर झेलतो घाव सारे, मराठीनं पाठ दाखवायला कधीच शिकवलं नाय.
जान गेली तरी बेहत्तर, पण सोडणार नाही रण पाठीस लावून पाय.

नाव मराठी गाव मराठी
अंतराचा भाव मराठी

काळजाचा ठोका मराठी
लक्ष गाठणारा झोका मराठी

साद मराठी प्रतिसाद मराठी
श्वास मराठी विश्वास मराठी

नाद मराठी नाळ मराठी
सप्तसुरांचा ताल मराठी

सत्व मराठी व्यक्तीमव्त मराठी
रोमरोम मराठी अस्तिव्त मराठी

गर्व मराठी पर्व मराठी
तु मी चोहीकडे सर्व मराठी

साज मराठी आवाज मराठी
माझा हरेक अंदाज मराठी

वर्तमान मराठी भविष्य मराठी
हरेक क्षण अन आयुष्य मराठी

विनय मराठी विजय मराठी
हरेक रणात अजय मराठी

मी मराठी मी मराठी

कुणाल रूद्राके

लढ तू अरे भिड तू!!


To GOD with LOVE & Lots of CARE..



उडणारंच धुराळा
तुला काय नवीन?
बघ एकदाच डोळ्यात आमच्या
मग काय कठीण??
बोलणारे बोलतील दहा तोंडानी
ढळू देऊ नको तोल एवढ्या तेवढ्यानी
बदलून टाक आता संकटाची दिशा
कसल्या घेऊन बसलास हातावरच्या रेषा
आव्हानाला "आव्हान" दे तुझ्या हिमतीनं
आस्मानाला झुकवावं जसं या धरतीनं
अंधाराला, तुझ्या कतृत्वानं कर लख्ख
उद्याच्या सूर्यावर सांग परत तुझाच हक्क
हार जीत तर साला चालणारंच आयुष्यात
पण तुला लढलेला बघायचंय भविष्यात
जाताना असा जाऊ नकोस हारुन
आजवर हरलास तरी हरलाएस लढून
जायच्याआधी दाखवंच "करुन"
तरीही करायचाय अलविदा??
खुशाल कर, पण कर शिखरावरुन
जायचं तर साला जेत्याच्याच अविर्भावात...
जायचं सगळं सोडून
टिका टिपण्णी टोमणे सल्ले..
च्यायला सगळ्याचीच पर्वा सोड तू..
नडला त्याला फोड तू..
पण जायच्याआधी एकदाच लढ तू
लढ तू.. अरे भिड तू...

कुणाल प्रकाश रुद्राके

"जिंदगी"




सोचा था मैने भी जिंदगी के बारे मे कुछ
हुआँ कुछ और ही..
देखना चाहा उसको ईतनी संजिदगी से
पर उसने मुझ पे न फरमाया कभी गौर भी
सोचा था हसूंगा दिल खोल के
हसती रही मुझ पे जिंदगी
आँसूओ को छुपाना चाहा पलको के पिछे
रुलाती रही जिंदगी
खुद मे ढूँढना चाहा आनेवाले कल को
हाथ की लकिरो मे उलझती रही जिंदगी
रिश्तो को माना था जिंदगी से बढकर
मारने पे तुली है जिंदगी
सपने सजाये थे खुली आँखो से
युही बिखरती रही जिंदगी
थमती नब्जो ने दिया था ईशारा
लेकीन ठुकरा के जिती रही जिंदगी
साथ छोड चुके थे ईन लब्जों का
खुद नज्म बनती रही जिंदगी
रहना चाहा था कभी कभी तनहा
पर साथ निभाती रही जिंदगी
जिया खुद के बलभूते पे..
न कुछ माँगा न ऊम्मीदे रखी जिंदगी से
फिर भी बहोत कुछ सिखाती रही जिंदगी
सोचा था मैने भी जिंदगी के बारे मे कुछ
पर...
खैर... येही है जिंदगी

कुणाल प्रकाश रुद्राके

"ओहोटी"




