हिरोसारखं राहणीमान,
आहे व्हाईट कॉलर
स्वप्नही आहे फक्त
कमवायचं डॉलर.
स्लिम ट्रीम बॉडी याची
कसून केलेली जिम
मित्रही म्हणतात लाडानं
याला छोटा भीम
पोरी तर याच्यावर असतात
नेहमी फिदा
त्याच्यासाठीच असतात
दिलखेचक अदा
कॉलेजमधे नेमही छाती
काढून चालतो
बाहेर मात्र चार दोन
टग्यांसमोर शेपूट हा घालतो.
गर्दीत एकदा तिला कोणीतरी
धक्का दिला
यानं त्याकडे सोयीनं
कानाडोळा केला
वर म्हणतो कसा... वर
म्हणतो कसा
देना आता सोडून
काय मिळणार आपल्याला
या रगेलांशी नडून
रागारागात तेव्हा झटकला
हात तिनं
तेव्हापासून चालू आहे
हे मुर्दाड मड्याचं जीणं
काल परवा त्याला कुणीतरी
मागून येऊन धडकला
तब्येत त्याची पाहून
याचा आवाज घश्यातंच अडकला
च्यायला म्हणता म्हणता
म्हणाला काय राव
राग गिळून समजावणीचाच
होता आविर्भाव
चले ए निघ जेव्हा तो
म्हणाला
मनातल्या मनातंच शिव्या
हासडत तो जाऊ दे म्हणून निघाला
भीतीवर राग काढत गाडी
काढली त्यानं
असंच चालू आहे मुर्दाड
मड्याचं जीणं
बातम्यात बघत होता
आण्णा बाबांचं उपोषण
राजकारण्यांना देत
बसला होता दूषण
वैतागून म्हटला भ्रष्टाचाराला
च्यायला घातला पाहिजे आळा
दंड वाचवण्यासाठी ट्रॅफिक
पोलिसाला ५० - १०० देऊन बेशिस्त ट्रॅफिकबद्दल काढत होता गळा
पोराच्या अॅडमिशनसाठी
पैसा जमवत होता
डोनेशन भरताना त्याला
भ्रष्टाचार आठवत नव्हता
स्वतःची पापं झाकत
मोर्च्यात, आंदोलनात मेणबत्त्या पेटवल्या त्यानं
च्यायला चालूये असंच
मुर्दाड मड्याचं जीणं
आज सकाळी लोकलमधे बॉम्बस्फोट
झाला
तेव्हा अचानक याला
देशाचा पुळका आला
पहिल्यांदा चार दोन
शिव्या आल्या ओठी
नकळतंच त्याच्या वळल्या
मग मुठी
डोळ्यामधे उतरली होती
आग
देहबोलीमधे भीती, असहाय्यता
आणि राग
रक्ता मासाचा चिखल
बघताना माथा त्याचा भडकला
सगळीकडच्या बातम्या
बघताना शिव्यांचा यथेच्छ कार्यक्रम त्यानं उरकला
जेवता जेवता बातम्यात
एकेक कुटुंब उध्वस्त होताना त्यानं पाहिलं
लोकलच्या रुळावर सांडलेलं
रक्त त्याच्या धमण्यातून थंड पाण्यासारखं वाहत राहिलं
पोलिसांची भीती
गुंडाची अरेरावी
राजकारण्यांची कूटनीती
अन भ्रष्टाचारानं पोखरलेल्या
दिशा दाही
बदल कसा करणार याच्यात
सर्वसामान्य?
षंढाचं ते जीणं केलं
त्यानं मान्य
चर्चा, बातम्या, आरोप
प्रत्यारोपांना येतो थोडावेळ ऊत
चार दोन तास मानगुटीवर
बसतं बंडाचं भूत
नंतर हेच भूत त्याला
जीवाची भीती दाखवतं
खांदे पाडून, मान खाली
घालून चारचौघात जगायला शिकवतं
आरश्याच्या दुनियेत
त्याला दिसतो फक्त तोच
विमनस्कपणे भावी पिढीतही
असहाय्यतेचं तो रुजवत राहतो रोप
मनातला राग आयुष्यभर
तो मनात गिळत राहीलाए
त्याच्यातला पुरुषार्थ
त्यानं असाच मरताना पाहिलाए
राग मानापमानापेक्षा
च्यायला असतो जीव मोठा
डोळेझाक करुन ओढून
घ्यायचा सामंजस्याचा मुखवटा खोटा
सगळं सगळं विसरुन चार
दोन तासात चालू होतं रुटीन नेमानं
असंच चालत आलय अन चालू
राहणार हे मुर्दाड मड्याचं जीणं, हे मुर्दाड मड्याचं जीणं
कुणाल प्रकाश रुद्राके.










