Thursday, June 22, 2017

डिजिटल शेती



ती आली तिनं पाहिलं आणि ती जिंकली... ह्यॅट तिच्यायला... यात काय दम नाही...
आजकाल तिच्याकडं कोन लक्ष देणार... लक्ष सगळ्यांचं शेटकडं ए...

शेटचं बगा की कसं झालं... ते आले त्यांनी पायलं... आनि ते जिंकले... अहं... त्येंनी लै काय काय केलंय...

शेट आले, शेटनी पायलं... शेटनी त्येंना जे पायजेले ते लोकांना दाकवलं... लोकांनी पन ते पायलं... लोकं अवाक झाली... तोंडात बोटं बिटं घालून फिरु लागली... मंग तोंडातली बोटं काडून जैजैकार करत हिंडू लागली... अदीमदी दम खाऊन बाकीच्यांच्या अंगावर गुरकायला लागली

बरं येवड्यावरंच नाय थांबले शेट...शेट आले, शेटनी पायलं... शेटनी त्येंना जे पायजेले ते लोकांना दाकवलं...
मग शेट बोलायला लागले... त्येंना जे पायजेले ते त्येंनी लोकांना ऐकवलं... लोकांनी कानात प्रान ओतू ओतू ऐकलं... कान सताड उगडे ठेवले... मेंदूला घट्ट कुलुपं लावली... परत अवाक झाले परत तोंडात बोटं घातली...

म शेट परत आले परत पायलं आनि यावेळेस शेटनी आभिनय केला... लोकं चवताळली... हाताच्या मुठी वळल्या... हवेत हात झाडले... मोटमोट्यानी भारत माता की जै म्हनले... जै हिंद म्हनले... जे म्हनत नाहित त्येंच्यासाटी पाकिस्तान टूरीजमच्या शाका उगडल्या... विजाशिवाय पाकिस्तानची तिकिटं काडली...

म काय शेटला बी हुरुप चडला... शेट येकदा असंच बसल्या बसल्या म्हनले... गाडीखाली कुत्र्याचं पिल्लू पन आलं तं मला लै वाईट वाटतं... लोकांच्या डोळ्यात घळघळा पानी आलं... गांदी बापू नंतर ह्येच आहींसावादी असला विचार आला लोकांच्या मनात... परत अवाक झाले... परत तोंडात बोटं गेली... परत जैजैकार वगैरे...

म येकदा का नाई शेट म्हनले महाभयंकर प्रलयातनं मी माज्या गावच्या पंदरा हज्जार... किती???? पंदरा हज्जार लोकांना हुडकू हुडकू येका दिवसात बाहेर काडलं... लोकांची खात्री पटली ना भौ शेटंच आपले तारनहारेत... म परत येकदा अवाक बिवाक.. जैजैकार बियजैकार...

म शेट परत आले परत पायलं... मग जीवाच्या आकांतानं म्हनले,"च्यांगले दिवस येनारेत"
खलास, विकासाचा बंटा खाऊन लोकं हुरळली गानं म्हनत सुटली, "आमी शेटला घिऊन येनारे... च्यांगले दिवस परत येनारेत"

म शेट येकदा म्हनले... सैनिक सीमेवर प्रान पनाला लावायलेत... आनि आपन त्येंच्यासाटी येक पनती नाय लाऊ शकत? येक दिवा त्येंच्यासाटी..
मग काय यावेळेस लोकं अवाक नाय झाली निसती... पाक भारावून गेली... पाव पाव किलो मिटाई... च्यकली लाडू च्यिवडा बिवडा, बासुंदी, श्रीकंड हानून येकेक दिवा लावून त्या दिव्यातलं त्येल संपायच्या आदी गपगार झोपले बी... झोपले म्हनून.. च्यायला नायतर यावेळी पन तोंडात बोटं बिटं घातली आसती...