एकटं एकटं वाटत राहतं
सारं काही अटळ तरीही..
निश्चल भासत राहतं
तो निघतो मग... मागे पाऊलखुणा न ठेवता
एव्हाना सावलीचीही सुटलेली असते साथ
विचारांची जळमटं, जडावलेल्या भावना अन
ओथंबलेल्या पापण्यानी पडत राहतात दबकी पाऊलं
तो चालत असतो पुढे अन
आठवणी बरोबर उलट्या दिशेने
दोघांच्या दिशा विरुद्ध तरीही
रुजतात अन रुततात त्या अंगोपांगी
अजून संथ होते त्याची चाल... आपसूकंच
एकेका आठवणीचं गाठोडं बांधतो मग तो डोळ्यात
अन येऊन बसतो सवयीनं... समुद्रकिनारी
फ्फ्फस्स.. फस्स.. फेसालळेल्या समुद्राची फस फस
चालू असते ताला-सुरात
तो आता विचार करत नाही
ओल्या रेतीचा, कडक ईस्त्रीचा
अन त्याच्याकडे सरसावणाऱ्या लाटांचा
किनाऱ्यावर आपटून, फुटून, त्याला भिजवून..
घुटमळतात त्या त्याच्या अवतीभवती
परत जाण्याआधी... अन
परत परत हाच खेळ चालू राहतो... तास न तास..
अगदी आठवणींसारखा..
त्याही घुटमळतात काळजात, डोळ्यात अन
जाताना गालावर
रीत्या करतो तो सगळ्या गोड आठवणी... खाऱ्या पाण्यात
आता सुरु होतो प्रवास परतीचा... त्याचा आणि लाटांचाही
अगदी विरुद्ध दिशेने...
मागे पाऊलखुणा ठेवत निघतो तो...
किनाऱ्यावर लोक म्हणत राहतात ओहोटी आली
तो हसून म्हणतो... "आठवणींना"
समुद्राचं लयबद्ध संगीत चालूच असतं
फ्फ्फ्फस्स्स... फस्स्स..

कुणाल प्रकाश रुद्राके

Saturday, April 28, 2012

"एक कागद"

"एक कागद"

एक कागद पेपरवेटखाली

निपचित पडला होता
कोरा करकरीत
निर्विकार चेहरा
नीट नेटका तरीही भकास
आतल्या आत आजवर कुढला होता
एक कागद पेपरवेटखाली
निपचित पडला होता
सुवाच्च ना गलिच्छ
सुसंस्कृत ना अर्वाच्च
शब्दांसह रेघोट्यांनाही
पारखाच राहिला होता
एक कागद पेपरवेटखाली
निपचित पडला होता
ना चित्र ना विचित्र कधी
कोरा नंतर अन कोराच आधी
ना चूक ना खाडाखोड साधी
काजळीत कधीच हरवला नव्हता
एक कागद पेपरवेटखाली
निपचित पडला होता
शाईची दौत ना पेन्सिलचं शिसं
निरस जगणं असं कसं
पांढऱ्याफटक रंगाला भुलून
स्वच्छ प्रतिमेत उगाचंच अडकला होता
एक कागद पेपरवेटखाली
निपचित पडला होता
वाटायचं त्यालाही असावी आपल्या ओठी
शब्दांची रास, जन्मच आपला त्यासाठी
दडपलेला, गुदमरलेला...
उडायला आसुसला होता
स्पर्श होताच लेखणीचा शब्दांना भिडला होता
त्याच्या प्रतिसादानं शब्द न शब्द शहारला होता
एक कागद पेपरवेट खालून अलगद निसटला होता
एक कागद आज निपचित पडला नव्हता

कुणाल प्रकाश रुद्राके

Monday, March 26, 2012

"अर्थहीन"


"अर्थहीन"

असाच असायचा तो शांत

हंम्म्म... शांत
आत घोंघावणारं वादळ
दाबून धरायचा तो
धुमसायचं ते डोळ्यामधे
उतरायचं डायरीच्या पानांवर
तुटक तुटक
बेसंबंध अन अर्थहीन
शब्दांची गर्दी पानांवर
कुठे खोडल्याच्या खुणा
तर कुठे फक्त लिहल्याचे अवशेष
विसंगत विखुरलेपण
एकेका अक्षरात
उसवत चाललेली डायरीची विण
जीर्ण झालेल्या पानांवर
फुटणारी शाई अन
बरबटलेल्या भावना
अस्ताव्यस्त विस्कटलेल्या ओळी
"अर्थ" शोधायचा प्रयत्न केला कोणी??
तोही कधी नसायचा भानावर
शब्द उतरायचे असेच पानांवर
त्यालाही जमलंच नाही
अर्थपूर्ण कधी "काही"
खुश नाखुश आनंदी दुःखी
प्रेमाची विरहाची कशाची नक्की
त्याची कविता कि शब्दांचं जाळं
पसरत रहायचं असंच अकारण
पोरकट, सामान्य, अगदीच साधारण
उतरायचं डायरीच्या पानांवर
अन अगदीच झालं अनावर तर..

