आज रोज डे आहे
म्हणे...
शाळेत असताना जाम
अॅट्रॅक्शन वाटायचं च्यायला रोज डे वगैरे प्रकाराचं. शाळेतून घरी येताना नीलायमचा
पूल चढून आल्यावर दमायचो मग पाच-दहा मिनिट पूलावरच्या चिंचेच्या झाडाखाली
थांबायचो. दमल्यामुळे थांबण्यापेक्षा खरंतर रेणूका आणि नू.म.वि.च्या मुली दमून
तिथे स्टॉप घ्यायच्या, वॉटरबॅगमधलं पाणी
प्यायच्या म्हणून आम्ही तिथं थांबायचो. अमुक एस्पी कॉलेजचा रोज किंग झाला अमुक रोज
क्वीन झाली वगैरे गोष्टींची चर्चा चालायची आणि त्यात प्रत्येकजण ईतका हिरीरीनं भाग
घ्यायचा आणि मसाला लाऊन लाऊन सांगायचा की जसं काय च्यायला स्वतः भावे
हायस्कूलमध्ये नव्वी दहावीमध्ये नसून एस्पीला एफ्वाय जेसीलाचे. बरं ही अति
महत्वाची गहन चर्चा चालू असताना रेणूका असो की नू.म.वि. असो दोन्हीपैकी कोणत्याही
शाळेतली मैत्रिण फक्त ओळख दाखवून जरी गेली तरी आपला भाव वधारायचा. शाळेत असूनंही
एस्पी कॉलेजची रोहिणी कालच्या रोज डेला रोज क्वीन झाली हे आख्ख्या जनतेला माहीत
असायाचं, बर नुसतं नाव नाही बरं का
तर रोहिणी कोण ए तेही अगदी तंतोतंत माहीतंच असायचं. प्रत्येकजण एस्पी कॉलेजसमोरुन
जाताना पुढच्या दोनेक वर्षात ईथं अॅमडमिशन घेयचं आणि रोहिणीला रोज डेला रोज
द्यायचा वगैरे स्वप्नं दिवसा ढवळ्या बघायचा, रोहिणी नाही तर किमान गेला बाजार आपल्याला चौथीपासून आवडत
आलेल्या आपल्या बालमैत्रिणीला तरी रोज द्यायचाच असा विचार करत सायकलचा स्पीड कमी
करुन आपसूकंच शाळेत ऊशिरा पोहोचायचा. स्वप्नात रमायचे दिवस होते ते सगळे पण दहावी
झालो आणि डिप्लोमाला अॅिडमिशन घेतलं आणि एस्पीला शिकायचं (म्हणजे बाकीचे धंदे
करायचं) आमचं स्वप्नं आजपर्यंत स्वप्नंच राहीलं. नाही म्हणायला डिप्लोमाचं अॅकडमिशन
होईपर्यंत दोन-तीन आठवडे तेवढा मी एस्पीचा कागदोपत्री विद्यार्थी होतो पण पहिले
दोन आठवडे कॉलेजच्या जिमला मोठ्या ऊत्साहात लावलेली हजेरी सोडता मी एस्पीला
विद्यार्थी म्हणून कधीच गेलो नाही. आमचे रोज असेच न घेताच सुकुन गेले.
डिप्लोमा कॉलेज
म्हणजे तर एक्स्टेंडेड शाळा होती आणि त्यात आम्ही मेकॅनिकल निवडलेलं.. च्यायला
मेकॅनिकल म्हणजे साला पोरींच्या नावानी ठण्ठण गोपाळ पाक दुष्काळंच.... डिप्लोमा,
इंजिनिअरींग सगळं सिंहगडावरंच झालं आमचं.
डिग्रीला मात्र एक पोरगी आली होती आमच्या कॉलेजला जिला तिच्या पहिल्याच दिवशी
कॅफेसमोरच्या पायऱ्यांवर नाव विचारु विचारु भंडावून सोडलेलं आम्ही. तिच ती
कुवेतवरुन आलेली समरीन आवडलेली मला. दोन चार महिन्यात च्यायला रोज डे का नाही यावा
आणि पोरांनी मला फुगवला समरीनला रोज द्यायचा हा कुण्या... बरं मलाही द्यायचाच होता
पण डेरींग कोण करणार च्यायला... बरं डेरींग लाख करु आपण पन तेच्यायला अॅयक्सेप्ट
नाय केला तर ईज्जत का फालुदाच की पाक सगळ्यांसमोर. बर आपण फुशारक्या मारायला पटाईत,
च्यायला मोटमोट्या बाता हानून झालेल्या असताना,
समरीन बरोबर पाच-दहा वेळा बोलून झालेलं असताना
आता आपण दिलेला रोज तिनं नाही घेतला आणि सगळ्यांसमोर आपल्याला हाsssssड म्हणाली तर काय... आयला पण रोज नाय द्यायला
जावं तर अजूनंच नामुष्की... बरं अशावेळेस मित्र लै उदार वगैरे होतात, रेड रोज आणून देणाऱ्यांची संख्या काय कमी
नव्हती. हो नाही हो नाही करत मी आपला एका मित्राकडून पार दुपारी तिन-साडे तीनला एक
रेड रोज घेतला, जाऊ का नको जाऊ
का नको करत कॅफेपाशी घुटमळलो, पोरं म्हणली जा
बे च्यायला म्हणे मी रोज देणार. आता मला पण चेव चढला पण च्यायला ग्यारंटी अशी होती
की ती रोज घेणार नाही, किमान रेड तर
घेणारंच्च्च्च्च्च्च नाही. मग एका मित्राकडून येल्लो रोज घेतला, गौरव लगेच म्हणाला ह्याट तेच्यायला येल्लो
बिल्लो नाही, रेडंच द्यायचा.