म येक दिवस शेटला कायतरी वेगळं करुन दाकवायची हुक्की आली... त्ये आले... त्यांनी पायलं आनि त्ये म्हनले
च्यला बे नोटा बंद करु... काळा पैसा, भ्रष्टाचार, दहशदवाद संपवू... मायला क्याशचं लपडंच नको क्याशलेस हून जाऊ पाक... म्हनले थोडे दिवस सहन करा म काय सुवर्नयुगंच... राम मंदीर काय घ्यून बसलात कडूहो, आख्खं रामराज्यंच आनतो तुमच्यासाटी... जरा कळ सोसा... क्याश भरायला काडायला जरा रांगा लावा... मायला तिकडं सीमेवं काय चाल्लंय.. तुमी हितं रांगंत हुबं नाय राऊ शकत होय?
लोकं लैच ज्यास्तं भारावली, अचंबित अवाक बिवाक झाली... म्येरे द्‌येश की धर्ती बिर्ती आशी गानी मनातल्या मनात म्हनत रांगेत लागली... शेट म्हनले मायला आख्खा द्‌येश लायनीवं आनला का नाय... लोकं म्हनले आता आपन महासत्ता होनार.. होनार म्हंजे काय होनारंच.. आगदी नो डौट होनार... देशप्रेमी रांगेत आनि देशद्रोही रांगेभायेर... काळाबाजारी पाक हास्पिटलाच्या आयश्यूत ग्येले... काय काय देशद्रोही तर मरायला ट्येकले तेव्वा मुद्दाम तेच्यायला रांगेत आले आनि रांग्येत यून मेले... "आरे तिकडं सीमेवं काय आनि तुमी सादं हितं" हे बगता बगता द्‌येशाचं ब्रीदवाक्य झालं...

मदी आदी परत परत शेट येत रायले.. शेटनी परत परत पायलं.. आनि मदीच येकदा तं शेटनी छाती बडवून घितली.. डोळ्ये पुसले... दाटल्येल्या गळ्यानी म्हनले, "त्ये मला मारुन टाकतील"....येका क्शनासाटी का आसंना धस्सकन काळ थांबला, लोकांना हाय आनि लो ब्लड प्रेश्यर येकदमंच जानवलं... जागच्या ज्यागी थिजून जाता जाता लोकं भारावून ग्येली... यावेळी बोटं तोंडात नाय गेली... यावेळी डोळ्ये पुसले बोटांनी..

पंनास दिवसांनी परत शेट आले... त्येंनी परत पायलं.. आता सगळंच करुन झाल्तं तरी यावेळेस शेट म्हनले.... "मित्रोsss...."

टाळ्या शिट्ट्या... सोशल नेटवर्कींग वगैरे सगळीकडं येकंच चर्चा... शेट आलेत शेट आलेत..

शेटचा हा खडतर प्रवास बगून आमचा येक मित्र म्हनला..शेट करतात काय नेमकं?
आमी सांगितलं शेटची शेतीये...
मित्र: कंची म्हनायची शेती?
आमी: गाजराची
मित्र: कितीये?
आमी: लैये... तरी हजार पाश्शे टि.बी. तरी आसलंच
मित्र: टि.बी.? हे आनि कोनतं युनिट काडलाव मोजायचं
आमी: टि.बी. = ट्येराबैट
मित्र: म्हनजे?
आमी: म्हन्जे म्हैत नाय होय अडान्या... डिजिटल शेतीये शेटची
मित्र: डिजिटल? आन ती कशाची?
आमी: गाजराची
मित्र: पन डिजिटल शेतीतनं आलेली गाजरं विकत्यात कशी?
आमी: लैच तिच्यायला गैबान्यावानी विचारायलायेस... डिजिटल शेतीमदली गाजरं विकत नसतात लका.. फक्त दाकवतात
मित्र: हां... तेच्यायला निस्त दाकवून काय होतंय?
आमी: आजवर सगळं गाजरं दाकवून तं झालंय... तू सोड... बोटं शाबूत ठ्येव, आजून लै वेळा तोंडात घालायचीयेत...

शेट आले शेटनी पायलं... लै काय काय क्येलं... आनि मित्रो शेट जिंकले!

(यातल्या सगळ्या घटना बिलकुल काल्पणिक नसून कोनत्यापन गोश्टीचा कोन्याही जिवित किंवा मृत व्येक्तीशी काहीपन संबंद आडळ्ळा तं निव्वळ योगायोग समजन्याची चूक करु नये...)

जै हिंद जै महाराश्ट्र


केपी आर

No comments:

दोघं - भाग १५

  तो मुंबई विमानतळावर पोहोचला . इमिग्रेशन चेक वगैरे सोपस्कार पार पडले होते आणि पुण्याला जाण्यासाठी पुढची फ्लाईट पाच तासानंतर...