डोळ्यातून गालांवर



कुणाल प्रकाश रुद्राके

"शब्द जास्त हर्ट करतात"


"शब्द जास्त हर्ट करतात"



एकटं एकटं.. आजकाल खूप एकटं एकटं वाटायचं त्याला
बोलायला.. भेटायला.. अन खरतर मन मोकळं करायला
नसायचं कोणीच..
तसं तर सगळे होते..
पण त्यानंच निवडला होता सो कॉल्ड एकांत
समज गैरसमज टाळण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न
शांत असायचा तो.. वरकरणी तरी..
पण आतल्या आत धुमसत रहायचे प्रश्न कर्कश्श
संवाद तोडला होता त्यानं स्वतःशीच
त्याच्या शांत बसण्याचं आश्चर्य वाटायचं सगळ्यांना
अन रागही येयचा..
पण तो बोलणं टाळायचा..
शब्द जास्त हर्ट करतात, एकंच उत्तर ठरलेलं असायचं त्याचं
घरच्यांना, मित्रांना.. खटकायची त्याची बेपर्वा अ‍ॅटिट्युड
प्रसंगी स्वार्थीच वाटायचं त्याचं वागणं
पण तो बेपर्वा कधीच नव्हता..
अन स्वार्थ तर साला... कधी जमलाच नाही त्याला..
कुणास ठाऊक का.. पण..
गैरसमज टाळता आलेच नाहीत..
अन स्पष्टीकरण तर.. हंम्म्म.. ना कोणाकडे मागितलं..
ना कोणाला कधी द्यायचा प्रयत्न केला..
जिथं विश्वास असतो तिथे स्पष्टीकरण लागतंच नाही म्हणायचा तो
तर्क वितर्कांना ऊत येयचा त्याच्या अशा वागण्यामुळं
त्याला काहीच फरक पडत नाही वाटायचं सगळ्यांना
पण खरं काय ते फक्त त्यालाच माहिती होतं..
किती दिवस चालणार असं, त्याचा त्यालाच प्रश्न पडायचा..
पण उत्तर शोधण्या आधीच..
असाच एक दिवस गेला तो..
सारे प्रश्न अनुत्तरीत ठेऊन..
आरोप, शंका, तर्क कशालाच उत्तर न देता..
डायरीच्या शेवटच्या पानावर मात्र लिहिलं होतं त्यानं न चुकता..

"शब्दच जास्त हर्ट करतात"


कुणाल प्रकाश रुद्राके

"आईस्क्रिम"



वॅफल कोनमधल्या आईस्क्रिमसारख्याच आयुष्यातही तीन लेयर्स असतात.

सगळ्यात वरची लेयर लालचुटुक चेरी, आपलं लहानपणही अगदी त्या लालचुटुक चेरीसारखं गोंडस, रसरशीत, हवहवसं वाटणारं अन कितीही आवडलं तरी नकळत चटकन संपणारं असतं
दुसरी लेयर आईस्क्रिमचा गोळा, दुसरी लेयर तुलनेनं जरा मोठी ती म्हणजे पौगंडावस्था अन तारुण्य. या वयातले दिवस अगदी त्या आईस्क्रिमच्या गोळ्यासारखे वेळेत एंजॉय नाही केले तर विरघळून जातात, त्याचे काही ओघळ कोनवर उतरतात अन कायमची खूण सोडतात काही क्षण जसे निरंतर आठवणीत राहतात तसे. आईस्क्रिमचा गोळा जसा एकट्यानं खावा वाटत नाही तसंच तारुण्याचे दिवसही एकट्यानं जगण्याचे नसतात. अन आईस्क्रिमची चव जशी जीभेवर रेंगाळते अन मनापासून सुखावते तसंच या दिवसांची नशा आयुष्यभर काळजात रेंगाळते. आईस्क्रिम अन तारुण्य दोन्हिही संपल्यावर अजून थोडं हवं होतं अशी रुखरुख राहते मनात.
तिसरी लेयर वॅफल कोन - उतारवय अन वॅफल कोनमधे फारंच साम्य असतं. आईस्क्रिमनं कोनवर जशी त्याची छाप सोडलेली असते तशीच तारुण्यानं वार्धक्यावर. त्या कोनसारखंच रुक्ष एकाकी असतं वार्धक्य. चेरी अन आईस्क्रिमच्या तुलनेत मोठं, निरस भासणारं अन जास्त काळ टिकणारं. पण तेही काहीजण एंजॉय करतात, कोनचं खालचं टोक फोडून तारुण्याला शेवटपर्यंत टिकवतात अन अनुभवतात.
दुर्दैवानं काही जणांची आईस्क्रिमवरची चेरी पडावी तसं लहानपण हरवून जातं, काहीजणांना धावपळीत तारुण्य अनुभवताच येत नाही हाती उरतं ते फक्त वार्धक्य.