मी म्हणलो च्यायला आधी येल्लो देतो, अंदाज तर घिऊ दे रे... ह्याट रेडंच म्हणून गौऱ्यानी मला रेटला. आपण शारुकचे
फ्यान, मोठा सोत्ता शारुक
असल्यागत ब्लेजर आणि मानेच्या मधे रेड रोज ठेवला, येल्लो रोज उजव्या हाताच्या मुठीत झाकून त्याचा देठ
ब्लेजरच्या बाहीत घालून रोजसोबत जीव मुठीत घेऊन चालू लागलो. तळहाताला घाम येऊन आता
पार रोज ओला होयची वेळ आली. जमेल तेवढा सावकाश मी "रीक्वेस्ट अ साँग"
हॉलमध्ये आलो. समरीन तिच्या कोणत्यातरी मित्राबरोबर तितंच होती. आयला रोज द्यायचा
प्रयत्नंच नाही केला म्हणून ईज्जतीचा फालूदा होण्यापेक्षा तिनं नाकारला म्हणून
फालूदा होऊ दे असं ठरवून तिच्याकडं गेलो, मुठीत आणि ब्लेजरच्या बाहीत लपवलेला "येल्लो रोज" तिच्या पुढं करत
म्हणालो फॉर यू... मनात म्हणलं तिच्यायला ईज्जत काढणार ही नाय म्हणून... पण ती
म्हणाली व्हाय येलो रोज?
मी: फ्रेंड्स?
ती: बट आय गेस
वुई आर फ्रेंड्स ऑलरेडी
आयला आता मात्र
मानेमागं ब्लेजरमधे लपवलेला रेड रोज शारुकच्या स्टाईलनं काढायची वेळ आली होती.
घाबरत घाबरत काढला राव तो पण रोज..
मी: देन टेक धिस
ती: व्हाय रेड
रोज?
मी: कॉझ आय लाईक
यू
ती: ओके...
आयला हे म्हंजे
लैच स्वप्नवत वगैरे झाल्तं राव तेव्वा... घेतला होता "रेड रोज" तिनं
कसलेही आढेवेढे न घेता. रेड रोज काय कोणीही कितीही जणांकडून घेतं हे आम्हाला
च्यायला नंतर कळलं, पण त्यादिवशी
पर्यंत तर हिंदी पिच्चरमध्ये बघून असं वाटायचं की एकाकडनंच घेत असतात.
बरं तिनं तो रोज
घेतल्या घेतल्या "रीक्वेस्ट अ साँग" हॉलमध्ये मी जीवाच्या आकांतानं
गौरवला शोधला कारण एकतर त्याकाळात डिजिटल क्यामेरा त्याच्याकडेच असायचा आणि त्यानी
मला लै झाडावर चढवलं होतं रेडंच च्च्च्च्च्च रोज द्यायचा म्हणून... पण माझं ब्याड
लक गौरव जवळपास सापडला नाही. तितक्यात पुष्कराज पाटील डिजिटल क्यामेरा घेऊन
देवासारखा माझ्यासमोर आला, मी जीव खाऊन
पुष्क्याला आवाज देऊन फोटो काढायला सांगितलं. परत एकदा रोज देण्याची पोझ वगैरे
पुष्क्यानी दोनेक क्लिक असे सगळे सोपस्कार पार पडले. रोज घेऊन ती गेली... मी
खुशीखुशीत कोणीतरी रीक्वेस्ट केलेल्या "तुझे देख के मेरी मधुबाला मेरे मन येह
पागल झाला"वर दनका नाचलो. मग परत पुष्क्याला गाठलं म्हणलं भावा फोटो तर दाखव.
पुष्क्यासारखा अप्रतिम कलाकार आजतागायत मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिलेला नाही.
पुष्क्याने संपूर्ण समरीन, तिनं पकडलेला रेड
रोज आणि तो रोज देतानाचा माझा फक्त हात असा फोटो फ्रेममध्ये क्याप्चर केला होता.
बरं त्याची ही जगावेगळी कलाकारी बघून दोनंच मिनिटांपूर्वी "भावा" म्हणून
हाक मारणारा मी त्याला "भ"ची बाराखडी ऐकवली, शिव्यांची लाखोली वगैरे वगैरे वगैरे वाहीली... बरं परत पोज
बिज घेऊन फोटो काढावा म्हणलं तर ती गायब झालेली...
तेच्यायला लहानपणापास्नं घोकलेला रोज डेचा ईस्कुट झाल्ता...
पण ते काय एवढं
महत्वाचं नाही...
महत्वाचं हे आहे
की माझं लहानपणापास्नं जिच्यावर क्रश होतं तिला मी माझा मोबाईल नंबर पैल्यांदा
दिला होता तेव्हा तिनी मला त्या रात्री पहिलाच एसेमेस केल्ता...
"ए रोज फॉर दोज
जिन्हे मिलते नही हम रोज लेकीन याद करते है हर रोज.... गुड
नाईट"
आणि ते
स्वल्पविराम, आणि वेगवेगळी
चिन्ह बिन्ह वापरुन तयार केलेलं गुलाबाचं चित्र...
आत्ता लै क्लिशे
बिशे वाटतं ना च्यायला... पण तेव्वा लै लै पेश्शल होतं..
रोज डे नसूनंही
तोच आजवरचा बेस्ट रोज डे....!
ईतकंच...
केपी आर

No comments:
Post a Comment