आता आपणंच ठरवायचं कोनचं टोक फोडून तारुण्य शेवटपर्यंत टिकवायचं की...



कुणाल प्रकाश रुद्राके

Friday, February 10, 2012

"कोणत्या ते विचारु नका"



"कोणत्या ते विचारु नका"

एकटी बसली होती ती..
तसं नावालाच एकटी
कारण आठवणींची अन विचारांची वर्दळ
नेहमीच असायची अवतीभवती
तशी आजही होतीच..
कुणी विचारलं असतं तिला
कसला विचार करतेस गं एवढा..
तर.. तर कदाचित सांगताही नसतं आलं..
नेमका कसला..
पण विचार सुटेना..
नक्की कसला अन कोणाचा..
तिनं विचारलं मग स्वतःलाच..
एकेक नावं येत गेली मनात
आई बाबा.. ताई दादा.. तो
अन जाणवलं तिला.. स्वतःचा विचार???
जमलाच नाही तिला कधी करायला..
ना पूर्वी कधी ना आजही..
आजवर एवढं एकटं कधी वाटलं नव्हतं तिला..
क्षणभर वाटलं फोन करावा कोणाला तरी..
पण कोणाला???
आता एकही नाव येईना मनात..
फोनबूक चाळता चाळता.. लक्षात आलं तिच्या
टचस्क्रीनवर फिरणाऱ्या बोटानं
वरखाली होणारी नावं वाचतंच नाहिये आपण..
घट्ट धरला सेल फोन तिनं तसाच हातात..
जणू सुटत होती एकेक नावं हातातून..
न रहावून घट्ट मिटून घेतले तिनं डोळेही..
पण.. मिटल्या डोळ्यातही फेर धरला
पुन्हा त्याच विचारांनी..
कोणत्या ते विचारु नका..
का कुणास ठाऊक तिला भरुन आलं तेव्हा..
मिटल्या डोळ्यातले थेंब गालावर उतरले..
तिनं थोपवलं नाही त्यांना..
मनसोक्त वाट करुन दिली त्यांना मोकळी..
आसवं झिरपताना... डोक्यातले विचार अन हातातला सेल फोन
कधी निसटला कळलंच नाही तिला..
विचारांचा ओघ आपसूकंच कमी झाला...
कोणत्या ते विचारु नका..

कुणाल प्रकाश रुद्राके

Tuesday, January 31, 2012

क्षणभर कवडसा



खिडकीतला कवडसा बघता बघता मोठा झाला
किरणांना फुटले पंख, उडता उडता काळोख झाला
काळोखाचं राज्य अगदी अनभिषिक्त नव्हतं
लुकलुकणाऱ्या चांदण्यानं आता बंड पुकारलं होतं
चांदवा मात्र आतून घाबरला होता
वाढता वाढता अचानक आकसला होता
काळोखाशी करताच आले नाहीत त्याला दोन हात
उजळता उजळाता मिसळून गेला काळोखात
चांदण्यानं मात्र टाकली नाहीत नांगी
काळरात्रीच्या उदरात होती पहाटेची नांदी

तांबडं फुटलं रात सरली
कवडश्यानं परत खिडकी भरली
किरणांना पंख फुटण्याआधी
गोष्ट कळली त्याला साधी
किरणांना क्षणात पंख फुटतात
रातीला मात्र पायही नसतात
ती राहते, वाढते, नांदते, रेंगाळते
पण थकत नाही..
आपण लढतो,चिडतो, भांडतो, हरतो
पण ती हटत नाही


म्हणूनंच.. नव्या कवडश्यातले
त्यानं वेचले, कवटाळले, जपले क्षण
रातीसाठी राखली चांदण्याची उधळंण
आता उडतात किरणं पण... चांदणं उधळण्यासाठी
अन रातही धावते सूर्यापाठी.. लख्ख उजळण्यासाठी..


कुणाल प्रकाश रुद्राके

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...